|| राजस सहस्रबुद्धे

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मी मूळचा पाल्र्याचा. शाळा पार्ले टिळक. पुढे म. ल. डहाणूकर महाविद्यालयातून बी. कॉम. झालो. पहिल्यापासूनच खेळांची आणि इव्हेंट्सची आवड होती. शाळा-महाविद्यालयाच्या क्रिकेट टीममध्ये होतो. महाविद्यालयाच्या व्हॉलीबॉल टीममध्ये होतो. शेवटच्या वर्षांला असताना वायएमसीएसाठी मुंबईकडून व्हॉलीबॉल टुर्नामेंट खेळलो होतो. महाविद्यालयातील काही कार्यक्रम आणि विपणनशास्त्राच्या (मार्केटिंग) राष्ट्रीय स्तरावरील परिषदेला हजर राहिलो होतो. या सगळ्या गोष्टींमुळे स्पोर्ट्समध्येच काहीतरी करायचं आहे हे कायम डोक्यात होतंच.

अन्य देशांमध्ये स्पोर्ट्स आणि रिक्रिएशनसाठी पदव्युत्तर अभ्यासक्रमांची व्यवस्थित आखणी केलेली असते आणि ते मान्यताप्राप्त असतात. मी हा विचार करत असताना आपल्याकडे असे अभ्यासक्रम चटकन न आढळल्याने परदेशात शिकायला जायचं ठरवलं. शिवाय त्यामुळे मला जगाच्या पाठीवर कुठेही काम करता येऊ  शकेल, असाही विचार होता. भारतातलं मार्केट आता खूप वाढत चाललं आहे, हे खरं असलं तरी अगदी भारतात मनासारखं क्रीडाशिक्षण मिळालं असतं आणि ते घेतलं असतं, तरी त्याला काही मर्यादा येतात. पालकांच्या मनात ती पदवी आणि तिच्या उपयुक्ततेविषयी साशंकता राहिली असती. म्हणून परदेशात जायचा निर्णय घेतला.

ऑस्ट्रेलिया, कॅनडा आणि युरोपमधील फ्रान्स आणि स्वित्झर्लॅण्ड आदी देशांचा विचार केला होता. मात्र फ्रान्स आणि स्वित्झर्लॅण्डमध्ये फ्रेंच भाषेचं वर्चस्व असल्याने आणि मला ती येत नसल्याने तो विचार सोडून द्यावा लागला. बी.कॉम.च्या तीन वर्षांमध्ये पुढच्या शिक्षणाच्या दृष्टीने काय काय करावं लागेल, याचा अभ्यास करत होतो. पण तेव्हा माझा एक आडाखा चुकला. मी कुठेतरी वाचलं होतं की, स्पॅनिश ही जगात बोलली जाणारी दुसऱ्या क्रमांकाची भाषा आहे. ते खरंही आहे. मी स्पॅनिशच्या दोन लेव्हल पूर्ण केल्या होत्या. पण मला हवा तो अभ्यासक्रम असणाऱ्या देशांत स्पॅनिशला तितकं महत्त्व नव्हतं. कॅनडामधला अभ्यासक्रम चांगला होता, पण तिथे सहा महिने बर्फ असतो. उरलेले सहा महिनेच स्पोर्ट्ससाठी मिळतात. शिवाय आइस हॉकी वगैरे तिथे खेळलं जातं, पण मी ते शिकलो नव्हतो. म्हणून मग ऑस्ट्रेलियाला प्राधान्य दिलं. आयडीपी या काउन्सेलिंग सेंटरच्या माध्यमातून इथे आलो, पण मी त्यांचं मार्गदर्शन घेतलं नव्हतं. मीच आधी सगळी माहिती काढली आणि अगदी निर्णय पक्का ठरवल्यावर आयडीपीची मदत घेतली. मग मास्टर्स ऑफ बिझनेस-स्पोर्ट्स मॅनेजमेंट या दोन वर्षांच्या अभ्यासक्रमासाठी माझ्या प्रवेशाची प्रक्रिया सुकरपणे पार पडली. माझ्या चुलत भावाने याच अभ्यासक्रमाला दीड वर्षांपूर्वी प्रवेश घेतला होता. त्यामुळे त्याने आणि माझ्या एका मित्राने खूप मार्गदर्शन केलं. माझं व्हिसाचं कामही सुरळीत झालं. सहसा असं होत नाही, हे इथं आल्यावर कळलं. जनरल टेम्पररी एण्ट्रण्ट हा कॉल प्रत्येकालाच येतो असं नाही. मला आला होता. आयडीपीमधल्या एजंटनी असा कॉल येऊ  शकतो, अशी कल्पना मला देऊ न ठेवली होती. माझा शेवटच्या वर्षांचा निकाल खूप उशिरा लागला. त्यामुळे मला इथे फेब्रुवारीत यायचं होतं, पण येता आलं नाही. मग मला जूनमध्ये प्रवेश घ्यायला लागला. दरम्यानच्या काळात मी भारतातल्या ‘युनिस्टार स्पोर्ट्स एक्सलन्स’ आणि ‘सॅनव्हर स्पोर्ट्स’मध्ये काम केलं. त्यामुळे काम करत असूनही ऑस्ट्रेलियात का येतो आहे, हे या कॉलमध्ये विद्यापीठ प्रतिनिधींनी जाणून घेतलं.

