डाएट, वेट लॉस, काय खावं, काय टाळावं याबाबत आता सगळीकडून माहितीचा पूर वाहतोय. पण घोडं अडतं, ते प्रत्यक्ष आचरणात आणताना! थिअरी ते प्रॅक्टिकलमधल्या गमतीजमतीमुळेच डाएटचा संकल्प धुळीला मिळतो. डाएटचं मनावर घेतलेल्या टीनएजर मुलीची ही डायरी त्यासाठीच!
आईचा फोन वाजला. आई आनंदाने सांगत होती. तिला चक्क मुंबई मॅरेथॉनचं बिब मिळालं होतं.. २१ किलोमीटरचं. ती जाम एक्सायटेड वाटली. मी तिचं अभिनंदन केलं आणि फोन ठेवला. आता आठवडाभर काही आमच्या घराची खैर नाही. खेळाडूंचीच आहारतज्ज्ञ म्हणजे आता आमचं अख्खं घर युद्धभूमीवर जायच्या पूर्वतयारीला लागणार.
आई या रेससाठी वर्षभर जराजराशी तयारी करत होती. पण नेहमीप्रमाणे समाधानकारक व्यायामाच्या दृष्टीने तयारी झालेली नव्हती, हे आम्हाला दिसत होती. आता आहाराच्या दृष्टिकोनातून ही आमचं डोकं खाणार हे नक्की होतं. सकाळी उठल्यावर दोन ग्लासभर तरी ती पाणी प्यायची. मग एखादं फळ. फळामध्ये जनरली केळं, पेअर किंवा सफरचंद असायचं. सकाळचा नाश्ता म्हणजे रोज तीन अंडी- तीही फक्त पांढरा भाग. अंडय़ाचं कधी आमलेट तर कधी भुर्जी करून फुलक्याबरोबर खायची. तिला तसाही ब्रेड आवडत नाही. ती मैद्याचे पदार्थ आवर्जून टाळते. पास्ता पार्टी ही कल्पना तिला फार झेपत नाही. प्रथिने आणि पिष्टमय पदार्थ याचं सेवन १ : ४ या प्रमाणात असावं याकडे तिचा कटाक्ष असतो. जेवणात कधी नाचणी, बाजरी किंवा राजगिरा एकत्रित पिठांची भाकरी, उसळ, दही, कोशिंबीर. उसळीऐवजी कधी चिकन, मासे (न तळलेले आणि खोबऱ्याचं वाटण न घातलेले) असं बोरिंग डाएट ती पाळत होती. ते पौष्टिक असणार यात शंका नाही. पण या मॅरेथॉनच्या तयारीच्या काळात ती सगळ्यात जास्त पिष्टमय पदार्थ खातेय हे मला दिसतंय. कारण विचारलं तर काही तरी कार्बलोडिंगबद्दल लेक्चर दिलं एकदा.
परत एकदा संध्याकाळी चक्क आई गूळपोळी खाताना दिसली. मी चकितच झाले तिला असं गोड खाताना बघून. पण हवामान, सण आणि त्या वेळी सहज मिळणारे पदार्थ, ते बनवायला लागणारी चीजवस्तू हे सुसंगत आहे आणि तेच पाळण्याकडे तिचा कल असतो. थंडीत गूळपोळी उष्णता निर्माण करते. गोडवा देते. तिळामधून कॅल्शिअम मिळतं, आवश्यक तेल मिळतं. परवा म्हणाली.. ‘किती साधी गोष्ट आहे. त्या महागडय़ा स्पोर्ट्सबारपेक्षा लाखपटीनं पौष्टिक.’ हे संध्याकाळी खाऊनदेखील रात्री तिला भात खाताना बघून तर मी उडालेच. आज पिठलं-भात तर उद्या राजमा-चावल. थोडक्यात, मॅरेथॉनच्या आधीची भरपूर खाणारी आई आपल्याला आवडली. झोपताना हळद घालून ती दूध प्यायली.
परवा सकाळी तिची एक लिस्ट बघितली. त्याबरहुकूम तिची तयारी चालली होती. नखं व्यवस्थित कापलेली, नेहमीच्या वापरातले धावायचे बूट, सुटसुटीत धावता येतील असे कपडे (नवे नाहीत.. नेहमीचे), पाण्याची बाटली, इलेक्ट्रॉल, गूळ, खजूर, तिळाचा लाडू, संत्र्याच्या चवीच्या लिमलेटच्या गोळ्या, गूळ-पाण्याची इटुकली पिटुकली बाटली वगैरे.. बरोबर घ्यायच्या वस्तूंची ती लिस्ट होती. मी तिला म्हटलंदेखील.. ‘खूप जण काहीही बरोबर न घेता धावतात. नुसतंच.’ ती हसून म्हणाली, ‘सवय. आपल्याला एवढं धावायची सवय नसेल तर सर्व तयारीनिशी जावं. वेळेवर काही करावे लागण्यापेक्षा हे बरोबर असणं चांगलं. कधी फार आगाऊपणा केला तर हा खेळ अंगाशी येतो.’
घरच्या घरीच तिचा व्यायाम सुरू होता. कटाक्षाने १२ ग्लास पाणी पिण्याचा तिचा आग्रह होता. वेळेवर झोपणं, उठणं हे अगदी शिस्तीत चालू झालं. एरवी माझ्याबरोबर रात्री इंग्रजी मालिका वगैरे बघत बसायची ती. आता सगळं बंद. हा असाच आमचा आठवडा चाललाय खरा.. शिस्तीचा. आता मॅरेथॉनचा दिवस अगदी दारात येऊन ठेपलाय. या संपूर्ण आठवडय़ात बाहेरचं खाणं किंवा कोल्ड्रिंक बंद. परवा म्हणाली.. आपली स्वप्न साकार करण्यासाठी चार महत्त्वाच्या गोष्टी हव्यात -प्रबळ इच्छा, जबरदस्त जिद्द, चिवट चिकाटी आणि हाडाची शिस्त! आईच्या सर्व खेळाडू मित्रमैत्रिणींकडे हे गुण आहेत. या गुणांचं महत्त्व ती नेहमी सांगते. आता प्रत्यक्ष तिच्याकडे बघताना, तिची चिकाटी, जिद्द बघताना मलासुद्धा ती शिस्त अंगी बाणवायची इच्छा झालीय. शेवटी आपल्या पिढीलाच तर याची गरज आहे.. नाही का!
(लेखिका आरोग्यतज्ज्ञ आणि स्पोर्ट्स न्यूट्रिशनिस्ट आहेत.)