वर्ष २०२५ सुरू होऊन नव्या बीटा जनरेशनचा उदय झाला आहे. इंटरनेट, एआय, स्मार्ट गॅजेट हे या नव्या पिढीच्या जीवनाचा अविभाज्य भाग असणार आहेत. पण स्मार्टफोन, इंटरनेट, सोशल मीडिया, एआय, व्हीआर अशा डिजिटल क्रांतीचा प्रभाव सगळ्याच जनरेशनवर जाणवत आहे. लँडलाइनच्या उदयाच्या काळत जन्माला आलेले मिलेनियल्स असोत की स्मार्टफोन सोबत वाढलेले जेनझी, खरे डिजिटल नेटिव्ह असणारे जेन अल्फा असो वा निवृत्तीचं जीवन जगणारे बूमर्स… सगळ्याच पिढ्या आता इंटरनेट, सोशल मीडिया यांच्याबरोबर डिजिटल जीवन जगत आहेत, पण या डिजिटल क्रांतीचे काही मानसिक, सामाजिक, शारीरिक परिणामदेखील समोर येत आहेत. डिजिटल जिंदगी जगताना निर्माण झालेल्या अशाच काही नव्या समस्या, त्यांची कारणे आणि उपाय यांचा वेध घेणारं नवं सदर ‘डिजिटल जिंदगी’.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
माणसाच्या मूलभूत गरजा कोणत्या? खरंतर हा इयत्ता चौथीचा प्रश्न. पण आदिम अश्मयुगापासून अगदी आत्ता आत्तापर्यंत याचं उत्तर म्हणून तीनच गोष्टी होत्या – अन्न ,वस्त्र आणि निवारा. बाकी सगळ्या गोष्टी कमी गरजेच्या किंवा चैनीच्या वस्तू या यादीत टाकता येण्यासारख्या, पण आजच्या डिजिटल जीवनात या यादीत अजून एक भर पडली आहे ती म्हणजे मोबाइल.
सकाळी मोबाइलच्या गजराने डोळे उघडताच ‘प्रभाते मोबाईल दर्शनं’ म्हणत मोबाईल जो हातात येतो, तो दिवसभर ऑफिसचे काम, ऑनलाइन लेक्चर्स, मित्रांशी चॅटिंग, करमणूक, सोशल मीडिया अशा अनेक कारणांसाठी सतत हातात राहतो. शॉपिंग करायला, पत्ता शोधायला, बिल भरायला, पैसे द्यायला अगदी साधं वेळ बघायला किंवा साधीसोपी बेरीज करायला अशी अनेक कारणं दिवसभर येतच असतात. ‘इनमोबी’ या मार्केटिंग टेक्नॉलॉजी कंपनीच्या २०२४च्या मार्केटिंग हँडबुकनुसार भारतीय दररोज सरासरी ४ तास ५ मिनिटेइतका वेळ मोबाइल बघण्यात घालवत असतात. बोस्टन कन्सल्टिंग ग्रुपच्या २०२४ च्या एका रिपोर्टनुसार भारतीय दिवसातून सरासरी ७०-८० वेळा त्यांचा फोन हातात घेतात. आणि यातील ५० टक्के वेळा फोन बघण्याचे विशेष काहीच कारण नसते. फक्त मोबाईल बघायची सवय लागली आहे, यामुळे सारखा मोबाईल हातात घेऊन पाहिला जातो.
हेही वाचा >>> जंगलबुक: समुद्रप्रेमी ते संशोधक
काळाची गरज म्हणूया किंवा अपरिहार्यता… मोबाइल आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग झाला आहे. पण यातून मोबाईलची सवय वाढून गोष्टीतल्या पोपटात प्राण असणाऱ्या जादूगारासारखंच बहुतांश तरुणाईचे प्राण मोबाईलमध्ये अडकले आहेत. ‘मोबाइलशिवाय एक दिवस’, ‘मोबाइल बंद पडला तर काय?’ असे कल्पनाविस्तार निबंधाचे विषय बऱ्याच मंडळींना दु:स्वप्न वाटू शकतात, अशी परिस्थिती वाढते आहे. आणि यातून ‘मै मोबाइल के बिना जी नही सकता’ ही मनाची अवस्था आज मानसिक विकाराच्या दर्जाला पोहोचली आहे.
