वैष्णवी वैद्य
फक्त भारतातच नव्हे तर जगभरात थोडय़ाफार प्रमाणात पुरुषप्रधान संस्कृती अगदी पुरातन काळापासूनच आहे. आणि स्त्री-पुरुष विषमता हा या संस्कृतीचा मोठा भाग आहे. अगदी अमेरिका, युरोपसहित संपूर्ण जगभरात विसाव्या शतकाच्या सुरुवातीपर्यंत स्त्रियांना मतदानाचा हक्क नाकारलेला होता. या अन्यायाविरुद्ध लढण्यासाठी स्त्रिया विविध पातळींवर प्रयत्न करत होत्या. ८ मार्च १९०८ रोजी न्यू यॉर्कमध्ये वस्त्रोद्योगातील हजारो स्त्री-कामगारांनी जमून प्रचंड मोठी ऐतिहासिक निदर्शने केली. कामाच्या जागी सुरक्षितता, लिंग-वर्ण, मालमत्ता आणि शैक्षणिक पार्श्वभूमी निरपेक्ष सर्व प्रौढ स्त्री-पुरुषांना मतदानाचा हक्क मिळावा अशा अनेक मागण्या त्यांनी केल्या होत्या. हाच दिवस पुढे युनोने ‘जागतिक महिला दिन’ म्हणून स्वीकारावा असे जाहीर केले.
जगभरात साजरा केला जाणारा हा जागतिक महिला दिन भारतात तेही मुंबईत साजरा होऊ लागल्यापासून जवळपास ऐंशी वर्षे झाली आहेत. खास या महिला दिनासाठी म्हणून युनोकडून एक थीम मांडली जाते. यंदा DigitALL: Innovation & Technology in Women Empowerment अशी थीम आहे. गेल्या काही वर्षांत महिला सक्षमीकरणाच्या दृष्टीने वाटचाल करत असताना भवतालात झालेले अनेक सामाजिक – आर्थिक बदल यांचे परिणाम स्त्रियांच्या सक्षमीकरण प्रक्रियेत झालेले आहेत. मात्र यंदाची महिला दिनाची संकल्पना ही आत्ताच्या काळात स्त्री सक्षमीकरणाच्या दृष्टीने अत्यंत प्रभावी ठरली आहे. डिजिटली तंत्रज्ञानाचा प्रसार आणि वापर हा अधिकाधिक स्त्री सक्षमीकरणासाठी, शिक्षणासाठी व्हायला हवा, अशी या संकल्पनेमागची धारणा आहे. आणि डिजिटल तंत्रज्ञानाचा खरोखरच अत्यंत हुशारीने वापर करत वाटचाल करणाऱ्या स्त्रिया आज आजूबाजूला दिसत आहेत. या पार्श्वभूमीवर ‘व्हिवा’ने तरुण मुलींशी तंत्रज्ञानाची आवड, त्यातून झालेले बदल, फायदे आणि त्याबरोबरीनेच होणारे तोटे वा धोके या बद्दल जाणून घेण्याचा प्रयत्न केला.
पूर्वा पुणतांबेकर ही तरुणी सध्या लंडनमध्ये सध्या कौन्सिलिंग सायकॉलॉजीचे शिक्षण घेत आहे. ती म्हणते, ‘‘ डिजिटल टेक्नॉलॉजी आणि मेंटल हेल्थचा आता खूप जवळचा संबंध आहे. शहरात डिजिटल टेक्नॉलॉजीच्या अतिवापरामुळे तरुणांना विविध समस्यांना सामोरे जावे लागते आहे. तर ग्रामीण भागात अजूनही डिजिटल टेक्नॉलॉजी नीट पोहोचलेली नाही. पण सोशल मीडिया आणि टेक्नॉलॉजीमुळेच मेंटल हेल्थबद्दल जास्तीत जास्त लोकांना जागरूक करता येते हेही तितकेच खरे आहे’’. ग्रामीण भागात मुलींवर, विवाहित स्त्रियांवरील अत्याचाराच्या घटना आपण पाहतो, ऐकतो. डिजिटल वा सोशल मीडियाच्या माध्यमातून लोकांना या बाबतीत मोठय़ा प्रमाणावर जागृत करणं आणि त्यांची मदत घेणं अधिक सोपं झालं आहे, असंही पूर्वा सांगते. तर ‘अॅडफॅक्टर्स’मध्ये असणाऱ्या प्रियांका जोशीच्या मते डिजिटल टेक्नॉलॉजीच्या वापरामुळे स्त्रिया स्वावलंबी होत आहेत. आज आपण फुलवालीकडेही युपीआय ट्रॅन्झ्ॉक्शन करतो, कोणी होम मेकर, स्मॉल बिझनेस करणारी असेल तर इन्स्टाग्राम वा फेसबुकच्या माध्यमातून त्या आपला बिझनेस वाढवू शकतात. डिजिटल टेक्नॉलॉजी स्त्रियांसाठीही उपयुक्तच ठरली आहे, त्याचा वापर आपण कसा करून घ्यायचा याची आपण काळजीही घ्यायला हवी, असं ती सांगते.
आजची तरुण स्त्री तंत्रज्ञान व तत्सम क्षेत्रांकडे करिअर म्हणूनही पाहते आहे ही आणखी समाधानाची बाब. आपल्या सगळय़ांची आवडती यूटय़ूबर अंकिता प्रभू-वालावलकर जी ‘कोकण-हार्टेड गर्ल’ म्हणून ओळखली जाते. ती सांगते, ‘‘सोशल मीडियामुळे जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचता येतं ही गोष्ट नाकारता येणार नाही. यूटय़ूब सोडून माझा स्वतंत्र बिझनेस आहे ज्यासाठी मला सोशल मीडियाचा नक्कीच उपयोग होतो. सोशल मीडिया वापरता येणं किंवा सोशल मीडियावर अॅक्टिव्ह राहणं आज काळाची गरज आहे.’’ मुलींनी फक्त फेम आणि पैसा मिळवण्यासाठी या तंत्रज्ञानाचा कुठल्याही गैरवापर करू नये, असा सल्लाही तिने दिला.
गेल्याच महिन्यात २७ फेब्रुवारीला ‘राष्ट्रीय विज्ञान’ दिवस झाला. या क्षेत्रात भारतीय स्त्रियांचे अविरत योगदान आहेच, आता तंत्रज्ञान आणि डिजिटल मीडियामध्येही स्त्रियांनी आघाडी घेतली आहे. मोठमोठय़ा कंपन्यांमध्ये डिजिटल मार्केटिंग, सोशल मीडिया, तांत्रिक तज्ज्ञ म्हणून स्त्रिया पदं भूषवत आहेत. जवळपास ५० टक्के मुली आयटी कंपन्यांमध्ये चांगल्या पोस्टवर आहेत. हेच चित्र भारतातल्या ग्रामीण दुर्गम भागांतही दिसावे, हाच सध्या तरुणींचा आग्रह आहे.
डिजिटल तंत्रज्ञानात आघाडीवर असलेल्या तरुणींच्या मते या काळात स्त्री सक्षमीकरण म्हणजे नेमकं काय असावं? यावर बोलताना ‘‘आजची स्त्री स्वावलंबी आहे, कारण ती स्वत:चे निर्णय स्वत: घेतेय. तिच्या मतांना आज आदर आणि संमती मिळते आहे. आपल्यामध्ये खूप क्षमता आहेत, आपण फक्त स्वत:हून पुढे पाऊल टाकायला हवं. आपण स्वावलंबी झालो तर आपली वाटचाल आपोआपच प्रगतीकडे जाते हेच मला स्त्रियांना सांगावंसं वाटतं’’ , असं प्रियांका म्हणते. तर पूर्वाच्या मते सबलीकरण/ सक्षमीकरण हा खूप व्यापक विचार आहे. जिला लिहिता वाचता येत नाही तिला खूप प्रयत्नांनी ते जमतंय तर तेसुद्धा सक्षमीकरणच आहे. आपल्या विषयाला धरून चालायचं तर होय टेक्नॉलॉजी, सोशल मीडियाचा वापर करता येणं हे आज सक्षमीकरणाचं प्रतीक आहे. आज तरुण मुलं वेगळय़ा शहरात नोकरी करत असतात, तेव्हा कित्येक आई-बाबा एकटेच शहरात किंवा गावात राहत असतात. त्यांना मोबाइलचा वापर येत असेल तर त्यांचं सव्र्हायव्हल सोप्पं होतं, असं ती सांगते.
काळानुरूप दुसऱ्यापुढे स्वत:चा विचार करणं हेसुद्धा एक प्रकारचं सक्षमीकरणच आहे, असंही मत काहींनी व्यक्त केलं. डिजिटल माध्यमातून शिक्षणाची पाळंमुळं करोनाकाळात रुजली. याचे अर्थात भरपूर फायदे झाले आणि आजही होताहेत. त्या पुढे जाऊन असंही म्हणता येईल की जास्तीत जास्त तंत्रज्ञानाचा वापर हा ग्रामीण भागातल्या मुलींच्या शिक्षणासाठी व्हावा, त्याची जारूकता या माध्यमातून व्हावी. तंत्रज्ञानाने मुलींना, महिलांना स्वावलंबी करणे गरजेचे आहे, व्यसन लागून त्याचा दुरुपयोग होऊ नये हा व्यक्तिसापेक्ष प्रश्न प्रत्येक मुलीने विचारात घेतला पाहिजे. तशी शिकवण त्यांना त्यांच्या पालकांनी व शिक्षकांनी देणे अत्यावश्यक आहे.
जागतिक महिला दिनाच्या निमिताने डिजिटल तंत्रज्ञानाशी स्त्रियांचे जोडले गेलेले नाते पाहता या तंत्रज्ञानावर त्यांचे प्रभुत्व असलेच पाहिजे ही बाब पुन्हा पुन्हा अधोरेखित होताना दिसते.