प्रेक्षकांच्या तुडूंब गर्दीत आणि उत्साहात या वेळचा व्हिवा लाऊंज रंगला. अश्विनी यार्दी यांच्या कर्तबगार तरीही मोकळ्या आणि संवादी व्यक्तिमत्त्वाची छाप सगळ्यांच्याच मनावर कोरली गेली.
कार्यक्रम खूपच छान झाला. या क्षेत्रात काहीतरी करण्याची प्रेरणा मिळाली. मला टेलिव्हिजन क्षेत्राची आवड आहे, त्यामुळे मला खूप गोष्टी अश्विनी यार्दी यांच्याकडून ऐकायला मिळाल्या तेव्हा मस्त वाटलं. मी जेव्हा माझ्या करिअरची सुरुवात करेन तेव्हा मला नक्कीच त्यांनी सांगितलेल्या टिप्सचा फायदा होईल. आजच्या कार्यक्रमामुळे या क्षेत्राकडे येण्याविषयीचा माझा आत्मविश्वास अजून वाढला.
आज एवढय़ा कर्तृत्ववान व्यक्तीला जवळून पाहताना आणि ऐकताना मी भारावून गेले होते. कोणत्याही क्षेत्रामध्ये आपलं टॅलेंट कसं उपयोगास आणू शकतो आणि त्यासाठी काय करणं गरजेचं असतं हे आजच्या कार्यक्रमातून शिकता आलं. अश्विनी यांचा आत्मविश्वास, टॅलेंट आणि त्यांचा स्मार्टनेस मला जास्त भावला आणि त्यामुळेच एक पॉझिटिव्ह एनर्जी मिळाली.
पडद्यावरचं चित्र, कलाकार आपण नेहमीच पाहत असतो; परंतु पडद्यामागे कसं काम चालतं, काय आव्हानं असतात हे आज अश्विनी यांच्याशी साधलेल्या संवादातून नेमकेपणाने कळलं. या क्षेत्रात येणाऱ्या सगळ्याच मुलींसाठी त्यांनी सांगितलेले अनुभव महत्त्वाचे आहेत. मला आजच्या कार्यक्रमातून खूप वेगळं जग जाणून घेता आलं आणि असंच काहीतरी धडाडीचं करण्याची प्रेरणा मिळाली.
मलासुद्धा टीव्ही- सिनेमा या क्षेत्रांमध्ये इंटरेस्ट आहे. आज या कार्यक्रमामुळे या क्षेत्रातदेखील मुली यशस्वी होऊ शकतात यासाठी मार्गदर्शन मिळालं. आवडीला करिअरमध्ये रूपांतरित करण्यासाठी कशी मेहनत घ्यावी लागते, याचं उदाहरण आज अश्विनी यार्दीच्या रूपाने आम्हा सगळ्यांनाच अनुभवता आलं.
आज अश्विनी यार्दीचा २० वर्षांचा अनुभव त्यांनी आम्हा सगळ्यांशी शेअर केला. तो अनुभव ऐकताना खूपच छान वाटत होतं आणि मुख्य म्हणजे आपणही असं काही तरी करावं यासाठी प्रेरणा मिळाली. टीव्हीवरची सीरिअल बघताना त्याच्या मागच्या विचारांची, स्ट्रॅटेजीची आणि मेहनतीची कल्पना येत नाही, पण त्यामागे अश्विनी यार्दीसारख्या क्रिएटिव्ह व्यक्तींची मेहनत असते आणि म्हणूनच ते कार्यक्रम लोकप्रिय होऊ शकतात. आज खूप गोष्टी नव्यानं कळल्या. यांच्यासारखं काही तरी करून दाखवायचा उत्साहही वाढला.
अश्विनी यार्दी यांच्या मुलाखतीचे व्हिडिओ पाहण्यासाठी भेट द्या http://www.youtube.com/LoksattaLive
संकलन : अनुश्री फडणीस, छायाचित्र : गार्गी गीध