श्रावण हा रंगांचा उत्सव असतो, असं म्हटलं जात. श्रावणमासी हर्ष मानसी हिरवळ दाटे चोहीकडे..तो तजेलदार हिरवा रंग, सणा-सुदीचे दिवस असल्यानं रंगलेलं वातावरण, हातावरची मेंदी, क्षणात येणाऱ्या ससरसर शिरव्यांना सारून ऊन पडल्यावर दिसणारं ते इंद्रधनुष्य. रंग म्हटल्यावर समोर येतं ते हेच सप्तरंगी इंद्रधनुष्य. काळ्या, करडय़ा ढगांच्या पाश्र्वभूमीवर, मधूनच डोकावणाऱ्या सूर्याकडे बघणारं इंद्रधनुष्य. निसर्ग ही रंगाची उधळण सूर्य आकाशात असतानाच करतो. रंगांची जादू प्रकाशातच जमून येते.
माणसाच्या डोळ्यांना शेकडो रंग दिसू शकतात. लाल, निळा, पिवळा आणि त्याच्या असंख्य शेड्स. आता हे सगळे रंग कापडावर उतरवता येतात. आपल्याला रंगांमध्ये केवढा तरी चॉईस असतो. रंगज्ञान म्हटलं तर अगदी सोपं पण तरीही फॅशनमध्ये रंगाचं महत्त्व आपल्याला कळतं पण सहज वळत नाही, हे खरं. एखादा रंग तुमच्यावर खुलून दिसतो. तर एखाद्या रंगाचे कपडे अंगावर डल वाटतात. तोच रंग मैत्रिणीच्या अंगावर मात्र सुरेख दिसतो. एखाद्या रंगाच्या कपडय़ात तुम्हाला वाटतं आपण जाड दिसतोय. हे असं का होतं?
रंग हे खरं तर फोर्सेस आहेत. प्रत्येक रंगाचं एक वैशिष्टय़ आहे. ते वैशिष्टय़ जाणून आपल्या व्यक्तिमत्त्वाशी सांगड घातली तरच हे रंगज्ञान पूर्ण झालं असं म्हणता येईल. मूळ रंगांचा विचार केला तर लक्षात येईल, लाल रंग तीव्र भावनांचं प्रतीक आहे. लाल म्हणजे धोका, लाल म्हणजे राग, आक्रमकता, पॅशन. फायर ब्रिगेड, पोस्ट बॉक्स लाल असतात ते यासाठी. पण तरीही लाल रंग प्रेमाचं प्रतीकसुद्धा असतोच ना.. म्हणून तर लाल गुलाब प्रेमाचं प्रतीक मानून देण्याची पद्धत आहे. तो तितकाच भावनिक रंग आहे. पॅशनेट रंग आहे. तो सीन आठवतोय.. ़? कुछ कुछ होता है या चित्रपटात काजोल अगदी इमोशनल सीनमध्ये आपला लाल दुपट्टा राणी मुखर्जीच्या अंगावर फेकते.. लग्न झालेल्या स्त्रियांनी लाल कुंकू लावायची पद्धत आहे. याचं कारण लाल रंगात ती ताकद आहे, प्रेम आहे आणि पॅशनसुद्धा आहे. मैत्रीचा, विश्वासाचा रंग आहे. या शिवाय गुलाबी रंग म्हणजे हळवं प्रेम, जांभळा रंग शाही असं म्हणतात.
मी या सगळ्यात अजून पांढरा आणि काळ्या रंगांचा उल्लेख मुद्दाम केला नाही. कारण रंगांची थिअरी सांगते, हे रंग नाहीतच. पांढरा म्हणजे रंग आहेत आणि काळा म्हणजे रंग नाहीत. पण तरीही हे दोन न्यूट्रल्स आपल्यावर चांगला प्रभाव टाकतात. पांढरा हा रंग सकारात्मक, शुद्ध, स्वच्छ आणि निरागसतेचं प्रतीक आहे. म्हणून ख्रिश्चन धर्मात वधू पांढरा गाऊन घातले. पण हिंदू धर्मात मात्र पांढऱ्या रंगाचं स्थान शोकसभांमध्ये असतं. कारण हा रंग शांतीचंही प्रतीक आहे. काळा रंग पांढऱ्याच्या विरुद्ध. तो निगेटिव्ह कलर आहे, असं मानलं जातं. काळा रंग निराशेचं, दुर्दैवाचं प्रतीक मानतात. आता आपल्या व्यक्तिमत्त्वाला कुठचा रंग शोभेल, कुठल्या ऑकेजनला काय रंग वापरला पाहिजे, कुठल्या पॅटर्नसाठी काय रंग आपल्याला चालणार नाही हे या मुख्य रंगज्ञानानंतर समजणं सोपं जाईल.

Story img Loader