‘‘अगं, मी काय सांगू माझ्याबद्दल.. मी काही शब्दप्रभू नाहीये.. मी सही मौकेपर क्लिक करू शकते. चित्रकला, रांगोळी नि क्राफ्ट करू शकते.. ‘व्हिज्युअल  इफेक्ट्स’बद्दल मी सध्या शिकत्येय नि इव्हेंट मॅनेजमेंटच्या क्षेत्राचा श्रीगणेशा गिरवायला सुरुवात केलीय..’’ आपले हे विचार शेअर करत्येय क्रिएटिव्ह गर्ल ऋतुजा जाधव!
हा हा म्हणता ऋतुजाचं ‘डी. जी. रुपारेल कॉलेज’मधलं टी.वाय.बी.ए.चं वर्ष संपलं. टी.वाय.ला तिनं फिलॉसॉफी घेतलं होतं नि त्याआधी एस.एन.डी.टी. कॉलेजमधून होम सायन्समध्ये एच.एस.सी. केलं होतं. टी.वाय.नंतरच्या करिअरची दिशा तिनं ठरवली नव्हती. पदवीखेरीज आणखी प्रावीण्य लागतंच. तिच्या सर्कलमधल्या मंडळींनी इतर शैक्षणिक कोस्रेस करायला सुरुवात केली होती. तिलाही छान करिअर करावंसं वाटत होतं. त्या सुमारास तिनं पाहिलेल्या ‘ट्रान्सफॉर्मर’ चित्रपटातली कॅरॅक्टर्स तिला आवडली. त्या कॅरॅक्टर्समागचा विचार आवडला. या क्षेत्रात करिअर करता येऊ शकेल, असं वाटलं. ती म्हणते की, ‘‘आमच्या घरी या क्षेत्राबद्दल काहीच माहिती नसल्यानं या कोर्सबद्दल सखोल चौकशी केली. त्यानंतर ‘माया अ‍ॅकॅडमी ऑफ अ‍ॅडव्हान्स सिनेमॅटिक’ (मॅक)मध्ये अ‍ॅडमिशन घेतली. तिथं ‘व्हीएफएक्स प्लस’ या कोर्समध्ये मी बरीच सॉफ्टवेअर्स शिकत्येय. आता आम्हाला दोन मिनिटांची स्टोरी क्लिप तयार करायची आहे. सध्या त्या तयारीत गुंतल्येय. हे तंत्रज्ञान शिकण्याचा अनुभव एकदम वॉव आहे. त्यात रोज नवीन काही तरी शिकायला मिळतंय.’’
याच दरम्यान अभिषेक- तिच्या भावानं तिला डीएसएलआर कॅमेरा गिफ्ट दिला. त्यामुळं फोटोग्राफीचा छंद लागला. मग तिनं ‘नॅशनल इन्स्टिटय़ूट ऑफ फोटोग्राफी’ (एनआयपी)मध्ये बेसिक फोटोग्राफीसाठी अ‍ॅडमिशन घेतली. तिथं फोटोग्राफीचा बेस पक्का होऊन तिनं इव्हेंटसाठी क्लिक करणं सुरू केलं. त्यातल्या प्रगतीमुळं या छंदाचं व्यवसायात रूपांतर करण्याचं तिनं ठरवलं. तिला मिळणाऱ्या ऑर्डर्समध्ये म्युझिकल कॉन्सर्टस, लग्नसमारंभ, मालिकांचं प्रमोशनल शूट आदी अनेक ‘क्लिक्स’चा समावेश आहे.
‘माया’तला कोर्स नि फोटोग्राफी करतानाच ती भावाचा मित्र भूषण मोरे यांच्या ‘एएसई इव्हेंटस’मध्ये ती जॉइन झाली आहे. सध्या ती काही अपकिमग प्रोजेक्ट्सच्या तयारीत गुंतल्येय. त्यात ती डिझाइिनग नि फोटोग्राफी करणारेय. ही सगळी कामं करताना ती आनंदी आहे नि त्याचं प्रतििबब तिच्या घरातही पडलंय. सध्या गाजणाऱ्या ‘होणार सून मी या घरची’ या मालिकेच्या प्रमोशनचं काम त्यांच्या इव्हेंट मॅनेजमेंट कंपनीला मिळालं होतं. त्याचं प्रमोशनल शूट ऋजुतानं केलं. आपल्या लाडक्या स्टारकास्टला आपण शूट करणार आहोत, या भावनेनं ती थोडी एक्साइट झाली होती नि त्यांच्या स्टारपणाचं थोडंसं दडपणही आलं होतं, पण सगळ्यांच्या सहकार्यामुळं हे फोटो शूट मस्त झालं. ‘लग्न पहावं करून’च्या प्रमोशनल मुलाखतीच्या निमित्तानं त्या टीमशी तिची ओळख झाली. त्यांच्याशी गप्पाटप्पाही झाल्या. हा अनुभव तिला आवडला. आता तिला कोणत्याही स्टारकास्टच्या फोटो शूटचं दडपण येत नाही. यंदाच्या दांडियात तिला दांडिया क्वीन फाल्गुनी पाठकला ‘क्लिक’ करायची संधी मिळाली. तिला फाल्गुनीचं ऑनस्टेज शूट करायला मिळालं. तिनं ‘क्लिक’ केलेले फोटो फाल्गुनीला फारच आवडले. ऋतुजाला स्वत:च्या आवडणाऱ्या ‘क्लिक’पकी एक क्लिक याच शोमधील आहे. फाल्गुनीचा दिलोजान एनर्जेटिक परफॉर्मन्स तिला टिपता आला. एकदम एनर्जेटिक होऊन ती गात्येय, हा क्षण आपल्याला कॅमेऱ्यात टिपता आल्याचं ऋजुताला समाधान वाटतं. असे दुर्मीळ क्षण यापुढंही टिपायला तिला आवडेल.
 फोटोग्राफीसाठी तिनं कुणाला आयडॉल मानलेलं नाहीये. ‘मी जे क्लिक करते ते मला आवडतं नि ते इतरांनाही आवडावं,’ असं तिला वाटतं. आतापर्यंत तिनं काढलेल्या फोटोंचं अनेकांनी कौतुक केलंय. ती नेटवरून शिकत नि स्वत:चे प्रयोग करत क्रिएटिव्ह फोटोग्राफी शिकल्येय. आपण काढलेल्या फोटोंबद्दल ती या क्षेत्रातील ज्येष्ठांशी नि सहकाऱ्यांशी बोलते. आपल्याकडची माहिती शेअर करत त्यांचंही मत समजून घेते. तिचा सॉफ्टवेअर इंजिनीअर भाऊ तिला खूप सपोर्ट करतो. त्यानं दिलेला कॅमेऱ्यावरूनच ती फोटोग्राफी शिकल्येय. हा कॅमेरा तिच्यासाठी खूप लकी ठरलाय. आता ती नवीन कॅमेरा घेणार असली तरीही हा कॅमेरा तो एक आठवण म्हणून जपून ठेवणारेय.
ती म्हणते की, ‘आपलं काम कुणी तरी अ‍ॅप्रिशिएट करतंय, ते करताना थोडी धावपळ होत्येय, पण त्याचाही एक आनंद मिळतोय. माझा ‘माया’मधला कोर्स एक दिवसाआड संध्याकाळचा असल्यानं मला थोडा वेळ मिळतो तेव्हा इव्हेंट नि फोटोग्राफीचं काम करते. मला शाळेपासूनच ड्रॉइंगची आवड आहे. एलीमेंट्री नि इंटरमीजिएटमध्ये ‘ए’ ग्रेड मिळाल्येय. त्याचा उपयोग रांगोळी काढताना होतो. रांगोळीत माझे मीच निरनिराळे प्रयोग करते. हे प्रयोग करता करता मी थ्रीडी रांगोळी काढण्यापर्यंत येऊन पोहोचल्येय. मी कुकिंग चांगलं करते. मला पर्यटनाची नि डान्सची खूपच आवड आहे.’
  ऋतुजा सांगते की, ‘माझ्या व्हिएफक्स तंत्रज्ञान, फोटोग्राफी नि इव्हेंट मॅनेजमेंटचा उपयोग होऊ शकेल, असा जॉब शोधण्याचा प्रयत्न करणारेय. गेले सहा महिने मी इव्हेंटचं काम करते आहे. तिथं मी फोटोग्राफी करत्येय नि को-ऑर्डिनेशन, मीटिंग्ज व्यावहारिक बाबी मनापासून शिकून घेत्येय. अपकिमग इव्हेंटच्या कामासंदर्भात भूषणदादानं माझ्यावर टाकलेला विश्वास नि दिलेली जबाबदारी मी नीट पार पाडेन, असा आत्मविश्वास मला आहे, कारण इव्हेंट मॅनेजमेंटचा अनुभव माझ्या गाठीशी जमा झालाय. त्याबद्दल माझं कौतुकही झालंय. आतापर्यंतच्या वाटचालीत मला अनेक चांगल्या गोष्टी शिकायला मिळाल्या, चांगल्या व्यक्तींनी माझं आयुष्य समृद्ध केलं.. आता स्वत:ला सिद्ध करून दाखवण्याचं ध्येय मला गाठायचंय..’ त्यासाठी तिला भरभरून शुभेच्छा.

Story img Loader