दिवाळीच्या पहिल्या दिवशी पारंपरिक वेशात देवळात जाऊन मग गप्पांचा फड जमवायचा, फोटो काढायचे हे आता ठरूनच गेलंय. इथं येण्यामागे दिवाळीच्या शुभेच्छा देण्याबरोबरच आणखी एक ‘हिडन अजेंडा’ असतोच. कट्टेकऱ्यांना तो चांगलाच माहितीय. पुणे, ठाणे, कल्याण, डोंबिवली, पार्ला इथं या दिवाळी कट्टय़ाची प्रथा संस्कृती म्हणावी इतकी छान रुळलीय.
‘उद्या भेट रे कट्टय़ावर!’ कदाचित या ओळी दिवाळीच्या सुट्टीमुळे बहुसंख्य कॉलेजिअन्स नक्कीच मिस करीत असतील. दिवाळीच्या सुट्टीमुळे कॉलेज, शाळा बंद असतील, कट्टे जरी ओस पडलेले असतील तरीही दिवाळीच्या सकाळी मात्र जरा वेगळ्या ठिकाणचे कट्टे आणि रस्ते फुलून जाणार हे नक्की. दिवाळी कट्टय़ाची एक आगळीवेगळी संस्कृती आता चांगलीच रुजताना दिसतेय. काही वर्षांपूर्वी दिवाळीच्या पहिल्या दिवशी उठून, अभ्यंगस्नान करून, फटाके फोडून नंतर कुटुंबीयांसमवेत नाश्ता करायचा आणि दिवसाला सुरुवात करायची असं काहीसं तरुणाईचं रुटीन असायचं; पण गेल्या काही वर्षांत ‘दिवाळीचा पहिला दिवस’ म्हटला की पारंपरिक वेशात तरुणाई बाहेर पडते आणि ठरलेल्या ठिकाणी कट्टा जमवते. प्रत्येक शहरात, उपनगरात हे दिवाळी कट्टे वेगळे आहेत. ते तरुणाईला नक्कीच माहिती असतात. दिवाळीत भेटायचंच हा अलिखित नियमच झाला आहे जणू!!
‘अरे आज तरी उठ रे लवकर, दिवाळी आहे’ असं पूर्वी आईला दहा वेळा ओरडावं लागायचं; अगदी परीक्षेच्या काळातही लवकर उठायचे जीवावर यायचे.
पण एरवी उशिरा उठणारा मुलगाही दिवाळीच्या दिवशी मात्र कोणीही न उठवता आपण होऊन शहाण्यासारखा उठून आवरून धाव घेतो ती आपल्या ठरलेल्या दिवाळी कट्टय़ाकडे. पुण्याची सारसबाग, डोंबिवलीचा फडके रोड, ठाण्याचा गोखले रोड, राममारुती रोड, कल्याणचा दुर्गाडी किल्ला ही ठिकाणं या दिवशी तरुणीने तुडुंब भरलेली असतात. सक्काळी सक्काळी नवीन कपडे घालून, नटून-सजून आपल्या मित्र-परिवाराला मराठमोळ्या साजात भेटण्याची मजा काही औरच असते. सणाच्या दिवशी आपल्या कट्टेकऱ्यांना आवर्जून भेटण्याची प्रथा तरुणाईनेच सुरू केली आहे. इथं भेटण्यासाठी कधीच कोणाला आग्रह करण्याची गरज पडत नाही. प्रत्येक जण उत्स्फू र्तपणे या दिवशी एकमेकांना भेटण्यासाठी येत असतात. अर्थात इथे येण्यामागे दिवाळीच्या शुभेच्छा देण्याबरोबरच एक हिडन अजेंडा असतोच.. रेग्युलर कट्टेकऱ्यांना तो चांगलाच माहितेय. अर्थातच आम्ही ‘बर्ड वॉचिंग’बद्दल बोलतोय. दिवाळीच्या खास ठेवणीच्या कपडय़ांत नटून सजून आलेले हे ‘बर्ड्स’ आणखी ‘विलोभनीय’ होतात हे सांगणे न लगे. (या बर्ड वॉचिंगमध्ये जेंडर बायस नाही बरं का.. मुलं-मुली दोघेही सारख्याच उद्देशाने आणि उत्साहाने यात सहभागी होतात.) डोंबिवलीच्या फडके रोडचा दिवाळी कट्टा तर यासाठी अगदी फेमस आहे. अनेक जण पहिल्यांदा इथंच भेटलेत आणि मग त्यांचं ‘जमलंय’. फडके रोडवरचे कट्टेकरी अशा अनेक प्रेमकहाण्या सांगतात. तर दिवाळी कट्टा हा या सगळ्या कारणांसाठी अगदी हवाहवासा वाटतो.
दिवाळी कट्टय़ावर कधी कित्येक र्वष जुन्या मित्राचा काही कॉन्टॅक्ट नसला तरीही या ठिकाणी तो मित्र हमखास भेटतो. तरुणांप्रमाणे मध्यम वयातली मंडळीही आपल्या जुन्या कॉलेज मित्रांना आणि त्यांच्या काळातल्या आठवणींना या सणाच्या निमित्ताने उजाळा देण्यासाठी इथं भेटून एक वेगळाच सांस्कृतिक कट्टा वसवतात. दिवाळीच्या पहिल्या दिवसाची प्रसन्नता, तरुणांच्या जल्लोषाने वाहून गेलेले रस्ते, तोरणांनी सजलेली रस्त्यावरची दुकानं आणि हॉटेलमध्ये वेटिंगवर राहून नंतर शेवटी मिळालेल्या ४ जणांच्या टेबलावर चेंगरून ८ जण बसून पावभाजीचा आस्वाद घेताहेत, या सगळ्याच उत्सवाचा गंध पुणे, कल्याण, डोंबिवली, ठाणे, पार्ले या ठिकाणच्या हवेत दरवळलेला असतो. या दिवशी कोणी कोणाला आग्रह करीत नाही, मस्का मारीत नाही, तरी सगळे जण स्वत:हून येतात. पुण्यासारख्या शहरात आवर्जून दीपोत्सवात सहभागी होतात.
रस्ते रांगोळ्यांनी सजलेले असतात. रस्त्यावर कितीही गर्दी असली तरीही आपल्या मित्राला त्या गर्दीत शोधून काढण्याचा आनंद अनुभवतात. सकाळी भेटून, मंदिरात देवाचे आशीर्वाद घेऊन मग अख्खा रस्ता मित्रांसोबत तुडवत फोटो काढण्यात तरुणाई गुंग होते. हल्ली तर तातडीने ते फोटो फेसबुक, ट्विटरवर टाकण्याची स्पर्धाच सुरू होते. दिवाळीच्या पहिल्या दिवशी तरुणाई आपल्या या हक्काच्या सांस्कृतिक आणि तेवढय़ाच धमाल कट्टय़ावर भेटून एकमेकांना दिवाळीच्या शुभेच्छा देत असते.

