तेजश्री गायकवाड

ऑफिस नाही, कॉलेज नाही, बाहेर काय घराखालीही उतरायची संधी नाही.. मग काय? केसांचा एक बुचडा बांधून टाकला, दोन गाऊन किंवा शॉर्ट आणि टी-शर्टचे दोन जोड भागतंय की..फ्लिपकार्ट-मिंत्रा ते लाईफस्टाईल नाहीतर गेला बाजार फॅशन स्ट्रीट कुठून कुठून निगुतीने खरेदी करून आणलेले सगळे कपडे आज कसे कपाटातील सगळ्या खणात जाऊन गपगुमान बसले आहेत. काय उपयोग आहे या कपडय़ांचा, किती पैसे खर्च के ले मी या वनपीसवर.. लॉकडाऊनची कल्पना असती तर खरेदीच के ला नसता.. असे संवाद वरचेवर मनाशी झडत असतात. असा सगळा निराशावादी सूर हळूहळू का होईना.. आपल्या तनामनात झिरपत चालला आहे. काय होईल जर या खणांमधला एखादा नवा टॉप उगाचच अंगावर चढला तर नसतील मित्रमैत्रिणी कॉप्लिमेंट द्यायला.. पण आरशात पाहून स्वत:चाच हा संवार लूं.. मूड टिपायला काय हरकत आहे म्हणण्यापेक्षाही ते गरजेचं आहे असं फॅशन डिझायनर्सच सांगतायेत..

‘यू आर व्हॉट यू वेअर’ हा फॅशनचा फं डा काही बदललेला नाही. त्याची प्रचीती खरं म्हणजे तुम्ही आताही घेतच आहात. रोज तेच तेच घालून किं वा त्याच त्याच अवतारात वावरून तुमच्या व्यक्तिमत्त्वातच एक उदासीनता आली आहे. आळशीपणा भिनला आहे आणि काहीच नवं करावंसं वाटत नाही आहे, हे अनुभव कित्येक व्हर्च्युअल संवादातून रोज ऐकू  येत असतात. ही आपल्या व्यक्तिमत्त्वावरच्या उदासीनतेची धूळ झटकायला थोडासा कपडय़ांमधला बदल, चेहऱ्यावर चढलेला हलकासा रंगही मदत करू शकतो, असे ‘निर्मला निकेतन’च्या प्रोफेसर विभूती खेडेकर सांगतात. ‘आपण जे कपडे घालतो त्याचा परिणाम आपल्या मानसिक स्थितीवर होत असतो.  तुम्ही जेव्हा चांगले कपडे घालता तेव्हा तुमचा मूड चांगला होतो  आणि त्यामुळे तुमच्या वागण्यातला-व्यक्तिमत्त्वात झालेला बदल चटकन लक्षात येतो. अगदी नेहमीपेक्षा थोडे वेगळे कपडे आणि चेहऱ्यात केलेल्या बदलाला मिळणारी छोटीशी कॉम्प्लिमेन्टही तुम्हाला सुखावून जाते’, असं त्या सांगतात. सध्या अनेक जण ‘वर्क फ्रॉम होम’ करत आहेत. कित्येकदा ऑफिसच्या ऑनलाईन मीटिंगसुद्धा होत आहेत. अशावेळीही अनेकजण आपण घरातच आहोत म्हणून घरातलेच कपडे घालून मीटिंग अटेन्ड करतात, पण त्याचा काही अंशी निगेटिव्ह परिणाम आपल्या कामावर कसा होतो याबद्दल त्या म्हणतात, व्हिडीओ मीटिंगच्या वेळी सर्रास लोक वरती फक्त फॉर्मल शर्ट अंगावर चढवतात आणि खाली घरच्याच शॉर्टस किंवा ट्रॅक पॅन्टवर असतात. सोशल मीडियावर तुम्हाला या संदर्भातील अनेक जोक्स दिसतील, परंतु याचा आपल्या कामावर नकळत गंभीर परिणाम होतो आहे हे आपल्याला लक्षात येत नाही. याचं एक उत्तम उदाहरण म्हणजे तुम्ही इंटरवूला जाता तेव्हा टापटीप फॉर्मल कपडे घालून जाता. त्यामुळेच तुमचा कॉन्फिडन्स वाढतो, तुमच्या बॉडी पोश्चरमध्ये बदल होतो. मग तसाच कॉन्फिडन्स तुम्हाला काम करतानाही गरजेचा असतो. तुम्ही बॉस असू शकता, टीम लीडर असू शकता. तुमच्यापैकी क ोणी शिक्षकही असू शकतं. मग जर तुम्ही टी—शर्ट आणि शॉर्टसवर किंवा घरातल्या कपडय़ावर मीटिंगसाठी, वेबिनारसाठी बसलात तर तुमची एनर्जी ही घरात सर्वसाधारण असते तशीच असते. त्याचा परिणाम तुमच्या वागण्यात आणि समोरच्यावरही होत असतो. त्याऐवजी योग्य कपडे, योग्य रंगांच्या कपडय़ांचा विचार के ला तर तुम्हालाही प्रसन्न वाटेल आणि त्याचा कामावरही सकारात्मक परिणाम होईल, असे खेडेकर सांगतात.

