‘साखरेचं खाणारे’ हल्लीच्या ‘डाएट’ जमान्यामध्ये मागे पडत चालले आहेत. मात्र चवीनं खाणाऱ्यांची गरज वाढते आहे.
चवीबद्दल किती बोलतात ना लोक! म्हणजे बोलूच नये असं नाही. तरी किती बोलावं याला काही मर्यादा? पण काही लोकांना चवीचं चर्वितचर्वण करण्याची सवयच असते. उदाहरणार्थ, चार-पाचजण मिळून हॉटेलमध्ये गेले, एखादा पदार्थ आवडला की नुसतं छान आहे ना. म्हणून गप्प बसत नाहीत लगेच चर्चासत्र सुरू. ‘लसणाचा तडका छान बसलाय.’
‘नाही नाही लाल मिरची आहे अहो.’
‘नाही गं. लवंग आणि तमालपत्र घातलं असणार.’
‘हो का? मला नाही वाटत. हे बघ लसूण आहे ना डाळीत.’
हे बोलताना डिशमध्ये गुप्तहेरांनी नकाशा मांडावा, तसा भात. त्यात खळगा करून दाल- पुन्हा परीक्षणासाठी म्हणून घेतलेला एक ओहोळ शिवाय तिरक्या पडलेल्या चमच्यात चवीला म्हणून घेतलेली थोडी दाल या दृष्यांनी बाऊल, हंडय़ांमधून आकर्षकपणे आणलेल्या पदार्थाची रयाच गेलेली असते. भात वाळतो, दाल गार होते.
पदार्थाच्या चवीचं किंवा घातलेल्या सामग्रीचं असं विच्छेदन करणं मला जरा भीषणच वाटतं. म्हणजे एखाद्या सज्जन व्यक्तीच्या रूपा-गुणांची कशी मनसोक्त चिरफाड करतात काहीजण. तसं. ‘हो हो व्यक्तिमत्त्व आकर्षक आहे, पण केस फारच पातळ आहेत.’ ‘बाकी ठीक आहे. पण नाक किती मोठं आहे.!’ ‘नाही बोलण्यात आहेच जरा तोतरेपणा.’ ‘मदतीला पुढे असतात पण जेवताना आडवा हात!’ गुण येतो त्यांच्या औषधांनी पण अपॉइण्टमेंट घेऊनच जावं लागतं!’ एक मिनिट, आपल्याला कशात रस आहे? माणसाच्या कामात, वर्तनात की काथ्याकूट करण्यात? असो, पण ‘कूट’ हासुद्धा काहीजणांच्या काथ्याचा. आय मीन. काटय़ा-कुटांचा असू शकतो.
आम्ही काही मित्र-मैत्रिणी एका थाय-रेस्टॉरंटमध्ये गेलो होतो. मी पहिल्यांदाच आय फूड बघणार. खाणार होते. शिफारशीवरून मी ‘रॉ पपाया सॅलड’ मागवलं- आणि मला ते खूपच आवडलं. जेमतेम तिसरा घास तोंडाच्या दिशेनी जात असताना एक मित्र स्वत:चं ज्ञान पाजळायला उद्गारला, ‘त्यात काय एवढं, फक्त पपई किसून दाण्याचं कूट घातलंय.’ मला ना असला राग आला मित्राचा. आपल्याला दिसत नसला म्हणून काय झालं, पण तिथल्या शेफनी किती प्रेमानी सजवून पाठवली होती सलाडची डिश. लगेच ‘फक्त कूट’ वगैरे कॉमेंट मारून पेपर कशाला फोडायचा? माझ्या एक स्वत:ला सुगरण म्हणवणाऱ्या चिकित्सक नातेवाईक बाई आहेत. तिला सर्व पदार्थ घरी करून बघण्याची हौस आहे आणि स्वत:च्या असल्या हौशीसाठी ती बाकीच्यांना तोंडाला फेस येईपर्यंत कामाला लावते.
