कुठल्या प्रकारचं जेवण कसं घ्यावं? कटलरी कुठली, कशी वापरावी? चांगला होस्ट किंवा गेस्ट बनण्यासाठीचे डायनिंग एटीकेट. फ्रेंच क्लासिकल मेन्यूमध्ये सॉर्बे हा कोर्स जेवणाच्या मध्यात येतो. याला रेस्ट कोर्स असंही म्हणतात. याच्या नंतरही काही कोर्स येणं बाकी असतं.
लिहिताना जरी sorbet असं लिहिलं, तरी बऱ्याचशा फ्रेंच उच्चारांप्रमाणे शेवटचे उच्चार ‘सायलेंट’ असतात. सॉर्बे म्हणजे अगदी सोप्या भाषेत सांगायचं झालं तर ग्लासमध्ये सर्व्ह केलेला अगदी ‘सोफिस्टिकेटेड’ असा फ्लेवर्ड बर्फाचा गोळा! हे आइसक्रीम नव्हे. हा जेवणाच्या मधला कोर्स आहे.
‘सॉर्बे’ हा शब्द बहुधा अरब देशातल्या ‘शरबत’वरून आला असावा. इटालियन मार्को पोलोने त्याच्या भ्रमंतीतून तो इटलीमध्ये आणला आणि त्याचा ‘सॉरबेत्तो’ झाला. आजही इटालियन आइसक्रीम (जिलातो) आणि सॉर्बे जगप्रसिद्ध आहेत. इटालियन राज घराण्यातून सॉर्बेचा प्रवास फ्रेंच राजघराण्यात झाला आणि त्यांच्या मेन्यूत जाऊन बसला. पण आपण जर सरबत फ्रीजरमध्ये ठेवलं तर त्याचं ‘सॉर्बे’ न होता कडक बर्फ होतो! तर ‘सॉर्बे’ म्हणजे नक्की काय ते आपण जाणून घेऊ.
बहुतेक सॉर्बे फळांच्या रसापासून बनविले जातात. साखरेच्या थंड पाकात फळांचा रस घालून, सोबत जिंजर, बेसिल सारखे फ्लेविरग्ज घालून ते आइसक्रम मशीनमधून काढलं की झाला सॉर्बे तयार! काही सॉर्बेमध्ये मिरांग (meringue), म्हणजेच अंडय़ाचं पांढरं आणि साखर फेटून घालतात. याचे स्कूप्स आइसक्रीम कपमध्ये ठेवून सव्र्ह करतात. फाइन डाइनमध्ये सॉर्बे चमच्याने खाल्ला जातो. सॉर्बे खाल्ल्यावर जीभ स्वच्छ झाल्यासारखी वाटते. तोंडात एकदम फ्रेश फीलिंग येतं. पुढे येणाऱ्या कोर्सेससाठी आता जीभ तयार असते! लेमन, ऑरेंज, श्ॉम्पेन आणि काही लिक्युअर्स असलेले सॉर्बे फ्लेवर्स अतिशय लोकप्रिय असतात.
फ्रेंच क्लासिकल मेन्यूमध्ये सॉर्बेला ‘रेस्ट’ कोर्सचं स्थान आहे. आपण जर पाहिलं तर पहिल्या (ऑदव किंवा स्टार्टर्स) कोर्सपासून मेन कोर्सपर्यंत प्रत्येक कोर्स हा खायला ‘हेवी’ होऊन जातो. सॉर्बे येईपर्यंत फक्त अध्र्याच मेन्यूचा प्रवास झाला असतो. पुढची खाद्ययात्रा करावयास अजून बळ यावं म्हणून हा ‘रेस्ट’ कोर्स! या कोर्सला (गरज पडल्यास) टेबल सोडून जायची मुभा मिळते. पुरुषांना धूम्रपान करायचे असल्यास सिगार्स वाटल्या जातात. थोडा ‘ब्रेक’ घेऊन मग सर्व जण पुढच्या खाद्ययात्रेला सुरुवात करतात.

Story img Loader