मितेश रतीश जोशी
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
नृत्याने कलेची चौकट मोडून फिटनेसमध्ये केव्हाच पाऊल ठेवलेलं आहे. आता त्याच्याही एक पाऊल पुढे जात नृत्याचा उपयोग ‘थेरपी’सारखा होऊ लागला आहे.२९ एप्रिल हा दिवस जगभरात ‘आंतरराष्ट्रीय नृत्य दिवस’ म्हणून साजरा केला जातो. यानिमित्ताने ‘डान्स मूव्हमेंट थेरपी’ म्हणजे नेमकं काय ते जाणून घेऊयात..
भारत ही जगातील सर्वात वैविध्यपूर्ण संस्कृती आणि परंपरांची भूमी आहे. भारतात नृत्य प्रकारांची विस्तृत श्रेणी आहे. येथे ज्याप्रमाणे काही अंतरावर बोलीभाषा बदलते अगदी त्याचप्रमाणे लोकनृत्यशैली, त्याला लागणारा पोशाख व नृत्य सादर करणाऱ्या कलाकारांच्या वैचारिक चौकटीसुद्धा बदलतात. कथक, भरतनाटय़म, कुचीपुडी, कथकली, मोहिनीअट्टम, मणीपुरी, ओडिसी, छाऊ आणि सत्रीय अशा एकूण नऊ शास्त्रीय नृत्यशैली आपल्याकडे आहेत. शास्त्रीय नृत्य हे मुळात नृत्य आणि अभिनय या दोन गोष्टींचा समतोल आहे. नृत्याचे साधन शरीर आहे. तर शरीराचे केंद्र मन आहे म्हणूनच मनाच्या शक्तीवर नृत्य अवलंबून असतं. त्यामुळेच शास्त्रीय नृत्य ही केवळ एक कला नसून ती एक थेरपी आहे. ‘डान्स मूव्हमेंट थेरपी’ म्हणजे नेमकं काय हे जाणून घेण्यासाठी या क्षेत्रात कार्यरत असलेले डॉ. निखिल हरेंद्र शासने यांच्याशी संवाद साधला असता ते म्हणाले, ‘‘नृत्यामधल्या हालचालींचा आणि व्यक्त होण्याच्या शैलीचा वापर या थेरपीमध्ये केला जातो. थोडक्यात इथे वेगवेगळय़ा गाण्यांवर नाचवलंच जातं. यामुळे माणसाच्या आत दडलेल्या भावना बाहेर पडू लागतात. यासाठी आधी नृत्याचे धडेच गिरवायला हवेत अशी अट अजिबात नाही. ही थेरपी फक्त आजारी व्यक्तीनेच घ्यायला हवी असेही नाही. जे सुदृढ आहेत, पण सोमवारपासून आठवडा चांगला जायला हवा म्हणूनही थेरपी घेणारे आहेत’’. डान्स थेरपीमध्ये प्रत्येक व्यक्ती आपापल्या पद्धतीने व्यक्त होते. व्यक्त होण्यासाठी प्रोत्साहित करणं हे थेरपिस्टचं मुख्य काम असतं. हे एक प्रकारचं समुपदेशनच आहे. फक्त त्यात व्यक्त होण्याचा मार्ग वेगळा आहे, असं निखिल यांनी सांगितलं.
कंपवात या आजाराच्या रुग्णांवर प्रभावीपणे डान्स थेरपी करणारी तेजाली कुंटे हिने डान्स मूव्हमेंट थेरपी नेमकी कशी दिली जाते? याविषयी सविस्तर माहिती दिली. ‘डान्स थेरपी सर्वसाधारणपणे तासाभराची असते. प्रत्येक सत्राचे चार भाग असतात. सर्वात पहिल्यांदा मनाची व शरीराची तयारी करण्यासाठी एक हलका शारीरिक व्यायाम केला जातो. ज्यामुळे सत्रामधील पुढील क्रियांसाठी शरीर सतर्क व तयार होतं. अंग लवचीक होऊन वेळ, गती आणि जागा याविषयी सजग व्हायला मदत होते. त्यानंतर ४५ मिनिटांचा पुढचा भाग येतो. ज्यामध्ये त्या सेशनचं उद्दिष्ट ठरवलं जातं, उदा:- अंगाची लवचीकता, तणावमुक्तता, शरीराबद्दल सतर्कता, सांघिक मनोभावना इत्यादी. त्या उद्दिष्टाला अनुरूप अशा अॅक्टिव्हिटीज पुढे घेतल्या जातात. यानंतर पुढच्या टप्प्यात या सत्रात सहभागी झालेल्यांना त्यांच्या अनुभवाबद्दल विचारलं जातं’. या टप्प्यावर मन मोकळं होणं महत्त्वाचं असतं, असं ती सांगते. नृत्योपचाराच्या विविध क्रियांमध्ये मनातील विविध भावना, विचार जागृत होऊ शकतात. ज्या भावना सहज बोलून दाखवता येऊ शकत नाहीत, अशा भावना शरीराच्या साहाय्याने व्यक्त केल्या जाऊ शकतात. या भावनांना वाचा फोडणं हे नृत्योपचारामध्ये महत्त्वाचं ठरतं. यासाठी थेरपिस्ट उत्तम असायला हवा, कारण अनेकदा विविध मानसिक आजारांच्या मुळाशी या न व्यक्त होऊ शकणाऱ्या भावना, विचार, संवेदना असण्याची शक्यता जास्त असते. थेरपिस्टने या भावना समजून घेतल्या पाहिजेत, असं सांगतानाच या टप्प्यावर घडणारी समुपदेशनाशी मिळतीजुळती प्रक्रिया आणि अंतिम भागात नेमकं काय घडतं याविषयी तेजलने माहिती दिली. सत्राच्या अंतिम भागात विविध पद्धती वापरून रिलॅक्सेशन दिलं जातं. सत्रादरम्यान थकलेलं मन व शरीर पूर्ववत व्हायला याने एकप्रकारची मदत होते. प्रत्येक सेशन चालू करण्यासाठी व संपविण्यासाठी विशिष्ट पद्धतीचा वापर केला जातो. त्यामुळे बाकीचे विचार बाजूला ठेवून सत्रासाठी मन व शरीर यांची तयारी होते आणि त्यावर लक्ष केंद्रित करण्यास मदत होते, असं तिने सांगितलं.
एक कथक नर्तक म्हणून गेली बारा वर्षे नृत्यसाधना करणारा पुण्यातील गिरीश संध्या मनोहर हा तरुण कथक आणि मुद्रा यांचा समन्वय साधत विद्यार्थ्यांमध्ये याची जागरूकता निर्माण करतो आहे. याबद्दल तो सांगतो, ‘मी पुण्यात ‘नादयोगी ब्लेंड ऑफ कथक डान्स’ अकॅडमी चालवतो.
विद्यार्थ्यांमध्ये कथक रुजवताना व ते फुलवताना एक गोष्ट माझ्या प्रकर्षांने लक्षात आली, ती म्हणजे शास्त्रीय नृत्यात असणाऱ्या विविध मुद्रांचा वापर थेरपी म्हणून केला जातो. शास्त्रीय नृत्यात मुद्रांच्या द्वारे संवाद साधून अभिनय केला जातो. ‘अभिनय दर्पण’ या ग्रंथामध्ये आपल्याकडे एकूण ३२ असंयुक्त आणि २३ संयुक्त अशा एकूण ६२ हस्तमुद्रांचा उल्लेख आढळतो. आपल्या शरीरात असणारी कुंडलिनी शक्ती जागृत आणि सक्रिय करण्याचे वेगवेगळे मार्ग आहेत. त्यातीलच एक मार्ग म्हणजे मुद्राउपचार आहे. आपल्या शरीराचे संतुलित कार्य पंचप्राण, पंचतत्त्वं व त्रिदोष यावर अवलंबून आहे. हे संतुलन साधण्यासाठी आपल्या शरीरातच योजना असून आपल्या हाताची बोटेच हे महत्त्वाचे कार्य पार पडतात. हाताच्या बोटांचा निरनिराळय़ा ठिकाणी दाब देऊन शरीराचे कार्य संतुलित राखता येते’. याची उदाहरणेही त्याने दिली. ‘हंसास्य मुद्रा ही उत्पत्ती हस्तक म्हणून कथकमध्ये वापरली जाते. नृत्य सुरू करण्यापूर्वी नर्तक ज्या मुद्रेत पवित्रा घेऊन उभा राहातो तीच ही मुद्रा. वाल्मीकी, वशिष्ठ, पराशर यांसारख्या अनेक महान ऋषींनी भारताला जे ज्ञानरूपी अमृत दिले आहे त्यांचीसुद्धा ध्यानमुद्रा हीच आहे. तर्जनीचे अग्र अंगठय़ाच्या अग्रावर टेकवून ही मुद्रा तयार होते. तर्जनी वायुतत्त्वाचे प्रतिनिधित्व करते, त्यामुळे तिला वायुमुद्रा असेही म्हणतात. आपला अंगठा अग्नीतत्त्वाचे प्रतिनिधित्व करतो त्याचा थेट संबंध मेंदूशी आहे. नाभीपासून उर:प्रदेशापर्यंत तेजतत्त्वाचे अस्तित्व प्रबळपणे जाणवते. खाल्लेल्या अन्नाचे पचन करून उष्णता निर्माण करणारी इंद्रिये याच भागात असतात. अंगठा मनाचा कारक मानला जातो. मन हे चंचल असते. तसेच तर्जनीचे वायूतत्त्वही चंचल असल्याने ही दोन्ही बोटे एकमेकांवर दाबून धरली की दोघांवर लगाम बसतो. त्यामुळे मन शांत होऊन एकाग्रता वाढते. म्हणून मी माझ्या विद्यार्थ्यांना मुद्रेवर अधिक भर देण्यास सांगतो’, असं गिरीशने सांगितलं. या मुद्रांचा फायदा आध्यात्मिक प्रगतीबरोबरच मुलांची स्मरणशक्ती सुधारण्यासाठीही होत असल्याने कथकबरोबरच विद्यार्थ्यांनी अचूक मुद्रेचा वापर करावा याकडे कटाक्षाने लक्ष देत असल्याचेही त्याने स्पष्ट केले. ‘विद्यार्थ्यांचे पालक मला आवर्जून विचारतात, तुम्ही शास्त्रीय नर्तक शरीराने आणि मनाने इतके तंदुरुस्त कसे असतात? याचा एक भाग म्हणजे ज्या कलेवर आपलं नितांत प्रेम आहे त्याची साधना करतानाचा शरीराच्या हालचाली होऊन एक प्रकारचा कार्डियो होतो. त्याचबरोबर लवचीकता टिकून राहते आणि नृत्यातून या हस्तमुद्रांचा सतत वापर होत असल्यामुळे विविध आजार नकळतच आपोआप दूर होतात. माझी व माझ्या विद्यार्थ्यांची आरोग्याची गुरुकिल्ली म्हणजे नृत्य आणि त्यात येणाऱ्या मुद्रा’, असंही तो विश्वासाने सांगतो.
आपण जी धडपड करतो ती कशासाठी? अन्न, वस्त्र, निवारा या मानवाच्या तीन मूलभूत गरजांबरोबरच आनंद, समाधान व मन:शांती मिळावी म्हणूनही आपली धडपड सुरू असते. या धडपडीची पहिली पायरी म्हणजे डान्स थेरपी होय. याचे अनेक फायदे आहेत ते सांगताना डॉ निखिल म्हणाले, ‘डान्स थेरपीने रक्ताभिसरण सुधारतं, व्यक्तिमत्त्व खुलण्यास मदत होते, मनाचा तोल सांभाळायला मदत होते, एकाग्रता – सुसूत्रता व आत्मविश्वास वाढतो, अनेक आजारांवर मात करण्यासाठी याचा चांगला वापर होतो, वजन कमी करण्यासाठी फायदा होतो, त्याचबरोबर स्वत:चं शरीर व मन अभ्यासण्याची ही एक सुवर्णकिल्ली आहे’.