तर फास्ट फूड प्रकार नवीन होते, तेव्हा तिला पिझ्झा म्हणजे काय- याबद्दल प्रचंड उत्सुकता होती. पुण्यातल्या संभाजीपार्क जवळच्या एका हॉटेलात मी तिच्याबरोबर का गेले असा मला महापश्चात्ताप झाला- नंतर. कारण गुन्ह्य़ाच्या केसमधल्या मृतदेहासारखं तिनी त्या पिझ्झ्याचं डीटेल्ड पोस्टमार्टेम केलं. प्रत्येक पापुद्रा, चीझ, भाजी उभी-आडवी सोलून फाडताना ‘इ. अच्छा. एवढंच होय.’ असल्या उद्गारांची खैरात चालू होती. टेबलवरच्या दुसऱ्या पिझ्झासमोर हा कुरतडलेला पिझ्झा बिचारा ‘कोण होतास तू- काय झालास तू’ अशा अवस्थेला आला होता. नंतर चव बघण्यासाठी म्हणून तिनी भाजीपोळी खाल्ल्यासारखा सारण आणि पिझ्झाबेसचा घास घेतला. त्या पुढच्या भेटीत लगेच तिनी तिच्या प्रयोगशीलतेची चुणूक दाखवली. बेस म्हणून नीट न भाजलेल्या कच्च्या जाड पोळीसारखा कणकीचा लगदा आणि वर सुचेल त्या भाज्यांची कोशिंबीर. छे छे! ते पाहून हॉटेलमधल्या पिझ्झ्यांनी चुल्लूभर सॉसमध्ये बुडून जीव दिला असता.
वाढला गेलेला पदार्थ प्रेमानी, चवीनी खाऊन त्याला सहज, उत्स्फूर्त दाद देणं सगळ्यांनाच जमतं असं नाही. अनेकांना दुसरा घासही तोंडात जाण्याआधी ताबडतोब कृती जाणून घ्यायची असते. भोपळ्याचं भरीत का?. ‘अच्छा. हिंग.? मग फोडणी वर घालायची की भरीत परतवायचं कढईत?’ किंवा ब्रेड पुडिंग घरी केलं असं म्हटल्याक्षणी. ‘काय काय घातलं, कसं केलं.’ सुरू प्रश्नांची सरबत्ती! लगेच कुकिंग क्लासला आल्यासारखं बोलायला दुसरं काही सुचत नसल्यासारखं करतात काहीजण. ‘कडिपत्त्याची किती पानं घालायची. गुळाच्या ऐवजी साखर चालेल का.’ अशी वाक्यं कानावर आली की मला न राहवून हसायलाच यायला लागतं.
‘आस्वाद’ हा फार खासगी आणि स्वानंदाचाही भाग असतो. फुशारक्या मारणारे खवय्ये नको वाटतात. घरच्या गृहिणीला काही सुचूच देत नाहीत असे लोक. एकदा एका बाईंनी, ‘तू खिचडी रिफाइण्ड तेलात करतेस आम्ही तर तुपात करतो.’ असं म्हणत आकाशपाताळ एक केलं होतं. मी त्यांच्या माऱ्यासमोर जरा ओशाळून गोंधळलेच होते. नंतर कळलं, त्यांचं तूप म्हणजे डालडा. माझ्या कल्पनाविस्ताराला मी डालडय़ातली साबुदाण्याची खिचडी कशी लागत असेल- याकडे जाऊच दिलं नाही. चवीनं खाणारे कळतात आपल्याला. किमान आपण स्वत: तरी चवीनं खाणारे असावं. असं मला फार मनापासून वाटतं. त्यात करणाऱ्याच्या कौशल्याचं कौतुक आणि त्यांच्या कृतीतल्या कळीच्या गोष्टीचं बिंग न फोडण्याची बूज असावी. आपण करून पाहायचं असेल तर कृती विचारताना हं चला- चटाचटा फॉम्र्युला सांगून टाका- अशा भावनेनी म्हटलं- तर सांगणाऱ्याचा किती विरस होतो.
अलीकडे आईनी शिकवलेली माझी एक कैरीची चटणी माझ्या काही जवळच्या आणि नात्यातल्या मैत्रिणींमध्ये हिट झाली आहे. मला माहितीए त्या चवीनी खाणाऱ्या आहेत. त्यांच्यासाठी ती चटणी परत परत करताना किंवा एखाद् वेळी कृतीसाठी आलेल्या फोनवर बोलताना माझी कळी इतकी खुलते. काय सांगू
सो कुल : चवीनं खाणार, त्याला…
‘साखरेचं खाणारे’ हल्लीच्या ‘डाएट’ जमान्यामध्ये मागे पडत चालले आहेत. मात्र चवीनं खाणाऱ्यांची गरज वाढते आहे. चवीबद्दल किती बोलतात ना लोक! म्हणजे बोलूच नये असं नाही. तरी किती बोलावं याला काही मर्यादा?
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 19-04-2013 at 01:06 IST
मराठीतील सर्व Show Cool बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Enjoy testy food