डाएट, वेट लॉस, काय खावं, काय टाळावं याबाबत आता सगळीकडून माहितीचा पूर वाहतोय. पण घोडं अडतं, ते प्रत्यक्ष आचरणात आणताना! थिअरी ते प्रॅक्टिकलमधल्या गमतीजमतीमुळेच डाएटचा संकल्प धुळीला मिळतो. डाएटचं मनावर घेतलेल्या टीनएजर मुलीची ही डायरी त्यासाठीच!

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

फॅड डाएटचा प्रयोग फसल्यानंतर मी डाएटचं मनावर घेतलं खरंच आणि आईला गुरूपदी मान्य केलं. ‘आई! माझं नवीन डाएट झालं का गं लिहून?’ आई ‘हो!’ अशा रीतीनं आता माझ्या छान पौष्टिक डायटची सुरुवात झाली. सकाळी दोन ग्लास पाणी प्यायले. आईने सफरचंद आणि पेअरचे काप कापलेलेच होते. ते खाल्ले आणि चक्क आज आईबरोबर शिवाजी पार्कात फिरायला गेले. प्रत्येक पावलागणिक आई ह्य़ाला-त्याला बघून हसायची, पण थांबत मुळीच नव्हती. चालता चालता तिच्याशी गप्पा मारायला मिळाल्या. अर्थात खूप दिवसांनी सध्या माझ्या अभ्यासाच्या व मोबाइलवर चालणाऱ्या असंख्य गोष्टींमुळे आम्हाला गप्पा मारायला मिळतच नाहीत. माझ्यापेक्षा तिचा स्पीड जास्तच होता. शेवटी ती हळू चालली. शाळा, अभ्यास हे महत्त्वाचे विषय सोडून आम्ही बोललो. गंमत वाटली मला. हुश्श करून घरी पोहोचलो. मी पाय वर करून सोफ्यावर तंगडय़ा पसरल्या तर तिकडे माझ्या मातोश्री पटापट अंडी – फुलके – ओटचे घावन – ज्यूस इत्यादी नाश्त्याची तयारी करायला स्वंयपाकघरात गेल्या. ही शक्ती हिच्यात येते तरी कुठून, कोण जाणे.

मी नाश्ता केला आणि अभ्यास करण्याच्या निमित्ताने खोलीत गेले. तंगडी पसरून हातात पुस्तक घेऊन मस्त झोपले. दुपारी आईने जेवायला हाक मारली, तेव्हा कुठे जाग आली. ती तोपर्यंत स्वत:चं आवरून पेशंट तपासून घरीपण आली होती. मग आम्ही जेवलो.आईने रोज मांसाहार नको, म्हणून मटकीची उसळ आणि फुलके केले होते. त्याबरोबर डाळ, पण हलकी फोडणी दिलेली. छान लसणीच्या वासानं मला ती खावीशी वाटली. मस्त कांदा, टोमॅटो, काकडीची चाट मसाला- िलबू घालून कोिशबीर होती. ती छान तिखट चमचमीत झालेली. जेवण झाल्यावर वाटीभर दही खाल्लं. आईनं जेवण झाल्यावर स्पष्टीकरण दिलं की, जेवणात काबरेहायड्रेट्स व प्रथिनांचं प्रमाण ३:१ तरी असावं. प्रत्येक जेवणात / खाण्यात याची काळजी घेतली की, मग आपल्याला प्रथिनांचं प्रमाण अवाच्या सव्वा घ्यायला लागत नाही.

मग माझं मोबाइलवर चॅटिंग सुरू झालं. ती मात्र सर्वाचं आवरल्यावर माझ्या बहिणीच्या मागे अभ्यासासाठी हात धुऊन लागली. शेवटी लाजेखातर मीदेखील थोडंसं वाचलं. तिच्या मत्रिणीचा फोन आला तशी आई लगेच घरात फेऱ्या मारायला लागली. कॅलरी बìनग म्हणे! मला तिला बघून भणभणायला लागलं आता. आजकाल आम्ही तरुण लोक इतकी कंटाळवाणी का असतो? विचार करता करता अजून एक गोष्ट माझ्या लक्षात आली. वेळच्या वेळी न खाणं आणि फक्त गोड पदार्थ, तेलकट पदार्थाचं सेवन यामुळे मेंदूला आणि शरीराला एक प्रकारची शिथिलता येते.. आई नेहमी म्हणते. नेहमीची मी असते आणि एवढा वेळ घरी एका जागी असते तर आतापर्यंत एखादा कोक प्यायले असते. त्यातून असंख्य प्रमाणात साखर तर जातेच, पण कॅफेनमुळे मनाला आणि मेंदूला तरतरी आल्याचा भास होतो. या दोन्हीचं शरीरातील प्रमाण कमी झालं की, परत परत तेच सेवन करायची तल्लफ निर्माण होते. (हेदेखील मातोश्रींच्या प्रवचनातून मिळालेले ज्ञान). आजही वाटलं की, जरा बाहेर जाऊन कोक प्यावा, पण ती तल्लफ मी जाणीवपूर्वक टाळली. ठरवलं की, कोल्ड्रिंक्स टाळली पाहिजेत. त्यानेही माझं वजन कमी होण्याची दाट शक्यता आहे. तेलकट चिप्स, तेलकट कुरकुरे, एखादं लेज् कधीच फडशा पडला असता, पण आता तोही टाळला. आम्ही तरुण मंडळी कोक, पेप्सी शीतपेये इतकी पितो की, विचारू नका. आई म्हणते त्यापेक्षा साखर न घालता फळांचा रस प्या. नुसती फळं खा.

तुम्हाला आई पुराण इतकं ऐकवतेय की, तुम्हाला असं वाटेल की, आई एकदम हंड्रेड परसेंट परफेक्ट आहे. पण ह्य़ा डाएटमध्ये थोडीशी चिटिंग कशी करायची हेही मला आई शिकवणार आहे. आत्तापासूनच त्याविषयी कुतूहल जागृत झालंय. शेवटी दुपारचा खाकरा, ताक आणि संध्याकाळी मशरूम सूप, चिकन सॅलड, हर्ब राइस खाऊन मी एकदाची झोपले. माझ्या डाएटमुळे आईही किचनमध्ये वेगवेगळ्या गोष्टी करायला उत्सुक असल्याचं दिसलं. मला असं वाटतं या वर्षभरामध्ये मी स्वंयपाक करायलाही नक्कीच शिकेन. आधी हे कोक, पेप्सी, कुरकुरे, लेज्, पेपी प्रकरण कसं हातावेगळं करायचं त्याचा शोध घेते.
(लेखिका वैद्यकीय तज्ज्ञ आणि स्पोर्ट्स न्यूट्रिशनिस्ट आहेत.)

मराठीतील सर्व डाएट डायरी बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Best way to start a diet detox