मृण्मयी पाथरे
आपण आपल्या आयुष्यातील नकारात्मक गोष्टींना कितीही टाळायचं म्हटलं आणि एखादी घटना घडल्यावर झालं गेलं विसरून आयुष्यात पुढे काय करता येईल याचा विचार केला, तरीही आपल्याला या क्षणी जाणवणारं दु:ख, भीती किंवा चिंता काही क्षणार्धात कमी किंवा पूर्णपणे नाहीशी होत नाही.
दोन दिवसांपूर्वी विराजसचा एफ.वाय.बी.कॉमच्या सत्र परीक्षेचा निकाल लागला. परीक्षेमध्ये मनासारखे गुण न मिळाल्याने तो नाराज होता. आता पूर्वीसारखं नुसतं शेवटच्या परीक्षेत जोर लावून चालणार नव्हतं. त्याला पुढे एमबीए करण्यासाठी नामांकित कॉलेजमध्ये प्रवेश घेण्याकरिता बॅचलर्सच्या तीनही वर्षांतील सीजीपीए ८ पूर्णाकापेक्षा जास्त हवा होता. सत्र परीक्षेत अपेक्षेपेक्षा कमी गुण मिळाल्याने विराजस नाराज होता. पण त्याला त्याची मित्रमंडळी ‘चलता है रे.. आमच्या मार्कापेक्षा तुझे मार्क तर बरेच म्हणायचे. तुझ्या मार्कामध्ये आमच्यासारखी दोन मुलं अजून पास होतील,’ असं सांगून त्याची समजूत काढत होते. विराजसला मात्र त्यांच्या या बोलण्याने प्रोत्साहन मिळण्याऐवजी आणि बरं वाटण्याऐवजी आणखी वाईट वाटलं.
मिहिका गेले पाच महिने समीरला डेट करत होती. त्या दोघांचीही तशी ही पहिलीच रिलेशनशिप होती. त्यामुळे दोघंही एकमेकांना सांभाळून घेत होते. पण कालांतराने आपल्या आवडी-निवडी वेगळय़ा आहेत, विचार वेगळे आहेत, स्वप्नं वेगळी आहेत, घरच्या मंडळींची विचारसरणी आणि राहणीमान वेगळं आहे, हे त्यांच्या लक्षात आलं. कदाचित, पुढे आपल्याला कामानिमित्त वेगवेगळय़ा शहरांत राहायला लागलं, तर नंतर भांडणं होण्यापेक्षा आताच या नात्याला पूर्णविराम दिलेला बरा, हा विचार करून त्यांनी ब्रेकअप केलं. हे ब्रेकअप म्हणजे दोघांनीही एकमताने घेतलेला निर्णय असला, तरीही दोघांनाही आपण आपलं नातं टिकवून ठेवू शकलो नाही, याचं फार वाईट वाटलं. ब्रेकअपला दोन-तीन महिने झाले तरी मिहिकाला जाणवणारं रितेपण काही कमी झालं नाही. तिच्या मित्रमंडळींनी तिला समजावण्याचा प्रयत्न केला- ‘किती वेळ समीरचा विचार करत बसणार आहेस तू? झाला की बराच वेळ तुमच्या ब्रेकअपला. जेमतेम चार-पाच महिन्यांची तर रिलेशनशिप होती तुमची. समीरसारखे किंवा त्याच्यापेक्षा कित्येक पटीने चांगले जोडीदार मिळतील तुला! मग टेन्शन कायकु लेनेका?’
कैवल्य गेल्या दीड-दोन वर्षांपासून डिप्रेशन अनुभवत होता. करोनाची पहिली लाट आल्यावर अवघ्या दोन महिन्यांतच त्याचा जॉब गेला. तो घरात एकुलता एक कमावणारा असल्यामुळे घरखर्च कसा चालणार, याची चिंता त्याला सतावत होती. या काळात पगार अचानक थांबल्यामुळे त्याने आतापर्यंत केलेली सेव्हिंग्स वापरायला सुरुवात केली. पुढे त्याने लहान-मोठी काँट्रॅक्ट बेसिसवर मिळणारी नोकरी करून घर कसंबसं चालवलं. आर्थिकदृष्टय़ा थोडं कुठे सावरतो न सावरतो, तोच करोनाच्या दुसऱ्या लाटेत त्याच्या बाबांचं अचानक निधन झालं. या धक्क्यातून बाहेर यायलाही त्याला बराच काळ लागला, पण करोनाची लाट सरल्यावर कैवल्यला उत्तम पगाराची नोकरी मिळाली. आर्थिक स्थैर्यासोबत त्याच्या आयुष्यात इतरही चांगल्या संधी यायला लागल्या. नवीन ऑफिसने कैवल्यला कंपनीच्या कामासाठी ऑस्ट्रेलियाला जाणार का? अशी विचारणा केली. कैवल्यच्या आयुष्यात चांगल्या गोष्टी घडत असल्या तरीदेखील या गोष्टी आपल्या आयुष्यातून पटकन निसटून जाऊ शकतात ही भीती त्याच्या मनात घर करून बसलेली. त्यामुळे आजूबाजूच्या मंडळींनी कितीही सांगितलं की ‘डोन्ट वरी, बी हॅपी’, तरी हे बोलायला सोपं आहे पण आचरणात आणायला अवघड आहे, हे कैवल्य जाणून होता.
आपल्या आयुष्यात प्रॉब्लेम्सची तीव्रता कितीही असो – कमी किंवा जास्त, आपण कधी ना कधी स्वत:ला किंवा इतरांना नकारात्मक गोष्टींपासून ‘मूव्ह ऑन’ करायला सांगतो. मग ते परीक्षेत आलेलं अपयश असो, करिअरमध्ये आलेले अडथळे असो, एखाद्या व्यक्तीचं निधन झालेलं असो किंवा तुटलेलं नातं असो. आपल्याला कित्येकदा ‘जे होतं ते चांगल्यासाठीच होतं’, ‘या सगळय़ा गोष्टी जाऊ देत. तू सकारात्मक गोष्टींचा विचार कर’, ‘अशा वेळेस ज्या लोकांचं दु:ख आपल्यापेक्षा जास्त आहे, त्यांचा विचार कर. ते त्यांचं दु:ख कसं सहन करत असतील?’, ‘काही दिवसांनी तुला या सगळय़ा गोष्टी क्षुल्लक वाटायला लागतील आणि तू सगळं विसरूनही जाशील’, ‘रिलॅक्स! उसमे क्या है? यह तो होता रहता है/ चलता है’, ‘बडी बडी शहरों में ऐसी छोटी छोटी बातें होतीही रहती है’, ‘गुड/ पॉझिटिव्ह वाइब्ज ओन्ली’ अशी वाक्यं ऐकायला किंवा वाचायला मिळतात. याला टॉक्सिक पॉझिटिव्हिटी (toxic positivity)असंही म्हटलं जातं.
या साऱ्या गोष्टी सांगून आपण इतरांना त्यांच्या दु:खातून बाहेर काढू असा जरी आपला हेतू असला, तरी ज्या व्यक्तीला अशा प्रसंगांना सामोरं जावं लागतं, त्यांना आपण त्यांच्या भावना समजून न घेता धुडकावून लावत आहोत असंही वाटू शकतं. आपण आपल्या आयुष्यातील नकारात्मक गोष्टींना कितीही टाळायचं म्हटलं आणि एखादी घटना घडल्यावर झालं गेलं विसरून आयुष्यात पुढे काय करता येईल याचा विचार केला, तरीही आपल्याला या क्षणी जाणवणारं दु:ख, भीती किंवा चिंता काही क्षणार्धात कमी किंवा पूर्णपणे नाहीशी होत नाही. उलट आपण या भावनांना जितकं आतल्या आत दाबून ठेवायचा प्रयत्न करतो, तितक्याच (किंबहुना कधी कधी त्याहून जास्त) जोमाने त्या भावना आपल्या आयुष्याच्या कोणत्या ना कोणत्या टप्प्यात पुन्हा डोकं वर काढतात आणि आपला चिडचिडेपणा वाढू शकतो.
बरं, एखादी व्यक्ती जेव्हा आपल्याला त्यांच्या मनातील दु:ख सांगते तेव्हा त्यांना आपल्याकडून नेमकं काय अपेक्षित आहे, हे समजून घेणं गरजेचं असतं. अनेकदा त्या व्यक्तीला इतरांचे सल्ले, उपदेश किंवा आम्ही आमच्या वेळेस आम्ही काय केलं हे जाणून घेण्याऐवजी त्यांचं म्हणणं केवळ शांतपणे आणि कोणतीही जजमेंट पास न करता ऐकून घेण्यासाठी आपली आवश्यकता भासू शकते. अशा वेळेस ‘तुला या क्षणी असं वाटणं साहजिक आहे. या आधीही तू अशा अवघड प्रसंगातून गेला / गेली आहेस आणि त्यातून मार्ग काढला आहेस. आता जरी या सगळय़ा प्रसंगांतून पुढे जाणं कठीण वाटत असलं, तरीही मला तुझ्या क्षमतेवर विश्वास आहे. तू जेव्हा शांत होशील, तेव्हा हवं तर आपण दोघं मिळून यातून काय मार्ग काढता येईल याबद्दल चर्चा करू. तोपर्यंत तुला माझी काही मदत लागलीच, तर नक्की सांग!’ एवढं बोलूनसुद्धा आपण एखाद्या व्यक्तीसाठी एक ‘सेफ स्पेस’ तयार करू शकतो. अखेरीस, आपल्यापैकी प्रत्येक जण कधी ना कधी नकारात्मक भावना अनुभवतोच. त्यामुळे आपण सतत पॉझिटिव्ह राहिलं पाहिजे, ही अपेक्षाही कित्येकांना ओझं वाटू शकते. ‘सो समटाइम्स इट इज ओके टु वरी!’
viva@expressindia.com