समजा सकाळी उठल्यावर मोबाईल सापडला नाही. किंवा कॉलेजला, ऑफिसला जाताना मोबाईल घरीच विसरला गेला. किंवा समजा प्रवासात असताना मोबाइलची बॅटरी आता अगदी संपण्यातच जमा आहे. या सगळ्या परिस्थितीत एक गोष्ट समान असेल ती चिंता. जसजसा वेळ वाढत जाईल, तशी तशी ही चिंता बेचैनीमध्ये रूपांतरित होईल. आणि काही जणांच्या बाबतीत तर अगदी टोकाची भीती दाटून येईल. या मानसिक अवस्थेचं नाव आहे ‘नोमोफोबिया’! ‘नो मोबाइल फोबिया’ या इंग्लिश शब्दांचं ‘नोमोफोबिया’ हे लघुरूप.
२००८ मध्ये यूके पोस्ट ऑफिसने केलेल्या एका अभ्यासात आढळून आले की ब्रिटनमधील ५३ टक्के लोकांना मोबाइल शिवाय राहण्याच्या कल्पनेनेही धडकी भरते. या रिपोर्टमध्ये ‘नोमोफोबिया’ हा शब्द पहिल्यांदा वापरला गेला. यानंतर हा शब्द हळूहळू जगभर प्रसिद्ध झाला. अनेक मानसशास्त्र तज्ज्ञांनी विविध चाचण्या करून यावर संशोधन केले आहे. २०१५ मध्ये कॅग्लर यिल्दिरिम यांनी नोमोफोबिया मोजण्यासाठी एक प्रश्नावली विकसित करून नोमोफोबियाचे स्तर निर्धारित केले. ‘प्यू रिसर्च सेंटर’ आणि इतर अनेक संस्थांच्या अभ्यासातून याचे विविध परिणाम समोर येत गेले. भारतात २०२० मध्ये प्रकाशित ‘द जर्नल ऑफ फॅमिली मेडिसिन अँड प्रायमरी केअर’ मधील संशोधनानुसार देशातील ४२ टक्के विद्यार्थ्यांमध्ये नोमोफोबियाची लक्षणे आढळून आली. अनेक विद्यार्थ्यांनी अभ्यास करताना, जेवताना किंवा झोपताना त्यांचे फोन सतत जवळ ठेवल्याची कबुली दिली आहे. याविषयी तरुणांमध्ये जागरूकता निर्माण करण्याची तातडीची गरज या अभ्यासात अधोरेखित करण्यात आली.
हेही वाचा >>> ढील दे ढील दे रे भैय्या
मोबाइल सतत जवळ बाळगणे. मोबाइल जवळ नसल्यास किंवा बॅटरी संपत आल्यास बेचैनी वाटणे हे नोमोफोबियाचे प्रमुख लक्षण म्हणता येईल. मोबाईल जवळ असण्याची इतकी सवय होते की शौचालयापासून तर अंघोळीला बाथरूममध्ये जातानादेखील मोबाइल सतत सोबत ठेवला जातो. परीक्षा केंद्र, विमानाचे उड्डाण अशा मोबाइलच्या वापरावर निर्बंध आणणाऱ्या परिस्थिती किंवा ठिकाणात मोबाइलचे नसण्याने अस्वस्थता वाढते. पण याचबरोबर मोबाइल जवळ असताना वारंवार तो बघण्याची तीव्र इच्छा होणे, बराच वेळ मोबाइल न पाहिल्यास अस्वस्थ वाटणे हीदेखील याची लक्षणे आहेत.
फोन जवळजवळ पूर्ण चार्ज झालेला असतानाही चार्ज करत राहणे, फोन बंद पडेल या भीतीने सतत चार्जर किंवा पॉवरबँक सोबत बाळगणे, फोन खिशात किंवा बॅगेत आहे याची पुन:पुन्हा खात्री करत राहणे, फोन योग्यरीत्या काम करत आहेत की नाही याची खात्री करण्यासाठी सतत तपासणे अशी देखील याची लक्षणे सांगता येतील.
बाल व कुटुंब मानसतज्ज्ञ गुंजन कुलकर्णी नोमोफोबियाचे गांभीर्य सांगताना म्हणतात, नोमोफोबिया ही वास्तववादी मन:स्थिती (मेंटल कंडिशन) आहे. इतकेच काय तर मानसिक आजारांच्या जगभरात प्रमाण म्हणून वापरल्या जाणाऱ्या ‘डायग्नोस्टिक अँड स्टॅटिस्टिकल मॅन्युअल ऑफ मेंटल डिसॉर्डर्स’मध्ये त्याचा समावेश करण्याची प्रक्रिया विचाराधीन आहे. आपला फोन गमावल्याची किंवा विसरल्याची जाणीव होताच काही व्यक्तींमध्ये पॅनिक अटॅक येण्याची देखील शक्यता असते. अशा वेळी शरीरात तातडीने हृदयाची गती वाढणे, घाम फुटणे, श्वास लागणे, घशाला कोरड पडणे इतके तीव्र बदल होऊ शकतात.
