रिलेशनशिपमध्ये चढउतार होतातच. पण हल्ली तेसुद्धा स्टेटस बनलंय. ‘इट्स कॉम्प्लिकेटेड’ असं उत्तर आलं की. कुछ तो गडबड है, हे उघड आहे. पण ही गडबडसुद्धा हल्ली बरीच कॉमन झालीय. ही काही उदाहरणं.. श्वेता आणि मिहिर. श्वेताच्या डोळ्यांत ऑलमोस्ट विहिरी भरलेल्या. ‘नको ना जाऊस इतक्यात’. मिहिरला पुढे काय बोलावं सुचलंच नाही. ‘अगं, असं कसं?’, एवढंच बोलून तो गप्प बसला. हल्ली प्रत्येक परतीच्या क्षणी तिची अशीच घालमेल व्हायची. श्वेता आणि मिहिरच्या ‘रिलेशनशिप’ला साधारण वर्ष होत आलं असावं. शाळेतल्या मत्रीचं रूपांतर प्रेमात झालं म्हणून दोघंही खूश होते. पुढे शिक्षणासाठी तो पुण्याला गेला आणि नियमित भेट होईनाशी झाली. भेट झाली तरी तिचा समारोप हा असा ठरलेला. ‘लाँग डिस्टन्स रिलेशनशिप’मुळे निर्माण झालेली ही पोकळी दरीत रूपांतरित झाली ते त्यांचं त्यांना कळलंच नाही. एव्हाना ‘कमिटमेंट’ची जागा ‘कॉम्प्लिकेशन्स’नी घेतली होती. श्वेताची सतत होणारी चिडचिड, मिहिरचा अभ्यासावरून ढळलेला फोकस, तिच्या डोक्यातला संशय.. हे त्याचेच परिणाम होते. त्यांचं हे ‘नातं’ कॉम्प्लिकेट झाल्याचं दोघांनाही उमजलं तेव्हा शेवटी त्यांनी एक ‘पॉझ’ घ्यायचं ठरवलं. ‘ब्रेक के बाद’ विचार करण्याचा निर्णय घेतला. हा ब्रेक म्हणजेच स्टेटस ‘कॉम्प्लिकेटेड’ असणं.
प्रिया सध्या लेक्चरमध्ये ‘डे ड्रीमिंग करत असते’. तिचं ग्रूपमधल्या गप्पांमध्येसुद्धा फारसं लक्ष नसतं. गेल्याच आठवडय़ात तिला मयूरनं प्रपोज केलंय. तिनं अजून काहीच उत्तर दिलं नाहीय. त्यानं विचारल्यावर धक्का बसला असं तिनं दाखवलं आणि उत्तर देण्यासाठी वेळ लागेल म्हणाली. पण खरं तर प्रियाबद्दल मयूरला सॉफ्ट कॉर्नर आहे, हे ग्रूपमध्ये सगळ्यांनाच माहिती होतं. प्रियाला खरं तर मयूरपेक्षा रूपेशमध्ये जास्त ‘इंटरेस्ट’ आहे. पण रूपेश ‘कमिटेड’ आहे. म्हणजे मयूरबद्दल विचार करायला तिची हरकत नाहीय सध्या, या निष्कर्षांपर्यंत ती येणार असं दिसतंय. एकूण काय.. इट्स कॉम्प्लिकेटेड.
कॉलेजच्या ग्रूपमध्ये नीट डोकावलात तर लक्षात येईल दहामधल्या नऊ मुली हल्ली ‘कमिटेड’ असतात. ‘रिलेशनशिप’च्या या लाटेने एक नवा ट्रेंड समोर आणलाय ‘हाफ गर्ल फ्रेंड – हाफ बॉयफ्रेंड’चा ! हे काहीसं ‘फ्रेंडशिप से जादा – रिलेशनशिप से कम’ असं प्रकरण असतं. म्हणजे असं एखादं ‘कपल’ कमिटेड नसतं. पण, स्वत:ला  एकमेकांचे ‘बॉयफ्रेंड- गर्लफ्रेंड’ म्हणवून घेण्यात त्यांना काही प्रॉब्लेम नसतो.
ग्रूपमध्ये चार मुली- चार मुलं असतील आणि त्यातली तीन कपल्स असतील तर उरलेल्या दोघांना एकमेकांचं गर्लफ्रेंड- बॉयफ्रेंड होणं क्रमप्राप्त असतं. पण, त्यातूनही खूप कॉप्लिकेशन्स निर्माण होतात. अशीच एक ‘हाफ गर्लफ्रेंड’ म्हणाली, ‘समोरासमोर जरी आम्ही काहीच वाटत नसल्याचं दाखवत असलो तरी आमच्यातला ‘ट्रस्ट’ कुठेतरी हरवत चाललाय. त्याची अशीच दुसरीही गर्लफ्रेंड (किंवा गर्लफ्रेंड्स) असल्या तर? हा विचार सतत मनात येऊन हल्ली मला त्रास व्हायला लागलाय. त्याचं वागणंही खूप बदललंय.’ या मुलीचं थोडक्यात ‘आ बल मुझे मार’ झालं होतं. ती स्वत:च या परिस्थितीला जबाबदार होती. आता तिला ‘तो’ सोडून जाईल अशी भीती वाटायला लागली होती. गमतीगमतीत सुरू झालेल्या या गोष्टीने सीरियस वळण घेतलं होतं. पण, फक्त तिच्याच बाजूने!
या सगळ्या मुलींपेक्षा खूप वेगळा विचार करणारी एक मुलगी भेटली. ती म्हणाली, ‘प्रत्येक व्यक्ती आयुष्यात येण्यामागे एक पर्पज असतं. काही व्यक्ती आयुष्यातून निघून जातात, तेव्हा तुमच्या आयुष्यातला त्यांचा ‘रोल’ संपला असं समजावं. येणाऱ्या भविष्यकाळाचं आनंदाने स्वागत करावं. आयुष्यात येणाऱ्या या कॉम्प्लिकेशन्सकडे पॉझिटिव्हली पाहीलं तर ती आव्हानं तुम्हाला खूप काही शिकवणारी.’
सो आजचा सुविचार- ‘एव्हरी सिंगल डे यू मेक अ चॉईस. सो, लेट्स चूझ हॅपीनेस ओव्हर एव्हरीिथग. स्प्रेड इट एव्हरीव्हेअर. कीप स्माईलिंग 🙂

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा