सणांचा राजा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गणेशोत्सवापाठोपाठच थाट मांडून उभी असते सणांची राणी.. बोले तो ‘फेस्टिव्हल क्वीन’.. अपनी दिवाली.
दिवाळी सणाची आतुरतेने वाट पाहणाऱ्या दिवाळीप्रेमींचा बाजारात दाखल झालेल्या फराळ, फटाके, रांगोळी, दिवे, आकाशकंदील वगरे वस्तूंच्या खरेदीतून मिळणारा आनंद गगनात मावेनासा असतो; त्यात अलीकडे भर पडली आहे ‘ई-दिवाळीची’!
‘ई -दिवाळी!’ हे काय बुवा.. विचारात पडलात ना. हंऽऽऽ आता डोक्याला जास्त ताण देऊ नका. कारण तुमचा आमचा मित्र असणाऱ्या ‘इंटरनेट’च्या माध्यमातून आता घरबसल्या दिवाळीची शॉपिंग दिवाळीप्रेमींना करता येणार आहे, त्यामुळे एक नाही, दोन नाही तर हजारोंच्या घरात ‘दिवाळी’चं एका क्लिकसरशी आगमन होणार आहे.
दिवाळी म्हणजे यशाची रोशनी, समाधानाचा फराळ, मंगलमय रांगोळी, मधुर मिठाई, आकर्षक आकाशकंदील, आकाश उजळवणारे फटाके, भेटवस्तू, नवनवीन कपडे आणि इतर वस्तूंची जोरदार खरेदी.. थोडक्यात ‘दिवाळी शॉिपग’. गर्दीच्या वेळी फिरणे, खरेदीत वेळ वाया घालवणे नकोसे वाटत असलेली, तंत्रज्ञानाचा अधिकाधिक वापर करत असलेली मंडळी प्रत्यक्ष दुकानात किंवा बाजारात जाण्यापेक्षा काही गोष्टी ऑनलाइनच खरेदी करणे पसंत करताएत. दिवाळीदरम्यान असलेल्या उत्पादनांची विविधता, खरेदीतील सुलभता, चांगल्या किमती, सोयीनुसार खरेदी अशा अनेक कारणांमुळे अनेकजण ऑनलाइन शॉिपगला पसंती देऊन ई-दिवाळी उत्साहात साजरी करत आहेत.
 आजच्या ग्लोबलाइज्ड युगात इंटरनेट हे अधिक क्रियाशील, गतिमान आणि आकर्षक माध्यम असल्यामुळे हे माध्यम काटेकोरपणे जोपासणारा तरुण वर्ग इंटरनेटचा केवळ शैक्षणिक आणि मनोरंजनात्मक वापर करत नसून तो इथे सांस्कृतिक तसेच व्यावसायिक बदल घडवीत आहे. त्यामुळे याही वर्षी ही तरुणाई शॉपिंगचं निमित्त साधून ऑनलाइन इंटरनेट माध्यमातून दिवाळी साजरी करीत आहे. सध्या तरुणांमध्ये सर्वाधिक लोकप्रिय असलेल्या ऑर्कुट,  फेसबुक, हायफाय, देसी डॉट कॉम, ट्विटर, फ्रेंड्स एटीन डॉट कॉम अशा अनेक वेबसाइट्सना भेट दिल्यावर दिवाळीच्या जवळपास हजार कम्युनिटीज आढळतात. लाखोंच्या संख्येत सभासद असणाऱ्या या कम्युनिटीजमार्फत तरुण वर्ग आपल्या मतांची, शुभेच्छांची देवाणघेवाण आकर्षक रीतीने, कमी वेळात करण्यासाठी दिवाळीची शुभेच्छापत्रे, ई-ग्रिटिंग्ज, अॅनिमेटेड शुभेच्छा पत्र एखाद्या वेबसाइटहून ऑनलाइनच खरेदी करून एकमेकांना पाठवून आपला आनंद व्यक्त करत आहेत. दिवाळीच्या दिवसांत ई-मेल, फेसबुक तसेच ट्विटरवर सतत अपडेट राहिल्याचा फायदा तरुणांना मिळतोय. दिवाळी खरेदीसाठीच्या काही साइट्स ग्राहकांना प्रॉडक्टच्या लेटेस्ट ऑफरचे ई-मेल पाठवतात यातून तरुणांना बेस्ट डिलही मिळते आणि अन्य लोक ऑनलाइन काय खरेदी करत आहेत याचाही अंदाज येतो. शिवाय अनेक चांगल्या वेबसाइट्स महागडय़ा वस्तूंच्या खरेदीसाठी ‘ईएमआय’ची सुविधा देत असल्यामुळे हव्या असलेल्या वस्तू खरेदी केल्यानंतर सहा महिन्याने त्याचे पसे भरण्याची सवलतही त्यांना मिळते. दिवाळीनिमित्त खरेदीचा अनुभव आणखी वाढवण्यासाठी शॉपिंग साइट्स विविध वेबसाइटची मोबाइल व्हर्जन देत असल्याचे कळल्यावर दिवाळीप्रेमी तरुणांनी प्रवास करत असताना स्मार्टफोन आणि टॅबलेटचा वापर करून ऑनलाइन शॉपिंग करण्याचा सुलभ पर्याय सध्या विकसित केला आहे.
ऑनलाइन शॉपिंग आता नवे राहिलेले नाही. दिवाळीच्या निमित्ताने तर ऑनलाइनच्या माध्यमातून अगदी धान्यापासून कपडे, चप्पल, दागिने एवढेच नाही तर फराळ, फटाके, रांगोळ्या, दिवे, दिवाळी अंकांच्या ऑर्डर महिनाभर आधीच नोंदवल्या गेल्या आहेत. परदेशातील तसेच भारतातील आपल्या नातेवाईकांना फराळ पाठवण्यासाठी आता ऑनलाइन फराळ नोंदणीचा पर्याय काही दुकानांनी उपलब्ध करून दिला आहे. दिवाळीचा प्रारंभ गाय-वासरांच्या पूजनाने होतो त्यानिमित्ताने बहुतेक घरापुढे पारंपरिक रांगोळ्या काढल्या जातात. ६४ कलांपकी एक असलेली रांगोळीच्या कलेची परंपरा खूप जुनी आहे. बहुतेक वेळा गारगोटीची भुकटी करून त्याच्या पावडरीपासून रांगोळी काढतात.महाराष्ट्राची पारंपरिक ठिपक्याची रांगोळी, बंगालची अल्पना, राजस्थानची मांडणा, केरळची पुविडल अशा अनेक रांगोळींच्या प्रकाराला तोडीस तोड देणाऱ्या नाजूक नक्षीकाम, कोरीवकाम तसेच मॉडर्न डेकोरेटिव्ह रांगोळ्यांना ऑनलाइन बाजारात विशेष मागणी आहे. त्यातल्या त्यात फ्लोटिंग स्टार रांगोळी, फोर मून फ्लोटिंग रांगोळी, टड्रिशनलं रांगोळी, मँगो रांगोळी, अॅक्रिलिक फ्लॉवर रांगोळी, आर्क रांगोळी, एलिगंट दिया रांगोळी, वास्तुपंच मंगल रांगोळी, डायमंड डिझाइन फ्लोअर, वूड क्ले फ्लोअर आर्ट रांगोळी इ. रांगोळी प्रकारांनी ग्राहकांचे लक्ष वेधून घेतलंय. रु. ४०० ते २००० पर्यंत या रांगोळ्यांच्या किमती आहेत. शुभ-लाभ, रिद्धी-सिद्धी, स्वस्तिक, कलश, लक्ष्मीची पावलं, वेलकम स्टिकर्सही तुम्ही १०० ते ३०० रुपयांपर्यंत ऑनलाइन खरेदी करू शकता. http://www.indiaplaza.com/rangoli.festival/html, http://www.dollsofindia.com, http://www.rangoli.com, वगरे ऑनलाइन रांगोळी खरेदी करण्यासाठी वेबसाइटचे अनेक ऑप्शन्स उपलब्ध आहेत.
लहानग्यांसाठी दिवाळी म्हणजे फक्त आणि फक्त मनमुरादपणे फटाके उडवून दिवाळीची मजा लुटणे. अशा या लहानग्यांसाठी फटाके विकणाऱ्या अनेक वेबसाइट्स व्हराईटी क्रॅकर असलेले दिवाळी चिल्ड्रन्स क्रॅकर हँपर घेऊन आल्या आहेत. http://www.kharedimaayboli.com अशा अनेक वेबसाइट्समार्फत दिल्या गेलेल्या दिवाळी जम्बो आणि कॉम्बो, दिवाळी बम्पर फटाका धमाका, क्रॅकर कॉम्बो विथ सोनपापडी अॅण्ड कॅडबरी, वाइन अॅण्ड ड्रायफ्रुट क्रॅकर कॉम्बो अशा अनेकविध फटाक्यांच्या ऑफर्सनी बच्चेकंपनीला वेड लावलं आहे. विशेष म्हणजे काही वेबसाइट्सवर फटाके कसे ऑर्डर करावे? फटाके खरेदी केल्यानंतर त्याचं गिफ्ट पॅकिंग कसं असेल याचे डेमोही व्हिडीयोमार्फत दाखवण्यात आले आहेत.
 लहानांना जसे फटाके तसच मोठय़ांना दिवाळीच्या दिवसांत दिवाळी अंकांशिवाय चन पडत नाही. पूर्वी घरोघरी काही विशेष दिवाळी अंक विकत घेऊन वाचले जायचे आणि उरलेले अर्थातच वाचनालयातून आणून वाचले जायचे परंतु ‘किंडल’ने आणलेल्या क्रांतीने एका छोटय़ाशा पेटीत शेकडय़ाने पुस्तके एकाच वेळी साठवायची सोय झाली आणि महाजालावर ई-पुस्तकांचे, ई-मासिकांचे, ई-अंकांचे पेवच फुटले आणि अशातच काही काळानंतर दिवाळी अंकांची ऑनलाइन विक्रीची योजना विविध वेबसाइट्सद्वारा अमलात आणली गेली आणि आता मराठी रसिक दिवाळी अंकांचीही ऑनलाइनच खरेदी करू लागले आहेत. http://www.kharedimaayboli.com  ही वेबसाइट ऑनलाइन दिवाळी अंकांच्या खरेदीसाठी उत्तम ऑप्शन आहे. कमीत कमी वेळेत आणि वाजवी किमतीत दिवाळी अंक वाचकांपर्यंत पोहोचविण्याच्या या  वेबसाइटच्या वाचकांना अंकांची निवड करणं सोप्पं जावं म्हणून १० पूर्वनियोजित संच आणि जास्त निवडीसाठी सुटे संच अशा दोन्ही पद्धतीने अंक विक्रीसाठी उपलब्ध करून दिले आहेत. उपलब्ध संच आणि सुटे अंक यांचे हवे तसे एकत्रीकरण करण्याचीही सुविधा येथे आहे. शिवाय तुम्ही विकत घेतलेल्या अंकांच्या संख्येप्रमाणे विशेष सवलतीही उपलब्ध आहेत. परंतु आजकाल बरेच अंक हे दिवाळीच्या शेवटच्या दिवसापर्यंत प्रकाशित होत नसल्यामुळे अंक दिवाळीनंतर पाठविले जातील व ते पाठवल्यापासून ३-४ आठवडय़ात तुमच्या घरी येतील अशा सूचनाही काही दिवाळी अंक खरेदी करणाऱ्या वेबसाइट्समार्फत देण्यात आल्या आहेत.
 दिवाळीच्या दिवसात खासकरून ‘भाऊबीजेच्या’ दिवशी मानाची समजल्या जाणाऱ्या पूजेच्या थाळीच्या एकसेएक व्हरायटी ऑनलाइन खरेदी करण्यासाठी दिवाळीप्रेमींची लगबग सुरूआहे. टड्रिशनल पूजा थाळी, ए टू झेड फिनिश पूजा थाळी, डिझायनर पूजा थाळी हॅम्पर, ग्रीन टेक्श्चर वूड अॅण्ड वर्क पूजा थाळी, स्वस्तिक पूजा थाळी, बर्फी पूजा थाळी, सिल्व्हर पूजा थाळी सेट ३०० ते १५०० रु.पर्यंत उपलब्ध आहेत. हॅन्गिंग ओम लाईट, बॉल लाईट, लीफ लाईट, लेड डेकॉर आणि फ्लॉवर लाईट, लक्ष्मी ग्लोिवग कँडल, २१ गोल्डन दिया ट्रेल लाईट असे लाईट्सचे प्रकारही दिवाळीत ग्राहकांकडून मोठय़ा प्रमाणावर ऑनलाइन वेबसाइट्सद्वारेच खरेदी केले जात आहेत.
दिवाळीच्या निमित्ताने का होईना ऑनलाइन शॉिपगचा पर्याय हळूहळू पॉप्युलर होऊ लागला आहे. महत्त्वाची बाब म्हणजे दिवाळीच्या दिवसांत ऑनलाइन खरेदी करणाऱ्यांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. थोडक्यात काय दिवाळीच्या शॉिपगचे वारे आता ऑनलाइन वाहू लागले आहेत. वेळेची बचत, वस्तूंच्या आकर्षति करणाऱ्या नवनवीन योजना, डिस्काऊंट्समुळे ऑनलाइन खरेदी करण्याला वाव देणाऱ्यांची ही काहीशी हटके आणि नावीन्याने नटलेली ‘ई-दिवाळी’.

नीलेश मानकर वर्षांतील ज्या दिवसाची मी आतुरतेने वाट पाहत असतो तो दिवस म्हणजे दिवाळीसाठी ऑनलाइन शॉपिंग करण्याचा दिवस. मी शॉपिंगचा प्रचंड वेडा आहे. मी वर्षांतून बरेचदा ऑनलाइन शॉिपग करत असतो, परंतु दिवाळीच्या खरेदीसाठी ऑनलाइन शॉपिंग करण्याची मजा काही औरच असते. फार पूर्वी शॉपिंपगला जायचं म्हणजे वीकेण्ड राखून ठेवायचा, यादी बनवायची आणि मोहिमेवर निघायचं म्हणजे तारेवरची कसरत होती परंतु आता क्रेडिट कार्डचा जमाना आहे. त्यामुळे आपल्या सोयीनुसार केव्हाही, कधीही, कुठेही ऑनलाइन शॉपिंग करता येते यापेक्षा आनंदाची बाब दुसरी असूच शकत नाही. दिवाळीच्या दिवसांत ऑनलाइन खरेदी केलेल्या वस्तूंवर अनेकदा अपेक्षित सूट मिळाल्यामुळे ग्राहकांना समाधानही मिळते आणि त्यामुळे अधिकाधिक ऑनलाइन वस्तूंची शॉपिंग ग्राहकांकडून केली जाते.

प्राची भावे दिवाळीच्या दरम्यान आपल्याला हवी असलेली उत्पादने विकणाऱ्या अनेक ऑनलाइन शॉपिंग साइट्स आहेत. पण खरेदी करण्यापूर्वी विविध वेबसाइट्स व व्यापाऱ्यांकडील वस्तूंच्या किमतीची तुलना करावी. सर्वसाधारणत: दिवाळीच्या दिवसांत बाजारात लोकप्रिय असलेली एखादी वस्तू विकणाऱ्या वेबसाइटवर बेस्ट डिल उपलब्ध असू शकेल, कारण अनेक प्रतिष्ठीत विक्रेते ती वस्तू विकत असतील आणि त्यांच्यामध्ये व्यवसायवाढीसाठी मोठी स्पर्धा असेल.

प्रवीण पडय़ाळ  दिवाळीत ऑनलाइन शॉिपग करण्याची क्रेझ आजकालच्या तरुणाईत विशेषत: अधिक प्रमाणात दिसून येते. मी आणि माझे कुटुंबीय बाजारात खरेदीसाठी वेळ घालवण्यापेक्षा ऑनलाइनच वस्तूंची शॉिपग करण्याला अधिक प्रेफरन्स देतो. इतक्या वर्षांच्या अनुभवावरून एक गोष्ट आवर्जून सांगावीशी वाटते की, दिवाळीच्या दिवसांत काही ऑनलाइन वेबसाइट्स नियमित ग्राहकांना डिस्काऊंट देणारे काही प्रमोशनल कोड देतात. त्याचा उपयोग विशिष्ट वस्तू खरेदी करताना तसेच  काही पेमेंट पर्यायांमध्ये करता येतो. खरेदी करताना हे कोड वापरल्यास  तुमची बचत होते. क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड, नेट बँकिंगच्या माध्यमातून खरेदी केली तर तुमची बँकही तुम्हाला काही सवलती देईल. स्पेशियल ऑफर देणारे हे कुपन्स विशिष्ट कालावधीपुरतीच लागू होतात. त्यामुळे दिलेल्या मुदतीत त्यांचा आठवणीने वापर करावा.  

संस्कृती मानकर सणादरम्यान कोणतीही वस्तू खरेदी करण्यापूर्वी तिच्या वैशिष्टय़ांचा नीट अभ्यास करावा. तुमच्या गरजा आणि बजेटमध्ये बसणाऱ्या वस्तू यानुसार खरेदी करावी. दरवर्षी मी वेगवेगळ्या वेबसाइट्सहून दिवाळी फराळाची खरेदी करते त्यामुळे घरी फराळाचा घाट मांडला जात नाही त्यामुळे वेळेचीही बचत होते आणि आपण दिवाळीची इतर तयारी करण्यासाठी मोकळे होतो. त्यामुळे ऑनलाइन दिवाळी शॉपिंगचा अनुभव प्रत्येक स्त्रीने एकदा तरी घ्यावा आणि ऑनलाइन दिवाळीची मजा लुटावी.

अमेय पाटील ऑनलाइन शॉपिंग म्हणजे प्रत्यक्षात ही शॉिपग इंटरनेटवरील एखाद्या वेबसाइटच्या मार्फत होते म्हणून आपण असे इंटरनेटद्वारे ऑनलाइन शॉपिंग आपल्या घरामधून, ऑफिसमधून अथवा जगातून कुठूनही करू शकतो. सणामध्ये गडबडीच्या दिवसांत एखादी वस्तू आणायची राहून गेल्यास आपण केव्हाही ऑनलाइन वस्तूची मागणी करून वस्तू झटपट स्वत:कडे उपलब्ध करून घेऊ शकतो. दिवाळीच्या दिवसांत विशेषत: कपडय़ांसाठी मी ऑनलाइन शॉपिंगचा पर्याय निवडतो, कारण या दिवसांत वस्तूंवर  दुकानांपेक्षा ऑनलाइनच मिळणाऱ्या सवलती या जास्त आकर्षक असतात. अशा ऑनलाइन वस्तू विकणाऱ्या वेबसाइटवर उपलब्ध असलेली वस्तू आपण कधीही आणि कितीही वेळा खरेदी करू शकतो. एखादी वस्तू खरेदी केल्यानंतर त्या वस्तूचे पसे देण्याचे बरेच पर्याय वेबसाइटमार्फत उपलब्ध करून दिलेले असतात.

सतीश राऊत पायातील चप्पल खरेदी करण्यापासून कॉम्प्युटर खरेदी करण्यापर्यंत आणि रेल्वेची तिकिटे खरेदी करण्यापासून गाडी विकत घेण्यापर्यंत जवळजवळ सर्वच गोष्टी सध्या इंटरनेटवर विक्रीसाठी उपलब्ध आहेत. अनेकदा कपडे तसेच रेल्वेच्या तिकिटाची ऑनलाइन खरेदी केली आहे, परंतु आजवर एकदाही दिवाळीसाठी विशेष ऑनलाइन खरेदी केली नव्हती. काही दिवसांपासून दिवाळीसाठी आवश्यक वस्तू विकणाऱ्या वेबसाइट्सना भेट दिल्यावर आता मलाही दिवाळीची ऑनलाइन खरेदी करण्याचा मोह आवरत नाहीये. त्यामुळे यंदा मी कुटुंबीयांना तसेच मित्रपरिवाराला दिवाळीच्या शुभेच्छा देण्यासाठी ऑनलाइन भेटवस्तूंची खरेदी करून ‘ई-दिवाळी’चा आनंद लुटणार आहे.

मधुलिका कोशे दिवाळीच्या ऑनलाइन शॉिपगचे जाळे सध्या जगभरात सगळीकडेच पसरले आहे. आधुनिक जगतातील या उपक्रमाचे लहानांपासून मोठय़ांपर्यंत प्रत्येकाने स्वागतच केले आहे. एखाद्या वस्तूची विक्री ही दुकानातून होण्याच्या मानाने इंटरनेटवर त्या वस्तूची विक्री मोठय़ा प्रमाणात होते, कारण इंटरनेटद्वारे ती वस्तू जगभरामध्ये पाहिली जात असते, म्हणजेच तिचा अपेक्षित ग्राहक जगभर पसरलेला असतो. त्यामुळे इंटरनेटद्वारे त्या वस्तूची मोठय़ा प्रमाणात प्रसिद्धी आणि विक्री होते. दिवाळीच्या दिवसांत महागाईने प्रत्येक वस्तूला वेढा घातलेला असतो. अशा वेळेस वस्तूंवर उत्तम सवलती देणाऱ्या ऑनलाइन वेबसाइटहून दिवाळीची शॉपिंग करणे याव्यतिरिक्त दुसरा चांगला पर्याय नाही.

स्वप्निता पुरारकर मी दरवर्षी आवर्जून एकातरी दिवाळी अंकाची ऑनलाइन खरेदी करते. यंदा मी आकर्षक दिसणाऱ्या फ्लोटिंग रांगोळ्यांसाठी ऑनलाइन रांगोळी विकणाऱ्या वेबसाइटवर महिनाभर आधीच नोंदणी करून ठेवली आहे. लवकरच ही रांगोळी कुरिअरने माझ्या घरी येईल. स्वस्तात मस्त आणि त्यातून वस्तूची फ्री होम डिलिव्हरी मिळणे म्हणजे सोनेपे सुहागाच नाही का!  विशेष म्हणजे इंटरनेटवरून आपण एखादी वस्तू खरेदी केली तर काही दिवसांमध्येच ती वस्तू चांगल्या पॅकिंगमध्ये आपल्या घरी पोहोचते, याचे कारण ती वस्तू थेट घाऊक दुकानातून आली असल्याने त्यावर इतर खर्च झालेला नसतो, त्यामुळेच अशा ऑनलाइन शॉपिंगवर बऱ्याच प्रमाणात सूट दिलेली असते.

प्रिया अरिंगळे अवघ्या तीन-चार दिवसांवर येऊन ठेपलेल्या दिवाळीची जय्यत तयारी सध्या सुरू असून बाजारपेठा गर्दीने फुलून गेल्या आहेत, तर एकीकडे दिवाळीच्या ऑनलाइन खरेदीला उधाण आलंय. प्रत्यक्षात ऑनलाइन शॉिपगमध्ये सोयीच्या तसेच गरसोयीच्या बऱ्याच गोष्टी आहेत. असे जरी असले तरी वाढती मागणी आणि जागृत ग्राहक यामुळे ऑनलाइन शॉिपगची सुरक्षितता वाढत आहे. दिवाळी सणादरम्यान बऱ्याच वेबसाइटवर निरनिराळ्या वस्तू खरेदी केल्यावर ती वस्तू खरेदी केलेल्या लोकांच्या प्रतिक्रिया देण्याची सोय असते, त्यामुळे आपण खरेदी करत असलेली वस्तू कशी आहे याचा अंदाज येतो शिवाय कोणती वस्तू खरेदी करावी, किती प्रमाणात घ्यावी याचा चोख अंदाज येऊन अचूक वस्तू खरेदी करण्यास मदत होते.

Story img Loader