५ जून हा दिवस जागतिक पर्यावरण दिन म्हणून साजरा केला जातो. पर्यावरणातील समस्या नि संवर्धनाविषयी जागरूकता निर्माण करणं, पर्यावरणविषयक निर्णय घ्यायची क्षमता निर्माण होण्यासाठी पोषक वातावरणाची निर्मिती करणं हा पर्यावरण दिन साजरा करण्याचा हेतू असतो. यंदाच्या पर्यावरण दिवसाचं घोषवाक्य आहे – Seven Billion Dreams. One Planet. Consume with Care.
केवळ विचार करणे नि स्वप्नांचे इमले रचण्यापेक्षा आजची तरुणाई थेट कृतीवर भर देते. साध्याशा कृतींतूनही पर्यावरणस्नेही होता येते, हे सिद्ध करतेय. अशाच काही जागल्यांशी गप्पा..
काही जणांना घरातूनच पर्यावरणप्रेमाचं बाळकडू मिळतं. त्यांपैकी एक आहे आयटीफिल्डमधली मीनाक्षी मोहिते. आपण रोज खात असलेल्या फळांच्या बिया घरातली मंडळी आणि परिचितांच्या साहाय्याने मीनाक्षी जमवते. सुट्टीच्या दिवशी ग्रुपसोबत माथेरान, नॅशनल पार्क आदी ठिकाणी ती नियमितपणे बिया पेरते. तिच्या घरीही अनेक प्रकारची झाडे आहेतच. ‘आपण पेरलेल्या बियांची झाडे झालेली पाहून मनाला समाधान मिळते. झाडांमुळं पर्यावरणाच्या चक्राला चालना मिळालेली पाहून मन शांतावतं आणि नव्या जोमानं मी बिया पेरायला सुरुवात करते,’ असं मीनाक्षी सांगते.
आपल्या भोवतलाविषयी जागरूक असणारी मंडळी सतत काहीतरी उपक्रमांद्वारे लोकांना सजग करत असतात. असाच एक उपक्रम युवक बिरादरी कल्याण-डोंबिवली विभागातर्फे होतोय, ‘क्लिन वाशिंद, ग्रीन वाशिंद!’ या प्रकल्पातला कार्यकर्ता सुदीप पात्रा सांगतो की, ‘प्लॅस्टिकमुळे होणारे वाढते प्रदूषण लक्षात घेऊन आम्ही त्याविषयी जागृती करणारोत. शिवाय पावसाळ्याच्या तोंडावर मोठय़ा प्रमाणात वृक्षारोपण करून आम्हीच त्यांची आळीपाळीनं निगा राखणार आहोत. शिवाय उल्हासनगरमध्ये पर्यावरणविषयक कार्यक्रमाचे आयोजन आणि डोंबिवलीत मिडअर्थ संस्थेतर्फे बालभवनमध्ये तीन दिवसीय लडाख-भूतान वाइल्डलाइफ छायाचित्र प्रदर्शन भरवतोय. त्याखेरीज ‘लेट्स टॉक अबाउट नेचर’ या कार्यशाळेचे आयोजन विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरणविषयक आस्था निर्माण होण्यासाठी आम्ही करतो.’
मीनाक्षी मोहिते
सुदीप पात्रा
काही जण लोकांना थेट निसर्गाशीच संवाद साधायला मदतीचा हात देतात. अशा पर्यावरणस्नेही मंडळींपैकी एक म्हणजे सुषमा मिश्रा. ती वाइल्डपॉ अॅडव्हेंचर्स या संस्थेच्या माध्यमातून वाइल्डलाइफ नि पर्यावरणविषयक जनजागृतीवर भर देते. मग ते नेचर ट्रेलच्या माध्यमातून निसर्गाची माहिती देणं असो किंवा वृक्षतोड थांबवण्याविषयी उचललेलं पाऊल असो. ती ग्रासरुट्स जर्नीज या संस्थेच्या रुरल टुरिझमशीही निगडित आहे. ‘ग्रामीण भागातील विशेषत: शेतकऱ्यांच्या पारंपरिक जीवनाची तोंडओळख करून देत निसर्गाशी एकरूप होऊ शकणाऱ्या जीवनशैलीची माहिती नि महती या माध्यमातून सांगितली जाते. आम्ही गावकऱ्यांमध्येही पर्यावरणविषयी जागरूकता निर्माण करतो,’ असं सुषमा सांगते.
अभ्यासानिमित्तानं नेचर फिल्डवर्क करताना निसर्गाची ओढ वाटू लागली नि मग तेच कार्यक्षेत्र म्हणून निवडल्याची उदाहरणं अजूनही कमीच दिसताहेत. निसर्गप्रेमी ओमकार पै त्यांच्यापैकीच. विद्यार्थी, कॉर्पोरेट, शैक्षणिक गटांसाठीच्या नेचर ट्रेल्समधून तो निसर्गाची माहिती लोकांपर्यंत पोहोचवतो. विविध शाळा नि एनजीओजना अॅप्रोच होऊन पर्यावरणाच्या प्रॅक्टिकल नि थिअरी नॉलेजवर भर देण्यात यावा, यासाठी स्प्राऊट्स एन्व्हार्नमेंट ट्रस्टतर्फे चालू असलेल्या उपक्रमातही तो सामील झालाय. ‘मुलांना भोवतालच्या पर्यावरणाचा अर्थ नीट समजावला तर त्यातले डूज-डोण्टस् ते लगेच फॉलो करतात. पर्यावरण शिक्षणासाठी शाळांसह सगळ्यांनी पुढाकार घ्यायला हवा, असं ओमकार सांगतो. सतत ओरबाडल्या जाणाऱ्या निसर्गाचं जतन नि संवर्धन होण्यासाठी ही युवा पर्यावरणस्नेही मंडळी पुढं सरसावलेत. निसर्गाचं महत्त्व नि माहात्म्य विविध माध्यमांतून अतिशय आत्मीयतेनं लोकांपर्यंत पोहोचवण्याचा वसा या ‘पर्यावरणाच्या जागल्यां’नी घेतलाय. आता गरज आहे आपण सगळ्यांनी हा वसा मन:पूर्वक स्वीकारून प्रत्यक्ष जीवनात अवलंबण्याची!
राधिका कुंटे – viva.loksatta@gmail.com