सुटीच्या दिवसांत धमाल तर करायची, पण त्याबरोबर पर्यावरणाचं भलं होईल यासाठीही काही काम केलं पाहिजे, असं काही विद्यार्थ्यांनी ठरवलंय. त्यांचा हा पर्यावरणप्रेमी सुटीचा बेत.
कॉलेजची सुटी सुरू झाली की बऱ्याच मुलांचा काय करायचं यावरून गोंधळ उडतो. मित्रांबरोबर टाईमपास करणं, मनसोक्त भटकंती, ट्रेकिंग, जमलंच तर पर्यटन वगैरे.. पण काही कॉलेजची मुलं मात्र सुट्टीचा सदुपयोग करून काही समाजोपयोगी कामं करतात. बरेच विद्यार्थी समर इंटर्नशिप करतात. काही कॉलेजचे विद्यार्थी सुट्टीत निसर्गसंवर्धन, जनजागृती यासाठी आवर्जून प्रयत्न करतात.
असेच काही उपक्रम यावर्षीपासून माटुंग्याच्या रामनारायण रुईया कॉलेजच्या काही विद्यार्थ्यांनी करायचे ठरवले आहेत. प्लॅस्टिक हे पर्यावरणाला हानीकारक, हे सगळ्यांनाच माहिती असतं. पण प्रत्यक्षात प्लॅस्टिक पिशव्यांचा वापर कमी करण्यासाठी आपण काय पावलं उचलतो? विज्ञान शाखेच्या काही विद्यार्थ्यांनी त्यासाठी पावलं उचलायचं ठरवलं आहे.
‘प्लॅस्टिकला विरोध करण्याची सुरुवात आम्ही कॅम्पसपासूनच करण्याचं ठरवलंय’, सेकंड इअर बॉटनीची विद्यार्थिनी सई गिरधारी हिनं तिचा निर्धार बोलून दाखवला.
इतर विद्यार्थ्यांनाही प्लॅस्टिकऐवजी कापडी पिशव्या वापरायला उद्युक्त करण्यासाठी या विद्यार्थ्यांनी सुट्टीच्या दिवसात एक उद्योग लावून घेतला आहे. नवीन वर्षांचं कॉलेज सुरू झाल्यानंतर काही दिवसांतच कॉलेज फेस्टचे वारे वाहतात. या कॉलेज फेस्टमध्ये स्वत: रंगवलेल्या कापडी पिशव्या इतर विद्यार्थ्यांना देण्याचा त्यांचा बेत आहे. त्यासाठी आता कापडी पिशव्या बनवण्याचा उद्योग त्यांनी या सुट्टीत अंगावर घेतलाय. आम्ही घाऊक बाजारातून म्हणजे क्रॉफर्ड मार्केटमधून कापडी पिशव्या आणणार आहोत आणि ‘आय अॅम नॉट अ प्लॅस्टिक बॅग’ असं त्यावर पेंट करणार आहोत, असं सईनं सांगितलं.
रुईयाच्या वनस्पतीशास्त्राच्या प्राध्यापिका डॉ. भावना नरुला यांनी आणखी काही पर्यावरणवादी प्रकल्प सुट्टीसाठी मुलांना सुचवले आहेत. या उपक्रमांमध्ये देशी झाडं लावण्याचा एक प्रकल्प आहे. मुंबईमधून नामषेश झालेल्या झाडांना पुनरुज्जीवन देण्याचा हा उपक्रम आहे. हल्ली मुंबईमध्ये रस्त्याच्या कडेला, सोसायटय़ांमध्ये दिसणारे रेन ट्री किंवा गुलमोहोर ही आपल्याकडची नैसर्गिक झाडं नाहीत. ती मुळात परदेशी झाडं आहेत. तसंच त्यांचा आपल्याकडच्या प्राणी-पक्ष्यांनाही उपयोग नाही. त्याऐवजी काटेसावर, पांगारा, ताडगोळा अशी देशी झाडं विद्यार्थी लावणार आहेत. ‘आम्ही पावसाळ्याच्या आधी म्हणजे मेमध्ये ही झाडं लावणार आहोत. आमच्या बॉटनी एक्सकर्शनच्या वेळी या देशी झाडांच्या बिया आम्ही गोळा करून ठेवल्या होत्या. त्या या सुट्टीत आपापल्या सोसायटय़ांच्या परिसरात रुजवणार आहोत.’ असं बॉटनीच्या विद्यार्थ्यांनी सांगितलं.
पूर्वी मुंबईमध्ये सहज नजरेस पडणाऱ्या पण हल्लीच्या काळात क्वचितच दिसणाऱ्या काटेसावर, पांगारा अशा झाडांच्या बिया शहराबाहेरच्या जंगलातून गोळा करून त्या मित्रपरिवारामध्ये वाटण्यात येतील आणि ती झाडं वाढवून त्यांना सोसायटय़ांमध्ये लावण्यात येणार आहे.
मुंबईमध्ये वाढणाऱ्या काचेच्या इमारतींचं प्रमाण आणि त्यांची नसलेली गरज यावर जनजागृती करण्याचाही या विद्यार्थ्यांचा मानस आहे. हल्ली मेट्रोपॉलिटन मुंबईमध्ये काचेच्या बिल्डिंगचं वाढणारं प्रमाण लक्षणीय आहे. पण काचेच्या बिल्डिंगची मूळची संकल्पना ही युरोपातली! तिकडच्या थंड वातावरणाला डोळ्यापुढे ठेवून या इमारतींची निर्मिती करण्यात आली. जेणे करून इमारतीच्या आतील वातावरण ऊबदार राहण्यास त्याचा उपयोग होईल. आपला देश हा उष्णकटिबंधात मोडणारा, तरीसुद्धा ही संकल्पना आपण जशीच्या तशी अमलात आणली. परिणामी इमारतींच्या आत तापमान वाढतं आणि ते कमी करण्यासाठी एअरकंडिशनरचा वापर वाढतो. पर्यायानं विजेच्या वापरात भरमसाट वाढ झाली आहे.
‘एका अर्थाने यामुळे आपल्या नैसर्गिक साधनसंपत्तीवर अधिकच ताण वाढला. याविषयी विविध माध्यमांचा वापर करून जनजागृती करण्याचे काम करणार आहेत. या उपक्रमात प्रथम व द्वितीय वर्षीच्या विद्यार्थ्यांनी भाग घेतला आहे’, सई म्हणाली.
पर्यावरणप्रेमी मित्रमैत्रिणी सुट्टीचा असा सदुपयोग करताहेत हे पाहून आपणही काही हातभार लावू शकतो, असं वाटतंय का, आम्हाला तुमच्या सुट्टीचे असे काही वेगळे उपक्रम नक्की कळवा.
पर्यावरणप्रेमाची सुटी
सुटीच्या दिवसांत धमाल तर करायची, पण त्याबरोबर पर्यावरणाचं भलं होईल यासाठीही काही काम केलं पाहिजे, असं काही विद्यार्थ्यांनी ठरवलंय. त्यांचा हा पर्यावरणप्रेमी सुटीचा बेत.
First published on: 11-04-2014 at 01:15 IST
मराठीतील सर्व लेख बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: College student work for the benefit of environment during holidays days