सायकलिंग हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी बजावणारच. हल्ली ज्यात त्यात आवाहन करण्याची स्टाइल आहे त्यामुळे- तुम्हीही सायकलिंग करा. बघा. खरंच आनंद होईल खूप.अ आ आई- म म मका तसं माझ्यासाठी स सा सायकल आहे. हे काय अद्वैत आहे माझं सायकलीशी कोण जाणे. पण सायकल फार आपली वाटते मला. साधारण आठव्या वर्षी शिकले मी सायकल. आधी बरेच कम्पल्सरी हॉपिंग करावं लागलं. मग कुणी तरी आपल्या सायकलचं कॅरिअर धरायचं आणि आपण ‘करी डळमळ भू-मंडळ’ अशा भीतीनं कसाबसा दुसरा पाय टाकायचा. हे करताना भरपूर धडपड, पडझड झाली. गुडघे कायम बॅण्डएडनी चिकटलेले आणि पायावर हमखास पडून झाल्याच्या खुणा. अखेर मला सायकल शिकविण्यात संदेशला यश आलं. सहावी-सातवीपासून सायकलनी शाळेत जायला लागले मी.
घरातल्या हातपंपांनी हवा भरायची. पडलेली चेन लावायची, तिरकं झालेलं हॅण्डल सरळ करायचं. थोडक्यात पंक्चर सोडून बाकीची सगळी मेकॅनिकगिरी मी करू शकायचे. संदीपदादासाठी घेतलेली पिवळी सायकल मग संदेशनी आणि त्याच्यानंतर मी वापरली. खेळ, शालेय स्पर्धा, नातेवाईक, सुट्टीतले उद्योग. सगळीकडे ती माझ्याबरोबर आली. स्वत: चालविण्याआधी लिंबू-टिंबू म्हणून मी डबलसीट असायचे. काडेपेटीचा एक छाप शोधायला कॉलनीतल्या इतर काही लहान मुलांसोबत संदेश मला डबलसीट घेऊन सारसबागेपर्यंत गेला होता. आम्ही चुलत-आत्ते भावंडं एका सुट्टीत तळपत्या उन्हात शिंद्यांची छत्री बघायला- वानवडीला सायकली ताणत गेलो होतो. सायकलनी मी आख्खं पुणं पालथं घातलं आहे. सिंहगडाच्या पायथ्यापर्यंतसुद्धा- फार नाही, पण काही वेळेला सायकलनी गेलो आहोत.
आईचे निरोप, बिलं, वस्तू पोहोचवायला माझी मिस् सायकल फार तत्पर असायची. नुकत्याच बाळंत झालेल्या कुणा ताई/वहिनीला किंवा आजारी मैत्रिणीला डबा/ गरम गरम पदार्थ वगैरे नेऊन पोहोचविण्यासाठी सायकल म्हणजे जणू माझं प्रायव्हेट जेट किंवा हेलिकॉप्टर होतं. पूर्वी ना, पुण्यात इतकी जीवघेणी रहदारी नसायची. त्यामुळे आई-बाबा स्कूटरनी आणि आम्ही मुलांनी सिनेमाला, नेहरू स्टेडियमला, आत्याकडे जेवायला- सायकलनी जाणं स्वाभाविक वाटायचं. मी नववीत होते तेव्हाची गोष्ट. संदीपदादा आयआयटी कानपूरला जाणार होता, त्याच दिवशी नेमकी पोलीस-ग्राऊंडला आमची आरएसपीची परेड होती. निघण्यापूर्वी दादाला अच्छा करायलापण मिळणार नाही. पुढे वर्षभर तो भेटणार नाही या कल्पनेनी मी फार व्याकूळ झाले होते. मनात एक धाडसी मोहीम आखली. परेड संपताक्षणी सायकल काढली आणि पुणे रेल्वे स्थानकाचा पत्ता विचारीत सुसाट निघाले. पोहोचल्यावर तिथे स्टॅण्डवर सायकल लावली आणि फलाटाकडे धावत सुटले. अचानक मला तिथे पाहिल्यावर घरच्यांच्या, विशेषत: दादाच्या आनंदाश्चर्याला पारावार उरला नाही. तू एकटी सायकलनी आलीस? असं सगळ्यांनी कौतुकानी विचारलं तेव्हा ती शाबासकी मी माझ्या सायकलला पोहोचवली होती.
