कुठल्या प्रकारचं जेवण कसं घ्यावं? कटलरी कुठली, कशी वापरावी? चांगला होस्ट किंवा गेस्ट बनण्यासाठीचे डायनिंग एटीकेट. पाश्चिमात्य जेवणात मांसाहारावर भर असला तरी फ्रेंच क्लासिक मेन्यूमध्ये व्हेजिटेबल्स वेगळा कोर्स म्हणून येतात. या सॅलड आणि व्हेजिटेबल कोर्सविषयी..

आपल्याकडे ‘भाजी’ हा रोजचाच प्रकार आहे. भाजी शिजायला एवढा वेळ लागतं नाही जितका ‘आज कोणती भाजी करावी बरं?’ हा विचार करण्यात जातो! पाश्चिमात्य जेवण जरी मांसाहारावर भर देणारं असलं, तरी त्यामध्ये भाज्यांचं महत्त्व बरंच आहे. या पद्धतीत भाज्या तीन प्रकारांनी खाल्ल्या जातात – अकंपनीमेन्ट म्हणून, एक स्वतंत्र कोर्स म्हणून आणि वेगळा सॅलड कोर्स म्हणून. पहिला प्रकार आपण मेन कोर्समध्ये पहिला. त्यात भाज्या ऑन्त्रेबरोबर अकंपनीमेन्ट म्हणून त्याच प्लेटमध्ये सव्‍‌र्ह केल्या जातात.
एक स्वंतंत्र कोर्स म्हणून जेव्हा भाज्या सव्‍‌र्ह केल्या जातात तेव्हा त्याची खरी नजाकत दिसून येते. पण यात फ्लॉवर आणि गाजरसारख्या भाज्या नसून, आर्टीचोक आणि अस्परेगस अशा एक्झॉटिक भाज्यांचा समावेश होतो. या भाज्या शिजवून त्याबरोबर जाणाऱ्या हॉलंडेझसारख्या विशिष्ट सॉसेसबरोबर खायच्या असतात. काही भाज्या कटलरीचा वापर न करता हातानेच खाल्लय़ा जातात, तर ‘कॉर्न-ऑन-द-कॉब’ म्हणजे आपलं कणीस, हे अगदी शाही आदबीत खाल्लं जातं. आपण जे कणीस भाजून (आणि तेही अनेकदा रस्त्यावर!), तिखट मीठ लावून खातो, तेच फाइन डाइनमध्ये उकडून, त्याच्या दोन्ही बाजूने होल्डर्स लावून खाल्लं जातं.. अगदी वितळलेल्या बटर बरोबर!
आपल्या ‘कोशिंबीर’ किंवा ‘पचडी’चा पाश्चिमात्य अवतार म्हणजे सॅलड्स. पण सुक्या बांगडय़ाची कोशिंबीरसारखे अपवाद वगळता आपल्याकडे कोशिंबीर बहुदा शाकाहारी असते. पाश्चिमात्य जेवणात सॅलड हे कच्च्या किंवा शिजवलेल्या भाज्यांमध्ये घातलेल्या मांसाहारी पदार्थाचे पण असू शकते. कोणत्याही सॅलडबरोबर ‘ड्रेसिंग’ हे असलंच पाहिजे. ड्रेसिंग अनेक प्रकारची असू शकतात. सर्वात पॉप्युलर ड्रेसिंग ऑलिव्ह ऑईल, व्हिनिगर, मस्टर्ड, मिरपूड आणि मीठ यांचं मिश्रण असतं. सॅलड खाताना थोडा ‘क्रंच’ यावा म्हणून अक्रोड, भाजलेले बदामाचे तुकडे किंवा ब्रेडचे तळलेले छोटे तुकडेही घालतात. काही भाज्या, मांसाहारी पदार्थ, चीज आणि ड्रेसिंग यांचं ठरलेलं कॉम्बिनेशन असून ती क्लासिकल सॅलड्स म्हणून ओळखली जातात. रशियन सॅलड, वॉलडॉर्फ सॅलड आणि सीझर्स सॅलड ही काही क्लासिकल सॅलड्स आहेत.
सॅलड हे स्टार्टर्स म्हणूनही सव्‍‌र्ह केलं जातं. सॅलड खायला एक वेगळा सॅलड फोर्क असतो. बुफे पद्धतीत जर प्लेटमध्ये जागा नसली तर सॅलड खायला एक विशिष्ट किडनीच्या आकाराची बशी आपल्या प्लेटला अडकवून, सॅलड खाता येतं.

Story img Loader