प्र. : मी आणि माझा बॉयफ्रेंड जवळजवळ गेली दोन र्वष रिलेशनशिपमध्ये आहोत. अधूनमधून भांडणं होतात, पण नथिंग सीरियस! अजूनपर्यंत आम्ही फिजिकल लिमिट्स पार केलेली नाहीत. ‘लग्न करू’ असं काहीसं गृहीत धरलंय, पण त्याविषयी स्पष्ट बोलणं झालेलं नाही. घरच्यांना तो फक्त ‘चांगला मित्र आहे’ इतकंच माहिती आहे, मला प्रॉब्लेम असा आहे की, आजकाल तो फिजिकल रिलेशन्सबाबत काहीसा डिमांडिंग झाला आहे, पण मला कंफर्टेबल नाही वाटत. त्याला दुखवू नये असंही वाटतं. काय करावं?
-सिमरन

सिमरन, या रिलेशनशिप्सबाबत आजकाल आपण बरेच लिबरल झालो आहोत. आधीच्या पिढीला ते डायजेस्ट होणं नक्कीच कठीण आहे. म्हणूनच कदाचित लग्नाचा नक्की डिसिजन होईपर्यंत तुम्ही घरच्यांना मोघमच सांगितलंय.
अ‍ॅट्रॅक्शन जरी माणसासकट सर्व प्राण्यांमध्ये नॅचरल असलं तरी आपण सोसायटीमध्ये राहत असल्यामुळे ते काही रुल्सच्या चौकटीत बांधून ठेवतो. तारुण्यात प्रवेश करण्याचं वय आणि प्रत्यक्ष कमिट करून लग्न करण्याचं वय यामधली गॅप वाढत चाललीय. या ताणलेल्या काळात अतृप्त राहणारी ही शारीरिक गरज तात्पुरत्या आणि रेकलेस निर्णयांनी भागवली जाते. मुलं आणि मुली यांच्यात आपण फरक केला नाही तरी लैंगिक गरजा भागवण्याच्या बाबतीत त्यांचे प्रेफरन्सेस वेगळे असतात. पुरुषी मेंदूमध्ये शारीरिक ऊर्मी प्रथम आणि बाकीच्या गोष्टी नंतर येतात. मुलं प्रपोज करतात ते ‘गर्ल फ्रेंड’ म्हणून; लग्नासाठी फारच क्वचित आणि तेही खूप नंतर! मुलींना मात्र थोडय़ा मनाच्या तारा जुळल्या, फ्युचरविषयी थोडी निश्चिती वाटली तरच पुढे जायला थोडा धीर येतो. त्यामुळे लग्नाचं नुसतं आश्वासन जरी मिळालं तरी त्या शरीरसंबंधाला तयार होतात. अशा प्रकारच्या अनेक बातम्या तू वाचल्या असशील.
‘काय प्रॉब्लेम आहे त्यात? थोडय़ा प्रिकॉशन्स घेतल्या की झालं!’ असं तुझ्या मित्राचं कदाचित मत असेल. ‘प्रिकॉशन्स’मुळे प्रेग्नसी टाळता येते. पण माझ्याकडे येणाऱ्या अनेक मुलामुलींना त्याविषयी फारच अपुरी आणि बरीचशी चुकीची माहिती असते. त्यामुळे या सगळ्या गोष्टी अव्हेलेबल असूनही आमच्याकडे मुली ‘अनवॉन्टेड प्रेग्नन्सी’ घेऊन येतात. म्हणजेच वाटते तितकी ही मेथड फूल प्रूफ नाही.
सॉरी थोडं लेक्चरच दिलं मी तुला! पण तुझ्यासारखाच प्रश्न पडलेल्या इतर अनेकजणांना मला हे एकदा सांगायचं होतं.
रिलेशनशिपमध्ये कुठपर्यंत पुढं जायचं हा तुझा स्वत:चा अगदी पर्सनल डिसिजन आहे, नव्हे तुझा तो हक्क आहे. तो घेताना इतर कोणत्याही गोष्टींचं किंवा व्यक्तींचं दडपण घ्यायचं तुझ्यावर बंधन नाही. कारण त्यातून उद्भवणाऱ्या शारीरिक आणि इमोशनल परिणामांना तुलाच सामोरं जायला लागणार आहे.
तू हे सगळं तुझ्या बॉयफ्रेंडशी मोकळेपणानं डिस्कस करू शकतेस. यावरून तुमची रिलेशनशिप धोक्यात आली तर तुला वेळीच इशारा मिळेल. इतक्या विसविशीत पायावर असलेला डोलारा आता तरी कसाबसा उभा राहिला तरी कुठल्याही स्टेजला कोसळण्याची शक्यता आहे. तुला हा निर्णय नक्की का घ्यायचाय हे तू नीट एक्स्प्लेन केलंस तर त्याला पटेलही. किंवा नाही पटलं तरी ‘तुझा निर्णय’ म्हणून तो त्याला रिस्पेक्ट करील. तू तुझ्या निर्णयाशी ठाम राहा.

विचारा तर खरं…
तरुणपणात निसर्गनियमाप्रमाणे प्रेमात पडायला होतंच. अर्थात ओघानं प्रेमभंगही आलाच. नवीन नाती, नवीन अभ्यासक्रम, नवीन जॉब आणि त्यांमधल्या गुंतागुंती. शरीराविषयी शंका, निर्णयांविषयी शंका असं खूप काही मनात सुरू असतं. खरं तर शंका खूप जेन्युईन असते पण ऐकणारा काय म्हणेल, हसेल की काय असं वाटतं. कुणाला विचारावं हेही कळत नाही. तुम्हाला वाटतंय असं काही? मग हा कॉलम आहे खास तुमच्यासाठी, तुम्हाला पडत असलेल्या प्रश्नांना वाट देण्यासाठी. इथे तुम्हाला वाटणाऱ्या शंकेला कुणी नाकं मुरडणार नाहीये की फालतू म्हणून त्या निकालात काढणार नाहीये. बिनधास्तपणे त्या शेअर करा. viva@expressindia.com  या आयडीवर. सब्जेक्टलाईनमध्ये ओपन अप असं लिहायला विसरू नका.