तिनी मला खूप सोबत केली आहे कायम. मुख्य म्हणजे मला स्वयंपूर्ण केलं आहे. खर्च फक्त हवेचा. त्या बदल्यात मला सगळीकडे वेळेवर जाता यायचं. भरपूर व्यायाम व्हायचा. शिवाय रस्त्यांची माहिती व्हायची. बालकल्याण संस्थेत मी जेव्हा नोकरी करायचे, तेव्हा औंधच्या डायरेक्ट बससाठी डेक्कन जिमखान्याला जा. बसची वाट बघत ताटकळत थांबा. पुन्हा उशिरा पोहोचण्याची भीती. हे टाळण्यासाठी मी अनेकदा सायकलनीच जायचे. तेव्हा माझे बाबा (मला न जाणविणारी) माझी दमछाक पाहून माझ्यासाठी फार वाईट वाटून घ्यायचे.
पुढे टू व्हीलर, कार वगैरे घेतल्यावर माझं सायकलिंग कमी झालं, पण संधी मिळेल तेव्हा मी माझ्या या दुचाकी मैत्रिणीबरोबर वेळ घालवला. हंपीचं आऊटडोअर शूट, पुण्यातलं आमचं रेस्टॉरंटचं शूट, कुनूर, गोवा या गावांमधल्या सायकलच्या रपेटी माझ्या फार फार लक्षात राहिल्यात. इटलीमध्ये तर ‘बायचिकलेत’ पिकनिकना इतकी मजा यायची. सोबत पाणी आणि बिस्किटं घेऊन निघायचं आणि गावाबाहेरच्या टेकडीवर किंवा गवतात विसाव्याला टेकायचं. मध्ये काही र्वष पुन्हा होती माझ्याकडे सायकल. पण एका मोठय़ा पावसात मी मुंबईत नव्हते. आणि बाहेर राहिल्यानं गंजलीच माझी ती सायकल.
हे सगळं आठविण्याचं, सांगण्याचं कारण म्हणजे इंग्रजी कॅलेंडरच्या सुरुवातीला आम्ही नवी सायकल घेतली आहे!!! ते मराठी कॅलेण्डरच्या सुरुवातीला तुम्हाला सांगितल्याशिवाय राहवत नाहीए. हुर्रे!!! मस्त आहे ती. साधी पण आहे अगदी- बिना गिअरची. आता ट्रॅफिक जाम नाही आणि पार्किंगचं टेन्शन नाही. घराजवळच्या कुठल्याही कामासाठी आता मी कार काढत नाही. जिमला तर अज्जिबात कारनी जात नाही. शिवाय भाजी, फळे, दुरुस्ती, बिल भरणे, कोपऱ्यावरून ऐन वेळी कोथिंबीर, लिंबू, ब्रेड आणणे अशा गोष्टींसाठी आनंदानी सायकल घेऊन पळत असते. मुख्य म्हणजे सायकल चालविताना आपण गप्प आणि शांत असतो, म्युझिक लावता येत नाही, फोन-मेसेज चेक करण्याचा प्रश्न येत नाही. लय सापडते. आपण सायकलच होऊन जातो. आय अॅम बॅक टू मायसेल्फ. एखादं छान गाणं मनात घोळत असतं. रेडिओची बजबजपुरी नसते. स्वत:च्या आवाक्यातली गती परत येतीए. खूप पेशन्स येतोय. साधा सोपा वाटतोय दिवस (रस्त्यांविषयी संताप आणि स्वत:विषयी करुणा वाटते हे वेगळं सांगायला नको.) पण गाडीच्या सवयीमुळे मनाला आलेला एसी बंदिस्तपणा खाडकन उघडला ना! इतकं मस्त वाटतंय मला. सहज, मोकळं आणि हवेशीर गुढीपाडव्याच्या शुभेच्छा. नववर्षांभिनंदन!
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा