कुठल्या प्रकारचं जेवण कसं घ्यावं? कटलरी कुठली, कशी वापरावी? चांगला होस्ट किंवा गेस्ट बनण्यासाठीचे डायनिंग एटीकेट. वेस्टर्न फाइन डाइनमध्ये स्टार्टर, सूप, फिश आणि पास्त्यानंतर येतो मेन कोर्स.. यात प्रामुख्याने मांसाहाराचा समावेश होतो. यामध्ये काय आणि कसं खाल्लं जातं?
19
लेखाला सुरुवात करण्याआधीच एक खुलासा करते. आजचा लेख संपूर्णत: मांसाहारी वाचकांसाठी आहे. शाकाहारींनी मग मेन कोर्सला काय खावे, हे जाणण्याकरिता थेट शेवटचा परिच्छेद वाचा!
पाश्चात्य पद्धतीच्या फाइन डाइनमध्ये मेन कोर्सपासून खऱ्या अर्थाने मांसाहाराला सुरुवात होते. अनेक प्रकारच्या पदार्थाची यात गणना होते. चिकन, मटण (बहुधा शेळीचं), बीफ आणि पोर्कपासून हे पदार्थ केलेले असतात. मांस कोणत्या प्रकारचे आहे आणि त्याच्या कापणीवर (कट्स) या पदार्थाची गणना मेन कोर्सच्या तीन भागांमध्ये होते.
सर्वात पॉप्युलर आहे ते ‘ऑन्त्रे’ (entree). फ्रेंचमध्ये ‘ऑन्त्रे’ म्हणजे ‘एन्ट्री’! जेव्हा मांसाहारी पदार्थ, कोणत्याही आधी आलेल्या कोर्सचा भाग न होता, स्वत: जेवणात एन्ट्री घेतो तो ‘ऑन्त्रे’! ऑन्त्रेमध्ये असलेल्या मांसाचे तुकडे छोटे असतात आणि बरेचदा बोनलेसही. साधं उदाहरण द्यायचं झालं तर – चिकन ब्रेस्ट. कोंबडीच्या छातीकडचा हा भाग बोनलेस करून वापरला जातो. हे कट्स मग निरनिराळ्या प्रकारे शिजवून सॉस आणि भाज्यांबरोबर सव्‍‌र्ह केले जातात.
‘रोस्ट’ हा मेन कोर्सचा प्रकार सहसा सणावाराच्या दिवशी नाही तर काही साजरं करण्यासारखं कारण असल्यास केला जातो. रोस्टचे कट्स ऑन्त्रेच्या कट्सपेक्षा मोठे असतात आणि जर पोल्ट्री असेल तर त्यात अनेकदा सारण भरून ते अख्खंच्या अख्खं रोस्ट केलं जातं. उदाहरणार्थ चिकन, डक किंवा टर्की. प्राण्यांचं मांस असेल तर त्याचे मोठे कट्स करून रोस्ट केलं जातं. जे काही मांस रोस्ट ( भट्टीत/अवनमध्ये शिजवणं) केलं जातं, त्या प्रत्येकाच्या बरोबर खाण्याचे पदार्थ (अकम्पनीमेंट) ठरलेले असतात. अमुक मांसाबरोबर कोणता सॉस आणि भाज्या खायच्या हेसुद्धा ठरलेलं असतं.
20
‘गेम’ म्हणजे शिकार. काही पाश्चिमात्य देशांमध्ये ठरावीक सीझनला शिकार करण्याची परवानगी असते. त्यासाठी लायसन्स घ्यायला लागतो आणि आखून दिलेल्या नियमांमध्ये, त्या विशिष्ट प्राण्यांची शिकार करावी लागते. पक्ष्यांमध्ये फेसंट, गिनी फाउल इत्यादींचा समावेश असतो आणि प्राण्यांमध्ये वाइल्ड बोअर (रानडुक्कर), वेनिसन (हरिण), रॅबिट (ससा) आदी असतात. गेमचे अकम्पनीमेन्टही ठरलेले असतात.
एकच मेन कोर्स असेल तर तो सर्वात मोठय़ा काटा-सुरीने खाल्ला जातो. ऑन्त्रे आणि रोस्ट असेल तर ऑन्त्रेची कटलरी रोस्टच्या कटलरीपेक्षा थोडी छोटी असते. पाश्चिमात्यांमध्ये निव्वळ शाकाहारींची संख्या कमी. त्यामुळे या कोर्सला शाकाहारी लोकांना काय सव्‍‌र्ह करावे हा काही पाश्चिमात्यांना प्रश्न पडतो. अशा वेळी ‘व्हेज कटलेट’ किंवा ‘पनीर कटलेट’ यावर निभावलं जातं. पण भारतीय स्वयंपाकाबद्दल माहिती असेल तर थोडं ‘फ्यूजन’ करून अनेक चविष्ट पदार्थ बनविता येतात.

Story img Loader