|| मानसी जोशी

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

करोनामुळे समाजात स्वच्छतेबरोबरच आरोग्यालाही कमालीचे महत्त्व प्राप्त झाले आहे. मुळातच तणावपूर्ण जीवनशैली, बाहेरचे खाण्याचे वाढलेले प्रमाण आणि यामुळे लहान वयातच मधुमेह, रक्तदाब, पाठदुखी, लठ्ठपणासारखे बळावणारे आजार यामुळे तरुणाईने दिनक्रमात व्यायामाला आधीच महत्त्व दिले होते. टाळेबंदीमुळे बहुतांश मंडळी घरी असल्याने कधी नव्हे ते सायकल, धावण्याचे शूज, दोरीच्या उड्या, मॅट बाहेर काढून त्यांच्यावरची धूळ झटकली गेली. सात महिने जिम बंद असल्याने घरच्या घरी करता येतील असे व्यायामप्रकार तसेच ऑनलाइन झुंबा, योगा यांचे क्लासेस लावत व्यायाम सुरू झाला. अनेकदा कंटाळा अथवा इतर मित्रांना पाहून सुरुवात केलेला हा व्यायाम दिनक्रमाचा अविभाज्य घटक कधी बनला हे समजलेच नाही. घरून काम करताना शरीराच्या वाढत जाणाऱ्या तक्रारी मनाने ऐकल्या. एका खासगी पर्यटन कंपनीत काम करणाऱ्या सतीश जाधवने टाळेबंदीत मिळालेला वेळ सत्कारणी लावण्याचे ठरवले. सकाळी उठून सूर्यनमस्कार, थोडे पळणे आणि चालणे असा व्यायाम करण्यास सुरुवात केली. हे करताना त्याची ‘पेसिंग पँथर’ या ग्रुपशी ओळख झाली. यामुळे त्याच्या धावण्याला एक दिशा मिळाली. करोनामुळे पर्यटन क्षेत्र थंडावल्याने तुलनेने काम कमी होते. त्यामुळे दिवसाचे दोन तास योगा, अ‍ॅब्स तसेच कोअर वर्कआउट, एक दिवस सायकल चालवणे असे मी आठवड्याचे नियोजन केले.  पहिले पंधरा दिवस हे व्यायामाचे वेळापत्रक पाळताना खूप त्रास झाला. मध्येच सोडून द्यावेसेही वाटले. नंतर सहकाऱ्यांनी प्रोत्साहन दिल्यावर माझा आत्मविश्वास वाढला. दोन महिन्यांच्या अथक परिश्रमानंतर माझा धावण्याचा वेग वाढला. शिवाय राग, चिडचिडेपणा कमी होण्यास मदत झाल्याचे त्याने स्पष्ट केले.

धावणे, चालणे आणि सायकल चालवणे हे सहजसोपे क्रीडाप्रकार तरुणांमध्ये लोकप्रिय होत आहेत. यामुळे कॅलरीज खर्च तर होतातच. शिवाय शरीराची ताकद आणि समतोल गुण वाढण्यास मदत होते. वजन कमी होण्याबरोबरच रक्ताभिसरण, श्वासोच्छ्वास सुधारण्यास मदत होते. तसेच यासाठी फारसा खर्चही होत नाही.  विरंगुळा आणि व्यायाम याचा उत्तम मेळ साधला जात असल्याने आजची तरुणाई धावणे आणि सायकल चालवण्याला जास्त पसंती देत आहे.

करोनामुळे देशातील हिमालयान, अहमदाबाद, कोची, दिल्ली, मुंबई, ठाणे, वसई-विरार, नवी मुंबई, सातारा हिल्स अशा महत्त्वाच्या मॅरेथॉन आणि क्रीडास्पर्धा रद्द झाल्या आहेत. मात्र त्याऐवजी व्हच्र्युअली या स्पर्धा आयोजित के ल्या जात असल्याने धावण्यासारख्या व्यायामप्रकारातील तरुणांचा सहभाग आणखी वाढला आहे. व्हच्र्युअल पद्धतीमध्ये स्पर्धकाने आपल्या परिसरात ठरावीक अंतर पार करायचे आणि त्याचा तपशील आयोजकांना पाठवायचा. त्यानुसार स्पर्धकाला ई-प्रमाणपत्र आणि पारितोषिक दिले जाते. यामुळे स्पर्धकांचा हुरूप वाढतो आणि त्याने महिनाभर केलेले परिश्रमही सफल होतात. यात धावणे, सायकल चालवणे या क्रीडाप्रकारांचे व्हच्र्युअल इव्हेंट्स मोठ्या प्रमाणावर आयोजित केले जात आहेत.

व्यवसायाने वकील असलेल्या रवी उईकेचा याबाबतीतील अनुभव अत्यंत बोलका आहे. त्याने नुकताच भारतीय वायुदलाला समर्पित केलेल्या एका व्हच्र्युअल इव्हेंटमध्ये भाग घेतला होता. यात चार जणांच्या समूहाने १९३२ किलोमीटर अंतर सायकलने पार करायचे होते. म्हणजे प्रत्येक सायकलपटूने एका महिन्यात किमान ४०० किमी पार करणे आवश्यक होते. यात रोज २५ किलोमीटर याप्रमाणे रवीने ३०० किमी अंतर सायकलने पूर्ण केले. या इव्हेंटमध्ये संकलित झालेला निधी भारतीय वायुदलातील शहिदांच्या कुटुंबीयांना देण्यात आला. अशा व्हच्र्युअल इव्हेंट्समध्ये सहभागी होण्याचा अनुभव वेगळा असल्याचे तो सांगतो. ‘यामुळे मला माझी क्षमता समजण्यास मदत झाली. मी दोन महिने केलेला सराव सार्थकी लागला. योग्य पद्धतीने सायकल चालवणे हे माझे मुख्य लक्ष्य होते. यासाठी रोज ५ किमी यासारखे छोटे लक्ष्य ठेवून सायकल चालवली. पहिले दोन आठवडे सायकल चालवताना मला प्रचंड थकवा जाणवत असे, नंतर मात्र त्याची सवय झाली. आता दिवसाला ३० किमी अंतर सायकलने कापणे सहज शक्य होते,’ असे त्याने सांगितले.

अंबरनाथ आणि बदलापूर येथील सायकल ग्रुपने खडतर परिश्रमानंतर शंभर किलोमीटर सरळ रेषेत सायकल चालवत अनोखा विश्वाविक्रम केला. यासाठी त्यांनी शंभर किलोमीटरचे अंतर चार तासांत पार केले. शासनाच्या करोनासंदर्भांतील नियमांचे पालन करत त्यांनी हा विक्रम केल्याचे अंबरनाथ सायकल गु्रपच्या हिरू आहुजा यांनी सांगितले.

टाळेबंदीमुळे या सहा ते सात महिन्यांत घराच्या एका कोपऱ्यात असलेली सायकल आणि कु ठलाही मोठा खर्च न करता सहजशक्य असलेला धावण्यासारखा व्यायाम याला कधी नव्हे ते महत्त्व प्राप्त झाले आहे. जवळ जाण्यासाठी गाडीचा वापर न करता सायकलने जाण्याचेही प्रमाण तरुणाईमध्ये वाढले आहे. फिटनेससाठी सुरू झालेली ही तरुणाईची धावाधाव वेगवेगळ्या अर्थाने निरोगी जीवनशैली विकसित करण्यासाठी त्यांना फायदेशीर ठरत आहे.

सध्या करोनामुळे घरातच अडकू न पडलेली आजची तरुणाई स्वत:च्या असण्याबरोबर दिसण्याकडेही लक्ष द्यायला लागली आहे. स्वत:ला सुंदर आणि आकर्षक ठेवण्यासाठी के वळ जिममध्ये घाम न गाळता अनेकांनी आपल्या व्यायामशैलीत बदल के ले आहेत. फिटनेससाठी व्यायामापुरते मर्यादित न राहता सायकलिंग किं वा रनिंगासारख्या पर्यायांवर तरुणाई जोर देताना दिसत आहे.

या गोष्टी लक्षात ठेवा

  • शूज घालूनच व्यायाम करा.
  • झेपेल तेवढाच व्यायाम करण्यास प्राधान्य द्या.
  • मित्रमैत्रिणींपेक्षा न्युट्रिशियनच्या सल्ल्यानेच डाएट करा.
  • पहिल्यांदा छोट्या गोष्टींपासून व्यायामास सुरुवात करा.
  • व्यायामात सातत्य असणे आवश्यक.

viva@expressindia.com