सगळ्या सणांच्या तुलनेत दिवाळीत जो काही थाटमाट असतो त्याला काही सीमा नसते. कपडे, दागिने, सजावट याबरोबरच आवडीचा विषय असतो तो म्हणजे भेटवस्तू ! दिवाळी हे हक्काचं निमित्त असतं जेव्हा भरघोस भेटवस्तूंची देवाणघेवाण करता येते. पाडवा, भाऊबीज, लक्ष्मीपूजनासाठी मित्र-मंडळी, आप्तेष्ट, नातेवाईक भेटतात आणि त्यानिमित्ताने प्रत्येकासाठी काहीतरी छान गिफ्ट घेतलं जातं. आजकाल इतक्या नवनवीन वस्तू बाजारात आल्या आहेत, शो-पीस, कपडे, फोटोफ्रेम, क्रोकरी… तुम्हाला जे हवं त्यात असंख्य वैविध्यही पाहायला मिळतं.

आजकाल कॉर्पोरेट गिफ्टिंग हा प्रकार प्रचंड प्रचलित आहे. पूर्वीच्या काळी सरकारी नोकरी किंवा बँकांच्या नोकऱ्यांचं प्रमाण जास्त असायचं, तेव्हा पगार आला की बोनस, फराळ अशाच भेट-वस्तू लोकांना मिळायच्या. आता काळ बदलला, कामाचे स्वरूप, नोकऱ्या, ऑफिस सगळंच हळूहळू आधुनिक होत गेलं. त्याच बरोबर मिळणारे पगार, लोकांचं राहणीमान, आवडीनिवडी, हौस हे सगळंच मोठं झालं. सणवार साजरे करायच्या पद्धतीसुद्धा आधुनिक आणि परंपरेची समीकरणं घालू लागल्या. या पार्श्वभूमीवर भेटवस्तू किंवा कॉर्पोरेट गिफ्टिंगचे सध्या काय ट्रेण्ड्स चालू आहेत त्याचा आढावा घेऊया.

हेही वाचा >>> सफरनामा: झोपेसाठी पर्यटन!

खासकरून कॉर्पोरेट गिफ्टिंगमध्ये गिफ्ट-हॅम्पर्स हा प्रकार बघायला मिळतो. याचं साधं कारण म्हणजे मोठ्या प्रमाणात अर्थातच होलसेलमध्ये वस्तू घेतल्या की बाजारातील किमतीपेक्षा निम्म्या किंवा थोड्या कमी किमतीत त्या खरेदी करता येतात. तसंच त्या किमतीत वेगवेगळ्या प्रकारच्या वस्तू देता येतात. उदाहरणार्थ, आता ड्रायफ्रूट हॅम्पर सर्रास दिले जातात. १००० रुपयांच्या ड्रायफ्रूट हॅम्परमध्ये अगदी २५-५०ग्रॅमचे ४ प्रकार तरी देता येतात.

पर्सनलाइज गिफ्ट्सचा ट्रेंड

दुकानांमधून भेटवस्तू खरेदी करण्यापेक्षा आपल्याला आवडतील त्या पद्धतीने कस्टमाइज्ड करून घेण्याकडे या पिढीचा कल वाढला आहे. अशा पद्धतीच्या गिफ्ट हॅम्पर्समध्ये, वेगवेगळ्या आकाराच्या पणत्या किंवा दिवे, वॉलपीस, फोटोफ्रेम्स, मग्स, लोकरीचे, खणाचे तोरण, रांगोळ्या असे सुंदर प्रकार असतात. ते दिसायलाही छान दिसतात आणि सण सोडून एरवीही तुम्ही वापरू शकता. कॉर्पोरेट गिफ्टमध्ये कंपनीचा लोगो असलेला मग, बॉटल, फोटोफ्रेम, डायरी हे फार आवडीचे प्रकार आहेत. या वस्तू तुम्ही वेगवेगळ्या विक्रेत्यांकडून घेऊ शकता किंवा एकाच विक्रेत्याकडून हॅम्पर्स बनवून घेऊ शकता. पर्सनलाइज्ड किंवा कस्टमाइज्ड गिफ्टिंगमध्ये सध्या अजून एक ट्रेण्डिग प्रकार म्हणजे कुशन्स किंवा छोट्या उशा ज्या सोफ्यावर सजावट म्हणून ठेवता येऊ शकतात. उशा तुम्ही कुठल्याही शॉपिंग साइटवर किंवा दुकानात घेऊ शकता, त्याच्या कव्हर्सची इतकी अगणित व्हरायटी तुम्हाला मिळेल की निवडताना थकून जाल. कव्हर्स तुम्ही कस्टमाइझ करून घेऊ शकता. कॉर्पोरेट गिफ्ट करायचे असेल तर कंपनीचा लोगो, ग्रुप फोटो असेही करू शकता. त्याखेरीज पैठणीच्या कव्हर्सचा सध्या खूप ट्रेण्ड आहे. तुम्हाला हव्या त्या फॅब्रिक आणि डिझाइनचे कव्हर तुम्हाला मिळू शकतात.

सुगंधी गिफ्ट्स

दिवाळीसाठी खास ऑरगॅनिक धूप, अगरबत्ती गिफ्ट केले जातात. आता हा प्रकार जर तुम्हाला बोरिंग किंवा जुना वाटत असेल तर मंगलदीपसारख्या ब्रॅण्ड्सचे गिफ्ट बॉक्स तुम्ही जरूर पाहा. आधुनिक धूप स्टिक्स, धूप कप , अगदी फ्रेश सुगंधी अगरबत्त्या, सांबरानी धूप, टी-लाइट कॅण्डल्स अशा खास दिवाळीसाठी आकर्षक वस्तूंसह त्यांनी गिफ्ट हॅम्पर्स लाँच केले आहेत. हे तुम्ही घरातील मंडळींनाही भेट म्हणून देऊ शकता. दिवाळीसाठीच्या हॅम्पर्समध्ये छोटी भगवद्गीता, शुभ-लाभ स्टिकर, तोरण अशाही वस्तू आहेत. हे गिफ्ट बॉक्स अगदी ४००, ५०० रुपयांपासून सुरू होतात. शहरांमध्ये सगळ्या शॉपिंग प्लॅटफॉर्म्सवरही असे हॅम्पर्स उपलब्ध आहेत.

ऑल-टाइम हिट चॉकलेट्स

चॉकलेट हॅम्पर्सचा ट्रेण्ड नवीन नसला तरी त्याची लोकप्रियता किंचितही कमी झालेली नाही. सणासाठी कुछ मीठा हो जाए म्हणत चॉकलेट देण्याची कॅडबरी कंपनीने पाडलेली प्रथा आता चांगलीच रुजली असून त्यातही वैविध्य आलं आहे. हॅण्डमेड चॉकलेट्सची सध्या जास्त चलती आहे. आकर्षक आकारातले, पॅकिंगमधले चॉकलेट्स कॉर्पोरेट गिफ्टिंगच्या हॅम्परमधला भाग असतातच. फक्त चॉकलेट्स नाही तर कुकीजसुद्धा गिफ्ट हॅम्परमधला मस्ट-हॅव आयटम झाला आहे. चॉकलेट कुकीज, बटर कुकीज, ड्रायफ्रूट कुकीज, थोडं हेल्दी हवं असेल तर ओट्स कुकीज असे भरपूर प्रकार तुम्हाला बाजरात किंवा घरगुती पद्धतीने बनवून मिळतील. दिवाळी पार्टी करणार असाल तर चॉकलेट आणि कुकीजशिवाय पार्टी फिकी वाटेल. जितका आता फराळ महत्त्वाचा झाला आहे तेवढेच चॉकलेट आणि कूकीजसुद्धा. अगदी किंडर जॉय या अतिशय लोकप्रिय लहान मुलांच्या चॉकलेट्सचेही गिफ्ट बॉक्स सध्या उपलब्ध झाले आहेत. चॉकलेट खायला काही वयाचे बंधन नाही, त्यामुळे हा गिफ्ट बॉक्स कॉर्पोरेट गिफ्टिंगप्रमाणेच कौटुंबिक गेटटुगेदरसाठीही परफेक्ट चॉइस आहे. गिफ्ट बॉक्ससोबत लहान मुलांसाठी त्यात एक सरप्राईज आयटमसुद्धा दिलेला आहे. चॉकलेट्सबरोबर कप केक, डोनट्स आणि टी-टाइम केक याचाही तुम्ही चॉकलेट हॅम्पर देताना विचार करू शकता.

