क्रिकेट विश्वचषक हा भारतासाठी एक भावनिक विषय आहे. खरं तर क्रिकेट हा खेळ इंग्लंड देशाकडून आपल्याकडे आला असला तरी भारतात क्रिकेटचे महत्त्व, चाहते आणि आवड जगात कुठल्याही देशापेक्षा जास्त आहे.
२०१९ च्या उपांत्य फेरीत झालेला धोनीचा रन आऊट आजही सगळय़ांच्याच मनात घर करून बसला आहे; परंतु नुकत्याच झालेल्या भारत-न्यूझीलंड सामन्यात भारताने एकदिवसीय विश्वचषक सामन्यात जवळजवळ २० वर्षांनी न्यूझीलंडवर मात करत दणदणीत विजय मिळवला आणि जुन्या जखमा थोडय़ा भरून निघाल्या. कपिल देवपासून ते सचिन तेंडुलकर, विराट कोहली, रोहित शर्मा आणि आता शुभमन गिलपर्यंत खेळाडूंच्या आणि चाहत्यांच्या पिढय़ा बदलल्या; पण क्रिकेटवरचे प्रेम मात्र पिढय़ान् पिढय़ा वाढते राहिलेले आहे. यंदा भारतातच सामने होत असल्याने चाहत्यांचा उदंड प्रतिसाद आपल्याला प्रत्येक सामन्यात पाहायला मिळतोय. सध्या चालू असलेल्या आयसीसी क्रिकेट विश्वचषक सामन्यात भारताची अजय घोडदौड सुरू आहे. भारत या वेळी विश्वचषक जिंकेल की नाही, हा उत्सुकतेचा प्रश्न सगळय़ांच्याच मनात आहे. त्याचबद्दल तरुण क्रिकेटप्रेमींशी बोलत घेतलेला हा आढावा.
बदलापूरचा मित धनंजय विद्वांस सांगतो, ‘‘या वेळेस भारतीय खेळाडूंचा फॉर्म बघता टीममध्ये सकारात्मक वातावरण जाणवतंय. सगळेच खेळाडू आपापली कामगिरी चोख बजावतायेत असं दिसतंय. हेच शेवटपर्यंत पाहायला मिळेल अशीही अशा वाटतेय.
हेही वाचा >>> अवकाशाशी जडले नाते: वेध शनीचा-कॅसिनी-हायगेन्स
‘‘भारत-पाकिस्तान सामने मनोरंजक असतातच, पण यंदा २००३ नंतर न्यूझीलंडवर मिळवलेला विजय खूप आनंददायी आहे. धोनीची उणीव नक्कीच जाणवतेय, पण विराट आणि रोहितची कामगिरी बघून एक आत्मविश्वास वाटतोय की आपण वल्र्ड कप नक्की जिंकू. रोहित शर्माच्या कर्णधार पदाचे खूप कौतुक करावेसे वाटते. सगळय़ा खेळाडूंना योग्य पद्धतीने न्याय मिळतोय.’’
क्रिकेट खेळण्याची तीव्र आवड असणारा मुंबईचा एक अवलिया देवाने दिलेला आशीर्वाद बनून भारताच्या टीममध्ये आला आणि त्याने संपूर्ण जगाला वेड लावले. तो बॅटिंगला आला की भारतीय चाहत्यांची वेळ तिथेच थांबायची आणि इतर देशातल्या खेळाडूंचे आणि चाहत्यांचे हृदयाचे ठोके वाढायचे. क्रिकेटची आवड खऱ्या अर्थाने स्त्रिया आणि तरुण मुलींमध्ये निर्माण केली ती सचिन तेंडुलकर या नावाने. पुढे २०११ मध्ये भारताने विश्वचषक जिंकून इतिहास रचला आणि भारतीय चाहत्यांना त्यांचा मिस्टर परफेक्ट फिनिशर – महेंद्र सिंग धोनी मिळाला. यष्टीरक्षक बॅट्समन म्हणून धोनीने जागा मिळवली ती अगदी धोनी रिव्ह्यू सिस्टम म्हणून प्रसिद्ध झाली.
आक्रमक बॅट्समन वीरेंदर सेहवाग- सगळय़ांचा लाडका वीरू, तडफदार आणि हँडसम युवराज सिंग ऊर्फ युवी, द अनसंग हिरो गौतम गंभीर, फिरकी मास्तर हरभजन सिंग, इरफान पठाण, झहीर खान आणि अजून बरीच मोठी नावांची यादी लिहिता येईल; परंतु २००० सालच्या आसपास जी भारताची क्रिकेट टीम होती त्याने तरुण क्रिकेटप्रेमींची मने जिंकली ती कायमचीच. बदलापूरचा विनायक वळवी सांगतो, ‘‘सध्या वल्र्ड कपचे सामने पाहायला मज्जाच येतेय. एक तर भारतीय टीम फॉर्ममध्ये आहेच; पण इतरही टीम फार छान टक्कर देतायेत. प्रत्येक सामना अटीतटीचा होतोय आणि त्यातही आपले गोलंदाज खास कामगिरी करतायेत. प्रत्येक मॅचमध्ये एकाच खेळाडूकडून आपण अपेक्षा करू शकत नाही, पण रोहित शर्मा आणि विराट खास अपवाद आहेत. समोर कुठल्याही देशाचा कुठलाही गोलंदाज असला तरी ते धावांचा पाऊस पाडतायेत. भारताने वल्र्ड कप तर जरूर जिंकावा, पण त्याहीपेक्षा सध्या भारतीय टीमचा फॉर्म पाहायला जास्त मज्जा येतेय.’’
१९८३ पासून आजपर्यंत भारतीय टीमने भरपूर मोठा यशाचा पल्ला गाठला आहे. त्या साली वल्र्ड कपची मॅच ६० ओव्हरची असायची. विश्वचषक जिंकताना भारत ६० ओव्हरची मॅच जिंकला होता. भारत असा पहिला देश आहे ज्याने ६० ओव्हर, ५० ओव्हर आणि २० ओव्हर वल्र्ड कप जिंकण्याचा किताब आपल्या नावावर केलाय. भारतीय खेळाडूंनीही हे अनेकदा नमूद केले आहे की, चाहत्यांच्या प्रोत्साहनामुळेच त्यांना अधिक चांगले खेळण्याची ऊर्जा आणि बळ मिळते. भारतात क्रिकेट हे इमोशन मानले जाते याचे मुख्य कारण म्हणजे भारतीय खेळाडू लोकांना मोठे सेलिब्रिटी वाटतच नाहीत. ते आपल्याच घरचे वाटतात. मॅचनंतरच्या सेलिब्रेशनमध्ये अनेक खेळाडू सांगतात, ड्रेसिंग रूमचे वातावरण अतिशय खेळकर असते. ही फार महत्त्वाची गोष्ट आहे. अशा पद्धतीच्या टुर्नामेंट्समध्ये आम्ही घरच्यांपासून लांब असतो, त्यामुळे बॉिण्डग होणे फार महत्त्वाचे असते. आम्ही दुपारचे जेवण एकत्र करतो. पुलच्या शेजारी बसतो. एकत्र गाणी ऐकतो. एकमेकांची चेष्टामस्करी सुरू असते. फार दबाव असेल तर एकमेकांना मदत करतो. आम्ही कुटुंबापासून दूर असलेले एक कुटुंब आहोत.
हेही वाचा >>> बन ठन के जश्न में रहना
पुण्याचा मानस गोडबोले सांगतो, ‘‘धोनीचा प्रभाव अर्थातच टीमवर होतोच. तो रिटायर झाला तेव्हा वाईट आणि भीती दोन्ही वाटलं, कारण टीम बांधून ठेवणं आणि योग्य तो क्रम लागणं फार गरजेचं होतं. वेगवेगळे कॉम्बिनेशन ट्राय करून आणि विविध हारजीत पत्करून सध्या जी टीम जमून आली आहे त्याचा क्रम योग्य आणि उत्कृष्ट आहे. रोहित, विराटसह के.एल. राहुल, हार्दिक पंडय़ा, जडेजा, शमी, सिराज ही सगळीच नावं आश्वासक आहेत. प्रत्येक जण आपापली कामगिरी उत्तमरीत्या करतोय. रोहित शर्माबद्दल आदर कायम राहणार आहे, कारण ज्या पद्धतीच्या कर्णधाराची आता गरज आहे ते सध्या फक्त रोहितच निभावू शकतो. कर्णधार असणं आणि तरीही चांगलं परफॉर्म करणं हे फार अवघड आहे जे तो फार सहज करतोय.’’
तरुण मुलीही क्रिकेट पाहण्यात मागे नाहीत असं दिसतंय, पोलादपूरची सई विद्वांस सांगते, आईचा ओरडा न खाता खूप वेळ टीव्ही चालू ठेवण्याला एकच कारण असतं, क्रिकेट वल्र्ड कप. खरं तर मी धोनीला बघण्यासाठी क्रिकेट बघायला सुरुवात केली होती आणि मग क्रिकेटची मज्जा कळायला लागली. काल विराटचं शतक व्हावं म्हणून फार उत्सुकतेने सगळेच बसलो होतो, भारत-पाकिस्तान सामन्यात कधी एकदा त्यांची विकेट मिळणार याकडे डोळे लावून बसलो होतो. मला आठवतं २०११ च्या वल्र्ड कप फायनल वेळी सचिन आणि सेहवाग आऊट झाल्यावर मी भीतीपोटी टीव्ही बंद केला होता. धोनी खेळायला आल्यावर वाटलं होतं आता आपण जिंकू आणि धोनीने षटकार मारल्यावर आम्ही नाचलो होतो. आताच आपण आशिया कप जिंकलोय आणि आता वल्र्ड कपही जिंकूच.’’
पुन्हा एकदा २०११ च्या इतिहासाची पुनरावृत्ती करत भारतातच भारताने विजयाची पताका झळकवावी याकडे सगळय़ांचीच आस आहे. तरीही भारतीयांचे क्रिकेटप्रेम हे कुठल्याही सामना आणि वल्र्ड कपच्या पलीकडचे आहे. ते पिढय़ान् पिढय़ा वद्धिंगत होत राहील. येणाऱ्या सामन्यांसाठी भारतीय टीमला भरपूर शुभेच्छा.
viva@expressindia.com