स्वप्नील घंगाळे
लाइट्स.. कॅमेरा.. अॅक्शन.. म्हटल्यानंतर ज्या उत्साहाने कलाकार अभिनय करण्यासाठी तयार असतात तोच शिगेला पोहोचलेला उत्साह सध्या क्रिकेट चाहत्यांमध्ये दिसतो आहे. खासकरून तरुणाई यंदाच्या ‘इंडियन प्रीमियर लीग’ म्हणजेच आयपीएलसाठी फारच उत्साहात असल्याचं चित्र दिसत आहे. पोस्ट करोना म्हणजेच करोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यानंतर पहिल्यांदाच दोन वर्षांनंतर देशामध्ये आयपीएलची संपूर्ण मालिका खेळवली जाणार आहे. याच कारणामुळे क्रिकेटपटू ज्याप्रमाणे मायदेशात खेळण्यासाठी उत्साही आहेत, तितकाच किंवा त्याहून किंचित अधिक उत्साह चाहत्यांमध्ये आहे.
तसं आयपीएलचं हे १३ वं पर्व असलं तरी तरुणाई याकडे पुन्हा नव्याने सुरुवात अशाच पद्धतीने बघते आहे. यामागचं मुख्य कारण म्हणजे आधी करोनामुळे अर्ध्यात रद्द करावी लागलेली स्पर्धा आणि नंतर भारतात न खेळवता ती दुबईमध्ये खेळवल्याने प्रत्यक्ष खेळ पाहण्याची हुकलेली संधी. मात्र सध्या ज्याप्रमाणे होळी, रंगपंचमीबरोबरच इतर सणांमध्ये दोन वर्षांची कसर भरून काढत उत्साहाने सण साजरे करण्यात आले तसाच हा क्रिकेटोत्सवही मोठय़ा उत्साहात साजरा केला जाणार असल्याची चिन्हं मागील काही दिवसांपासूनच दिसू लागली आहेत. अगदी व्हॉट्सअप स्टेटस असो, फेसबुक असो किंवा वेगवगेळय़ा संघाचे सोशल मीडिया हॅण्डल असोत, आयपीएलची वातावरण निर्मिती तर पूर्णपणे झाली आहे, आता फक्त वेळ आहे ती सामना सुरू होतो त्याआधीच्या काउण्ट डाउनची.
यंदाची आयपीएल स्पर्धा ही सर्वाधिक सामने असणारी स्पर्धा ठरणार आहे. पहिल्यांदाच या स्पर्धेत दहा संघ सहभागी होणार असून २६ मार्च ते २२ मे दरम्यान साखळी फेरीतील ७० सामने होतील. तर उर्वरित चार सामने म्हणजेच तीन उपांत्य फेरीतील सामने आणि अंतिम सामन्याबद्दल अद्याप घोषणा करण्यात आलेली नाही. विशेष म्हणजे यंदाचं आयपीएल हे मुंबई आणि पुणेकरांसाठी पर्वणी असणार आहे. मार्च संपल्यानंतर करोना संदर्भातील नियमांमध्ये सूट देण्यात येणार असल्याने सामन्यांसाठी मैदानात प्रत्यक्षात उपस्थित राहणाऱ्या प्रेक्षकांची संख्या वाढवली जाण्याची शक्यता आहे. आता मुंबई आणि पुणेकरांसाठी आनंदाची बाब म्हणजे हे सर्व ७० सामने मुंबई आणि पुण्यात खेळवले जाणार आहेत. वानखेडेच्या मैदानात एकूण २०, ब्रेबॉनवर १५ सामने खेळवले जातील. तर नवी मुंबईतील डी. वाय. पाटील स्टेडियममध्ये २० आणि पुण्यातील महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या मैदानामध्ये १५ सामने खेळवण्यात येणार आहेत. अर्थात, करोनाच्या पार्श्वभूमीवर खेळाडूंना कमीत कमी प्रवास करावा या हेतूने असं नियोजन करण्यात आलं असलं तरी याचा फायदा मुंबई आणि पुण्याच्या क्रिकेट चाहत्यांना होणार आहे.
सामान्यपणे परीक्षांमध्ये येणारं आयपीएल यंदा थोडंसं परीक्षांच्या वेळापत्रकासोबत क्लॅश होत असलं तरी ते सांभाळून घेण्यासारखं आहे, असं पहिल्या वर्षांपासून अगदी तिसऱ्या वर्षांला शिकणारी कॉलेजची मुलं सांगतात. एकीकडे आयपीएल पाहण्यासाठी प्रत्यक्षात मैदानात जाता येईल की नाही याबद्दल मनात थोडी शंका असली तरी वीकेण्डला दिवसाला असणारे दोन्ही सामने पाहण्यासाठी आतापासूनच नियोजनाला अनेकांनी सुरुवात केली आहे. खासकरून मुंबई, चेन्नई आणि विराटचे चाहते बंगळुरुसारख्या संघांना पाठिंबा देताना दिसतायेत. मुंबई आणि चेन्नई तर स्पर्धेतील दादा संघ आहेत, मात्र असं असलं तरी पहिल्यांदाच सहभागी होणारा गुजरात आणि लखनऊच्या संघाबद्दलही क्रिकेट चाहत्यांमध्ये कमालीचा उत्साह दिसून येतो आहे.
यंदाच्या आयपीएल लिलावामध्ये मुंबई इंडियन्स, चेन्नई सुपर किंग्स, दिल्ली, कोलकाता, बंगळुरु यासारख्या मोठय़ा संघांमध्ये मोठे बदल झाले आहेत. या संघाच्या कोअर ग्रुपपैकी म्हणजेच मागील अनेक वर्षांपासून खेळत आलेले खेळाडू या पर्वापासून नवीन संघाबरोबरच इतर संघांमधून खेळणार आहेत. त्यामुळे आता एकेकाळी ज्यांना गळय़ात गळे घालून विकेट्स सेलिब्रेट करताना पाहिलं त्यांना आता एकमेकांविरोधात खेळताना पाहणंसुद्धा क्रिकेट चाहत्यांसाठी पर्वणी ठरणार आहे. पंजाबचा माजी कर्णधार के. एल. राहुल यंदा लखनऊच्या संघाचं नेतृत्व करणार आहे तर मुंबईचा अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांडय़ा पहिल्यांदाच मुंबईच्या संघाऐवजी गुजरातच्या संघाकडून खेळाताना संघाची धुरा संभाळणार आहे. चेन्नईच्या संघामधील विश्वासाचा खेळाडू म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सुरेश रैनावर यंदा बोलीच लागली नसल्याने त्याचा नवा अवतार पाहायला मिळण्यापेक्षा थेट कॉमेन्ट्री बॉक्समधून क्रिकेट चाहत्यांच्या कानावर पडणार आहे.
त्यातच यंदा दोन गटांमध्ये संघ विभागण्याबरोबरच नियमांमध्येही बदल करण्यात आल्याने सामने अधिक रंजक होणार आहेत. खेळाडूंबरोबरच चाहत्यांसाठीही हे बदललेले नियम म्हणजे नवे प्रयोग फारच चर्चेत असल्याने या पर्वाकडून काहीतरी वेगळं मनोरंजन मिळण्याच्या अपेक्षा वाढल्या आहेत. क्रिकेटच्या या रोमांचक जर – तरच्या गणितांबरोबरच यंदा तब्बल दोन वर्षांनंतर स्पोर्ट्स बार आणि सार्वजनिक ठिकाणी सामने पाहण्याची संधी क्रिकेट चाहत्यांना मिळणार आहे. त्यामुळे क्रिकेट मित्र आणि धम्माल असे अनेकांनी प्लॅन आतापासूनच तयार केलेत. काहींचे हे प्लॅन परीक्षांनंतर आहेत, पण यंदाच्या उन्हाळय़ाचे इतर कोणतेही प्लॅन करताना तरुण क्रिकेट चाहत्यांनी आयपीएलला आवर्जून वेळ दिल्याचं दिसतं आहे. अनेक हॉटेल्, स्पोर्ट्स बार आणि मॉलमध्ये आयपीएलनिमित्त जंगी तयारी करण्यात आली आहे. फूड कोर्ट्स, क्रिकेटचे सामने दाखवले जाणारे स्पोर्ट्स बार हे करोना नियमांचं पालन करून पुन्हा दोन वर्षांपूर्वीसारखा अनुभव चाहत्यांना देण्याच्या तयारीत आहेत. मुंबई आणि पुणे या दोन शहरांमध्ये सामने होणार असल्याने येथील स्थानिक हॉटेल्स, मॉल आणि दुकानादारांकडून विशेष सूट देणाऱ्या ऑफर्सची चाहत्यांना अपेक्षा आहे हे वेगळं सांगण्याची गरज नाही. याचसोबत आणखी एका गोष्टीची तयारी सुरू आहे ती म्हणजे मोबाईल, अॅप्स आणि ऑन द गो क्रिकेटचा आनंद घेण्याची. टीव्हीसमोर बसून क्रिकेट पाहण्याची मज्जा कुटुंबासोबत घेण्याचा विचार असतानाच दुसरीकडे भटंकती आणि कामानिमित्त कुठे असल्यास कोणता मोबाइल प्लॅन डेटासाठी योग्य ठरेल, सबस्क्रिप्शन वाटून घ्यायचं का यासारख्या वाटाघाटी आत्ता अंतिम टप्प्यात आल्या आहेत. अनेक अॅपवरून संघ निवडून योग्य संघ निवडीसाठी बक्षिसं मिळवण्याची चढाओढ यंदा अगदी जोमाने दिसून येणार आहे.
एकंदरीतच ही सारी तयारी आणि उत्साह पाहता यंदाचं आयपीएल हे खऱ्या अर्थाने देशातील करोनानंतरची सर्वात मोठी स्पर्धा म्हणण्यापेक्षा क्रिकेटचा उत्सव ठरणार आहे. त्यातही सर्व सामने मुंबई पुण्यात असल्याने केवळ ऑनलाइन नाही तर ऑफलाइन पद्धतीने ते एन्जॉय करण्याची पूर्ण तयारी मुंबई आणि पुणेकर चाहत्यांनी केली आहे. त्यामुळेच यंदाच्या आयपीएलसाठी सर्व चाहत्यांनाही शुभेच्छा!
viva@expressindia.com