रसिका शिंदे
वातावरणात जसा वारंवार बदल होत असतो तसेच बदल फॅशन ट्रेण्ड्समध्ये होत असतात. तेच कुर्ते, क्रॉप टॉप, साडय़ा असे इंडो-वेस्टर्न कपडे वापरून कंटाळा आला की आपण बेसिक कपडय़ांच्या फॅशनकडे वळतो. आता बेसिक म्हणजे काय तर जीन्स, टॉप आणि त्यावर साजेसा गळय़ात स्कार्फ. चारचौघांमध्ये आपण फॅशनेबलदेखील दिसतो आणि मुळात आपण त्या कपडय़ांत कम्फर्टेबल असतो हे जास्त महत्त्वाचे. पण सध्या डेनिम पॅन्ट-टॉप आणि डेनिमच्या कुर्त्यांसोबत डेनिमचे विविध प्रकारचे कपडे परिधान करण्याचा ट्रेन्ड आला आहे. डेनिमची एक खासियत म्हणजे हिवाळय़ाच्या ऋतूत अंगाला ऊबही मिळते आणि फॅशनची हौसही फिटते.
डेनिम जॅकेट्सचे नाना प्रकार
सर्वसाधारणपणे डेनिम म्हणजे गडद किंवा हलक्या निळय़ा रंगाचा कपडा. याच कपडय़ाचे वेगवेगळय़ा स्टाइलचे जॅकेट्स बनवले जातात अशी विचारसरणी असते. मात्र, डेनिम जॅकेट्सचे अनेक प्रकार आहेत. हिवाळय़ात गारवा जरी जाणवत असला तरी फॅशन करायची हौस जात नाही. मग तेच तेच गडद किंवा हलक्या निळय़ा रंगाचे डेनिमचे जॅकेट्स घालून कंटाळा आला असेल तर बाजारात उपलब्ध असलेले डेनिमचे हटके जॅकेट्स ट्राय करता येतील. फ्रिंज डेनिम जॅकेट, कलर्ड जॅकेट, विंटेंज डेनिम जॅकेट, बलून क्रॉप जॅकेट आदि विविध प्रकारचे डेनिम जॅकेट्स बाजारात सध्या उपलब्ध आहेत. तरुण पिढी पबमध्ये पार्टी करण्याला किंवा मित्रमैत्रिणींसोबत हँगआऊट करण्याला जास्त पसंती देतात. अशा प्रसंगी डेनिमचे विविध प्रकारचे जॅकेट्स, सोबत क्रॉप टॉप आणि गळय़ात चोकर घालत त्याला डेनिम पॅन्ट आणि शूजची जोड दिली तर तुमचा लुक नक्कीच हटके दिसेल.
डेनिम स्कर्ट
हल्ली मुली फॅशनपेक्षा कपडय़ांमध्ये कम्फर्ट शोधताना दिसतात. यात डेनिमच्या अनेक कपडय़ांच्या प्रकारांचा समावेश आहे. डेनिमची डंगरी, ए-लाइन ड्रेस, जम्पसूट, मॅक्सी ड्रेस, कोल्ड किंवा ऑफ शोल्डर ड्रेस, डेनिम शर्ट ड्रेस परिधान करून तुम्ही वेगळे लुक अजमावू शकता. तसेच, ज्यांना स्कर्ट परिधान करण्याची आवड आहे त्यांच्यासाठी मिडी स्कर्ट, डेनिम पेन्सिल स्कर्ट आणि डंगरी स्कर्टसारखे एकाहून एक युनिक पर्याय बाजारात उपलब्ध आहेत.
डेनिम बॅग्ज
कॉलेजच्या तरुण-तरुणींमध्ये ऊक अर्थात डु इट युअरसेल्फ म्हणजे उपलब्ध साहित्यात कोणत्याही वस्तू बनवण्याचीही फॅशन आहे. त्यामुळे घरच्या घरी डेनिमची बॅग किंवा वॉलेट्स बनवले जातात. कॉलेजमधले विद्यार्थी सर्रास डेनिम बॅग्ज वापरताना दिसतात. शोल्डर बॅग, स्लिंग बॅग्ज याच्या बरोबरीने डेनिम क्लच आणि वन साइड पर्सनाही मुली पसंती देताना दिसतात.
डेनिमचे शूज
डेनिमचे जॅकेट, पॅन्ट्स आणि आता डेनिमचे शूजही महाविद्यालयातील विद्यार्थी घालताना दिसत आहेत. कपडय़ांबरोबरच चपलांनाही आपण तितकेच महत्त्व देतो. कोणतीही फॅशन ही योग्य चपला किंवा बुटांशिवाय अपूर्णच वाटते. जेव्हा वेस्टर्न लुक करतो त्या वेळी तर योग्य रंगसंगती असणारे शूज घालायला सर्वानाच आवडतात. सध्या डेनिमच्या इतर आऊटफिट्सच्या ट्रेण्डमध्ये डेनिम शूजनाही पसंती मिळते आहे. डेनिम शूज नेहमीपेक्षा वेगळा लुक आणण्यासाठी नक्कीच मदत करतात. कॅज्युअल शूजपासून ते स्निकर, ब्लॉक हिल्स, ऑफिस सँडल्स, ओपन टो सँडलपर्यंत सर्वामध्ये डेनिमचे अनेकानेक प्रकार सर्रास बाजारात पाहायला मिळत आहेत.