काही दिवसांपूर्वीपर्यंत कुरळे केस म्हणजे आफत वाटायची मुलींना. सरळसोट केस हीच फॅशन होती. सगळ्या जणी स्ट्रेटनिंग करण्याच्या मागे असायच्या. सध्या मात्र कुरळ्या केसांचा ट्रेण्ड हिट होतोय.

साधारण दोन-तीन वर्षांपूर्वी यांना ‘काहीतरी वेगळेच आहेत’ म्हणून हिणवलं जायचं, त्यांची कटकटच नको म्हणून सर्रास त्यांच्यावर इस्त्री फिरवली जायची आणि मग इस्त्रीचे चटके सोसत सोसत ते अगदी सरळ होऊन जायचे. तेच ते.. आपले मिस्टर कुरळे! हे मिस्टर कुरळे कुणाला नको असायचे. स्टाइलच्या दृष्टीने ते तसे कटकटीचेच. पण एकाएकी मिस्टर कुरळ्यांचा भाव सध्या वाढलेला दिसतोय.
एक-दोन वर्षांपूर्वीपर्यंत सरळ केसांना आयडियल मानलं जात होतं. सरळसोट, चकाकते केस सगळ्याच मुलींना हवे असायचे. परंतु सध्या मात्र कुरळे केस म्हणजे स्टाइल स्टेटमेंट मानलं जातंय. कुरळे केस एक वेगळी ओळख देतात. कंगना रनौट हिंदी चित्रपटांमधली टॉपची नायिका व्हायच्या आधी तिची ओळख कुरळ्या केसांची नवी नायिका अशीच होती. हल्ली आपल्या मराठी कपसाँगमुळे प्रसिद्ध झालेली मिथिला पालकरसुद्धा तिच्या कुरळ्या केसांमुळे अनेक जणांच्या पसंतीस पडली. कुरळ्या केसांची सध्या चलती असली तरीही अनेक मुलींना आपले कुरळे केस कसे मेंटेन करावे याबद्दल खूप शंका असतात आणि त्यामुळे काही जणींना ते आवडेनासे होतात. पावसाळ्यात तर कुरळे केस अनेकींच्या कटकटीचा विषय ठरतो. पण वेगवेगळ्या सोप्या हेअर स्टाइल्स करून तुम्ही पावसाळ्यातही आपल्या कुरळ्या केसांचा ‘स्वॅग’ दाखवू शकता. कुरळ्या केसांना तुम्ही जसं स्टाइल कराल तसे ते मस्त स्टाइल होतात. सध्या हाफ बन, मेसी बन, प्लीट्स या हेअर स्टाइल्स खूप इन ट्रेंड आहेत आणि पावसाळ्यात तर अगदी कम्फर्टेबल आणि पटकन करता येतील अशा या हेअर स्टाइल्स आहेत. या सगळ्या बरोबर हल्ली तुम्ही केस मोकळे सोडूनही तुमचे कलर्स आवर्जून दाखवू शकता.
केसांच्या कुरळेपणाचेही वेगवेगळे प्रकार असतात आणि त्यानुसार त्यांची निगा राखली गेली पाहिजे. कुरळ्या केसांत चटकन गुंता होतो. धुताना पुरेशी काळजी घेतली नाही तर केसांच्या लडी आणखी अडकून केस तुटतात. केस पुसताना खालून वर क्रंच करावेत त्यामुळे केसांचा कुरळेपणा जाणार नाही आणि वाळल्यावर ते फ्रिझी किंवा अवास्तव फुललेले दिसणार नाहीत. मुळातच कुरळे केस सरळ केसांच्या तुलनेत रूक्ष असतात. त्यामुळे खूप वेळा स्ट्रेटनिंग किंवा आयनिंग करून केसांचं स्टायलिंग करू नये. कारण ड्रायर वापरल्याने किंवा त्या उष्णतेने ते आणखी उष्ण होतात. कुरळे केस रंगीत बीट्स वापरून वेगवेगळ्या क्लिप्स, बो किंवा फुलं वापरून मस्त स्टाइल करता येतात. कुरळ्या केसांना कलर स्ट्रिक्स खूपच छान दिसतात. ऑकेजननुसार तुम्हाला हव्या त्या पद्धतीने तुम्ही ते स्टाइल करू शकता.
आपल्या कुरळ्या केसांची कटकट वाटण्यापेक्षा त्याला जर योग्य पद्धतीने हाताळलं गेलं तर त्याचं सौंदर्य तुम्हाला नक्कीच जाणवेल आणि तुम्ही पुन्हा एकदा मिस्टर कुरळेंच्या प्रेमात पडाल.

कर्ली वर्ली
कुरळ्या केसांत चटकन गुंता होतो. धुताना पुरेशी काळजी घेतली नाही तर केसांच्या लडी आणखी अडकून केस तुटतात. कुरळ्या केसांसाठी सल्फेट फ्री श्ॉम्पू वापरावा आणि मग केसांना कंडिशनिंग करावं. कंडिशनर वापरताना केसांवरच लावावा, स्काल्पवर लावू नये. ज्या वेळी तुम्ही केस धुणार आहात तेव्हा बाथरूममध्ये जाऊन केसांमधला गुंता काढून घ्या. त्यासाठी मोठय़ा दात्याचा कंगवा वापरा. केस वाळवताना ड्रायर किंवा इतर कोणत्याही इलेक्ट्रॉनिक साधनांचा वापर न करता त्यांना आपोआप वाळू द्यावे. आपला जुना कॉटन किंवा होजिअरी टीशर्ट केस पुसण्यासाठी खूपच उत्तम.

Story img Loader