कधी ठिपक्यांची, कधी फुलांची, मिठाची, फ्रीहॅण्ड, संस्कार भारती, पोर्टेट असा रांगोळीचा प्रवास आता थ्रीडी रांगोळीपर्यंत आलाय. त्यात तरुणाईनं आपणहून पुढाकार घेतलाय. अनेकांनी बिझी शेडय़ुल असूनही लहानपणापासून रांगोळी काढायची आवड जपल्येय. इंच इंच लढवू म्हणत उपलब्ध जागेत रांगोळी काढताना मिळणारा नवनिर्मितीचा आनंद लुटलाय. पाहणाऱ्यांच्या दादेमुळे आणखी प्रयोग करायला त्यांना हुरूप वाटतोय.. रांगोळी काढतानाचं फीिलग खूपच छान असतं.. शब्दांत न पकडता येणारं.. तरीही ते पकडायचा केलेला हा प्रयत्न..

साईप्रसाद मयेकर
रांगोळी काढताना सुरुवातीला मी ठिपके, संस्कार भारती, फुलं, भाज्या, खडे मिठाची रांगोळी अशी टप्प्यानं एकेक रांगोळी काढायला शिकलो. महाराष्ट्र दिनानिमित्त घाटकोपरला २७ बाय १० फूट आकाराची सिंहासनाधिष्ठित शिवाजी महाराजांची रांगोळी काढली होती. माझ्या वाचनात आलं होतं की, मीठ हे लक्ष्मीचं प्रतीक मानल्यानं पायदळी तुडवलं जात नाही. मिठामुळे घरातील वातावरणात सकारात्मकता येते. मिठाच्या रांगोळीत खायचे रंग वापरल्यानं ते नंतरही वापरता येतात. यातली कोणतीही रांगोळी मी कुणाकडून शिकलेलो नाही.
दरवर्षी जवळच्या पोलीस स्टेशनमध्ये, पाच र्वष दादरच्या धन्वंतरी रुग्णालयात आणि बालमोहन विद्यामंदिरमध्ये ११ र्वष मी रांगोळी काढतोय. रांगोळी काढताना समोरची जागा नि मिळालेल्या चौकटीत बसेल अशी डोक्यातली कल्पना प्रत्यक्षात साकारावी लागते. त्या वेळी भोवतालच्यांच्या प्रश्नांमुळे काही वेळा मन विचलित होतंही. पण त्यांच्या मनातली आपलेपणाची भावनाच त्यातून उमटते. त्यामुळे एकीकडे छानही वाटतं. नंतर रांगोळीला मिळालेल्या दादेमुळे साऱ्या कष्टांचं चीज होतं.  मला बाबासाहेब पुरंदरे यांची मिठाच्या माध्यमात रांगोळी काढायची आहे. त्याखेरीज लग्नकार्यात खाण्यायोग्य रंग वापरून रंगवलेल्या अक्षतांची उपस्थितांनी रांगोळी काढल्यानं अन्नाची नासाडी थांबवण्यावर विचार चाललाय.

अपूर्वा जोशी
लहानपणापासून आईच्या रांगोळीत रंग भरून मी रांगोळीचा श्रीगणेशा गिरवला. आठवीपासून मी संस्कार भारती, फुलांची रांगोळी, गालिचा नि फ्लोटिंग रांगोळी, ठिपक्यांची, बोटांची रांगोळी, मिठाची, कोळशाची, धान्याची, लाकडाच्या भुशाची रांगोळी काढत्येय. त्याखेरीज उंबरठय़ावरची, ताटाभोवती, पंक्तीसाठी फुलं-रांगोळीची रांगोळी, लहान मुलांसाठी चॉकलेटची रांगोळी काढते. यापकी संस्कार भारतीची रांगोळी मी शिकल्येय. मला संस्कार भारती नि फुलांची रांगोळी अधिक भावते. आतापर्यंत मी विविध स्तरांवरील रांगोळी स्पर्धात भाग घेतलाय. पुरस्कार पटकावल्येत. भारतीय संकृतीचं प्रतीक असणारी रांगोळी शुभचिन्हांनी बनते. तिचं पावित्र्य जपावं लागतं. म्हणून त्यात मी बाकीचे विषय घेत नाही. मी आपली संकृती जपण्याचा प्रयत्न करते. प्रतीकात्मक चिन्हं वापरून पारंपरिकता दाखवण्याचा प्रयत्न करते. रांगोळी काढताना एक रांगोळी दुसऱ्यासारखी नसते. प्रत्येक वेळी वेगळी कलाकृती निर्माण होते. नवनिर्मितीचा आनंद मिळतो.