लॉकडाऊन असल्याने तुम्ही घरी बसून काम, जेवण, सिनेमा बघणं असं सगळंच एकाच कपडय़ात करत आहात. याऐवजी एखादे वेबिनार अटेंड करण्यासाठी जर तुम्ही जीन्स आणि छान टॉप किंवा शर्ट घालून बसलात तर तुम्हाला आतून वाटणारा आनंदच तुमची एनर्जी आणि एकाग्रता वाढवणारा ठरेल. साधं आपण स्वयंपाक घरात जेवण बनवताना अ‍ॅप्रन घालतो तेव्हाही एक वेगळा कॉन्फिडन्स नक्कीच येतो. आपण इतरवेळी जसं एखाद्या दिवशी हॉटेलमध्ये फॅमिली लंच किंवा डिनरला जाताना छान तयार होऊन जातो तसंच सध्याच्या या काळात आठवडय़ातून एकदा तरी करा. घरीच छान स्वयंपाक बनवून छान तयार होऊन जेवायला बसलात तर नक्की तुम्हाला फरक  जाणवेल, असं त्या सांगतात. स्टायलिस्ट अमित दिवेकरही याला दुजोरा देतात. ‘लॉकडाऊनमध्ये आपण सगळेच आळशी झालो आहोत, आपल्याला काही करावंसं वाटत नाही आहे. अगदी आपल्या शरीरातून सगळी ऊर्जाच निघून गेली आहे असंही अनेकांना वाटतं. यासाठी आपण स्वत:लाच बुस्ट करून सगळी कामं करायला हवीत. यासाठी आपण थोडंसं जरी ड्रेसअप होऊन बसलो घरात तरी फार फरक पडतो. आपोआप आपली आतली एनर्जी पुन्हा येईल. मी असं म्हणत नाही की खूप हेवी कपडे घाला, मेकअप करा, ज्वेलरी घाला. परंतु तुम्ही टी—शर्ट मधून शर्टमध्ये, शॉर्टसमधून पूर्ण पॅन्टमध्ये नक्कीच येऊ शकता. घरीच बसायचं आहे, मग कशाला एवढे कष्ट?, हा विचार मनात येणारच पण ही छोटीशी मेहनत तुम्हाला फ्रेश बनवायला मदत करते. कपडे, रंग यांचा थेट संबंध मनाशी आहे. तुम्ही तुमच्या मेंदूला जे सांगाल त्यावर तो विश्वास ठेवतो. त्यामुळे हा थोडासा चेंजही आपल्याला नेहमीपेक्षा काहीतरी वेगळं करायचं आहे, असा संदेश मेंदूला देतो आणि साहजिकच आपली नेहमीची कामेही आपण अधिक उत्साहाने करतो’, असं दिवेकर सांगतात.

नाही म्हटलं तरी सध्या सुरू असलेल्या वेबिनार्स, व्हिडीओ कॉल, घरच्यांच्या व्हिडीओ बैठका किं वा ऑनलाइन सांस्कृ तिक कार्यक्रमातला सहभाग यामुळे चांगले दिसण्याचा आणि कपडय़ांचा अचानक संबंध येतो आणि मग आता काय घालायचं, हा गोंधळ उडतो. त्यासाठी कपडय़ांचे रंग आणि आपल्या आजूबाजूला असलेला लाईट यांचा विचार महत्वाचा ठरतो, असं  दिवेकर सांगतात. ‘रंग हे आपल्या आयुष्यात फार मोलाचा वाटा उचलतात. कलर ही एक प्रकारची थेरपी आहे. तुम्ही ब्राईट पिवळा, केशरी, लाल, क्रिस्प पांढरा असे रंग किंवा तुमचा जो  हॅप्पी रंग असेल तो घातला तर तुम्ही लगेच सुंदर, फ्रेश, पॉझिटिव्ह  फील करू शकता. त्याचबरोबर आपण आपल्या घरात बाहेरचा नैसर्गिक लाईट येऊ देणं महत्त्वाचं आहे. अंधार आपल्याला अनेकदा डिप्रेशनमध्ये घेऊन जातो. सध्या घरी बसून अनेकजण आवर्जून वेगवेगळ्या विषयावरचे वेबिनार बघत असतात, अनेकदा स्वत: देतसुद्धा असतात. अशावेळी आपण नेमके कपडे नाही घातले तर वेबिनारमध्ये जो विषय आहे, माहिती आहे ते समजायला त्रास होतो.  तुम्ही अर्थविषयक  वेबिनार ऐकायला बसला असाल तर फॉर्मल किंवा सेमी फॉर्मल कपडे घाला. घरून काम करतांना किंवा वेबिनार देतांना आवर्जून संपूर्ण फॉर्मल कपडे घाला’, अशी माहिती त्यांनी दिली.

नेहमीपेक्षा थोडं वेगळं दिसण्याचा, राहण्याचा प्रयत्न हा सध्या सोशल मीडियावर सुरू असलेल्या चॅलेंज प्रकारातून सहज होऊ शकतो, असं खेडेकर सांगतात. नुसतेच जुने फोटो टाकण्याचे चॅलेंज देण्यापेक्षा छान तयार होऊन नवीन फोटो काढून पोस्ट करा. यातून तुम्हालाही चेंज मिळेल आणि बदलाचे हे वारे इतरांपर्यंत पोहोचण्यासही मदत होईल. यासाठी दिवसातून चार वेळा कपडे बदला किंवा रोज छान छान कपडे घालून तयार होण्याची गरज नाही. रोजच्या कपडय़ांमध्ये केलेला छोटा बदलही आनंद देणारा असेल.  एक दिवस शॉर्ट टी—शर्ट घाला, कधी वनपीस, कधी आपला आवडता टॉप किं वा आवडत्या रंगाचे कपडे असे बदल करायला काहीच हरकत नाही. हा थोडासा सजण्यासवरण्याचा प्रयत्न तुम्हाला या त्याच त्याच एकसुरी वातावरणातही फ्रेश ठेवेल.

viva@expressindia.com

Story img Loader