तरुण मतदार या महत्त्वाच्या फॅक्टपर्यंत पोहोचण्यासाठी राजकीय पक्ष, कार्यकर्ते, उमेदवार, मीडिया सगळेच प्रयत्नशील आहेत. हा फॅक्टर एकगठ्ठा सापडण्याचं ठिकाण म्हणजे कॉलेज कँपस. विविध भागांतल्या तरुणाईशी बोलून कॉलेज कँपसमधला हा इलेक्शन फीव्हर टिपण्याचा प्रयत्न..
कॉलेजचा एखादा ऑफ तास असो किंवा कट्टा, नाका असो; या सर्व ठिकाणी चर्चा करायचे तरुणाईचे विषय अगदी ठरलेले असतात. सिनेमा, क्रिकेट मॅच, पोरापोरींची एकमेकांवरून चिडवाचिडवी, एखादा नाटकाचा ग्रुप असल्यास नाटय़मय चर्चा, नाहीतर आपल्याला नेमलेला अभ्यासक्रम कसा वाईट आहे, एखादी शिक्षिका कशी खडूस आहे, इत्यादी. गप्पांची मफल (मोठय़ांच्या भाषेत टवाळ्या) साधारण याच विषयांभोवती फिरत असते, परंतु सध्या कॅम्पसमध्ये फीव्हर आहे तो निवडणुकांचा!! निवडणुका जवळ आल्यावर वातावरण तापतंच. ते काही नवीन नाही; पण निवडणुकांचा प्रचार तरुणाईला केंद्रित ठेवून करण्याचा यंदाचा फंडा नवीन आहे. या वेळच्या निवडणुकीत नवमतदारांना फार महत्त्व आलंय आणि ते एकगठ्ठा सापडायचं ठिकाण म्हणजे कॉलेज कँपस!

विविध राजकीय चर्चा, वादविवादाच्या कार्यक्रमांमध्ये मोठय़ा संख्येने तरुण सहभागी होताहेत. कॉलेजमध्ये वेगवेगळ्या टीव्ही चॅनेलसाठी चर्चा घडवून आणण्यात येत आहेत. वेगवेगळ्या सव्‍‌र्हेमध्ये विद्यार्थ्यांना सामावून घेतलं जातंय. स्वत:हून राजकारणात उतरण्यापासून एखाद्या पक्षाचं कॅम्पेिनग करण्यापर्यंत प्रत्येक विभागात तरुणवर्ग मोठय़ा संख्येने निवडणुकांशी जोडला गेला आहे. मतदान करणं ही देशातल्या प्रत्येक नागरिकाची जबाबदारी आहे आणि राजकारणाच्या बाबतीत तरुणांनी सकारात्मक पावलं उचलायलाच हवीत, असं म्हणत आजची तरुण मंडळी मतदानाचं महत्त्व पटवून देण्याच्या मागे लागली आहे. तरुणाईचा हाच जोश आणि देशातील तरुण वयोगटातील जास्त संख्या पाहता या निवडणुकांमध्ये प्रमुख राजकीय पक्षसुद्धा तरुण मंडळींना टाग्रेट करताहेत. पूर्वी घरोघरी,गल्लोगली जाऊन प्रचाराचे भोंगे वाजवणारं निवडणुकांचं वातावरण आता महाविद्यालयं आणि विद्यापीठांकडे आपला मोर्चा वळवताना दिसत आहे.
मुंबई विद्यापीठाची विद्यार्थिनी आणि जनरल सेक्रेटरी अश्विनी माने म्हणाली, ‘यंदाच्या निवडणुकांमध्ये तरुण पिढीला जास्तीतजास्त प्रोजेक्ट करण्याचा प्रयत्न होतोय. आधीच्या निवडणुकांच्या तुलनेत या वर्षी राजकीय पक्षांचा कल विद्यार्थ्यांकडे आहे. विद्यापीठामध्ये जागोजागी विद्यार्थी निवडणुकांवर आपापसांत चर्चा करीत आहेत, त्यामुळे आम्हा विद्यार्थ्यांनाही निवडणुकांची उत्सुकता आहे.’ तिच्या मते, तरुणांना आकर्षति करण्यासाठी सोशल मीडियाचा वापर प्रचंड होतोय. विविध पक्षांच्या म्युझिक, जाहिरातीमध्येदेखील तरुणांचा सहभाग आहे. ती म्हणाली, ‘मी पहिल्यांदाच लोकसभेसाठी मतदान करणार आहे. कोणत्याही पक्षापेक्षा एखाद्या व्यक्तीचं काम कसं आहे, ती व्यक्ती देशाला पुढे घेऊन जाण्यास समर्थ आहे का, याचा विचार करून मी माझं मतदान करणार आहे.’
तरुण देशाची शक्ती असले तरीही तरुणांची शक्ती म्हणजे सोशल मीडिया, हे अचूक ओळखून सोशल मीडियाद्वारेसुद्धा तरुणांना निवडणुका प्रचाराच्या िरगणात आणलं जातंय. कॉलेज कॅम्पसप्रमाणेच जॉिगग पार्क, गार्डन्स, जिथे तरुणांची वर्दळ असते अशा सगळ्या ठिकाणी खास तरुण मतदारांना आवाहन करण्यासाठी कार्यकत्रे पोहोचत आहेत. घरोघरी प्रचार करण्यापेक्षा थेट तरुणापर्यंत पोहोचण्याचा सोशल मीडिया हा एक चांगला पर्याय आहेच, शिवाय तरुण पिढीचं मोबाइल प्रेम लक्षात घेऊन मोबाइल फोन्सची कव्हर्स प्रचार करण्याचं काम करताहेत. बाजारात विविध पक्षांची माहिती देणारे मोबाइल कव्हर्स आली आहेत. त्याचप्रमाणे पक्षाच्या चिन्हाचे टीशर्ट्स, कॅप्स, ग्रीटिंग कार्ड्स वाटणं काही ठिकाणी सुरू झालंय. याशिवाय मतदानाविषयी जागरूकता निर्माण करण्याचे प्रयत्नही होताहेत.
मुंबई विद्यापीठात राज्यशास्त्राचा अभ्यास करणारा अक्षय रानडे म्हणाला, ‘गेल्या दोन-तीन वर्षांमध्ये भ्रष्टाचाराच्या विरोधातली चळवळ असो किंवा निर्भया प्रकरण असो, अशा काही महत्त्वाच्या चळवळींमध्ये प्रामुख्याने तरुण पिढी पुढे आली. त्यामुळे एकंदर आजच्या तरुणांमधील सामाजिक भान, राजकीय भान वाढलं आहे. आजच्या युवा पिढीची कोणत्याही पक्षाला मत देण्याची भूमिका स्पष्ट आणि स्वतंत्र आहे. त्यामुळे या निवडणुकांमध्ये वर नमूद केलेल्या वयोगटाकडूनदेखील जास्तीतजास्त मतदान व्हावं अशी अपेक्षा सगळीकडे वर्तवली जातेय.’
तरुणाईच्या जागरूकतेमुळे यंदाची निवडणूक वेगळी ठरते आहे. काही विद्यार्थी स्वत: या तरुण मतदारांच्या जागरूकतेसाठी प्रयत्न करताहेत.

पुण्याच्या गरवारे महाविद्यालयाचा मयूर भावे या संदर्भात म्हणाला, ‘कॉलेज कॅम्पसमध्ये निवडणुकांची जोरदार चर्चा आहे. तरुणांच्या मागण्यांचा आणि मतांचा विचार या वर्षीच्या निवडणुकांमध्ये केला जातोय, त्यामुळे तरुण मंडळीदेखील मतदानाचा हक्क बजावण्यासाठी तयार झाली आहेत. फेसबुक, व्हॉट्सअपमुळे मोठय़ा प्रमाणात आणि कमीतकमी वेळात निवडणुकांचे मेसेजेस तरुणांपर्यंत पोहोचताहेत. त्यामुळे सोशल मीडियामुळे अनेक तरुण मंडळींना निवडणुकांची सविस्तर माहिती मिळतेय. मतदानाचा हक्क सर्वानी बजावलाच पाहिजे यासाठी आमच्या कॉलेजच्या पत्रकारिता विभागाकडून आम्ही ‘एक व्होट तरक्की की ओर’ या नावाने पथनाटय़ सुरू केलं आहे. विद्यार्थी मित्रांमध्ये मतदानाचं महत्त्व वाढावं हा त्यामागचा उद्देश आहे. तरुण पिढीही या उपक्रमाला चांगला प्रतिसाद देत आहे. नक्कीच या वर्षीची निवडणूक वेगळी ठरणार आहे.’
यवतमाळच्या श्री. वसंतराव नाईक गव्हर्न्मेंट मेडिकल कॉलेजमध्ये शिकणारा मिहिर खरे सांगतो, ‘आमच्या मेडिकल कॉलेजच्या कॅम्पसमध्येदेखील निवडणुकांची जोरदार चर्चा सुरू आहे. दिवसभर अभ्यासात रमलेले सगळे विद्यार्थी जेव्हा काही वेळासाठी ब्रेकमध्ये एकत्र येतात तेव्हा निवडणुकांवरच गप्पा रंगतात. मी मूळचा मुंबईचा असल्याने मतदानाचा हक्क बजावण्यासाठी कॉलेजची परीक्षा आटोपल्यावर लगेच मुंबईला मतदान करण्यासाठी येणार आहे. तरुणांमध्ये निवडणुकांचा उत्साह व जागरूकता भरपूर आहे, त्याचप्रमाणे यंदा तरुणांना निवडणुकांमध्ये जास्तीतजास्त फोकस करण्यात येत आहे.’
नाशिकच्या बी.वाय.के. कॉलेज ऑफ कॉमर्सच्या मुग्धा जोशीनं सांगितलं, ‘येत्या लोकसभा निवडणुकीसाठी मतदान करणाऱ्या मतदारांपकी ४७ टक्के मतदार हे वय वष्रे ३५ च्या आतील तरुण मतदार आहेत. त्यामुळे प्रचार करताना या तरुणाईचा विचार सर्व पक्षांकडून होतो आहे. या वर्षी लोकसभा निवडणुकांसाठी मी पहिल्यांदाच मतदान करणार आहे. त्याने किती फरक पडेल हे मला माहीत नाही, पण एक सुजाण नागरिक म्हणून माझं कर्तव्य मी पार पाडणार आहे.’
थोडक्यात, कॉलेज कॅम्पसला सध्या इलेक्शन फीव्हर चढलाय. कोणाला तांत्रिक प्रचार भावतोय, कोणाला पहिल्यांदाच मतदान करत असल्याची एक्साइटमेन्ट आहे; तर कोणाला प्रत्यक्ष राजकारणात उतरून काम करायची इच्छा आहे. या वेळेस तरुणांना जसा आकर्षति करण्याचा प्रयत्न होतोय त्याप्रमाणे तरुणदेखील स्वत:हून मतदानाच्या बाबतीत सतर्क होऊन राजकारणाविषयी आपली मत मांडताना दिसत आहेत.

फेसबुक, व्हॉट्सअपमुळे तरुण मंडळींना निवडणुकांची सविस्तर माहिती मिळतेय. मतदानाचा हक्क सर्वानी बजावलाच पाहिजे यासाठी आमच्या गरवारे कॉलेजच्या पत्रकारिता विभागाकडून आम्ही ‘एक व्होट तरक्की की ओर’ या नावाने पथनाटय़ सुरू केलं आहे.
मयूर भावे, पुणे</strong>

राजकीय पक्षांचा कल विद्यार्थ्यांकडे आहे. विद्यापीठामध्ये आम्ही निवडणुकांवर चर्चा करीत आहेत, त्यामुळे आम्हा विद्यार्थ्यांनाही निवडणुकांची उत्सुकता आहे.
अश्विनी माने, जीआर, मुंबई विद्यापीठ

आम्हा तरुणांमध्ये सामाजिक भान, राजकीय भान वाढलं आहे. आजच्या युवा पिढीची कोणत्याही पक्षाला मत देण्याची भूमिका स्पष्ट आणि स्वतंत्र आहे.
– अक्षय रानडे, मुंबई