परफ्युम्स

लोकांचं राहणीमान आणि पद्धती आधुनिक झाल्या तेव्हापासून परफ्युम हा प्रकार लोकप्रिय झाला. आजच्या काळाची, गरज आणि फॅशन म्हणून परफ्युम सर्रास वापरले जाते. गिफ्ट देण्यासाठी म्हणून अगदी एलिगंट, फॅन्सी आणि तरीही बजेटमधला हा पर्याय अगदी योग्य आहे. बेला-विटा, मेन्स कंपनी, एंगेजसारखे ब्रॅण्ड्स सध्या ट्रेण्डिंग आहेत, कारण ते अगदी बजेटमध्ये फ्रेश परफ्युम देतात. त्यांच्या बाटल्याही अगदी रेखीव आणि सुंदर असतात. याचे असंख्य कॉम्बो-पॅक तुम्हाला हव्या त्या साइटवर उपलब्ध आहेत. तसेच थोडा वेगळा पर्याय म्हणून इझे ब्रॅण्डचा विचार करू शकता. याचे बरेच परफ्युम युनिसेक्स प्रकारात आहेत. होम-मेड परफ्युम्स हे त्यांचे आणखी एक वैशिष्ट्य असून हा ब्रॅण्ड भारतीय आहे.

आवडीचा सुकामेवा

हा सगळ्यात लोकप्रिय कॉर्पोरेट गिफ्ट आयटम आहे. पूर्वीपासूनच सुंदर डेकोरेटिव्ह बॉक्समध्ये ४-५ प्रकारचे ड्रायफ्रूट मिळणारे हे बॉक्स आकर्षक, गिफ्ट द्यायला सोपे आणि होलसेल प्रमाणात घ्यायचे असल्यास स्वस्त पडतात. काजू, बदाम, पिस्ता, मनुका हे ४ प्रकार जास्त करून दिले जातात. आता याचेही आणखीन आकर्षक कॉम्बो पॅक, याबरोबर मोती साबण, पणत्या, आकाश कंदील, एखाद दुसरी मिठाई असलेले गिफ्ट बॉक्स उपलब्ध आहेत.

स्पा आणि कॉस्मेटिक आयटम

कॉस्मेटिक कंपन्यांनी आपले प्रॉडक्ट्स गिफ्ट बॉक्स स्वरूपात द्यायला सुरुवात केल्यापासून हाही प्रकार कॉर्पोरेट गिफ्टिंगमध्ये लोकप्रिय झाला आहे. पुरुष व महिला दोन्ही कर्मचारी जिथे आहेत अशा कंपन्यांमध्येही वेगवेगळे किंवा युनिसेक्स प्रॉडक्ट्स असलेले कॉस्मेटिक गिफ्ट हॅम्पर्स हा उत्तम पर्याय ठरतो. या पद्धतीच्या गिफ्ट बॉक्समध्ये लोशन्स, क्रीम्स, सुगंधी साबण, सुगंधी किंवा आरोग्यदायी तेल, परफ्युम्स, मेकअप सेट्स असे प्रॉडक्ट्स असतात. सध्या नायका, मेबिलीन, लॅक्मे किंवा आता बरवा, शुगर, मॅक अशा मोठ्या ब्रॅण्ड्सचे अनेक ऑफर्ससह ट्रेण्डिंग प्रॉडक्ट्स उपलब्ध आहेत.

