हाय मृण्मयी,
मी नेहमी सलवार- कमीझ घालते. पण मला जीन्स वापरायची आहे. लेगिंग्ज आणि वेस्टर्न आऊटफिट्सही वापरून बघायचे आहेत. मी ४० वर्षांची असून स्थूल आहे. उंची ५.४ फूट आणि वजन १०४ किलो आहे. माझा चेहरा गोल आहे आणि पेअर शेप बॉडी आहे. मला डेली- कॅज्युअल आणि फॉर्मल ड्रेसिंगबद्दल तुमचा सल्ला हवाय.     
उल्का

आमूलाग्र बदल एकदम नको
प्रिय उल्का,
तू दिलेल्या माहितीवरून तुझं वजन बरंच जास्त आहे, असं दिसतं. कमरेजवळ आणि खालच्या बाजूला जाडी अधिक आहे, असं तू म्हणतेस. बहुतांश भारतीय महिलांची अशीच पेअर शेप बॉडी असते. कारण वजन वाढतं तेव्हा ते आधी खालच्या बाजूनं दिसून येतं. अशा परिस्थितीत नॅचरली आपण शक्यतो ढगळ किंवा आपली जाडी आणि कव्‍‌र्हज दिसून येणार नाहीत असे कपडे वापरणं प्रॅक्टिकल समजतो. म्हणूनच कदाचित तूदेखील सलवार कमीझ वापरण प्रीफर करत असशील. कारण त्यात वाढलेलं वजन झाकलं जातं. आपण सगळ्याचजणी असा विचार करतो. एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे – एकाच प्रकारचे कपडे वापरण्याची तुझी सवय असेल तर त्यात एकदम बदल करणं योग्य नाही, ते चांगलं दिसणार नाही. स्टेप बाय स्टेप बदल केले पाहिजेत.
पहिली स्टेप म्हणजे सिमिलर स्टाइलचे कपडे वेगळ्या पद्धतीनं वापरता येताहेत का ते बघ. म्हणजे तू सलवार कमीझमध्ये कंफर्टेबल असशील तर सलवार कमीझचेच जरा वेगळे पॅटर्न वापरून बघ. थोडय़ा वेस्टर्न कट्सचे टॉप्स वापरायला सुरुवात कर. उदाहरणार्थ धोती स्टाइलची पँट आणि वर तू वापरतेस त्यापेक्षा जरा शॉर्ट कुर्ता असं वापरून बघ. नेक आणि स्लीव्हजचे जरा वेगळे स्मार्ट पॅटर्न असलेले ड्रेस निवड. धोती पँट्स वापरणं फारसं अनकंफर्टेबल नसेल. सलवारची सोय त्यात आहे. हे वापरायची सवय झाली की, वेस्टर्न स्टाइलचे कपडे वापरण्याचा कॉन्फिडन्स तुझ्यात येईल.
पुढची स्टेप म्हणजे जरा व्यवस्थित फिटिंगचे कपडे वापरायला सुरुवात करणे. ट्रॅडिशनल पण तरीही स्टायलीश कपडे यामध्ये येतील. चुणीदार, लेगिंग्ज किंवा स्ट्रेट पँट्स हे सलवार ऐवजी वापरायला सुरुवात कर. रेग्युलर कॉटनच्याच पँट्स सुरुवातीला वापर. लेगिंग्जमधल्या वेगवेगळ्या स्टाइल्स ट्राय कर. वेगळ्या टेक्चरच्या, प्रिंटेड, अँकल लेंथ लेगिंग्ज वापर. यामुळे वेस्टर्न कपडे वापरण्याचा कॉन्फिडन्स आणखी वाढेल. वेगळ्या कुर्त्यांच्या स्टाइल्सही ट्राय कर. एकदा हे वापरण्याचा आत्मविश्वास आला की, जेगिंग्ज आणि स्ट्रेच्ड जीन्स वापरायला हरकत नाही. कुर्त्यांमध्ये लेटेस्ट कट्स, सिलोएट्स ट्राय कर. जेगिंग्ज हा माझ्या मते, कंफर्टेबल पर्याय आहे. स्ट्रेच होणारं कापड असल्यानं जीन्सचा अवघडलेपणा यात नसतो. अंगाबरोबर जेगिंग्ज घट्ट बसतात. एकदा जेगिंग्ज वापरायला सुरुवात केली की मग हळूहळू कुर्त्यांवरून टय़ुनिक्सवर ये. टय़ूनिक्स आपल्या कुर्त्यांसारख्याच असतात. पण वेस्टर्नाइज्ड टच येतो. थोडय़ा शॉर्ट आणि फिटिंगच्या असतात. बटन्स, झिप्स, बेल्ट अशी फिचर्स टय़ुनिक्समध्ये बघायला मिळतात.
काय वापरायला हवं आणि काय टाळायला हवं यातल्या महत्त्वाच्या टिप्स म्हणजे – डार्क कलर वापर. त्यामध्ये बारीक दिसायला होईल. बहुतेक सगळे रंग तुझ्यावर खुलून दिसतील. पण स्कीन कलरचे आऊटफिट्स टाळायला हवेत. फ्लेअर्ड बॅगी स्टाइलच्या पँट आणि टॉप टाळायला हवेत. व्हर्टिकल आणि डायगोनल डायरेक्शनच्या प्रिंट्स वापर. आडव्या रेषांची नक्षी, फुलांचं डिझाइन किंवा कट्स टाळायला हवेत. कापड वजनानं हलकं असलेलं निवड. ओपन नेकचे पॅटर्न हवेत. कॉलर्ड ड्रेस नकोत. फूल स्लीव्हजचे ड्रेसही शक्यतो टाळायला हवेत. तुझ्यासाठी बेस्ट स्लीव्ह लेंथ-५ ते ६ इंच आहे. नेहमी वरचा कपडा म्हणजे कुर्ता किंवा टॉप हा कमरेखाली येणारा हवा. त्यामुळे हिप्स कव्हर होतील. पँट किंवा लेगिंगदेखील घोटय़ाएवढय़ा उंचीची हवीच.
केसांचा बन वर उंचीवर बांधायला हवा. त्यामुळे गोल चेहऱ्यामुळे वाटणारी जाडी कमी वाटेल. १९६० च्या दशकातल्या अभिनेत्री केसांचा फुगा काढून हेअरस्टाइल करायच्या तसा पफ काढलेला चालेल. त्यामुळे चेहऱ्याची लांबी जास्त वाटेल. उंचीचा आभास निर्माण होईल आणि परिणामी जाडी झाकली जाईल. खरं तर फॅशनबरोबरच तुझी लाइफस्टाइल बदलण्याचा प्रयत्न करायला हवा. त्यामुळे खरा मेक-ओव्हर होईल. ऑल द बेस्ट!