|| वेदवती चिपळूणकर

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हाऊस सकीपिंग हा व्यवसाय नाही, तर यात केवळ लोकांची घरं स्वच्छ करून देणं असतं, इतकंच लोकांच्या डोक्यात येतं. इतरांची घरं स्वच्छ करण्यात कसला बिझनेस आणि काय त्या बिझनेसचं भविष्य अशा दृष्टीने अनेक जण याकडे बघतात.

नेहा परब हिचं शिक्षण कॉमर्समधलं. बीकॉम झाल्यानंतर बाबांच्याच कंपनीत तिने काम करायला सुरुवात केली. बाबांचा व्यवसाय हाऊ सकीपिंगचा होता. मोठमोठय़ा कॉर्पोरेट कंपन्या त्यांच्या क्लाएंट्स होत्या. मात्र त्यात फारसा रस नसलेल्या नेहाने तिचं काम केवळ अकाऊंट्सपुरतंच मर्यादित ठेवलं. दोन वर्ष बाबांच्या कंपनीत अकाऊं ट्स डिपार्टमेंट सांभाळल्यानंतर तिला स्वत:च्या व्यवसायाची कल्पना सुचली. बाबांच्या कंपनीच्या अंतर्गतच तिने स्वत:ची कल्पना राबवायला सुरुवात केली आणि चार वर्ष तो व्यवसाय बाबांच्या कंपनीच्या माध्यमातून चालवला. या चार वर्षांत हळूहळू तयारी करून तिने स्वत:चा व्यवसाय स्वतंत्र केला. आता ती तो व्यवसाय समर्थपणे सांभाळते आहे. ‘डायल फॉर क्लीन होम’ या नावाने तिने तिचा व्यवसाय उभारला आहे.

बाबांचाही साधारण समान स्वरूपाचा व्यवसाय असताना ही वेगळी कल्पना कशी सुचली हे सांगताना नेहा म्हणते, ‘‘बाबांच्या कंपनीत मी काम करत होते. मात्र त्यांचे सगळे कॉर्पोरेट क्लाएण्ट्स होते. कॉर्पोरेटसारख्या मोठय़ा क्लाएण्ट्सना मी सांभाळू शकेन, असं मला वाटत नव्हतं. इतक्या मोठय़ा प्रमाणावर काम करणं माझ्या क्षमतेच्या पलीकडे आहे, असं माझं मत होतं. मात्र त्याच वेळी माझ्या डोक्यात नवीन कल्पना तयार होत होती. कॉर्पोरेट क्लाएण्ट्सना हँडल करणं मला शक्य नसलं तरी वेगळ्या दिशेने मी हा व्यवसाय वाढवू शकत होते. घरांना हाऊ सकीपिंगची सेवा पुरवता येईल असं मला वाटायला लागलं. मात्र थेट स्वत:ची वेगळी कंपनी सुरू करण्याची मला गरजही वाटली नाही आणि बाबांच्या कंपनीच्या कामाचा या सगळ्यासाठी हातभारच लागला असता. बाबांच्या कंपनीतली कामसू माणसं मला या कामातही मदत करणार होती. मात्र लोकांच्या घरी जाऊ न काम करायचं असल्याने मी निवडून निवडून माणसं माझ्यासोबत घेतली,’’ असं नेहा सांगते. २०११ ते २०१५ ही चार वर्ष बाबांच्या कंपनीच्या नावानेच मी या व्यवसायात पाय रोवायला सुरुवात केली. बाबांच्या कंपनीचं नाव होतं, काम होतं, माणसं होती आणि मुख्य म्हणजे सपोर्ट होता, असं सांगणाऱ्या नेहाने या चार वर्षांत मिळालेल्या पाठिंब्यावर आपली स्वतंत्र व्हायची तयारी टप्प्याटप्प्याने पूर्ण केल्याची माहिती दिली.

नेहाचे बाबा याच व्यवसायात असल्याने घरातून कोणत्याच प्रकारे तिला कधीच विरोध झाला नाही. घरच्यांनी तिच्या नवीन व्हेन्चरला प्रोत्साहनच दिलं आणि तिच्या पाठीशी उभे राहिले. मित्रपरिवार आणि आईबाबा यांचा खंबीर पाठिंबा तिला होता. मात्र तिच्याशी संबंधित इतर अनेकांना तिचा हा व्यवसाय काही विशेष रुचला नाही, असं ती म्हणते. बाबाही हाऊ सकीपिंगमध्ये आणि आता मुलगीही तेच करणार असा साधारणत: त्यांचा दृष्टिकोन होता. याबद्दल बोलताना नेहा म्हणाली, ‘‘हाऊ सकीपिंग हा व्यवसाय नाही, तर यात केवळ लोकांची घरं स्वच्छ करून देणं असतं. इतकंच लोकांच्या डोक्यात येतं. इतरांची घरं स्वच्छ करण्यात कसला बिझनेस आणि काय त्या बिझनेसचं भविष्य अशा दृष्टीने अनेक जण याकडे बघतात. कसला बिझनेस आहे हे कळल्यावर अनेकांनी लग्नाला नकार दिल्याचेही माझे अनुभव आहेत,’’ असं ती सांगते. माझं अरेंज मॅरेज असल्यामुळे माझा व्यवसाय ही माझी पहिली अट होती. मात्र हाऊ सकीपिंगला लोक व्यवसायच मानत नसल्याने अनेकांना ते पसंत पडलं नाही. मात्र आता माझ्या लग्नानंतर माझे सासू-सासरे आणि नवरा सगळेच खूप सपोर्टिव्ह आहेत. मी कोणत्याही फंक्शनमध्ये असले तरी माझे कामाचे फोन येतच असतात. माझं कायम बिझी असणं आणि चोवीस तास कामाच्या विचारांत आणि व्यापात बुडलेलं असणं हे त्यांनी खूप सहजपणे आणि मनापासून स्वीकारलं असल्याचं नेहा म्हणते. केवळ घरच्यांचाच नाही तर तिचे मित्रमैत्रिणीही या सगळ्यात खूप सपोर्टिव्ह असल्याचं तिने सांगितलं. एरवी साधारणत: फॅमिली किंवा फ्रेण्ड्सना त्यांच्यासोबत असताना कामाच्या गोष्टीत लक्ष घालणं, कामाचे फोन घेणं, कामाबद्दल बोलणं वगैरे आवडत नाही किंवा फारसं पटत नाही. मात्र माझ्या जवळच्या व्यक्ती याबाबतीत वेगळ्या ठरल्या. त्यांच्या या समजून घेण्यामुळे मला काम करणं सोपं जातं, असं सांगणाऱ्या नेहाला या सगळ्याचा होणारा सकारात्मक फायदा तिच्या बोलण्यातून सहज जाणवतो.

हाऊसकीपिंग म्हणजे क्लाएण्ट्सच्या घरी जाऊन काम करायचं असतं. त्यामुळे साहजिकच त्यातली आव्हानं वेगळी असतात. क्लाएण्ट्सबद्दल बोलताना नेहा उत्साहाने सांगते, ‘‘लोकांच्या घरी जाऊन काम करण्यासाठी आपली विश्वासार्हता सिद्ध करणं महत्त्वाचं असतं. आपल्याकडे काम करणारी लोकं तेवढी कामसू आणि विश्वासू असली पाहिजेत, त्यांनी आपलं ऐकलं पाहिजे, समजून घेऊन आणि प्रामाणिकपणे काम केलं पाहिजे आणि या सगळ्यावर आपलं लक्ष असलं पाहिजे, असं ती सांगते. माझे कित्येक क्लाएण्ट्स देशाबाहेर राहतात. त्यांचा इथे येण्याचा बेत ठरला की मला फोन येतो. घराच्या किल्लीची सोय त्यांनी शेजारी, नातेवाईक, मित्र अशांकडून करून ठेवलेली असते. घर माझ्या ताब्यात देऊन ते येण्याच्या आधी संपूर्ण रेडी करण्याचं काम माझं असतं. घरातल्या व्यक्ती स्वत: इथे नसताना त्यांच्या घरात काम करणं ही खूप मोठी जबाबदारी असते. मात्र अशा वेळी आपल्या कष्टाने कमावलेल्या या विश्वासार्हतेचं स्वत:लाच कौतुक वाटतं आणि आत्मविश्वास वाढतो. सुरुवातीला माझ्या व्यवसायाला नावं ठेवणाऱ्या, दुय्यम समजणाऱ्या आणि मला हसणाऱ्या लोकांनी जेव्हा मला सेलेब्रिटींसाठी काम करताना पाहिलं तेव्हा मात्र त्यांची मतं बदलायला सुरुवात झाली. मोठमोठे सेलेब्रिटी माझ्यावर विश्वास ठेवून प्रत्यक्ष घरातलं काम सोपवतात हे पाहिल्यावर त्यांना माझ्या व्यवसायाचं महत्त्व पटलं आणि प्रतिष्ठाही जाणवली, हा नेहाचा अनुभव खरोखरच विचार करायला लावणारा आहे.

आपलं घर स्वच्छ करणारे म्हणजे कोणी तरी दुय्यम दर्जाचं काम करणारे लोक असतात, ही मानसिकता बदलायला अशाच प्रेरणादायी गोष्टी मदत करतात. सगळ्यात विश्वासू सहकारी म्हणून त्यांच्याकडे पाहण्याची दृष्टी देतात. जो हे काम करतो तोही दुय्यम आणि ज्याला स्वत:च्या घराकडे लक्ष द्यायला वेळ होत नाही म्हणून ही कामं बाहेरच्यांना सांगावी लागतात तोही दुय्यम अशी एक पारंपरिक विचारसरणी आपल्यात रुजलेली आहे. नेहा परबसारख्या उद्यमशील स्त्रिया असे प्रवाहाबाहेरचे व्यवसाय उभारतात आणि यशस्वीरीत्या त्याची वाढही करतात तेव्हा या विचारसरणीला छेद देण्याची आशा निर्माण होते.

एखाद्या स्त्रीने बॉसिंग करणं हे कोणत्याही पुरुषाला थोडं कठीण जाताना दिसतं. त्यात माझ्या व्यवसायात तर मी ऑफिसमध्ये बॉसिंग करते आणि सगळे पुरुष वर्कर्स फिल्डवर काम करतात. याउलट कॉम्बिनेशनमुळे कधीकधी जास्त त्रास होतो. काही वेळा हा त्रास जाणूनबुजून दिला जातो, तर काही वेळा तो त्यांच्या वर्षांनुवर्षांच्या पारंपरिक विचारांतून साहजिकपणे आलेला असतो. मात्र आपण आपल्या कृतीवर आणि निश्चयावर ठाम असलं की मागे वळून पाहण्याचा विचारही मनात येत नाही.   – नेहा परब

viva@expressindia.com

मराठीतील सर्व व्हिवा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Commercial cleanliness house skipping neha parab