ऋतुजा जाधव
शालेय स्पर्धासह विविध स्पर्धामध्ये माझ्या रांगोळीला बक्षीसं मिळाली आहेत. आधी खडूनं फ्रीहॅण्ड काढून त्यात रंग भरते. कॉलेज फेस्टिव्हल आणि इंटर कॉलेजमधील अनेक स्पर्धात सहभागी रांगोळीत भ्रष्टाचार, प्रदूषणादी विषयांवर सामाजिक संदेश लिहिले होते. मला ठिपक्यांची रांगोळी काढायला अजिबात आवडत नाही. त्याऐवजी मी फ्रीहॅण्ड रांगोळीत पोर्टेट, डिजिटल पेंटिंग- सिनरी वगरे काढते. अ‍ॅबस्ट्रॅक्ट रांगोळीही काढते. त्यात भौमितिक आकार, पानं-फुलं वगरे गोष्टी काढते. रांगोळी काढायला सुरुवात करताना डोक्यात बेसिक थीम तयार असते. पण काही वेळा रेषा काढताना आणखी काही नव्या कल्पना सुचून रांगोळीत पटकन बदलही होतात. एकदा रांगोळी काढायला घेतल्यावर दोन-तीन तास कसे संपले ते कळतच नाही. रांगोळी काढून झाल्यावर बघणाऱ्यांना ती आवडेल की नाही अशी हुरहुर वाटते खरी. पण कौतुकाचे चार शब्द ऐकल्यावर बरंही वाटतं. रांगोळीच्या बाबतीत इंटरनेटच्या साहाय्यानं वेगवेगळे प्रयोग मी करीत राहिल्येय. आता मला किल्ल्याच्या थीमवर आधारित थ्रीडी रांगोळी काढायची आहे.

प्रणव सुर्वे
एरवी आईची बघून रांगोळी काढत असलो, तरी प्रोफेशनल रांगोळी म्हणजे काय, ते दहावीत पाहिलेल्या प्रदर्शनामुळे कळलं. ही प्रोफेशनल रांगोळी श्रद्धा वैद्य यांच्याकडे शिकलो. त्यांच्या कलासाधना संस्थेतर्फे भरवल्या जाणाऱ्या प्रदर्शनांत गेली ४ र्वष मी सहभागी होतोय. रांगोळीच्या स्पर्धात मला फारसा रस वाटला नाही. ज्येष्ठ छायाचित्रकार गौतम राजाध्यक्ष यांना श्रद्धांजली म्हणून काढलेल्या पोर्टेटला त्यांच्या शिष्यांचीही दाद मिळाली होती. यंदाच्या प्रदर्शनासाठी सामाजिक विषय घ्यायचा विचार चालू आहे. शक्यतो मी जसं ठरवतो, तसंच ते उतरवतो. कारण माझा परफेक्शनवर भर असतो. आमच्या हातात एक रेफरन्स असतोच. त्यात अ‍ॅड करायच्या गोष्टींचा विचार चालतो. रांगोळी काढताना मी डोकं फ्री ठेवतो. कल्पनांचा विहार चालू असतो नि त्या भरातच रांगोळीला असा काही उठाव येतो.. की.. शब्दांत पकडता न येणारं ते फीिलग खूपच छान असतं. रांगोळीच्या रंगांशी खेळायला खूप मजा येते. यंदा थ्रीडीबेस पोर्टेट काढायचा विचार आहे.

मंदार  म्हसकर
मला लहानपणापासून रांगोळीची आवड आहे. गेली दोन र्वष मी रांगोळी काढतोय. युथ फेस्टिव्हलमधल्या संस्कार भारतीची रांगोळी गोलाकार काढून तिला फुलपाखराचा आकार दिला होता. कॉलेजमधील इकॉनॉमिक्सच्या फेस्टिव्हलदरम्यान त्याच्या ब्रोशरची मिठाची रांगोळी काढली होती. महाराष्ट्र उत्सवात दुष्काळ या विषयाशी निगडित पोर्टेट रांगोळीत आकाशाकडे टक लावणारे आजोबा नि भेगाळलेली जमीन काढली होती. मात्र प्रोफेशनल लेव्हलची रांगोळी काढण्याएवढा यशस्वी झालेलो नाही. अभ्यासामुळे सरावाला तेवढा वेळ मिळत नाही. पण स्पध्रेच्या वेळी मात्र मी तयारीला थोडा वेळ देतो. रांगोळी काढताना त्या चित्रात आपण मुरलो पाहिजे. रांगोळीशी एकरूपता साधता आली पाहिजे.

Story img Loader