‘अब की बार किस की सरकार?’ असा प्रश्न आपल्या सगळ्यांनाच छळत होता, परंतु या प्रश्नाची उत्तरं शोधण्यात किंवा त्यावर चर्चा करण्यात अनेक न्यूज चॅनेल्ससोबतच नेटिझन्सचाही महत्त्वाचा वाटा होता. खास इलेक्शन स्पेशल किंवा मग पॉलिटिकल चर्चासाठी सोशल मीडियावर अनेक ग्रुप्स बनवले गेले. निवडणुकीचे टप्पे जाहीर झाल्यापासूनच फेसबुक ग्रुपसारख्या डिजिटल कट्टय़ांवर तरुणाई अक्षरश: धुमाकूळ घालत होती. तारखा आल्या, व्होटिंगसाठी फॉर्म भरून झाले, उमेदवार डिक्लेर झाले आणि मग प्रचार सुरू झाला. तरुणाईचं हे ऑनलाइन युद्ध चालू ठेवण्यात हायटेक प्रचाराचा खूप मोठा वाटा होता. ‘अब की बार’, ‘हर हाथ तरक्की’ किंवा मग ‘साहेबांचं महिला धोरण’ या मोटोजमुळे तर कित्येक क्रिएटिव्ह डोक्यांना खाद्य मिळालं आणि त्यांनी सोशल मीडियाच्या नेटिझन्सना छान एन्टरटेन केलं. कोणाच्या भाषणातल्या चुका असो किंवा मग भडक प्रचार.. सगळ्याचेच जोक्स झाले. पेड न्यूज-बूथ कॅप्चिरग- प्रचाराची उतरलेली पातळी आणि नेत्यांच्या तोंडून निघालेले अपशब्द यावर निषेध व्यक्त करत टीकाही झाली. इलेक्शन कमिशनचं ‘कोड ऑफ कंडक्ट’ ते निवडणुकीचे अंदाज यावर अगणित चर्चा झाल्या. स्वत:चे शाई लावलेल्या बोटांचे सेल्फिज आले आणि हे सोशल जग निवडणूकमय झाल्याचं स्पष्ट झालं. तसंच नेत्यांच्या वादग्रस्त, क्वचितप्रसंगी चांगल्या भाषणांचे व्हिडीओज पोस्ट झाले.
एकंदरीतच सोशल मीडियावर निवडणुकीचा बराच ऊहापोह झाल्याचं जाणवत होतं. तरुणांना काय घडतंय हे कळायला आणि त्यावर रिअ‍ॅक्ट व्हायला त्यामुळे मदत झाली. निवडणुका संपल्या तरी चर्चामध्ये खंड पडू नये याची जबाबदारी आयोगाने घेतली आणि मतदानाच्या शेवटच्या टप्प्यानंतर एक्झिट पोल्स समोर आले. खरं तर गेले काही महिने ज्या उत्साहात चर्चा झडल्या होत्या आणि तावातावाने पोस्ट शेअर होत होते तो उत्साह पाहता, हातात अंदाजे आकडे आल्यानंतर तर या ग्रुप्सवर कल्लोळ अपेक्षित होता.  एक्झिट पोल्सवर नसलेला विश्वास किंवा मग एकूणच अंतिम निकालाचीच वाट पाहत असलेली तरुणाई यामुळे म्हणा, तरुणाईचे हे ई-कट्टे गेले १०० तास तुलनेने शांतच होते. अर्थात निवडणुकीच्या संदर्भात. पोल सव्‍‌र्हे शेअर झाले पण त्यावर ना कमेंट्स पोस्ट झाल्या ना त्यावर चर्चा झाली. एरव्ही प्रत्येक छोटय़ा-छोटय़ा गोष्टींवर पोस्ट, लाईक, कमेंट आणि शेअरने भरणाऱ्या वॉल्स, हातात अंदाज आणि आकडे असूनही आश्चर्यकारकरीत्या शांत होत्या. तरीही यंदाच्या निवडणुकीमध्ये ‘सोशल मीडिया’ या ना त्या कारणाने महत्त्वाचा फॅक्टर ठरला. आता अंतिम निकालानंतर सोशल मीडियावर नव्या सरकारचं स्वागत कसं होतंय, ते पाहणंही औत्स्युक्याचंच ठरेल..!!

Story img Loader