|| तेजश्री गायकवाड

वर्षभरानंतर आपण सगळे पुन्हा एकदा या महिन्यात ‘जैसे थे’ परिस्थितीत अडकलो आहोत. करोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे पुन्हा एकदा ‘घर पे रहो’ हे मिशन सुरू झालं आहे. अनलॉकमध्ये हौसेने घेतलेले कपडे पुन्हा एकदा तसेच कपाटात बसलेले आहेत. मग अशा वेळी तुम्ही म्हणाल की, फॅशनमध्ये काय ट्रेण्डिंग आहे किंवा कोणता सीझन सुरू आहे याने काय फरक पडतो? पण आपण घरात थांबलो म्हणून फॅ शन काही थांबत नाही. घरी असतानाही मनासारखे चांगले कपडे घालून वावरल्याने वातावरणातील नकारात्मकता दूर होते. आपलं आपल्यालाच प्रसन्न वाटायला लागतं. त्यामुळे दरवर्षीप्रमाणे उन्हाळ्यातली खास समर फॅशन कलेक्शन बॅगमध्ये भरून बाहेरगावी हिंडा-फिरायची मौज नसली तरी घरच्या घरी काही कु ल ट्रेण्ड्स नक्की ट्राय करता येतील.

नाइट ड्रेस – गेल्या वर्षी करोनामुळे झालेल्या लॉकडाऊनमध्ये नाइट ड्रेस खूप ट्रेण्डमध्ये आले होते. हाच ट्रेण्ड यंदाही सुरू राहणार आहे. नाइट ड्रेसमध्येही अनेक प्रकार उपलब्ध झाले आहेत. शर्ट आणि पायजमा सेट, शॉर्ट्स आणि टी-शर्ट किंवा शर्ट,  क्रॉप टॉप स्वेटपॅण्ट्स, टी-टॉप आणि शॉर्ट्स, काफ्तान गाऊन, स्वेटशर्ट, लांब आणि शॉर्ट नाइटी असे अनेक प्रकार बाजारात उपलब्ध आहेत. घरीच पूर्णवेळ  राहायचं, घरूनच काम करायचं म्हणून कम्फर्टच्या शोधात असलेल्या अनेकांनी या नाइट ड्रेसला पसंती दर्शवली आहे. नाव जरी नाइट ड्रेस असलं तरी हमखास दिवसभर याच ड्रेसमध्ये वावरणं अनेक जण पसंत करतात हा गमतीचा भाग वेगळा. ग्राहकांची वाढती मागणी बघता या ड्रेसेसमध्ये अगणित प्रिंट्स आणि वेगळ्या प्रकारचे कपडे उपलब्ध झाले आहेत. फ्लोरल प्रिंटपासून ते अगदी कार्टून प्रिंटपर्यंत वेगवेगळ्या प्रिंट्स उपलब्ध आहेत. टिपिकल पोलका डॉट असलेले ड्रेससुद्धा सहज उपलब्ध आहेत. उन्हाळा असल्यामुळे कॉटनचे नाइट ड्रेस वापरले जात आहेत. कॉटनमध्येही अनेक प्रकारचे कपडे पाहायला मिळत आहेत.

ओव्हर साइज फॅशन – लूझ टी शर्ट, ओव्हर साइज टी शर्ट आणि शर्ट, लूझ पजामा हे सध्याच्या काळातील तरुणाईचे मोस्ट फेवरेट कपडे आहेत. मुलगा असो वा मुलगी ओव्हर साइज कपड्यांना सगळ्यांकडून उन्हाळ्यात जास्त पसंती दिली जाते. ओव्हर साइज म्हणजे आपल्या फिटिंगच्या कपड्यांपेक्षा थोडी साइज मोठी असणे. ही एक प्रकारे लोकप्रिय फॅ शन असल्याने बाजारातही हे कपडे ओव्हर साइज कपडे म्हणून सहज मिळतात. यात अनेकदा खांद्यावर परफे क्ट बसणारे आणि बाकी लूझ अशा कपड्यांना जास्त पसंती मिळते. वरच्या कपड्यांप्रमाणेच बॉटम वेअरमध्येही कंबरेत फिटिंगला असणारे आणि खाली लूझ असे पायजमेही ट्रेण्डमध्ये आहेत. हे ड्रेसेस शक्यतो प्लेन रंगांमध्ये असतात. प्रिंट्स असल्यास ऑलओव्हर प्रिंट न ठेवता एखाद्दुसरी मोठी प्रिंट यावर असते. कॉटन, सिल्क अशा कपड्यांमध्ये हे ड्रेस उपलब्ध आहेत.

अ‍ॅक्टिव्ह वेअर – करोनाच्या काळात आपलं स्वास्थ्य किती महत्त्वाचं आहे हे सांगायची गरज नाही. आपण घरी आहोत त्यामुळे आपण आपल्या शरीराची अधिक काळजी घेऊ लागलो आहोत. व्यायाम, योगा आवर्जून केला जातो आहे. एरवीही फॅ शनची समीकरणं सांभाळणाऱ्या तरुणाईला व्यायामासाठीही तसेच खास कपडे हवे असतात. खरं तर अशा अ‍ॅक्टिव्ह वेअरमुळे का असेना अनेकांमध्ये व्यायामाचा उत्साह वाढला आहे. आधीसारखा ट्रॅक पॅण्ट आणि टी शर्टसारख्या टिपिकल फॅशनचा ट्रेण्ड आता राहिलेला नाही. आता मुलींसाठी  टाइट्स, स्वेट पॅण्ट, टँक टॉप, रेसरबॅक, केप्री, स्पोटर््स ब्रा तर मुलांसाठी स्लीव्हलेस ट्रेनिंग शर्ट, कम्प्रेशन टी-शर्ट, वर्कआउट टँक टॉप, ट्रेनिंग हुडी, ट्रेनिंग टाइट्स, कम्प्रेशन शॉर्ट्स असे प्रकार वापरले जात आहेत आणि ट्रेण्डमध्येही आहेत.

याशिवाय वर्क फ्रॉम होम करत असल्याने खास त्याकरता कॉटन वन पीस, कॉटन शॉर्ट्स, स्ट्राप टॉप, क्रॉप टॉप, कफ्तान ड्रेस घालू शकता. एकंदरीत आपण घरीच असलो तरी फॅशन ट्रेण्ड नकळत फॉलो करत आहोतच. उलट आपण रोजच्या त्याच त्याच कपड्यांपेक्षा सतत वेगळे काही तरी कपडे घालायलाच हवेत. आपण काय कपडे घालतो आहोत याचा प्रभाव आपल्या मानसिकतेवरही होत असतो. त्यामुळे काळजी घ्या, घरी राहा आणि फॅशनेबल राहा.

viva@expressindia.com

Story img Loader