इंग्रजी मालिका बघणाऱ्या तरुणांची संख्या सध्या वाढते आहे. या मालिकांमधली फॅशन आणि स्टाइल बरीच रिअॅलिस्टिक असते, तरीही ट्रेंडी असते. तरुणाई त्यामुळे याकडे लगेच खेचली जाते आणि ही फॅशन जगभर फॉलो केली जाते.
एक तरुण स्त्री भरजरी साडी नेसून किंवा भरलेला ड्रेस घालून त्यावर झगमगणारे दागिने, मोकळे केस, हेवी मेक-अप अशा अवस्थेत घरात वावरत असते.. ‘मालिका’ म्हटल्यावर आपल्यासमोर असंच काहीसं चित्र उभं राहतं. भारतीय मालिकेतील- हिंदी असो किंवा मराठी हे नटलेल्या नायिकांचं चित्र कॉमन असतं. सध्या तरुणाईमध्ये खरी क्रेझ आहे इंग्रजी मालिका बघण्याची. टीव्हीपेक्षाही यूटय़ूब चॅनेलवर तरुणाई या मालिका एंजॉय करताना दिसते. या इंग्रजी मालिकेतल्या फॅशनचं चित्र मात्र हिंदी- मराठी मालिकांपेक्षा अगदी वेगळं आहे. यातल्या कलाकारांचा पोषाख अगदी सुटसुटीत आणि कंफर्टेबल असतात. ते त्या त्या देशीच्या लाईफस्टाईलचा विचार करता रिअॅलिस्टिकही वाटतात.
बऱ्याच अशा मालिकांमध्ये पाहिलं तर आपल्या असं लक्षात येतं की डेली वेअर ज्याला आपण कॅज्युअल्ससुद्धा म्हणतो अशा कपडय़ांचा वापर मालिकांमध्ये जास्त प्रमाणात केला जातो. फ्लोरल डिझाइन असलेले किंवा फिक्या रंगाचे प्लेन शर्ट्स, लूज पँट्स, स्काफ्र्स, स्निकर्स हेच या मालिकांमधून प्रामुख्यानं समोर येतं. ‘टू अँड अ हाफ मेन’, ‘हाउ आय मेट युअर मदर.’ सारख्या पॉप्युलर मालिकांमध्ये हे बघायला मिळतं. कॅज्युअल वेअरबरोबरच स्पोर्ट्स वेअरमध्येदेखील कमालीची व्हरायटी बघायला मिळते. नवनवीन पॅटर्नची जॅकेट्स, शॉर्ट्स, टीज, हूड्स या मालिकांमध्ये पहिल्यांना बघून अनेक मुलं ते फॉलो करतानाही दिसतात. तसं बघायला गेलं तर अनेक लोकप्रिय इंग्रजी मालिका या कॉर्पोरेट वर्ल्ड, गुन्हेगारी विश्व, गुप्तहेर आदी विषयांवर आधारित असतात. त्यामुळे फॉर्मल्सचा वापर अधिक प्रमाणात केला जातो. डार्क अर्दी ब्लेझर, पोलो किंवा फॉर्मल शर्ट, ट्राउझर, मिडी स्कर्ट आणि प्लेन फॉर्मल शूज. अशा फॉर्मल अटायरवर अगदी दिसतील न दिसतील असे कानातले (एखाद- दुसरा खडा), गळ्यात एखादी नाजूक चेन अथवा लॉकेट आणि हातात ब्रेसलेट किंवा घडय़ाळ अशा काही अॅक्सेसरीजचा समावेश असतो. हेअरस्टाईलच्या बाबतीत विचाराल तर शॉर्ट, ब्लाँड अँड स्ट्रेट हेअरचा ट्रेंड दिसतो.
बऱ्याच परदेशी मालिकांचं चित्रिकरण हे अमेरिका किंवा ब्रिटनच्या थंड प्रदेशांमध्ये होतं. त्यामुळे या सीरिअल्समध्ये उबदार कपडे अधिक प्रमाणात वापरले जातात. वेगवेगळ्या तऱ्हेचे थर्मल वेअर, ओव्हरकोट, बूट्स, कान टोप्या. या ओव्हरकोट्समध्ये देखील व्हरायटी असते. लॉँग, ढगळे, शॉर्ट काहींना तर कंबरेभोवती पट्टादेखील असतो. मालिका म्हणजे कलाकार आणि कलाकार म्हणजे फॅन्स. आता जिथे फॅन्स तिथे कलाकारांचं केलेलं अनुकरण अर्थात फॉलोइंग हे आलंच. कॉलेजियन्स मध्ये वाढणारं कॅज्युअल्स आणि स्पोर्ट्स वेअरचं प्रमाण, मोठमोठय़ा कंपन्यांमध्ये वाढणारं फॉर्मल्सचं प्रमाण हे आपल्याला दर्शवतं की या वर्गात झपाटय़ाने या जागतिक ट्रेण्डची क्रेझ वाढते आहे.
जर तुम्हाला आठवत असेल तर काही वर्षांपूर्वी ‘हॅन्ना माँटेना’ नावाची ‘डिस्ने’ चॅनेलवरची एक मालिका प्रचंड गाजली होती. सुप्रसिद्ध हॉलिवूड गायिका मायली सायरस या’ हॅन्ना माँटेनाच्या भूमिकेत रूपेरी पडद्यावर झळकल्या होत्या. त्या वेळेस १० पकी किमान ८ मुली तरी त्यांना फॉलो करायच्या. त्यात हॅन्नाने घातलेल्या अॅक्सेसरीज, टी-शर्ट्स प्रचंड प्रमाणात पॉप्युलर झाले होते. हॅन्नाच्या हेअरस्टाईललादेखील खूप डिमांड होती. काळ बदलला, कित्येक मालिका आल्या अन् गेल्या, पण मालिकेतली फॅशन फॉलो होण्याची रीत मात्र तीच आहे.