मॅनेजमेंटचा अभ्यास करणारे आम्ही, आयुष्याच्या मॅनेजमेंटमध्ये मात्र सपशेल हरतो. आलेल्या कटू प्रसंगांना खंबीरपणे सामोरे जाण्याचे धडे देणारी ही खरी मॅनेजमेंट स्कूल्स आहेत. त्यामुळे त्यांना मदत करण्यासाठी नव्हे, तर आपल्या स्वत:ला मदतीचा हात देण्यासाठी आपण नक्की ‘इथं’ जायला हवं.. सांगतेय मित्रमंडळींसमवेत वृद्धाश्रमात दिवाळी साजरी करणारी स्वप्नाली धाबुगडे.
‘व्हॉट्स द प्लॅन फॉर धिस दिवाली गाईज?’ Whats App  वरच्या ‘ट्रेकलव्हर्स’ ग्रुपमधल्या बापूच्या या मेसेजने खरं तर आम्हा सगळ्यांचेच डोळे लकाकले होते. ट्रेकिंग, सायकिलग, रॅिप्लग असे नवनवीन प्रयोग करणाऱ्या आमच्या ग्रुपचा पुढचा ‘तुफानी’ प्लान काय असेल, यावर खमंग चर्चा सुरू झाली होती. या दिवाळीत आपल्याला नक्की काहीतरी ‘हटके’ करायचंय, या विचारातून ‘वृद्धाश्रमा’ला भेट देऊन आजी-आजोबांसोबत दिवाळी साजरी करण्याच्या कल्पनेवर शिक्कामोर्तब झालं आणि आम्ही भेटलो ‘मातोश्री’ वृद्धाश्रमातील इनमेट्सना.
आयुष्याच्या ‘या’ वळणावर तुम्हाला नक्की काय हवं असतं? पसा? नाही! गाडी-बंगला? नाही! हवा असतो फक्त थोडा वेळ.. मग हाच वेळ.. मग हाच वेळ इनमेट्ससोबत शेयर करायचा असं आम्ही ठरवलं आणि मग सुरू झाली त्याची तयारी. आधी ‘मातोश्री’मध्ये फोन करून तिथले नियम समजून घेतले. इनमेट्स म्हणजे सहवासी आपापली आधीची आयुष्य बाजूला सारून एकमेकांच्या सहवासात ‘सेकंड इिनग’ नव्या उमेदीने जगणारे लोक.. एक नवीन कुटुंब.. सगळ्या आजी-आजोबांचं!
इनमेट्सची वयं, एकूण संख्या, तिथले नियम लक्षात घेता, सगळ्यांचा सहभाग राहील असे कोणते गेम खेळता येतील, जिंकणाऱ्याला किंवा चांगलं गाणं-नाच-अभिनय करणाऱ्याला काही बक्षीस देता येईल का, दिवाळी कशी साजरी करता येईल यावर आमची शोधमोहीम आणि चर्चासत्र सुरू झाली. शेवटी गाण्यांवर बॉल पास करणे, हौजी आणि बादलीत बॉल टाकणे हे तीन खेळ नक्की केले. या खेळांसाठी लागणारं सामान जमा केलं. वातावरण निर्मितीसाठी ‘त्यांच्या’वेळची गाणी शॉर्टलिस्ट केली. काही मजेशीर प्रश्नांची आणि बक्षिसांची यादी केली. बक्षीस आणि फटाक्यांकरता आम्ही एक दिवस आख्खं दादर मार्केट पालथं घातलं. रात्री दोनपर्यंत बसून सगळ्या बक्षिसांना आकर्षक पॅकिंग केलं. सगळ्यांसाठी खाऊ घेतला. खेळ प्रभावीपणे घेता यावेत याकरता म्युझिक सिस्टीम आणि वायरलेस माईक सोबत घेऊन गेलो. आमच्यापकी कुणी काय करायचं हेही ठरवलं.
रविवार, दिनांक १० नोव्हेंबर २०१३.. आमच्या लवाजम्यासह आम्ही तिथे पोचलो.
खरं तर त्यांच्या निम्म्या वयाहून कमी वयाचे होतो आम्ही.. दोन पिढय़ांचं अंतर.. पण कुठंच जाणवलं नाही ते. सगळे मिळून खेळलो, खळखळून हसलो, ‘कोंबडी पळाली’च्या तालावर नाचलो, सुरात गाणी म्हटली, गझल-शेरोशायरी ऐकल्या, टाळ्या वाजवून एकमेकांना दाद दिली, स्पध्रेत एकमेकांच्या टीम्सना चिडवलं, गप्पा मारल्या आणि हो, दिवाळी म्हणून शेवटी निघताना फुलबाज्या-पाऊस-चक्र असे फटाकेही उडवले. या सगळ्या इनमेट्सचा उत्साह आम्हाला लाजवणारा होता.
त्यांना आपली गरज आहे, आपण त्यांना वेळ द्यायला हवा, अशा काहीशा भावनेतून त्यांना भेटायला गेलेलो आम्ही.. भेटल्यावर लक्षात आलं की, खरं तर आम्हाला गरज आहे त्यांना भेटण्याची, त्यांच्याकडून खूप काही शिकण्याची.
आयुष्यभर ज्यांच्यासाठी खस्ता खाल्ल्या, त्यांनीच नाकारल्यावर वयाच्या या टप्प्यात सर्व बदलांसह एक नवीन आयुष्य सुरू करणं खरंच तितका सोप्पंय का? वेगवेगळ्या भागांतून आलेल्या वेगवेगळ्या स्वभावाच्या व्यक्तींसोबत नव्यानं राहणं सहजशक्य आहे का? या सर्व बदलांमधून जाताना काय मानसिक अवस्था होत असेल? आम्हाला त्याची कल्पनाही करता येत नव्हती. एकीकडे – कधी परीक्षेत अपयश आलं म्हणून, कधी आई-वडील रागावले म्हणून, तर कधी प्रियकर-प्रेयसी भांडण, अशा क्षुल्लक कारणांनी निराशेच्या गत्रेत जाणारी आमची पिढी आणि दुसरीकडे हे इनमेट्स.. आपल्या दु:खापलीकडे जाऊन समतोल साधू पाहत होते. एकीकडे – छोटय़ा छोटय़ा प्रसंगांनी खचून जाऊन सगळं काही संपल्याचा आव आणणारे आम्ही, तर दुसरीकडे – आयुष्याच्या संध्याकाळी प्रत्येक क्षण आनंदात घालवण्याची मानसिकता जपणारे इनमेट्स. नक्की कळलं नाही की, आम्ही त्यांच्या चेहऱ्यावर हसू फुलवू पाहत होतो की ते आमच्या? त्या दिवशी या आणि अशा अनेक विचारांची गर्दी मनात दाटली.
मॅनेजमेंटचा अभ्यास करणारे आम्ही, आयुष्याच्या मॅनेजमेंटमध्ये मात्र सपशेल हरतो. आलेल्या कटू प्रसंगांना खंबीरपणे सामोरे जाण्याचे धडे देणारी ही खरी मॅनेजमेंट स्कूल्स आहेत. त्यामुळे त्यांना मदत करण्यासाठी नव्हे, तर आपल्या स्वत:ला मदतीचा हात देण्यासाठी आपण नक्की ‘इथं’ जायला हवं. यंदाच्या दिवाळीत आमच्या मनात या विचारचा दिवा आम्ही लावला. हा दिवा असाच ‘तेवत’ राहो, त्याच्या प्रकाशात चालत राहण्याची सुबुद्धी आम्हाला लाभो, हीच सदिच्छा!

Story img Loader