फडके रोडची गर्दी – सानिका कुसुरकर (डोंबिवली)
मी आणि माझे सगळे मित्र-मत्रिणी गेली आठ र्वष न चुकता दर दिवाळीच्या पहिल्या दिवशी फडके रोडवर भेटतो. मुख्य म्हणजे या दिवशी जुने ग्रुप्स भेटतात. त्यामुळे फडके रोडवरची दिवाळी खास असते. भल्या पहाटेपासून गर्दी व्हायला सुरुवात होते. सकाळी साडेसातपर्यंत रोड गर्दीने भरून जातो. आम्ही सगळे आधी देवळात जाऊन नंतर तिकडे असलेल्या सांस्कृतिक कार्यक्रमांचासुद्धा आस्वाद घेतो. जेव्हा फिरून फिरून भूक लागते तेव्हा सगळ्यांची धाव डोंबिवलीच्या मॉडर्न कॅफेकडे जाते. सणाच्या दिवशी सकाळी बाहेर पडल्यामुळे सुरुवातीच्या काळात घरचे ओरडायचे; पण नंतर हळूहळू त्यांनाही सवय झाली आणि आता फडके रोड असं म्हटलं की कोणी काहीच बोलत नाही. त्या दिवशी रोडवर इतकी गर्दी असते, त्यामुळे हमखास ग्रुपची चुकामूक होते. फाटाफूट होते. हा सिन दरवेळेस घडतो. पण तरीही फोनाफोनी करून अखेरीस पुन्हा एकमेकांचा शोध घ्यायला मजा येते.

