मेक-अप करताना काय काळजी घ्यायची, सौंदर्यप्रसाधनं कोणती वापरायची, मेक-अप बेस कसा असावा, आधी काय लावायचं, कसं लावायचं अशा अनेक शंका मनात असतात. त्यांचं समाधान करणारी लेखमालिका.
चेहऱ्यावरच्या मुख्य फीचर्समध्ये डोळ्यांचा समावेश होतो. चेहऱ्याच्या देखणेपणात महत्त्वाची भूमिका बजावतात ते डोळे. म्हणूनच डोळ्याचा मेक-अप महत्त्वाचा असतो. मागच्या भागात आयब्रो म्हणजे भुवया उठावदार दिसण्यासाठी काय करावे ते आपण पाहिले. आजच्या भागात आय लायनरचा उपयोग पाहू या.
डोळ्यांच्या मेकअपमध्ये प्रामुख्याने काजळ, आय लाइनर, आय श्ॉडोस आणि मस्कारा यांचा विविध पद्धतीने वापर केला जातो. त्यात सगळ्यात महत्त्वाचे आहे ते आय लाइनर. डोळे सुंदर दिसण्यासाठी विविध ब्रँड्स नवीन आणि आकर्षक लायनर्स बाजारात आणतात. जेल, लिक्वीड, पेन्सिल, कोल, क्रीम लाइनर हे लायनर्सचे प्रकार बाजारात उपलब्ध आहेत. पण हे एवढे प्रकार ऐकून किंवा पाहून गोंधळून जाऊ नका. प्रत्येक लाइनर प्रकारचे फायदे आणि तोटे आहेत. आजच्या लेखाद्वारे तुम्ही नक्कीच ठरवू शकता की तुमचा हेतू कोणत्या आय लाइनरच्या प्रकाराने साध्य होईल.
१. आय पेन्सिल : पेन्सिल आय लाइनर ही सामान्य पेन्सिलसारखी असून याचे विविध कलर्सही मिळतात. याच्यात वॉटरप्रूफ, स्मजप्रूफ किंवा स्मजी असे पर्याय उपलब्ध आहेत. जास्त करून स्मजप्रूफ पेन्सिल काही सेकंदांकरताच ब्लेंड होतात तर स्मजी पेन्सिल्स कितीही वेळ ब्लेंड होतात व ते लाइनर सेट होण्याकरिता पावडर लावतात. नवशिक्यांकारिता सर्वात सोपा व चांगला पर्याय म्हणजे आय पेन्सिल. आय पेन्सिल अप्लाय करताना पापणीच्या सर्वात जवळच्या भागावर लावावी. शार्प लाइन हवी असल्यास टोक हे अणकुचीदार असावे लागते, तर स्मजी इफेक्टकरिता गुळगुळीत टोक आवश्यक आहे. स्मोकी इफेक्ट देण्याकरिता स्मजी पेन्सिलच वापरावी.
२. लिक्विड लाइनर- अरेबिक मेकअप, कॅट आय, ड्रॅमॅटिक लुक, पापण्या जाड दिसण्याकरिता तसेच बारीक पण ठळक लाइन आणण्याकरिता लिक्विड लाइनर वापरतात. बोल्ड लुक विथ स्टनिंग आउटफिटसाठी उपयुक्त, कॅज्युअल लुककरिता लिक्विड लाइनर वापरू नये. लिक्विड लाइनर लावण्यास थोडेसे अवघड असून ज्यांची लाइनरच्या स्ट्रोकवर पकड आहे, त्यांनीच हा पर्याय निवडावा. बारीक व तंतोतंत आकार देता येत असल्यामुळे लाइनरचे वेगवेगळे आकार ट्राय करायला हरकत नाही. अविचल हाताने पापणीच्या जवळच्या रेषेवर छोटे छोटे स्ट्रोक द्यावेत, सर्वात आधी डोळ्यांच्या मधल्या भागापासून सुरुवात करून बाहेरील भागापर्यंत खेचत आणावे. नंतर डोळ्यांच्या आतील भागापासून हळूहळू मधल्या भागापर्यंत (जिथून सुरुवात केली तिथपर्यंत) लावावे. हे जरूर लक्षात ठेवा की लिक्विड लाइनर स्मोकी किंवा स्मज्ड लुक देत नाही.
३. क्रीम लाइनर : खासकरून मेकअप आर्टस्टि याचा वापर करतात. पण हल्ली क्रीम लाइनरसुद्धा कॉमन होत चालले आहे. क्रीम लाइनर डबीमध्ये येत असून अँगल ब्रशने किंवा फाइन टीप ब्रशने अप्लाय करतात. याचा वापर आय श्ॉडोजसाठी क्रीमी बेस बनविताना वापरतात तसेच स्मजी लुक आणि प्रॉपर ग्रॅफिक्स लाइन्ससाठीही क्रीम लाइनर उपयुक्त आहे. क्रीमी असल्यामुळे लवकर स्मज होते म्हणूनच अप्लाय केल्यानंतर पावडर लावून सेट होऊ द्यावे.
४. जेल लाइनर : जेल लाइनर हे क्रीम लाइनरसारखेच असून थोडे जास्त घट्ट आहे. हे काही काळापर्यंतच ब्लेंड / स्मज करता येते. जेल लाइनरने ग्राफिक किंवा बोल्ड लाइन्स उत्तम प्रकारे काढता येतात.
५. कोह्ल लाइनर : कोह्ल लाइनर हे दुसरे काही नसून डबीतील काजळाचे पेन्सिल फॉर्म मध्ये केलेले रूपांतर आहे. हे बाळगायलाही सोपे आणि लावायलाही सोपे तसेच स्वस्तही आहे. कोह्ल लाइनर लाँग लासटिंग इफेक्ट देत नाही. स्मोकी आइजसाठी अतिशय उत्तम आहे.
मेक-अप टिप्स : आय लाइनर लावताना…
मेक-अप करताना काय काळजी घ्यायची, सौंदर्यप्रसाधनं कोणती वापरायची, मेक-अप बेस कसा असावा, आधी काय लावायचं, कसं लावायचं अशा अनेक शंका मनात असतात.
आणखी वाचा
First published on: 23-05-2014 at 01:06 IST
मराठीतील सर्व लेख बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Eyeliner