मी एकवीस वर्षांची फ्युचर ओरिएन्टेड मुलगी आहे. बी.कॉम. केलंय. नववीमध्ये होते तेव्हा फर्स्ट टाइम प्रेमात पडले. आता या मोमेंटला वाटतं की ते अ‍ॅट्रॅक्शन होतं. तो मला आवडतो हे मी त्याला सांगितलं. त्यानंसुद्धा खूप विचार करून होकार दिला. रिलेशन तेवढं डीप नव्हतं. पण जेव्हा तो ग्रॅज्युएट झाला आणि मी बारावी पास, तेव्हा त्यानं मला लग्नासाठीची इच्छा दर्शवली, बट ओन्ली व्हेन बी सेटल्ड! सहा वर्षे झाली, आम्ही अजून रिलेशनशिपमध्ये आहोत. पण आता अशी वेळ आली आहे की, दर दोन-तीन दिवसांनी भांडणं होतात. एकमेकांच्या सवयी माहिती असूनसुद्धा सहन होत नाहीत आणि आता सोडावंसं पण वाटत नाही. आता कळतच नाही की, परत त्याला समजावू, त्याच्या जवळ जाऊ, की रिलेशनच्या बाहेर पडू, मी काय करू?
भावना

हाय भावना,
तू नववीत असताना बारावीतला एक मुलगा आवडला म्हणून त्याला तसं जाऊन सांगितलंस, म्हणजे चांगलंच डेअरिंग केलंस तू! अर्थात त्या वेळच्या भावनांची तीव्रताच तितकी असते म्हणा! परिणामांची चिंता न करता धाडकन् मनात येईल ते करायचं! त्याचबरोबर अनिश्चितता खूप असते मनात. पण त्या वेळच्या हार्मोन्सच्या लाटेवर स्वार होऊन तू धाडस केलंस. तुम्ही सेटल झाल्यावर लग्न करायचं ठरवूनही आता तीन वर्षे झाली. मग आता लग्न करण्याच्या दिशेनं काही हालचाली सुरू झाल्या आहेत का? तो काय करतो आता? आणि घरच्यांचं काय? त्यांची संमती आहे?
स्टॅटिस्टिक्स सांगतं की, शालेय जीवनात प्रेमात पडलेल्यांपैकी फक्त साधारण पाच टक्के रिलेशन्स लग्नापर्यंत पोहोचतात. इतकं कमी परसेंटेज असण्याची कारणं अनेक. काहींना तुझ्यासारखा लव्ह आणि अ‍ॅट्रॅक्शनमधला फरक समजायला लागतो, काहींना सुरुवातीचा प्रेमळ भर ओसरल्यावर एकमेकांचे स्वभाव अगदीच जुळत नाहीयेत जाणवतं. काहींच्या शिक्षणात तफावत पडते, म्हणजे दोघांपैकी एक जण खूप शिकतो, एक जण कमी. कधी दूरगावी, परदेशी जाण्यामुळे अंतर पडतं, कधी दुसऱ्या कुणाबद्दल प्रेम वाटायला लागतं. कधी जोडीदाराविषयीच्या कल्पना बदलतात, तर कधी तसं काहीच कारण नसताना दुरावा येतो. खरं सांगायचं तर टीनएजमध्ये असताना लग्न, सहजीवन, मुलं या सगळ्याविषयी विचार करण्याची क्षमताच अजून डेव्हलप झालेली नसते. त्यामुळे त्या संदर्भात घेतले जाणारे निर्णय अपरिपक्व असतात आणि बऱ्याचदा चुकीचे.
तुमच्या दोघांच्या नात्याविषयी बोलायचं झालं तर सुरुवातीला फारसं डीप नसलेलं नातं काही काळानं लग्नाच्या निर्णयापर्यंत पोहोचलं आणि आता एका वेगळ्याच वळणावर अडकलंय. ही धाकधूक, आपलं पटेल की नाही ही शंका लग्न करणाऱ्या सगळ्यांच्या मनात थोडय़ाफार प्रमाणात असते. तुम्ही एकमेकांना चांगले ओळखत असल्यानं ही शंका जरा जास्त असेल. पण अशी सिच्युएशन लग्नानंतरही उद्भवू शकते बरं का! नात्यातून माघार घ्यावी की काय हे फीलिंग तुझं एकटीचं आहे की म्युच्युअल? म्हणजे त्याच्या वागण्या-बोलण्यातून त्याला ‘नको’ झालंय आता, असं काही तुला जाणवतं? तुमच्या कॉमन मित्रमैत्रिणींचं तुमच्या नात्याबद्दल काय मत आहे? आयुष्यात तो आता ज्या आर्थिक, सामाजिक परिस्थितीला पोचलाय, त्याविषयी तू फारशी समाधानी नाहीयेस का? तुमच्या भांडणांचे विषय काय असतात? आणि हो, तुम्ही फिजिकली कुठपर्यंत गेला आहात? तसं तुमचं लग्नाचं वय अगदीच उलटून चाललंय असं नाही. पण तुम्हाला दोघांनाही या सगळ्याचा सोक्षमोक्ष नीट लावून काहीतरी निर्णय घ्यायला हवा. मे बी, तू सगळं एकदा लिहून काढ आणि मग त्याच्याशी शांतपणे बोल. त्यातून तुला अनेक गोष्टी क्लिअर होतील. मात्र यात तुझी पण चूक असण्याची शक्यता मोकळेपणानं स्वीकारण्याची तयारी ठेव. अगदीच एकमेकांशी सरळ बोलणं शक्य नसेल तर एखादी विश्वासाची प्रौढ व्यक्ती किंवा समुपदेशक यांची मदत घे. हे नातं नाकारण्याची किंवा नाइलाजानं स्वीकारण्याची घाई करू नकोस आणि गरज वाटल्यास स्पष्टपणे ‘नाही’ म्हणायला बिचकू नकोस.
* Good relationships don’t just happen. They take time, patience and two people who truly want to be together. *

विचारा तर खरं…
तरुणपणात निसर्गनियमाप्रमाणे प्रेमात पडायला होतंच. अर्थात ओघानं प्रेमभंगही आलाच. नवीन नाती, नवीन अभ्यासक्रम, नवीन जॉब आणि त्यांमधल्या गुंतागुंती. शरीराविषयी शंका, निर्णयांविषयी शंका असं खूप काही मनात सुरू असतं. खरं तर शंका खूप जेन्युईन असते पण ऐकणारा काय म्हणेल, हसेल की काय असं वाटतं. कुणाला विचारावं हेही कळत नाही. तुम्हाला वाटतंय असं काही? मग हा कॉलम आहे खास तुमच्यासाठी, तुम्हाला पडत असलेल्या प्रश्नांना वाट देण्यासाठी. इथे तुम्हाला वाटणाऱ्या शंकेला कुणी नाकं मुरडणार नाहीये की फालतू म्हणून त्या निकालात काढणार नाहीये. बिनधास्तपणे त्या शेअर करा. viva@expressindia.com या आयडीवर. सब्जेक्टलाईनमध्ये ओपन अप असं लिहायला विसरू नका.

Story img Loader