ठाणे शहराची ओळख काय, असं काही वर्षांपूर्वी विचारलं असतं तर कोणत्याही ठाणेकराने अभिमानाने ‘तलावांचं शहर’ हे उत्तर दिलं असतं. पण काळ बदलला तशी ठाण्याची ओळखही बदलली. ‘तलावांचं शहर’ ही ओळख सांगणाऱ्या ठाण्याचा चेहरा अधिक तरुण झाला आणि हा तरुण चेहरा राममारुती रोडसारख्या झगमगीत रस्त्यावर अधिक दिसायला लागला. राममारुती रोड आणि ठाणे हे एक समीकरण बनून गेलं.
साधारण दहा-पंधरा वर्षांपूर्वी ठाण्यातल्या या रस्त्याचं रुंदीकरण झालं. रुंदीकरणापाठोपाठ नवनवीन दुकाने उभी राहिली. एकेकाळी तळ्यावर घिरटय़ा मारणारी किंवा तेथील कट्टय़ावर ठिय्या देऊन बसणारी तरुणाई आपसूकच या नव्या रस्त्याकडे वळली. या रस्त्यावरील फुटपाथ तरुणांच्या प्रसन्न ताटव्यांनी फुलू लागले. याच सुमारास या तरुणांची भूक भागवण्यासाठी रामरतन यादव नावाच्या एका व्यक्तीने इव्हिनिंग स्पॉट नावाचा चाट कॉर्नर सुरू केला. आधी फक्त भेळपुरी, पाणीपुरी, शेवपुरी अशा नेहमीच्या चाट पदार्थाच्या साथीने सुरू झालेल्या कॉर्नरने गेल्या दहा वर्षांत भलतीच मजल मारली आहे. आता इव्हिनिंग स्पॉट राममारुती रोडची एक ओळख बनला आहे.
ठाण्याला पश्चिमेला उतरलात की, राममारुती रोड कुठे, हा प्रश्न घेऊन बाहेर पडा. शेंबडं पोरगंही तुम्हाला रस्ता सांगेल. या राममारुती रोडवर इव्हिनिंग स्पॉट कुठे आहे, असं विचारायची गरजच पडणार नाही. कारण राममारुती रोडला लागल्यानंतर अगदी दीडशे मीटर अंतरावरच तरुणांचा एखादा घोळका हातात चाट पदार्थानी किंवा सँडविचेस्नी भरलेल्या प्लेट्स घेऊन उभाच दिसतो. पूर्वी फक्त चाट पदार्थाचा भरणा असलेल्या या इव्हिनिंग स्पॉटमध्ये आता ज्यूस, सँडविचेस्, पिझ्झा असे वेगवेगळे ३० पदार्थ मिळतात. विशेष म्हणजे हे सर्वच्या सर्व पदार्थ १०० रुपयांच्या आतबाहेर आहेत.
इव्हिनिंग स्पॉटकडे सगळेच पदार्थ खूपच उत्तम मिळतात. पण खाबू मोशायची आवड विचाराल, तर दहीपुरी आणि पाणीपुरी! त्याच्याबरोबर आलू टिक्की हादेखील इथला फेमस पदार्थ आहे. सँडविचेस्मध्ये चिलिमिली सँडविच एकदा खाऊन बघाच. पिझ्झावरच्या टॉपिंगप्रमाणे तुमच्या सँडविचमध्ये स्टफिंग केलेलं असतं. पावाच्या तीन लेअर्समध्ये हे स्टफिंग भरून मग टोस्ट केलं जातं. त्यावर चिजची पखरण करून हे सँडविच तुमच्यासमोर येतं. या सँडविचची टेस्ट लाजवाब आहेच. इव्हिनिंग स्पॉटची स्पेश्ॉलिटी म्हणजे त्याच्याकडील हिरवी चटणी! या चटणीसह कोणतंही सँडविच लज्जतदार लागतंच.
इव्हिनिंग स्पॉटकडील खाबू मोशायला आवडणारी गोष्ट म्हणजे इथे ‘सुखापुरी’च्या प्लेट्स भरूनच ठेवलेल्या असतात. कोणत्याही डिशनंतर चाटवाल्याकडे सुखापुरी मागणाऱ्यांनाच या भरून ठेवलेल्या प्लेट्समागचा आनंद कळेल. तुम्ही एकच प्लेट खाल् ली असेल, तरी सुखापुरीच्या दोन प्लेटही तुम्ही उडवू शकता. अर्थात, तुम्ही तेवढे निर्लज्ज असाल, तरच! पण रामरतन यादव किंवा त्यांच्याबरोबर काम करणारे त्यांचे कर्मचारी तुम्हाला चुकूनही हटकणार नाहीत.
इव्हिनिंग स्पॉटने गेल्या दहा वर्षांत खवय्यांच्या मनात ‘जिव्हा’ळ्याचं स्थान निर्माण केलं आहे. संध्याकाळी साडेचारपासून सुरू असलेला हा इव्हिनिंग स्पॉट खवय्यांची प्रत्येक संध्याकाळ सत्कारणी लावायला तत्पर असतो.
छाया- रोहन टिल्लू
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा