भारतीय फॅशन जगतातील आघाडीचं व्यक्तिमत्त्व – सब्यासाची मुखर्जी. बॉलीवूडमधल्या अनेक तारकांचा तो आवडता फॅशन डिझायनर आहे. सब्यासाचीच्या कलेक्शनमधले कपडे आपल्या विश लिस्टमध्ये असावेत असं अनेक मॉडेल, अभिनेत्री आणि सोशलाइट्सना वाटत असतं. त्यांच्याशी व्हिवा रिपोर्टर मृणाल भगतने साधलेला संवाद.
सब्यासाची मुखर्जी ऐकल्यावरच बंगाली रसगोल्लाची आठवण व्हावी असा गोडवा आहे नावात. विद्या बालनचा लग्नसोहळा असो किंवा ऐश्वर्याची कान फेस्टिवलची वारी, ‘ब्लॅक’मधली आंधळी-मुकी राणीची व्यक्तिरेखा असो किंवा श्रीदेवीची अ‍ॅवॉर्ड सोहळ्यातली साडी, प्रत्येक खास ऑकेजनला या आणि अशा अनेक बॉलीवूड सेलिब्रिटींनी वेळोवेळी सब्यासाचीच्या डिझाइन्सना पसंती दिलेली आहे. भारतीय हातमागाला ग्लॅमरस लूक देण्यात सब्यासाचीचा मोठा हात आहे. ‘कपडे हे व्यक्तिमत्त्वाचा आरसा असले पाहिजेत’  या तत्त्वावर ठाम असणाऱ्या सब्यासाचीने पडद्यावरही ‘रावण’, ‘लागा चुनरीमें दाग’, ‘गुजारीश’, ‘ब्लॅक’, ‘बाबुल’, ‘पा’, ‘नो वन किल्ड जेसिका’ या चित्रपटांमधील व्यक्तिरेखा जिवंत केल्या आहेत. २००२ साली इंडियन फॅशन वीकमधून पदार्पण केल्यानंतर त्याने कधी मागे वळून पाहिलंच नाही मुळी. लंडन फॅशन वीक, मिलान फॅशन वीक, न्यूयॉर्क फॅशन वीक अशी मजल त्यानं मारली आणि आज तो भारतीय फॅशनचा चेहरा बनला आहे. गेल्या महिन्यात पार पडलेल्या लॅक्मे फॅशन वीकची सांगता सब्यासाचीच्या दिमाखदार सोहळ्याने झाली. अनेक वर्षांनंतर त्यांनी मुंबईच्या या शोमध्ये भाग घेतला होता.
तब्बल पाच वर्षांनंतर तुम्ही या वेळी लॅक्मे फॅशन वीकमध्ये भाग घेतलात, हा अनुभव कसा होता?
अनुभव खूपच छान होता. माझ्या करियरची सुरवात मी लॅक्मे फॅशन वीकनेच केली होती आणि या वेळच्या वीकची सांगता करायला मिळणं हे भारावून टाकणारं होतं.
आज जिथे विविध फॅशन ब्रॅन्ड्स पाश्चात्त्य संस्कृतीची कास धरताना दिसतात, तिथे आजही तुम्ही भारतीय टेक्स्टाइल विशेषत: हातमाग आणि एम्ब्रॉयडरीची कास सोडली नाही आणि इतकेच नव्हे तर तुमच्या प्रत्येक कलेक्शनमधून लोकांना तुम्ही याच्या वापरानं चकित करता. एक डिझायनर म्हणून हे प्रयोग कसे करता?    
मी नेहमीच माझ्या कलेक्शनमधून भारतीय पेहरावाला जागतिक रूप देण्याचा प्रयत्न केला आहे. मुळात मी भारतीय असल्याचा मला अभिमान आहे आणि भारतीय टेक्सटाइल माझ्यासाठी खूप महत्त्वाचे आहे. भारतीयत्व हा माझ्या ब्रॅन्डचा आत्मा आहे. ते माझ्या डिझाइनच्या गुणसूत्रांतच आहे. त्यामुळे जेव्हा अशा प्रयोगांमधून पाठीवर कौतुकाची थाप पडते तेव्हा अभिमान वाटतो.
भारतीय एम्ब्रॉयडरी आणि संस्कृतीची पाश्चात्त्य ढंगात सरमिसळ करण्याचं अनोखं कसब तुमच्याकडे आहे. याची प्रेरणा तुम्हाला कुठून मिळते?
माझ्या कलेक्शनमधून अनेक प्रकारच्या टेक्सटाइल्सच्या मिलापातून विविध संस्कृतींना एकत्र जोडण्याचा प्रयत्न मी नेहमी करतो. मुळात भारतीय असल्यामुळे एम्ब्रॉयडरी आणि कलाकुसरीकडे मी सहजरीत्या ओढला गेलो आणि आज ते माझ्या फॅशनविषयीच्या व्याख्येचे अविभाज्य घटक बनले आहेत. मुळातच खादीच्या किंवा हातमागावर बनवलेल्या कपडय़ावर पारंपरिक कलाकुसरीचा ठसठशीत उठाव दिसतो. त्यावर एम्ब्रॉयडरीची नजाकत वाढते आणि अशा मिलापातून उठून येणारा ‘रस्टिक बरोक’ मला जास्त भावतो.
आज भारतीय फॅशनचा नवा चेहरा आपण पाहतोय. फॅशन उद्योगानं अनेक र्वष चढउतार पहिले आहेत. एक डिझायनर म्हणून भारतीय फॅशन व्यवसायाचे भविष्य कसं असेल असं वाटतं? आज पाश्चात्त्य फॅशनपासून वेगळी अशी स्वत:ची ओळख भारतीय फॅशन क्षेत्राला मिळाली आहे असं आपण म्हणू शकतो?
पुढील काही वर्षांत भारतीय फॅशन व्यवसायाला जागतिक बाजारपेठेत एक मानाचं स्थान मिळेल. आज जगाच्या पाठीवर अनेक ब्रॅन्ड्स आहेत जे अभिजात रचनेचा दावा तर करतात, पण त्यांच्या कलेक्शनमधला आत्मा हरवलेला असतो. भारतासारखे देश ज्यांच्याकडे स्वत:ची अशी एक संस्कृती, कला, परंपरा आहे, ते भविष्यात विनासायास पुढे येतील, कारण ग्राहकाच्या मागणीनुसार आणि त्याच्या सांस्कृतिक आणि वैचारिक मतांप्रमाणे त्याचा स्वतंत्र पेहराव बनवण्याची कला आणि कसब त्यांच्याकडे पिढीजात  आहे.
तुमचं प्रत्येक कलेक्शन स्त्रीत्व साजरं करताना दिसतं. त्याच्यात गतकाळाची झलक दिसून येते. तुमच्या आयुष्यात याचं काय स्थान आहे?
स्त्रीचं सौंदर्य आणि तिच्यातील प्रसन्नता खरंच कौतुकास्पद असते आणि मी नेहमीच त्याची झलक माझ्या कलेक्शनमधून दाखवण्याचा प्रयत्न करतो. स्त्रिया नेहमीच मला कलेची प्रेरणा देतात आणि माझं प्रत्येक कलेक्शन त्या अस्सल भारतीय स्त्रीसाठी असतं, जिला आपल्या परंपरेचा आणि संस्कृतीचा अभिमान आहे. मी माझ्या कलेक्शनमधून स्त्रीचं स्त्रीत्व साजरा करण्याचा प्रयत्न करतो.
सब्यासाची ब्रॅन्ड हा केवळ सेलेब्रिटीज आणि अपमार्केट लोकांपुरताच मर्यादित आहे असा समाज होत असतानाच तुम्ही ‘बॅण्ड बाजा ब्राइड’ या शोमधून पुढे आलात आणि एका सामान्य मुलीला तिच्या स्वप्नातलं लग्न सत्यात उतरवण्यात मदत केलीत. तो अनुभव कसा होता? आणि भविष्यात पुन्हा आम्ही तुम्हाला या भूमिकेत पाहू शकू?
हो नक्कीच. सब्यासाची ब्रॅन्ड नेहमीच समाजातील विविध स्तरांतील माणसांना जुळवून घेण्याचा प्रयत्न करत आला आहे, मग ते सेलेब्रिटीज असोत, उच्चस्तरीय लोक असोत किंवा सामान्य स्त्री-पुरुष. समाजातील सर्व घटकांना सामावून घेण्याचा प्रयत्न आम्ही नेहमीच करत राहू.
आतापर्यंत अनेक बॉलीवूड नटय़ांनी सब्यासाचीच्या साडय़ा, ड्रेस घातलेले आम्ही पाहिलेत, पण बॉलीवूडचे नट कधी सब्यासाचीच्या स्टाइलमध्ये रंगलेले दिसतील? अलीकडेच तुम्ही पुरुषांसाठीदेखील कलेक्शन्स बनवली आहेत, म्हणजे हा योग लवकरच जुळून येईन असं म्हणता येईल?
हो, सध्या आम्ही पुरुषांसाठी कलेक्शन घेऊन आलो आहोत आणि बॉलीवूड सेलिब्रिटीजबद्दल बोलाल तर मी तेच चित्रपट करतो ज्यांच्याशी मी कनेक्ट होऊ शकतो, त्यामुळे भविष्यात जर एखादी चांगली संधी चालून आली तर नक्कीच त्याचा विचार करू.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा