अभिषेक तेली
‘ढाक्कुमाक्कुम ढाक्कुमाक्कुम’, ‘गोविंदा रे गोपाळा’, ‘मच गया शोर सारी नगरी रे’ या गाण्यांचे सूर कानी पडू लागले आहेत. तरुणाईच्या सळसळत्या उत्साहाने भरलेला दहीहंडी उत्सव अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपलेला आहे. मुंबईसह राज्यांत ठिकठिकाणची गोविंदा पथके रात्रीचा जागर करून मानवी मनोरे रचण्याचा सराव करीत आहेत. तर दुसरीकडे आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर लाखो रुपयांच्या बक्षिसांची खैरात करून वर्चस्वाची हंडी फोडण्यासाठी राजकीय पक्षही मैदानात उतरले आहेत. काळानुरूप दहीहंडी उत्सवाचे स्वरूप बदलत चालले असून उंच थर रचण्याची स्पर्धा वाढू लागली आहे. उत्सवामधील उत्साह शिगेला पोहोचलेला असताना तरुण गोविंदांच्या मनात नेमकं काय चाललंय हे जाणून घेण्याचा हा प्रयत्न.
मुंबईसह राज्यात दहीहंडी उत्सवाची तयारी शिगेला पोहोचली असून गोविंदा पथके मानवी मनोरे रचण्याचा कसून सराव करीत आहेत. अलीकडच्या काळात राजकीय पक्षांनी डीजेचा ताल, लाखो रुपयांच्या बक्षिसांचा पाऊस आणि कलाकारांची मांदियाळी जमावल्यामुळे दहीहंडी उत्सवाला ग्लॅमर प्राप्त झाले आहे. उंचच उंच मानवी मनोरे रचण्याची चुरस गोविंदा पथकांमध्ये वाढत चालली आहे. उत्साहाने भरलेल्या या उत्सवाला आता राजकीय रंग चढू लागल्यामुळे पारंपरिक उत्सव हरपत चालल्याचा प्रश्न उपस्थित होत आहे. या पार्श्वभूमीवर वरळीतील वीर नेताजी क्रीडा मंडळ गोविंदा पथकामधील अभिषेक रसाळ हा तरुण सांगतो की, ‘राजकीय पक्ष पाहून दहीहंडी उत्सवामध्ये आम्ही सहभागी होत नाही. वरळीपासून पनवेलपर्यंत विविध ठिकाणी आम्ही दहीहंडी फोडतो. आपला सण महत्त्वाचा असून तो उत्तरोत्तर वाढत राहिला पाहिजे हीच भावना आमच्या मनात असते. मुंबई सोडून लांब राहायला गेलेले रहिवासी दहीहंडीच्या निमित्ताने एकत्र येत असल्यामुळे एकप्रकारचे रियुनियन होते’. या पथकाने २००३-०४ सालापासून आठ थरांचा मानवी मनोरा रचण्याची तयारी सुरू केली होती. मेहनत तसेच जिद्दीच्या जोरावर २०२२ साली आठ थर रचण्यात त्यांना यश आले.
हेही वाचा >>> साठवणीतील भेट
यंदा प्रो – कबड्डीच्या धर्तीवर मुंबईतील वरळीमध्ये ‘प्रो – गोविंदा’ स्पर्धेचा थरारही सर्वानी अनुभवला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गतवर्षी दहीहंडीला साहसी खेळाचा दर्जा देण्याची घोषणा केली होती. त्याबाबत गोविंदांमध्ये संभ्रमाचे वातावरण आहे. तसेच जेव्हा दहीहंडी फोडण्यासाठी रचलेले थर कोसळून काही गोविंदा जखमी होतात, दुर्दैवाने काही गोविंदांना आपले प्राण गमवावे लागतात. तेव्हा उत्सवाला गालबोट लागल्यामुळे दहीहंडीवर टीका सुरू होते. त्यामुळे दहीहंडी उत्सवात सहभागी होणाऱ्या गोविंदांसाठी सरावाचे महत्त्व अधोरेखित करताना माझगाव ताडवाडी दक्षिण विभाग सार्वजनिक गणेशोत्सव मंडळातील गोविंदा सौरभ त्रिवेदी म्हणतो, ‘दहीहंडी उत्सवामध्ये सहभागी होणाऱ्या गोविंदांनी निदान सहा महिने व्यायाम करणे आणि मैदानी खेळ खेळणे आवश्यक आहे. जेणेकरून थरावरून कोसळल्यानंतर कोणताही फटका बसल्यास तो सहन करण्याची ताकद मिळेल. जेवढा सराव तेवढेच थर रचले पाहिजेत. उत्साहाच्या भरात थरांची स्पर्धा करायला जाऊ नका. तंदुरुस्त राहणे महत्त्वाचे आहे. तरच दहीहंडी उत्सवामध्ये शून्य अपघात होतील आणि दहीहंडी उत्सव उत्साहाने साजरा होऊन सण जपला जाईल’. आता ‘प्रो – गोविंदा’ स्पर्धा पार पडली, भविष्यात दहीहंडीला अधिकृतरीत्या साहसी खेळाचा दर्जा मिळाल्यास गोविंदांना शासकीय सेवेत समाविष्ट करण्यासाठी सरकारने प्रयत्न केले पाहिजेत, असेही तो म्हणतो. या मंडळाने भारतातील पहिला ८ थराचा मानवी मनोरा रचण्याचा विक्रम १९९८ साली आणि २००८ साली भारतातील पहिले ९ थर रचण्याचा विक्रम करून सर्वाना आश्चर्यचकित केले होते.
सध्या आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगात आपण मोबाईलच्या छोटय़ाशा स्क्रीनमध्ये गुंतत चाललो आहोत. परिणामी कुटुंब व मित्रपरिवारापासून दुरावत चाललो असून वर्षभर एकमेकांची भेटही होत नाही. हल्ली सणांच्या निमित्तानेच आपण एकमेकांना भेटत असतो. सणांच्या माध्यमातून सामाजिक भानही जपले जाते. यंग उमरखाडी क्रीडा मंडळ व गोविंदा पथकातील मधुकर भोई सांगतो, ‘दहीहंडी उत्सवाच्या एक महिना अगोदर आम्ही मुंबईबाहेर गेलेल्या आमच्या मंडळातील लोकांशी संपर्क करतो आणि सर्वाना एकत्र जमवतो. त्यानंतर गुरुपौर्णिमेला आमच्या सरावाची सुरुवात होते. सर्वजण स्वखर्चाने मुंबईमध्ये दाखल झालेले असतात. दहीहंडी उत्सवाच्या दरम्यान बक्षीसरूपी मिळालेल्या रक्कमेतून गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य आणि अनाथ आश्रमामध्ये विविध साहित्यांचे वाटप केले जाते. वर्षभर एकमेकांचे पाय खेचले जातात, मात्र दहीहंडीच्या दिवशी वर जाण्यासाठी एकमेकांना हात दिला जातो, एकजुटीची भावना निर्माण होते.’
हेही वाचा >>> फुडी आत्मा : रोजच्या जेवणातला हिरो
अलीकडच्या काळात राजकीय पक्षांनी लाखो रुपयांच्या बक्षिसांची खैरात केल्यामुळे दहीहंडी उत्सवामधील थरांची स्पर्धा वाढत चालली आहे. त्यामुळे या सणाकडे पाहण्याचा तरुण पिढीचा दृष्टीकोन हा स्पर्धात्मक होत चाललेला आहे. स्पर्धेला बळी न पडता दहीहंडीमध्ये अपघात टाळण्यासाठी कसून सराव करणे गरजेचे असल्याचा एक सूर गोविंदांमध्ये आहे. स्वत:ची सुरक्षा आणि सणाचा आनंद दोन्ही जपण्यासाठी आपणच प्रयत्न करायला हवेत याची जाणीव तरुण गोविंदांना आहे. दहीहंडी उत्सवाचा आनंद आणि त्यानिमित्ताने सामाजिक भान जपण्यासाठी तरुण गोविंदा पथकांची सुरू असलेली धडपडही महत्वाची आहे.
सर्वाना एकत्र आणणारा ‘महाराष्ट्राचा गोविंदा’
सध्याच्या घडीला सामाजिक माध्यमांचे महत्त्व कमालीचे वाढले आहे. विविध उत्सवांमध्येही वेगवेगळय़ा परीने सामाजिक माध्यमांचा प्रभावीपणे वापर केला जातो. हेच जाणून सर्व गोविंदा पथकांची माहिती एकाच मंचावर उपलब्ध करण्यासाठी २०११ साली प्रणय शिंदे या तरुणाने ‘महाराष्ट्राचा गोविंदा’ या फेसबुक पेजची निर्मिती केली. या फेसबुक पेजवरून वर्षभर मुंबई शहर, मुंबई उपनगर, ठाणे, पालघर, रायगड ते थेट गुजरातमधील विविध गोविंदा पथकांच्या स्थापनेपासूनचा प्रवास, विभाग, वैशिष्टय़े, प्रशिक्षकांचे नाव, कोणत्या वर्षी किती थर रचले, विमा कवच, नोंदणी आहे की नाही आदी विस्तृत माहिती छायाचित्रांसह उपलब्ध केली जाते. सध्या या फेसबुक पेजचे १ लाख २१ हजारांहून अधिक फॉलोअर्स आहेत.
अलीकडच्या काळात राजकीय पक्षांनी लाखो रुपयांच्या बक्षिसांची खैरात केल्यामुळे दहीहंडी उत्सवामधील थरांची स्पर्धा वाढत चालली आहे. त्यामुळे या सणाकडे पाहण्याचा तरुण पिढीचा दृष्टिकोन हा स्पर्धात्मक होत चाललेला आहे. स्पर्धेला बळी न पडता दहीहंडीमध्ये अपघात टाळण्यासाठी कसून सराव करणे गरजेचे असल्याचा एक सूर गोविंदांमध्ये आहे. स्वत:ची सुरक्षा आणि सणाचा आनंद दोन्ही जपण्यासाठी आपणच प्रयत्न करायला हवेत याची जाणीव तरुण गोविंदांना आहे. दहीहंडी उत्सवाचा आनंद आणि त्यानिमित्ताने सामाजिक भान जपण्यासाठी तरुण गोविंदा पथकांची सुरू असलेली धडपडही महत्त्वाची आहे.
सामाजिक भान जपण्याची दृष्टी
दृष्टीहीन तरुण-तरुणींच्या अंध:कार आयुष्यात निसर्गरम्य भटकंतीने आनंदाचा प्रकाश देऊन त्यांना गिर्यारोहण करता यावे, या उद्देशाने स्थापन झालेल्या नयन फाऊंडेशनने एक पाऊल पुढे जात २०१३ साली दृष्टिहीनांचे साडेतीन थर रचत नयन फाऊंडेशन गोविंदा पथकाची मुहूर्तमेढ रोवली. दहीहंडी उत्सवादरम्यान बक्षीस म्हणून मिळणारा रक्कमेचा एक वाटा दृष्टिहीन – अंशत: दृष्टिहीनांना समानपणे दिला जातो. तर दुसऱ्या वाटय़ातून गोविंदांना गिर्यारोहणासाठी नेले जाते. ‘तरुणांनंतर २०१७ साली दृष्टिहीन तरुणींनी थर रचण्यास सुरुवात केली. तर २०१९ मध्ये नयनच्या दृष्टिहीन तरुणांनी पहिल्यांदाच पाच थर लावत दिमाखात सलामी दिली.आमच्या संस्थेच्या माध्यमातून दृष्टिहीन विद्यार्थ्यांना परीक्षेच्या दरम्यान लेखक पुरविणे, तरुणांसाठी क्रिकेटचे सामने, तरुणींना स्वसंरक्षणासाठी प्राथमिक तायक्वांदो प्रशिक्षण असे उपक्रमही संस्थेने राबविले आहेत. भविष्यात स्वयंसेवकांच्या मार्गदर्शनाखाली दृष्टिहीनांचा हात हातात घेऊन विविध सामाजिक उपक्रम राबविण्याचा संस्थेचा मानस आहे’ असे स्वत: अंशत: दृष्टिहीन असलेले नयन फाऊंडेशनचे अध्यक्ष पोन्न अलगर देवेंद्र यांनी सांगितले.
viva@expressindia.com