सिरॅमिक

हॅण्डमेड, पर्यावरणपूरक, इंडियन ओरिजिन अशा पद्धतीने बनलेल्या वस्तूंना खूप महत्त्व आहे. त्यातलाच एक नवीन आलेला आणि अतिशय रुजलेला ट्रेंड म्हणजे सिरॅमिकपासून बनवलेल्या गोष्टींचा… विशेषत: क्रोकरी किंवा शो-पीस. याच्यामध्ये इतके सुरेख आणि नाजूक डिझाईन असतात की कुठला घेऊ नि कुठला नको असं होतं. बाउल्स, मगसेट, प्लेट्स, क्रोकरी सेट, असंख्य गोष्टी तुम्हाला हव्या त्या डिझाईनमध्ये मिळतात. डायनिंग टेबलवर ठेवायला छानशा बरण्या, विविध आकारातले बाऊल्स, सर्व्हिंग प्लेट्स गिफ्ट द्यायला फारच सुंदर दिसतात. कधी कधी एकच वस्तू पण अगदी नीटनेटकी आणि सुंदर हवी असते. अशा वेळी हा पर्याय उत्तम आहे. हे तुम्हाला ई कॉमर्स साइट्सपासून ते अगदी घरगुती व्यवसाय करणाऱ्यांपर्यंत अनेक पर्याय मिळू शकतात.

वॉलपीस, शोपीस, इनडोअर झाडं असे प्रकारसुद्धा सिरॅमिकपासून बनवलेले मिळतात, जे तुमच्या घराला छान शोभा देतात. आजकाल इंटेरिअर करताना तरुण पिढी खास करून सिरॅमिकच्या शोपीसचा अधिक वापर करताना दिसते.

टेक्नॉलॉजी गिफ्ट्स

तुमचं बजेट थोडंसं जास्त असेल किंवा तुमची कंपनी हे प्रॉडक्ट्स बनवत असेल तर पॉवर बँक, फॅन्सी इअरफोन्स, स्पिकर्स, यूएसबी, स्मार्ट वॉच अशा गिफ्ट्सचाही तुम्ही विचार करू शकता. टेक्नॉलॉजी गिफ्ट्स देत असाल तर असे गिफ्ट्स द्या जे कोणालाही वापरता येतील. गिफ्ट हॅम्पर देणार असाल तर यातली एखादी वस्तू तुम्ही देऊ शकता. कर्मचाऱ्यांना नक्कीच आवडेल तसेच यावर कस्टमाइज्ड करून घेण्यासाठी कंपनीचा लोगोही प्रिंट करून घेता येईल. भाऊबीज आणि पाडव्यालाही हे गिफ्ट अगदी योग्य आहे.

याव्यतिरिक्त ज्वेलरी, पर्सनलाइज्ड स्टेशनरी, वॉल-क्लॉक, की-होल्डर, नवीन वर्षाचे कंपनीचे कॅलेंडर असे अनेक प्रकार कॉर्पोरेट गिफ्टिंगमध्ये प्रचलित आहेत. तोरणांमध्येही आता लोकरीच्या तोरणांची चलती दिसेल, कारण ते दिसायला फारच सुंदर दिसतात आणि वॉशेबल असतात.

सध्या व्होकल फॉर लोकल हे धोरण असल्याने असे एकही प्रॉडक्ट नाही जे कुणी घरगुती पद्धतीने देत नाही. अशा व्यापाऱ्यांकडून घेतले तर लोकांनाही चार पैसे मिळतात आणि तुम्हाला होलसेल दारात घेतल्याने स्वस्त मिळतात. सणाचं गिफ्ट म्हटलं तरी कंपनीची आर्थिक गणितं त्यात दडलेली असतात. काही हौशी कंपन्या कार, लॅपटॉप, आयफोन, अँड्रॉइड फोन, मॅकबुक असा श्रीमंती थाटही दाखवतात. कॉर्पोरेट गिफ्टिंगमध्ये एकूण ट्रेण्डलाच अनेक नवीन वळणं मिळाली आहेत. आयटी क्षेत्र जेव्हापासून भारतात वाढत गेलं तेव्हापासून कंपन्यांचा राजेशाही थाट वाढत गेला. कर्मचाऱ्यांना त्यांच्या कामाचा मोबदला वा त्यांना कंपनीबद्दल प्रेम वाटावं म्हणून किंवा कंपनीच्या दर्जासाठी अशा नानाविध कारणांमुळे कॉर्पोरेट गिफ्टिंगचे विचार, कल्पना मोठ्या मोठ्या होत गेल्या. अर्थात, त्यामुळे दिवाळीसारख्या सणाचा आनंद द्विगुणित होतो म्हटल्यावर ही भेट अधिक मोलाची ठरते आहे. तुम्हालाही या दिवाळीत भरभरून भेटवस्तू मिळोत…या दीपावलीच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा!

viva@expressindia.com