इतके वैविध्य पाहून, नक्की काय घालावे हे न कळून सामान्य माणूस संभ्रमात पडतो. आपल्या व्यक्तिमत्त्वाला शोभून दिसणारे प्रिंटेड कापड निवडणे हे फारच कठीण काम. यामागचे महत्त्वाचे कारण म्हणजे रोजच नवनवीन छपाई असलेली अनेक कापडे बाजारात हजर होत असतात आणि तसे पाहायचे तर सगळीच मनाला भुरळ घालतात. कापडाचा पोत किंवा रंग या कशातच या प्रिंट्सइतके नावीन्य असूच शकत नाही. त्यामुळे कोणती चित्रे असलेला, कोणता कापडाचा प्रकार निवडायचा ही गोष्ट मोठय़ा खुबीची आहे. कारण फक्त कापडावरील नक्षी आवडणे महत्त्वाचे नाही तर ती आपल्याला शोभून दिसणे हेही तितकेच गरजेचे आहे.
या निवडीमध्ये अनेक बाबींना प्राधान्य द्यावे लागते. मुख्य म्हणजे कपडा परिधान करणाऱ्या व्यक्तीचे वय आणि आकारमान. कोणतीही फॅशन कोणत्याही वयात करावी हे जरी मान्य केले तरी ती तुम्हाला शोभायला तर हवी की नाही? सर्वसाधारणपणे तिशी-पस्तीशीपर्यंतच्या स्त्रियांना कोणताही कापडाचा प्रकार, त्यावरील चित्रकला शोभून दिसते, पण त्यानंतर मात्र शरीराचा आकार, चालण्याची ढब, वयाचा शरीरावर होणारा दृश्य परिणाम या सर्वाचा विचार कपडय़ावरीलप्रिंट निवडताना करावा लागतो. अशा वयात बहुधा फुलापानांची नाजूक नक्षी किंवा पारंपरिक चित्रकला तुमची प्रतिमा अधिक प्रगल्भ दिसण्यास मदत करते. असा िपट्र निवडीचा प्रश्न पुरुषांच्या बाबतीत उद्भवतच नाही. आता मात्र परिस्थिती थोडी बदलताना दिसते आहे. आजकालची तरुणाई आणि चाळिशीच्या आतले युवक चित्रविचित्र छपाई असलेले कपडे घालताना सर्रास दिसतात.
आता सर्वात महत्त्वाच्या मुद्दय़ाकडे वळूया, तो म्हणजे कपडा घालणाऱ्या व्यक्तीच्या शरीराचा आकार. आणि येथेच आपल्याला ड्रेस डिझायनर्सची फार मोलाची मदत होते. तंत्रशुद्धपणे विचार करायचा झाला तर शरीराचा आकार म्हणजे उंची आणि रुंदी. उभ्या- आडव्या रेषा किंवा चौकडीचे प्रिंट मागील लेखात सांगितल्याप्रमाणे – रेषा रेखांकनामुळे होणाऱ्या दृष्टीभ्रमासारखेच परिणाम करतात. आपल्या किंवा कोणाच्याही शरीराचा आकार नेमका कसा आहे हे ठरवता येणे फार कठीण. कोणाचे खांदे ताठ आणि रुंद असतात, तर कोणाचे उतरते, कोणाचा पाश्र्वभाग खूप मोठा, तर कोणाचा अगदीच अरुंद, कोणाची छाती भरदार, तर कोणाच्या मांडय़ांचा भाग आकाराने मोठा असतो. कोणाचे शरीर अंडाकृती आणि कंबर जाड असते. अशा सर्वासाठी कोणत्या प्रकारची प्रिंट्स योग्य दिसतील त्याचा विचार करूया.
पुलांची नक्षी
सामान्यत: फुलांची नक्षी असलेले कपडे सर्व वयोगटाचे स्त्री-पुरुष घालतात. असे कपडे तुम्ही वयाने लहान किंवा तरुण असल्याचे भासवतात, पण अशीच गडद आणि मोठय़ा आकाराची कपडय़ावरील नक्षी पस्तिशीच्या आतल्या कोणालाही शोभून दिसते. त्यापुढच्या वयोगटातल्या माणसांनी तरल रंगातली नाजूक फुलांची नक्षी निवडणे योग्य. उंच व्यक्तींना मोठय़ा फुलांची नक्षी चालून जाते, पण कमी उंची असणाऱ्या व्यक्तींनी लहान आकाराची विरळ फुलांची नक्षी असलेला कपडा निवडलेला चांगला.
भौमितिक चित्र
वेगवेगळ्या रेषा, उदा. उभ्या, आडव्या, चौकडी, चौरस, आयत, गोलाकार याचा वेगवेगळा किंवा एकत्रित वापर म्हणजे भौमितिक चित्र किंवा जॉमेट्रिक प्रिंट्स. यांतील जास्त प्रमाणात वापरण्यात येणारा आकार म्हणजे वर्तुळे. यांचा पोल्का डॉट्स म्हणून उल्लेख केला जातो. फार पूर्वापार वापरात असलेले या प्रकारचे डिझाइन सर्वच वयातील व्यक्तींना प्रामुख्याने तरुणांना जास्त आकर्षति करते. अतिबारीक किंवा अतिजाड व्यक्तींनी मोठय़ा आकाराच्या व अगदी जवळजवळ पोल्का डॉट्स असलेले कपडे टाळायला हवेत, कारण त्यामुळे जाडी व्यक्ती आणखी जाड, तर बारीक व्यक्तीच्या आकारमानाशी ते मिळतेजुळते दिसणार नाही.
पेसली प्रिंट
कापडावरील नक्षीत मुबलक प्रमाणात वापरण्यात येणारा आणखी एक प्रकार म्हणजे पेसली प्रिंट, याला भारतात कैरी प्रिंट असेही म्हणतात. कपडे, चादरी, हातावरच्या मेहंदीत हा नक्षी प्रकार वापरण्यात येतो,आणि मुख्य म्हणजे तो सर्व वयोगटांतील व्यक्तींना शोभून दिसतो. यातील लांबट (उदा. पíशयन) नक्षी कमी उंचीच्या व्यक्तींना योग्य दिसते. तर तशीच भारतीय प्रकारची नक्षी अंगाने सडपातळ व्यक्तींना शोभते.
अमूर्त चित्र
या प्रकारच्या चित्रांना प्रमाणबद्धता नसते व ती अंगभर पसरलेली असतात. खरे तर अशी नक्षी ठळक आणि आकर्षक असते, पण ती सगळ्यांनाच शोभून दिसेल असे नाही. यासाठी वय महत्त्वाचे नाही, पण वापरलेली रंगसंगती, नक्षीचा आकार हे कपडा वापरणाऱ्या व्यक्तीच्या आकारमानाला शोभायला हवे हे नक्की. उंच व्यक्तींनी मोठय़ा ठळक अमूर्त रचनेची, तर बारीक माणसांनी मध्यम आकाराच्या अमूर्त रचनेची निवड करावी.
मानवी आणि प्राण्यांच्या आकृत्या
पारंपरिक वस्त्र प्रावरणांमध्ये प्राणी, पक्ष्यांच्या आकारांच्या नक्षीचा वापर अधिक दिसत असला तरी आता पाश्चात्त्य पद्धतीच्या आऊटफिट्समध्येही हे आकार वापरले जातात. अशी नसíगक आणि ट्रेंडी नक्षी सर्व वयोगटांतील व्यक्तींना शोभते. चित्ता प्रिंट, झेब्रा प्रिंट , टायगर प्रिंट अशी प्राण्यांच्या आकाराची चित्रे १९५० च्या दशकात पाश्चात्त्य पद्धतीच्या पॅन्टस, जाकिटे, कुत्रे यावर मोठय़ा प्रमाणात दिसत असत. हे प्रकार वापरणाऱ्या व्यक्तीचा आकार महत्त्वाचा नसून वय महत्त्वाचे असते.
पौराणिक चित्रे
या प्रकारच्या चित्र नक्षीला वस्त्र उद्योगात चांगलीच मागणी आहे. भारतात आणि भारताबाहेर या स्टायलिश प्रिंटचा वापर मोठय़ा प्रमाणात होताना दिसतो. यात सर्वाना आवडणारी कपडय़ावरील चित्र म्हणजे राधा-कृष्ण, गौतम बुद्ध, भगवान शंकर आणि गणपती. या नक्षीचा वापरणाऱ्याच्या आकाराशी संबंध नसतो, पण वयाशी मात्र असतो. ही पूर्णाकृती चित्रे कोणताच दृष्टीभ्रम निर्माण करीत नाहीत. अर्थात तरुण वर्गात या प्रकारच्या प्रिंट्सना भरपूर मागणी असते.
कपडय़ांवर आणखीही अनेक चित्रपद्धती वापरल्या जातात. भारतीय ग्राहकांच्या बदलत्या वैचारिक दृष्टिकोनानुसार, डिझायनर्सनाही कपडय़ांवर निरनिराळे प्रयोग करण्याची आयतीच संधी मिळते.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा