होळी नि रंगपंचमी.. तरुणाईचे आवडते सण. सभोवताली बदलणाऱ्या निसर्गाचं प्रतिबिंब इतर सणांप्रमाणं याही सणांत न पडतं तर नवल. होळीत वाईट वृत्तींचं दहन केलं जातं. त्या ओघात झाडं तोडली जातात. रंगपंचमीला रंगांची उधळण होते. त्यासाठी वापरले जाणारे रासायनिक रंग आपलं आरोग्य नि पर्यावरणासाठीही हानीकारक असतात. अलीकडं याबद्दल वारंवार सांगितलं जातं. आपणही पर्यावरणस्नेही होऊन खारीचा वाटा उचलू शकतो. कसा ते पाहूया.
झाडं वाचवा, झाडं जगवा
होळीसाठी बेसुमार झाडं तोडू नका.
होळीपेटवण्यासाठी वाळलेली लाकडं, पालापाचोळा, टाकाऊ फíनचर वापरा.
एकाच ठिकाणी प्रतिकात्मक होळी करा.
होळीत लाकडाऐवजी नारळाच्या शेंड्या, पालापाचोळा, लाकडाचा भूसा इत्यादी वापरावे.
होळीमध्ये प्लास्टिक, टायर आदी हानिकारक वस्तू जाळू नका.
होळीचं निमित्त साधून वृक्षारोपण करायाचा प्रयत्न करा.
पाणी वाचवा
पाण्याशिवाय रंगपंचमी ही कल्पनाच कशी तरी वाटते ना, पण हे पॉसिबल आहे.
पाण्याचा अतिरिक्त वापर टाळा.
कोरड्या रंगांनी रंगपंचमी खेळा.
सध्याची दुष्काळी परिस्थिती लक्षात घेऊन सामाजिक बांधिलकीचं भान राखा.
रंग, फुगे, पिचकारया विकत घेण्याऐवजी तीच रक्कम दुष्काळग्रस्तांना मदत म्हणून द्या.
प्लॅस्टिकचा वापर टाळा
अनेकांना छोट्या प्लॅस्टिक पिशव्या आणि फुग्यांमधून पाणी भरून मारण्याची सवय असते. यामुळं समोरच्याला इजा होते. पाण्याचा अतिवापर होतो आणि पर्यावरणाला हानी पोहचते. त्यामुळं प्लॅस्टिकचा वापर करणं टाळाच.
हानीकारक गोष्टी टाळा
ऑईल पेंट, पेट्रोल, चिखल, रासायनिक घटक आदी गोष्टींचा वापर कटाक्षानं टाळा. त्यामुळं शारीरिक इजा होऊ शकते आणि पर्यावरणाचा रहास होऊ शकतो.
गुलाल वापरू नका
कोरडा रंग म्हणून अनेकदा गुलालाचा वापर केला जातो. पण त्यात सिलिका किंवा अँसबेसटॉसचा वापर केलेला असतो. तो आरोग्यास हानिकारक ठरतो. त्यात धातूंची पूड मिसळलेली असल्यास त्यामुळं अस्थमा, त्वचा विकार, डोळ्यांना इजा होऊ शकते.
रंगपंचमीसाठी नसíगक रंगांचा वापर करा. हे रंग असे तयार करता येतील-
लाल : लाल जास्वंदीची फुले सावलीत वाळवून त्यांची पावडर करा. त्यात कणीक किंवा डाळीचं पीठ मिक्स करा. डािळबाची सालं टाकून पाणी उकळवा.
हिरवा : मेंदीपावडरीत कणीक किंवा डाळीचं पीठ मिक्स करा. मेंदी पावडर पाण्यात टाकून मिश्रण करा. पालक किंवा कोथिंबिर किंवा पुदिन्याची पेस्ट पाण्यात मिसळा.
पिवळा : हळदीत डाळीचं पीठ किंवा कणीक किंवा मुलतानी माती घाला. झेंडूच्या वाळलेल्या फुलांपासून बारीक पावडर करा. त्यात डाळीचं पीठही मिक्स करता येईल. पाण्यात चमचा हळद टाकून मिश्रण चांगले हलवा.
तपकिरी : आवळ्याची किंवा मेंदीची पेस्ट पाण्यात मिसळा. विड्याच्या पानात वापरला जाणारा काथ पाण्यात मिसळा.
केशरी : प्राजक्ताच्या फुलांचे देठ वाळवून, त्यांना पाण्यात भिजवा. पळसाची फुलं रात्रभर पाण्यात भिजवा.
जांभळा / गुलाबी : बीटाचे बारीक तुकडे करून ते पाण्यात टाका. लाल कांद्यांची सालं पाण्यात उकळवून घ्या.
निळा : जॅकारॅंडाची फुलं वाळवून त्यांची पावडर करा.
काळा : वाळलेले आवळे लोखंडी भांड्यात उकळवून रात्रभर ठेवा. त्यात भरपूर पाणी टाकून वापरा. काळ्या द्राक्षांचा रस काढून त्यात भरपूर पाणी टाकून वापरा.
फ्रेण्डस्, हे आम्हांला सुचलेले काही उपाय आहेत. तुमच्या डोकॅलिटीत इतरही ऑप्शन्स असतील तर तेही नक्की ट्राय करा. कारण हटके आणि चांगल्या गोष्टी करायला तरुणाई नेहमीच पुढं असते. तेव्हा छानसा कलरफुल अटायर करा. सामाईक होळी पेटवा. पाणी वाचवून रंगपंचमी खेळा. दुष्काळग्रस्तांना मदतीचा हात द्या. घरची पुरणपोळी आवडीनं खा. नंतर मात्र झोप न काढता वृक्षारोपण आठवणीनं करा. इस बात का बुरा न मानो भाई, होली हैं.. वो भी इकोफ्रेण्डली..