डान्स मूव्हमेंट थेरपीचे अभ्यासक्रमही नामांकित विद्यापीठात तथा इन्स्टिटय़ूटमध्ये उपलब्ध आहेत. मुंबईत टाटा इन्स्टिटय़ूट ऑफ सोशल सायन्स येथे एक वर्षांचा ‘डिप्लोमा इन डान्स मूव्हमेंट थेरपी’ हा कोर्स आहे. ज्यात आंतरराष्ट्रीय पातळीवरचे प्रमाणपत्र सहभागी विद्यार्थ्यांना प्राप्त होते. वर्षांतून केवळ अठ्ठावीस जागांसाठीच हा कोर्स असतो. हा कोर्स करून मुंबईतल्या शाळांमध्ये लहान मुलांकडून डान्स मूव्हमेंट थेरपीचे धडे आदित्य गरुड या तरुणाने गिरवून घेतले. आदित्यने गेल्या वर्षी मुंबई महानगरपालिकेबरोबर ‘प्रोजेक्ट फुलोरा’ ही चळवळ राबवली. ज्याच्या माध्यमातून अडीच हजार विद्यार्थ्यांमध्ये डान्स मूव्हमेंट थेरपीची जागरूकता निर्माण झाली. त्याचबरोबर त्याला गतिमंद तथा मतिमंद मुलांसाठीसुद्धा थेरपी देण्याचा अनुभव आहे. आदित्य सांगतो, ‘मरीअन चेझ यांना या थेरपीसाठी जनक मानलं जातं. शरीर आणि मनाला जोडणारा दुवा म्हणजे डान्स थेरपी. आपलं शरीर आपल्याला कायम सूचना देत असतं, पण आपण त्याच्याकडे दुर्लक्ष करतो. आपण जेव्हा पहिल्यांदा जन्माला आलो तेव्हा सगळय़ात पहिल्यांदा आपण हसायला, रडायला, हावभावातून व्यक्त व्हायला लागलो. नंतर भाषेतून व्यक्त होऊ लागलो. आपलं शरीर प्रत्येक भागामध्ये आठवणी दडवून ठेवतं. काळ पुढे जातो, पण आठवणींना अमरत्वाचा शाप असतो. ‘डान्स मूव्हमेंट थेरपी’मध्ये व्यक्त होणंच महत्त्वाचं असतं. भावनांना नृत्याद्वारे वाचा फुटावी हाच त्याचा उद्देश असतो. केवळ गाण्यावर नृत्य करणं अभिप्रेत नसतं, तर संगीताचा वापर सहभागी व्यक्तींच्या अंगभूत हालचाली उद्युक्त करण्यासाठी केला जातो. इथे नृत्याचं सादरीकरण हा हेतू नसून स्वत:ला जाणवतील, मनापासून कराव्याशा वाटतील अशा उत्स्फूर्त हालचाली करणं हे अधिक महत्त्वाचं ठरतं. या प्रक्रियेद्वारेच विविध भावभावना, इच्छा, विचार यांचे आकलन होऊन ते व्यक्त करण्यास मदत होते, असं तो सांगतो.
शास्त्रीय नृत्यात गणितशास्त्र, मानसशास्त्र, शरीरशास्त्र या सर्वच विषयांचा काही ना काही रूपाने समावेश आहेच. त्याचाच फायदा नर्तकाला होत असतो. त्यामुळे खरं तर याला डान्स थेरपी म्हणावं की नृत्यातून किंवा आपल्या कलेतून थेरपीच्याही पुढे मिळणारा निखळ आनंद आणि समाधान म्हणावं हा एक यक्षप्रश्न आहे. थोडक्यात डान्स थेरपीमध्ये वेगवेगळय़ा संगीताद्वारे, वेगवेगळय़ा गाण्यांचा आधार घेत, कधीकधी कोणत्याही संगीताशिवाय देखील स्वत:ला मोकळं सोडून व्यक्त व्हायला, स्वत:ची लय शोधायला आणि ते व्यक्त करायला मदत होते.