आपत्कालीन परिस्थितीत मदतीसाठी कॉल करू न शकण्याची भीती, ऑनलाईन मित्रांपासून वेगळं पडण्याची भीती , महत्त्वाच्या बातम्या किंवा अपडेट्स गमावण्याची भीती, फोमो अशा अनेक मानसिक भीती नोमोफोबियाशी संबंधित असू शकतात. दैनंदिन जीवनात बहुतांश कामासाठी मोबाइलवर अतिप्रमाणात अवलंबून असणे हे नोमोफोबियाचे एक प्रमुख कारण म्हणता येईल. गजराचे घड्याळ, भिंतीवरचे कॅलेंडर, नोंदी करायची वही, दैनंदिनी, कॅल्क्युलेटर यांच्याऐवजी मोबाइल काम करत होतेच, पण आता आर्थिक व्यवहार, फिटनेस मॉनिटरिंग, शॉपिंग, सोशल अपडेट, बातम्या, मित्रांशी कनेक्टीव्हीटी अशा अनेक कारणांची भर पडत चालली आहे. यातून फोनच नसेल तर हे सगळं ठप्प होण्याची भीती मनाच्या कोपऱ्यात सुप्तपणे उद्भवू शकते.
काही मानसशास्त्रज्ञांच्या मते आत्मविश्वासाची कमतरता असल्यास बाह्य साधनांवरचे अवलंबन वाढते. किंवा एकटेपणाच्या भीतीमुळे देखील सतत डिजिटली कनेक्ट राहण्याची धडपड सुरू असते. या गोष्टीदेखील नोमोफोबियाचे कारण असू शकतात. कॅलिफोर्निया युनिव्हर्सिटीच्या ड्यूई ट्रॅन यांच्या शोधनिबंधानुसार स्मार्टफोनद्वारे मिळणारे त्वरित समाधान (Instant Gratification) हे देखील यामागचे एक कारण आहे.
यासंदर्भांत अधिक माहिती सांगताना गुंजन कुलकर्णी म्हणतात, कोणतीही नवीन व आनंददायी गोष्ट केली की आपल्या मेंदूद्वारे डोपामिन हे चेतापारेषक रसायन स्रावले जाते. स्मार्टफोन वापरताना नोटीफिकेशन, मेसेज, पोस्टला आलेल्या लाइक्स याद्वारेदेखील समाधान मिळून डोपामिन स्रावले जाते. या आनंददायी अनुभवासाठी पुन:पुन्हा मोबाइल पाहिला जातो. एखादे पुस्तक वाचून पूर्ण झाले, एखादे ध्येय साध्य झाले, व्यायाम झाला अशा काही घटनांमध्ये देखील डोपामिन स्रावून आनंद मिळत असतो. पण यांच्या तुलनेत मोबाइल बघणे हे सहजसाध्य आणि त्वरित शक्य असल्याने मोबाइलचे व्यसन लगेच लागण्याची शक्यता असते. ‘त्श्वेन युनिव्हर्सिटी ऑफ टेक्नॉलॉजी’च्या रिचर्ड शेम्बर, रॉबर्ट रुगिम्बाना यांच्या शोधनिबंधानुसार मोबाइल फोन हे २१ व्या शतकातील सर्वात मोठे नॉन-ड्रग व्यसन ठरत आहे.
नोमोफोबियाचे मानसिक, शारीरिक आणि सामाजिक आरोग्यावर लक्षणीय परिणाम जाणवू शकतात. सतत मोबाइल बघण्याच्या सवयीमुळे कामातली, अभ्यासातली एकाग्रता कमी होऊ शकते. हळूहळू चिंता, ताणतणाव, नैराश्य, निद्रानाश अशा मानसिक समस्या वाढू शकतात. २०१९ च्या इंडस्ट्रियल सायकियाट्री जर्नलच्या एका शोधनिबंधाच्या निष्कर्षानुसार भारतातील किशोरवयीन मुलांमध्ये नोमोफोबियामुळे नैराश्य येण्याचे प्रमाण लक्षणीयरीत्या वाढत आहे. नोमोफोबिया असलेल्या अनेक व्यक्तींना फॅन्टम व्हायब्रेशन सिंड्रोमदेखील आढळतो. यात कुठलेही नोटिफिकेशन, मेसेज आला नसतानादेखील सतत फोन व्हायब्रेट होत असल्याचा भास होतो आणि वारंवार फोन बघितला जातो.
खरंतर आपण सगळेच जण थोड्या फार प्रमाणात स्मार्टफोन अॅडिक्शनचे शिकार असू शकतो. नोमोफोबियाची आपली पातळी ओळखून वेळीच काही उपाययोजना करणे मानसिक आरोग्याच्या दृष्टीने योग्य ठरते. नोमोफोबिया मोजण्यासाठी संशोधकांनी नोमोफोबिया प्रश्नावली (NMP-Q) विकसित केली आहे. याचा किंवा आपल्या मोबाइल वापराचे स्वमूल्यांकन करत आपल्याला आपली पातळी कळू शकते. काही सोप्या उपायांनी ही पातळी कमी करता येणेही शक्य आहे.
महत्त्वपूर्ण नसणाऱ्या अॅप्सचे नोटीफिकेशन बंद करणे हा एक प्राथमिक उपाय आहे. डिजिटल वेलबीइंग, स्क्रीन टाइम अशा काही अॅप्सच्या मदतीने आपला स्क्रीन टाइम मर्यादित करता येऊ शकतो. सोशल मीडिया अॅप्सचे ऑटो लॉग इन असणे बंद केल्यास दरवेळी लॉगिन करण्याच्या खटाटोपामुळे त्यांचा वापर कमी होऊ शकतो. अभ्यास किंवा ऑफिसचे काम करताना ते पूर्ण होईपर्यंत मोबाईल न बघण्याची स्वयंशिस्त बाळगणे अगत्याचे ठरते. अशा वेळी मोबाइल दुसऱ्या खोलीत ठेवता येऊ शकतो, पण मोबाइल बघण्याची इच्छा कमी करण्यासाठी आधी मोबाइलवरचे अवलंबन कमी करणे गरजेचे आहे. ज्या कारणांसाठी आपण मोबाइल हातात घेतो, त्यांना इतर पर्याय शोधता येतील. करमणुकीसाठी वाचन करणे, छंद जोपासणे शक्य आहे. महत्त्वाच्या नोंदी, रिमांइडर्स डायरीत लिहून ठेवता येऊ शकतात.
याबाबतीत गुंजन कुलकर्णी म्हणतात, आपल्या फोनवर आपण इतके अवलंबून असण्याची खरंच गरज आहे का? हा प्रश्न स्वत:ला विचारणे अत्यंत गरजेचे आहे. निसर्गात भटकंती, मित्रमंडळींची गेटटुगेदर्स, रोजचे जेवण, मुलांबरोबर खेळणे, वाचन, वॉशरूमला जाणे या गोष्टी फोन जवळ न ठेवता करून बघायला हव्यात. दिवसातला जेवण, मॉर्निंग वॉक, झोपण्याआधीचा अर्धा तास असा काही वेळ फोन फ्री टाइम म्हणून ठरवता येऊ शकतो. घरातले डायनिंग टेबल, स्टडीरूम, बेडरूम असे काही भाग ‘नो फोन झोन’ म्हणून ठरवून तिथे मोबाईल नेणे टाळता येईल. आठवड्यातून एकदा मोबाइल न नेता बाहेर जाऊन येण्याचा प्रयत्नदेखील उपयुक्त ठरू शकतो. पण नोमोफोबियाची पातळी जास्त असल्यास, मन:स्थिती हाताबाहेर जाण्याआधी मानसतज्ज्ञांची मदत घ्यायला हवी असे त्या नमूद करतात.
आजच्या डिजिटल युगात स्मार्टफोनचा वापर ही गरजेची बाब आहे. मोबाइलचा उपयोग टाळता येण्यासारखा नसला तरी मर्यादित ठेवता येण्यासारखा नक्कीच आहे. आपले आयुष्य सुखकर होण्यासाठी घेतलेला मोबाइल जर आपल्या चिंता आणि ताणतणावाचे कारण ठरत असेल तर नक्कीच याबाबत विचार करायला हवा. कारण शेवटी जिंदगी सलामत तो मोबाइल पचास !!
viva@expressindia.com