मला घरच्यांचा कायमच भक्कम पाठिंबा होता. स्पोर्ट्स मॅनेजमेंट करायचं ठरवल्यावर घरच्यांनी मॅनेजमेंटच का करत नाहीस, त्याने कामाची कक्षा रुंदावेल, असा विचार माझ्या काळजीपोटी मांडला होता. पण नंतर भारतातलं क्रीडाक्षेत्रातलं बदलतं चित्र, वाढत्या संधी आणि स्पेशलाइज्ड कामंही वाढत आहेत, हे पटलं. आता इथे येऊ न सात महिने झाले आहेत. मला विद्यापीठात पोहोचायला जवळपास दीड तास लागतो. भाऊ आणि पाल्र्यातील आणखी तिघांसोबत मी राहतो आहे. आठवतो आहे तो ट्रेन आणि ट्रामने केलेला पहिला प्रवास. ट्रामने जाताना आपला स्टॉप आल्यावर बझर दाबल्यावर ट्राम थांबते. तेव्हा थोडी गडबड झाली होती. ती ट्राम सगळ्या स्टॉपवर थांबत होती. मी माझ्या स्टॉपच्या आधीच बझर दाबला आणि थांबून राहिलो. ड्रायव्हर आता उतर म्हणाला. मग मी दोन स्टॉपनंतर उतरायचं आहे, असं सांगितलं. तेव्हा त्यानं योग्य त्या स्टॉपवर ट्राम थांबवली. विद्यापीठात पोहोचल्यावर पाहिलं तर विद्यार्थ्यांना सहज कळतील, असे सूचना फलक ओरिएंटेशनला जायच्या रस्त्यावर लावलेले होते. त्यामुळे काहीच शोधाशोध करायला लागली नाही. एका मोठय़ा हॉलमध्ये ओरिएंटेशन होतं. विविध अभ्यासक्रमांसाठी आलेल्या काही भारतीयांशी ओळख झाली. पहिल्या लेक्चरला ऑस्ट्रेलियन विद्यार्थ्यांशी ओळख झाली. इथली मुलं लहानपणापासून कम्युनिटी वर्क करतात. त्यामुळे इथल्या कार्यसंस्कृतीविषयी वगैरे हळूहळू कळलं. १६ युनिट्मधल्या विषयांच्या निवडीचं स्वातंत्र्य विद्यार्थ्यांना असतं. त्यामुळे एकच एक असा ग्रूप कायम राहात नाही. इथली मुलं लहान वयातच स्वावलंबी होतात. स्वत:च्या पायांवर उभी राहातात. ते पाहून मला प्रेरणा मिळाली आणि मीही तसं करायचं ठरवलं. एण्ट्रन्सशिपमुळे इथल्या इंडस्ट्रीत काम करणाऱ्यांशी ओळख झाली. या बेसबॉल क्लबच्या एण्ट्रन्सशिपमध्ये मी मार्के टिंग व्हॉलेंटिअर आणि ग्रूप असिस्टंट म्हणून काम केलं. बेसबॉल इथे सर्रास खेळला जात नाही. त्यामुळे खूप काम नव्हतं पण वेगवेगळ्या गोष्टी शिकायला मिळाल्या. सध्या बेसबॉलचा सीझन संपल्याने ऑनलाइन काम घरून केलं तरी चालतं.

मी होतो वाणिज्य शाखेचा आणि इथल्या असाइन्मेंटमध्ये चार-पाच हजार शब्द लिहायला सांगितले गेले. आपल्याकडे अनेकदा केलं जाणारं कॉपी-पेस्ट इथे कटाक्षाने टाळलं जातं. सगळं स्वत:चं स्वत: लिहावं लागतं आणि त्यासाठीचे संदर्भही सांगावे लागतात. मला इतक्या मोठय़ा लिखाणाची अजिबातच सवय नव्हती. ती सवय होण्यासाठी आणि एकूणच इथे स्थिरावण्यासाठी सुरुवातीचे तीन-चार महिने काम केलं नाही. केवळ अभ्यासावर लक्ष केंद्रित केलं होतं. त्यानंतर समर व्हेकेशनमध्ये युनिट घेऊ  शकतो किंवा नाही घेतलं तरी चालतं. माझ्या दोन लेखी परीक्षा आणि असाइन्मेंट पूर्ण केल्या होत्या. त्यामुळे पहिलं सेमिस्टर संपता संपता मी अर्ज करायला सुरुवात केली. मुलाखतींसाठी बोलवणी आली होती. बऱ्याच ठिकाणी फिरलो. शेवटी काम मिळाल्याने मी युनिट घेतलं नाही. त्यानंतर एक पार्टटाइम नोकरीही लागली. या दोन्ही कामांमुळे माझा इथला खर्च भागवला जातो. हे सगळं करताना, मी शेवटच्या क्षणापर्यंत वेळ काढला असता तर कसरत झाली असती. पण ती टाळण्यासाठी फ्लॅटमेटनी सांगितलेल्या गोष्टींचा खूपच उपयोग होतो. उदाहरणार्थ-असाइन्मेंट दिल्यावर लगेच त्याविषयीची माहिती काढणं, संदर्भ शोधणं या गोष्टींना खूप वेळ लागतो. नंतर एक कच्चा आराखडा मनात तयार होतो नि मग लिखाणाला सुरुवात होते. संदर्भासाठी ग्रंथालयाचा खूपच वापर केला जातो. अन्य विद्यापीठात उपलब्ध असणारी ऑनलाइन पुस्तकं वाचण्याची सोयही आहे.

