दीपिका पदुकोणचा होमी अडजानियानी केलेला ‘माय चॉइस’ नावाचा व्हिडीओ गेल्या आठवडय़ात सगळ्या सोशल नेटवर्किंग साइट्सवर व्हायरल झाला होता. वेगवेगळ्या माध्यमांमधून त्यावर भरपूर चर्चाही चालू आहे. मी काय कपडे घालावेत, कसं राहावं, लग्न करावं की करू नये, कुणाशी करावं, मुलं होऊ द्यावी की नको.. माय चॉइस! असं ठामपणे सांगणारा दीपिका पदुकोणचा आवाज आणि त्यासोबत झळकणाऱ्या वेगवेगळ्या प्रतिमा.. ९९ जणींचे चेहरे. वेगवेगळ्या क्षेत्रांत काम करणाऱ्या स्त्रियांच्या प्रतिमा आणि ‘माय बॉडी, माय सोल, माय चॉइस’ हे ठसवणारा तो आवाज म्हणजे स्त्री- स्वातंत्र्याचा विषय खूपच बोल्डपणे मांडणारा ठरला.
‘माझ्या कपाळावरचं कुंकू, माझ्या बोटातली अंगठी, (मी स्वीकारलेलं) तुझं आडनाव हे माझे दागिने आहेत.. ते बदलू शकतात. माझं तुझ्यावरचं प्रेम हेच शाश्वत आहे. त्याचा आदर कर.’ हे सांगणारा दीपिकाचा आवाज अनेकींना आपला वाटतोय.
बोल्ड हा शब्द यासाठी की, या व्हिडीओमध्ये व्यक्त केलेल्या ‘माय चॉइस’च्या संकल्पनेमध्ये असेही काही मुद्दे आहेत, जे एवढय़ा स्पष्टपणे एखाद्या सेलेब्रिटीच्या तोंडून प्रथमच एवढय़ा थेटपणे मांडण्यात आले. लग्न करावं की करू नये.. माझा निर्णय आहे यापुढे दीपिका म्हणते.. ‘सेक्स बीफोर मॅरेज, सेक्स आऊटसाइड मॅरेज.. माय चॉइस’ त्यापुढे मुळात ‘सेक्स करावा का करू नये, पुरुषासोबत की बाईसोबत हा माझा चॉइस आहे..’ असंही या व्हिडीओमध्ये म्हटलंय आणि त्यावरूनच मोठा गदारोळ उठलाय.
या व्हिडीओमधली मतं कुणाला पटली, कुणाला अतिरेकी वाटली. कुणाला हा स्वच्छंदीपणा वाटला तर कुणाला स्वैराचार. हा केवळ प्रसिद्धीसाठी केलेला खटाटोप आहे, असंही बोललं जातंय. यातलं काय चूक-बरोबर हा विषय नाही, पण या निमित्ताने किमान ‘बाईचा चॉइस’ या विषयावर एवढय़ा उघडपणे चर्चा तर झाली. तुम्हाला काय वाटतं? स्त्रीस्वातंत्र्य, स्त्री-पुरुष समानतेचा हा संदेश तुम्हाला कसा वाटतो? तुमचे विचार ‘व्हिवा’पर्यंत नक्की पोचवा. सोबत तुमचे नाव, कॉलेजचे नाव, शहर ही माहितीही पाठवा. मजकूर युनिकोडमध्ये टाइप करून रविवारच्या आत आम्हाला खालील पत्त्यावर  ई-मेल करा.
प्रतिनिधी -viva.loksatta@gmail.com

Story img Loader