ग्लोबल फॅशन ट्रेंड्स आपल्याला आता माहिती असतात. ग्लोबल ब्रँड्स आपल्याकडे सर्रास उपलब्ध असतात. पण त्याच वेळी देशी डिझायनर ब्रँड्स कधी नव्हते एवढे वाढले आहेत. नवनवीन फॅशन डिझायनिंग स्कूल्सच्या माध्यमातून या क्षेत्रात येणाऱ्या डिझायनर्सचा ओघही वाढला आहे.
गेल्या काही वर्षांत देशातला फॅशन उद्योग नव्या वळणावर आलाय. आपल्या फॅशनविषयक जाणिवा प्रगल्भ व्हायला लागल्या आहेत. लेटेस्ट ट्रेंड, लेटेस्ट फॅशन काय याची अगदी सामान्य मुलींनाही बरीच माहिती असते. पूर्वीची फॅशन फक्त हिंदी सिनेमावर आधारित असायची. म्हणजे एखाद्या चित्रपटात एखाद्या नटीनं केलेला पेहराव, तिचा ड्रेस जसाच्या तसा फॅशन म्हणून रूढ व्हायचा. ‘दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे’मधला काजोलचा वन पीस ड्रेस किंवा हम आपके है कौनमधला माधुरीचा लाल ड्रेस जसाच्या तशा फॅशन म्हणून रूढ झाला होता. आताही हिंदी सिनेमा ही फॅशनमागची प्रेरणा असते. म्हणजे हिंदी सिनेमातली फॅशन हीच हिट फॅशन असते यात शंका नाही. पण ती आपण जशीच्या तशी स्वीकारली जात नाही आणि ती आणि तेवढी एकच फॅशन आता नसते. बाजारात नवीन काय आलं आहे, ट्रेंड कसला आहे आणि मुख्य म्हणजे जगात इतरत्र फॅशनबाबत काय सुरू आहे याची बित्तंबातमी आपल्यातल्या अनेक जणींना असते. आंतरराष्ट्रीय ब्रँड्स आपल्याकडे आता सर्रास उपलब्ध व्हायला लागले आहेत. मला अमूक ब्रँडच सूट होतो, अ‍ॅक्सेसरीज तमूक ब्रँडच्याच चांगल्या असतात, असं म्हणणाऱ्या फॅशन कॉन्शस मुली वाढताहेत. ग्लोबल फॅशन ब्रँड्स कॉमन व्हायला लागलेत हे खरंय, पण त्याच्या बरोबरीनं कधी नव्हते एवढे देशी ब्रँड्सही लोकप्रिय व्हायला लागले आहेत. डिझायनर वेअरचा नवा ट्रेंड रुजतोय.
सब्यासाची मुखर्जी, विक्रम फडणीस, अनिता डोंगरे, नीता लुल्ला, निवेदिता साबू अशा भारतीय डिझायनर्सची सिग्नेचर स्टोअर्स मोठय़ा शहरांमध्ये उघडलेली दिसताहेत. डिझायनर वेअर घेण्याकडे कल वाढतोय. कारण त्याचा युनिकनेस तरुणाईला खुणावतोय. चारचौघांमध्ये आपण उठून दिसलं पाहिजे यासाठी असं ‘हटके लुक’चं डिझायनर वेअर अगदी मस्ट झालंय. पण सगळ्यांनाच काही अशा मोठय़ा डिझायनर्सचे सिग्नेचर वेअर घेणं परवडतं असं नाही. तरीदेखील डिझायनर वेअरचे बाजारात इतरही अनेक पर्याय उपलब्ध आहेत. तुलनेने कमी प्रसिद्ध अशा अनेक नवख्या डिझायनर्सचं कलेक्शनही तेवढंच लक्षवेधी ठरतं. पूर्वी म्हणजे अगदी आठ- दहा वर्षांपूर्वीपर्यंत अशी डिझायनर वेअर सर्रास उपलब्ध व्हायची नाहीत.  मुळात फॅशन डिझायनिंगच्या क्षेत्रात एवढय़ा मोठय़ा प्रमाणावर मुलं येतच नव्हती. गेल्या पाच वर्षांत फॅशन उद्योगात नव्याने येणाऱ्यांची संख्या दुपटीने वाढली आहे. सुरुवातीला या क्षेत्रात येऊ इच्छिणाऱ्यांना इथपर्यंत पोचण्याचा मार्गच माहिती नव्हता. फॅशन टेक्नॉलॉजी किंवा फॅशन डिझायनिंगचं शास्त्रशुद्ध शिक्षण घ्यायची एवढय़ा मोठय़ा प्रमाणावर संधी नव्हती. नॅशनल इन्स्टिटय़ूट ऑफ फॅशन टेक्नॉलॉजीसारख्या मोजक्या संस्थांमधूनच या क्षेत्राचे व्यावसायिक शिक्षण घ्यायची सोय होती. शिक्षण घेऊन बाहेर पडलेल्या मुलांसाठी संधी मिळण्यासाठी फार स्ट्रगल करावा लागायचा. फॅशन शो आणि रँप वॉक आजच्याइतके कॉमन झाले नव्हते. आता फॅशन डिझायनिंग इन्स्टिटय़ूट्सही मोठय़ा प्रमाणावर निर्माण होऊ लागल्या आहेत. डिझायनिंग, मॉडेलिंग आणि फॅशन उद्योगातल्या इतर कामांचं प्रशिक्षण देण्यासाठी अनेकांनी हात पुढे केले आहेत.
ज्येष्ठ डिझायनर कृष्णा मेहता या संदर्भात म्हणतात, ‘आजपासून ३० वर्षांपूर्वी मी तरुण असताना एवढय़ा संधी नक्कीच नव्हत्या. आज फुलणारं हे क्षेत्र बघून असं वाटतं की, तरुण असते तर आता इथे शिकायला आले असते.’
प्रसिद्ध डिझायनर नीता लुल्ला म्हणतात, ‘फॅशन डिझायनिंग स्कूलमधले प्रशिक्षण आणि प्रत्यक्ष व्यवसायातली गरज यांचा मेळ घालण्याची आज गरज आहे. या पुढच्या काळात फॅशन डिझायनिंगचे क्षेत्र वाढत जाणार आहे. गेली अनेक वर्षे मी वेगवेगळ्या इन्स्टिटय़ूटमधून शिकवत असताना मुलांना आज या क्षेत्रातील प्रॅक्टिकल ज्ञानाची गरज असल्याचं लक्षात आलं.’
नीता लुल्ला आता स्वत फॅशनसंदर्भातील प्रशिक्षण द्यायला या क्षेत्रात उतरल्या आहेत. सुभाष घईंनी स्थापन केलेल्या मुंबईच्या व्हिसलिंग वूड्स इन्स्टिटय़ूटच्या कँपसमध्येच त्यांचे व्हिसलिंग वूड्स नीता लुल्ला स्कूल ऑफ फॅशन नुकतेच सुरू झाले. भारतीय डिझायनरचं फॅशन स्कूल उघडण्याची ही पहिलीच वेळ आहे.
ग्लोबल ब्रँड्च्या तुलनेत देसी ब्रँडही तितकेच वाजतगाजत बाजारात येत आहेत, ही नक्कीच वेगळी गोष्ट आहे. त्यामुळे आता आपल्याला या स्पर्धेत भरपूर चॉईस आणि व्हरायटी मिळणार ही त्यातली चांगली गोष्ट.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा