डाएट, वेट लॉस, काय खावं, काय टाळावं याबाबत आता सगळीकडून माहितीचा पूर वाहतोय. पण घोडं अडतं, ते प्रत्यक्ष आचरणात आणताना! थिअरी ते प्रॅक्टिकलमधल्या गमतीजमतीमुळेच डाएटचा संकल्प धुळीला मिळतो. डाएटचं मनावर घेतलेल्या टीनएजर मुलीची ही डायरी त्यासाठीच!
आई! आजपासून माझं डाएट आहे. आईने दचकून माझ्याकडे पाहिलं. ‘अगं पण..’ तिचं शिक्षण, तिचा अनुभव, तिचा व्यवसाय हे सर्व मी ‘पणाला’ लावलं होतं. ‘पणबीण काही नाही. ठरलं म्हणजे ठरलं!’मी तिला म्हटलं. माझ्या मत्रिणीच्या आईची खास मत्रीण पेडररोडवरच्या एका छान स्लििमग सेंटरला जाते. तिथून तिने ते डाएट आणलं होतं. अर्थात त्यासाठी तिने दहा हजार रुपये मोजले होते. काही फालतू डाएट नव्हतं ते. मला तर सॉलिडच वाटत होतं. आईचा जरा रागच आला होता. काही नवीन करायला नाही म्हणते म्हणजे काय!
दुसऱ्या दिवशीपासून माझं नवीन डाएट सुरू झालं. सकाळी उठल्यावर दोन ग्लास पाणी प्यायले. नाश्त्याच्या वेळी आईने पोहे केले होते. मला तसेही ते आवडत नाहीत. म्हणून मला बरं वाटत होतं. माझा डाएटचा कागद मी फ्रीजवर लावला होता. त्यात लिहिलं होतं. नाश्ता – २ मारी बिस्किटं, पातळ दूध. मी ते खाल्लं. माझ्या कुत्र्याला – डेनिसला तो लहान पिल्लू असताना आम्ही मारी बिस्किटं आणि पातळ दूध द्यायचो. डेनिसला जाऊन तीन वर्षे झाली. एकदम त्याच्या आठवणी जाग्या झाल्या. सकाळ त्याच्या आठवणींत गेली. आई मस्त स्वयंपाक करत होती. प्रोटिन-काबरेहायड्रेट्सचं प्रमाण याकडे आईचे नको तेवढं लक्ष असते. जेवणाचे वास नाकात घुसले आणि मी लांब माझ्या खोलीत जाऊन बसले. जेवणात सर्वाना उसळ, पोळी, गाजराची कोिशबीर होती. पण माझ्या डाएटच्या पेपरवर वरणाचे पाणी १ वाटीभर, १ ग्लास दुधीचा ज्यूस, १ भाजी, १ गव्हाच्या कोंडय़ाची चपाती हा मेन्यू होता.
आईने कागद बघितला. ज्यूस बनवला. चपात्यावाल्या काकींनी गव्हाच्या कोंडय़ाची चपाती बनवली. गावाला आजी-आजोबांच्या घरी गेले होते, तेव्हा आजीकडच्या मावशींनी गोठय़ातल्या कमळी गाईसाठी बनवलेली भाकरीसुद्धा मला जास्त चविष्ट दिसत होती. दुधीचा ज्यूस चाट मसाला घालून आईने जरा तरी चमचमीत बनवला होता. आता प्रश्न होता ‘भाजी’.. भाजी काही माझ्या घशाखाली जाणं शक्य नव्हतं. मला आता कधीही रडू फुटणार होतं. पण मन अजूनही हार मानायला तयात नव्हतं. आता आईपण जराशी त्रासलेली (का चिंतित?) दिसत होती. नेहमीप्रमाणे तिचे पेशन्ट बघून ती जरा वेळाने परत आली. माझा चेहरा बघितला आणि म्हणाली, ‘चालू आहे की संपलं?’ मला राग आला. लगेच माझ्या डाएटचा राग मी तिच्यावर काढला. फडाफडा तिला बोलले. ती गप्प होती. अनुभवामुळे तिला कळत होतं की, माझं तोंड नाही तर माझं पोट बोलतं आहे.
मग शेवटी तहाची बोलणी करण्याएवढी मी शांत झाले. नवीन कागदस्वरूपी आहारतज्ज्ञ आणि घरात फुकट कटकट करणारी आहारतज्ज्ञ यांच्या मसलतीने जेवण झाल्यावर चारच्या सुमारास एक फळ खायचं ठरलं. सफरचंदाचा एक काप पोटात गेला आणि तोंडातून आवाज आला. दुपारी जेवताना, आईला फडाफडा बोलले होते, ते मनाला लागून राहिलं होतं. तिला सॉरी म्हटलं. बरं वाटलं. सफरचंद खरंच खूप रसाळ, चवदार होतं.
संध्याकाळी कागदाची उजळणी केली, तेव्हा लक्षात आलं.. परत कॉफी व २ मारी बिस्किटं आहेत. मारी बिस्किटं डाएटसाठी कोणी दिली की आईला प्रचंड राग येतो. तिला ही कल्पनाच सहन होत नाही. वजन कमी करायचं असेल तरी पौष्टिक खाऊन वजन कमी कसं करायचं याकडे तिचा कल जास्त असतो. शेवटी कॉफी आणि २ मारी बिस्किटं मी खात होते आणि आई संध्याकाळच्या तिच्या नियमांप्रमाणे चणे-दाणे खात होती.
संध्याकाळ सरली तशी मी कासावीस होऊ लागले. आता मात्र मी माझ्या प्रबळ इच्छाशक्तीच्या जोरावर अख्खा माणूसही खाऊ शकत होते. भुकेने मी कावले होते आणि फ्रीजवरच्या डाएटच्या कागदावर संध्याकाळी सूप, सॅलड असं लिहिलं होतं. आईने सूप – सॅलडची तयारी करायला घेतली. पातळ सूप आणि त्या पाण्यावर तरंगणाऱ्या चार नावडत्या भाज्या बघून मला एकदम रडू फुटलं. सर्व आहारतज्ज्ञांच्या अकला बाहेर काढत मी शेवटी हंबरडा फोडला.
शेवटी डोळ्यासमोर चिकन, मासे, अंडी नाचू लागले. मस्त चिकनचा रस्सा, फुलके, कांदा टोमॅटोची कोिशबीर जेवले आणि आईला सांगितलं, ‘यू आर ग्रेट!’. आधी माझं पोट शांत झालं, मग मी शांत झाले. मग माझं घर शांत झालं.
आमच्या सर्वाच्या दृष्टिकोनातून या फॅड डाएटच्या प्रयोगात कोणीचं हरलं नाही. त्या दिवशी मला कळलं फॅड डाएट करायचं नाही. आईचा शांत स्वभाव मी परत अनुभवला आणि तिला मी सांगितलं- आजपासून माझ्यासाठी पौष्टिक आहार हवा.. ज्याने माझ्या शरीराला आणि मनाला आधार मिळेल. आईला एकदम मस्त (हायसं) वाटलं. शेवटी हृदयातून आलेली हाकच आपण ऐकू शकतो. हो ना?
(लेखिका आरोग्यतज्ज्ञ आणि स्पोर्ट्स न्यूट्रिशनिस्ट आहेत.)