‘पार्लेश्वरा’ची संस्कृती – स्नेहल देशमुख (पार्ले)
दिवाळीच्या पहिल्या दिवशी भल्या पहाटे नटून सगळी तरुण मंडळी पाल्र्याच्या पाल्रेश्वर मंदिरात जमलेली असतात. या दिवशी अस्सल मराठी बाणा सर्वामध्ये जागृत झालेला असतो.मुली नऊवारी आणि मुलं धोतर नेसतात. बरेच मराठी कलाकारसुद्धा या वेळेस इथं जमतात. या ठिकाणी दहिसर, भायखळा, बोरिवली, बांद्रा या ठिकाणावरून तरुणाई येते. त्यामुळे सगळेच जुने मित्र भेटतात आणि दरवर्षी जाऊन जाऊन नवीन ओळखीही होतात. त्यामुळे मित्र-परिवार वाढतो. पश्चिम उपनगरांतील तमाम तरुणांसाठी या दिवशी हा हक्काचा कट्टा असतो.

राममारुती रोडवरचा उत्साह – मत्रेय जोहरी (ठाणे)
दिवाळीच्या पहिल्या दिवशी ठाण्यातले जवळपास सगळेच रस्ते तरुणांनी भरलेले असतात. एरवी सकाळी उठायचा कितीही कंटाळा आला तरीही या दिवशी मात्र लवकर उठायचा अजिबात कंटाळा येत नाही. सगळे भेटल्यावर आम्ही खूप भटकतो, फोटो काढतो, त्यामध्ये वेळ कसा जातो कळत नाही. मग कुठेतरी नाश्ता करायला जातो; पण या दिवशी मराठमोळेच पदार्थ खायचे असा आमच्या मित्र-परिवाराचा कटाक्ष असतो. दुपारी मात्र आवर्जून सगळे घरीच जेवतो. त्यामुळे सकाळी कितीही भटकलो तरीही आई-बाबा ओरडत नाहीत. दिवाळीच्या पहिल्या दिवशी यानिमित्ताने मित्रांना भेटणं होतं.  

सारसबागेचा दीपोत्सव – नचिकेत बिवलकर (पुणे)
मंगळवार- चतुर्थी- गणपती किंवा सुट्टय़ांमध्ये ठरलेली सारसबागेतली गर्दी आता दिवाळीच्या पहिल्या दिवशी उच्चांक गाठू लागली आहे. हल्ली दिवाळीत सकाळी लवकर (म्हणजे तरुणांच्या भाषेत तर भल्या पहाटे) मोठय़ा प्रमाणात तिथे जमलेली असतात. पहाटे उठून नटून सगळे एकत्र भेटतात आणि झकासपकी फोटोज काढून ते एफबीवर अपलोड केले जातात. कोणत्या तरी कारणाने का होईना, ठरवून भेटणं होतं- गप्पा होतात आणि लवकर उठून सजून मंदिरात जायचं समाधान मिळतं ते वेगळंच!!

कल्याणच्या दुर्गाडी किल्ल्यावरचा कट्टा – सायली महाडिक (कल्याण)
माझा ग्रुप दरवर्षी दिवाळीच्या पहिल्या दिवशी आमच्या इथल्या दुर्गाडी किल्ल्यावर जमतो. या दिवशी एक वेगळीच एनर्जी आणि वातावरण किल्ल्यावर तयार झालेलं असत. या दिवशी सगळीच तरुण मंडळी नटून पारंपरिक वेशात आलेली असतात. किल्ल्यावर भेटल्यानंतर फोटो वगरे काढून आम्ही आमच्या शाळेच्या वर्गशिक्षिका रत्नाकरबाईंकडे फराळाला जातो. हल्ली प्रत्येकाच्या कॉलेजच्या वेळांमुळे सगळ्यांची भेट होतेच असं नाही; पण यानिमित्ताने जुन्या बाईंनाही भेटता येतं. एकंदरच सगळीकडे उत्साहाचं वातावरण असतं.

चिंचवडमधला गप्पांचा फड
चिंचवडच्या प्रसिद्ध आणि ऐतिहासिक मोरया गोसावी मंदिरात दिवाळीच्या पहिल्या दिवशी तरुणाईचा कट्टा जमतो. सकाळी कधी नव्हे ते लवकर उठून नदीकिनारच्या या मंदिरात आल्यामुळे नदीतीरावरून सूर्योदयाचं दर्शन होतं. फोटोसेशन होतं आणि मग नदीकाठीच गप्पांचा फड जमतो. एरवी फेसबुक- व्हॉट्सअ‍ॅपवरून बोलणं होत असतंच. पण दिवाळीला हे असं प्रत्यक्ष भेटणं खूप काही देऊन जातं. वर्षभर त्या आठवणी साठवत, पुन:पुन्हा फोटो बघत छान वाटत राहतं.

Story img Loader