थिअरी शिकवली तरी प्रॅक्टिकलवर खूपच भर दिला जातो. त्या त्या विषयांवर इंडस्ट्रीतल्या जाणकार वक्त्यांचं व्याख्यान आयोजिलं जातं. त्यामुळे काय प्रकारे लिहायचं आहे, अभ्यास कसा करायचा, ही दिशा मिळते. भविष्यात या सगळ्या गोष्टींचा नक्कीच उपयोग होऊ  शकतो. इथली शिकवण्याची पद्धत आणि अपेक्षा खूप वेगळ्या आहेत. असाइन्मेंटमध्ये निव्वळ माहितीचा भरणा करणं अपेक्षित नाही. विषयाला साजेशी उदाहरणं देणं अपेक्षित असतं. काही प्राध्यापक खूपच चांगलं शिकवतात. तर काहींचा भर विद्यार्थ्यांना इंडस्ट्रीतील प्रॅक्टिकल माहिती देण्यावर असतो. प्राध्यापक विद्यार्थ्यांशी स्नेहाने वागतात. ईमेलना प्रतिसाद देतात. कॉफी मीटिंग दरम्यान शंकानिरसन करतात. विद्यापीठात विद्यार्थ्यांच्या तऱ्हेतऱ्हेच्या अडीअडचणी निवारण्यासाठी मेंटॉर्स असून त्यात माजी विद्यार्थ्यांचाही समावेश असतो. शिकताना विषयांच्या अनेक कंगोऱ्यांची माहिती झाली. काही नावडत्या विषयांचाही अभ्यास करावा लागेल, ही मानसिक तयारी करून आलो होतो.

दक्षिण आफ्रिका, केनिया, चीन, कोरिया, जर्मनी, अमेरिका, मेक्सिको या देशांतील विद्यार्थ्यांशी होणाऱ्या गप्पा खेळांशी संबंधित असतात. विद्यापीठाच्या स्पोर्ट्स टीम खूप आहेत, पण मी त्यात नाही. कारण मला खेळण्यापेक्षा कामाचा अनुभव घेणं महत्त्वाचं वाटतं आहे. क्वचित कधी फ्लॅटमेट्ससोबत क्रिकेट वगैरे खेळलं जातं. गणपती, दिवाळी वगैरे सणवार आम्ही साजरे करतो. घरकाम ठरवून आळीपाळीनं केलं जातं. सुरुवातीचे काही महिने इथल्या पदार्थाचा आस्वाद घेण्यात गेले. आता त्यांचा कंटाळा आल्यावर मी घरी जेवण करायला लागलो आहे. मला ड्रायव्हिंग करायला आणि भटकंती करायला खूप आवडतं. ग्रेट ओशन रोड, लेक पिंक आदी ठिकाणी फिरायला गेलो होतो.

विद्यापीठाच्या बुरवुड कॅम्पमध्ये अनेक इव्हेंट्स होत असले तरी मी वीकएण्डला काम करत असल्याने त्यातल्या बहुतांशी इव्हेंटमध्ये सहभागी होता येत नाही. स्पोर्ट्सविषयक अनेक इव्हेंट्स, करिअर एक्स्पोही होतो. सीव्ही कसा लिहावा, नेटवर्किंग चांगलं होण्यासाठी काय करावं आदींविषयी मार्गदर्शन केलं जातं. हजेरी नव्हे तर अभ्यासाला महत्त्व दिलं जातं. आमचा अभ्यासक्रम दूरस्थ-ऑनलाइनही शिकता येतो. त्याचा लाभ इथल्या फील्डमधील लोक घेतात. दोन वर्षांचा हा अभ्यासक्रम संपल्यावर पुढे कामाचा अनुभव घ्यायचा विचार आहे.

कानमंत्र –

  • नव्याने किंवा अवचित समोर आलेल्या सगळ्या गोष्टींना तोंड द्यायची मानसिक तयारी ठेवा.
  • आपला अभ्यासक्रम संपल्यानंतर काय करणार, याचा विचार आधीच करा.

शब्दांकन – राधिका कुंटे

मराठीतील सर्व व्हिवा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Deakin university melbourne