प्रत्येक रंगाला एक व्यक्तिमत्त्व असते आणि व्यक्तिमत्त्वाचा
एक रंग.  तुमचा रंग कोणता ?
फॅशनमध्ये रंगाचे अनन्यसाधारण आहे. व्यक्तिमत्त्वाला उठाव देण्यात रंग कशी जादू करतात, हे मागच्या लेखात सांगितले होते. प्रत्येक मूडसाठी, प्रत्येक व्यक्तिमत्त्वासाठी रंग असतोच. पण आपण आपल्यावर उठून दिसणारा म्हणून किंवा आवडता रंग म्हणून एखादाच रंग का निवडतो, याचा विचार कधी केला आहे का?
एखाद्या व्यक्तीचा आणि एखाद्या रंगाचा संबंध कसा, हे मानसशास्त्रज्ञदेखील शोधत आहेत. मार्केटिंग रिसर्चरसुद्धा याचा अभ्यास करतात आणि अर्थातच फॅशन डिझायनरही याचे उत्तर शोधताहेत. वेगवेगळ्या कलर थिअरीजचा अभ्यास करून त्याप्रमाणे आपल्या कामात, डिझाईन्समध्ये ते बदल करताहेत. एखादा रंग एखाद्या व्यक्तीला का आवडू शकतो, याचे उत्तर जगभरातील शास्रज्ञांनी शोधायचा प्रयत्न केला आहे. आपल्या परीने त्याची उत्तरेही दिली आहेत. एखाद्याचा आयुष्याकडे बघायचा दृष्टीकोन, त्याचे व्यक्तीमत्त्व त्याला एखाद्या रंगाकडे आकर्षित करू शकते. त्याचप्रमाणे एखादी व्यक्ती ठराविक वेळी कुठल्या मानसिक अवस्थेतून जात आहे, त्यानुसारही रंगाची पसंती ठरू शकते.
रंगाची निवड आणि व्यक्तिमत्त्व यांचे नाते आहेच. जाहिरातींमधून रंग आणि व्यक्तिमत्त्व यांची सांगड घातलेली अनेक वेळा दिसेल. त्याचबरोबर फॅशन इंडस्ट्रीनेदेखील याची वारंवार सांगड घातलेली आहे. सिनेमांमध्येसुद्धा प्रतीक म्हणून रंग वापरण्यात येतात ते याच भावनेने. नकारात्मक भूमिका असणाऱ्या कलाकारांना भडक आणि काळ्या रंगाचे कपडे देण्यात येतात. एखादी अल्लड तरुणी नायिका म्हणून दाखवायची असेल तर व्हायब्रंट गुलाबी, निळा असे रंग वापरण्यात येतात. भूमिकेला न्याय देणारे कपडे तयार करताना रंगाचा विचार डिझायनरला करावाच लागतो.  
आजकाल व्यक्तिमत्त्वाला साजेसे रंग असण्याऐवजी रंगाची निवड सापेक्ष असते. याचाच अर्थ असा की, फॅशनमध्ये कुठला रंग आहे, कुठल्या रंगाचा ट्रेंड हिट आहे त्यानुसार लोक आपल्या आवडीचे रंग ठरवतात. पण रंगाची अशी ट्रेंडनुसार केलेली पसंती आपला खरा रंग सांगू शकत नाही. प्रत्येक रंगाला व्यक्तिमत्त्व असते. त्याला जुळणाऱ्या व्यक्तीला तो रंग आवडतो. रंगाच्या चॉईसवरून तुमचे व्यक्तिमत्त्व तपासणे आता तंतोतंत असू शकत नाही. कारण तुम्हालाच तुमच्या रंगाची खरी ओळख नसते.
आपला रंग कोणता हे जाणून घेण्यासाठी आपल्या व्यक्तिमत्त्वाचा रंग शोधण्यासाठी ही छोटी क्विझ आपली आपल्याला घेता येईल. याच्या उत्तरांवरून तुमचा रंग सापडतोय का बघा.

१.    हे केल्याशिवाय/ घातल्याशिवाय तुम्ही बाहेर जात नाही …
 अ) लिपस्टिक/ लिपग्लॉस; ब) घडय़ाळ;
क) स्कार्फ/ स्टोल; ड) बोल्ड ज्वेलरीतला एखादा दागिना; इ) डोळ्यांचा मेक-अप;
फ) पर्स/ हँडबॅग

२. तुमचे कपडे साधारण असे असतात
    अ) इन कट्स, डीप नेकलाईन; ब) कॉलर्स;
क) बेसिक एम्ब्रॉयडरी;
ड) प्लेन; इ. प्लीट्स;
फ) सेल्फ डिझाईन किंवा फ्लोरल प्रिंट्स

३. तुमच्या ऑफिसमध्ये क्लाएंटसमोर प्रेझेंटेशन आहे. तुम्ही काय घालाल?
    अ) तुमच्या कलेक्शनमधला शॉर्ट स्कर्ट;
ब) छान इस्त्री केलेला फॉर्मल शर्ट आणि ट्राउजर्स;   क) कपडय़ांचा फार विचार करणार नाही. पण साधेसेच, शोभतील असे कपडे घालीन;  
 ड) बेसिक फॉर्मल्स. पण त्यावर उठावदार अ‍ॅक्सेसरीज;   
इ) क्लासिक फॉर्मल शर्ट आणि जॅकेट खाली नॅरो स्कर्ट आणि बेसिक अ‍ॅक्सेसरीज
    फ) साधा प्लेन शर्ट आणि स्ट्रेट ट्राउझर्स, कम्फर्टेबल असणं महत्त्वाचं.
४. पार्टीत बॉलिवूड थीम आहे, तर तुम्ही काय ड्रेस घालाल?
    अ) फॅशनमघील प्रियंका चोप्रासारखा
    ब) कॉर्पोरेटमधील बिपाशा बसू
    क) पेज थ्री मधील कोंकणा सेन-शर्मा
    ड) देवदासमधील माधुरी दीक्षित<br />    इ) डॉनमधील झीनत अमान
    फ) जोधा अकबरमधील ऐश्वर्या राय

५. तुम्ही तुमच्या आवडत्या मुलाबरोबर पहिल्या डेटला जाताय. काय घालाल?
    अ) लेसचा स्लिम फिट वन पिस ड्रेस
    ब) व्यवस्थित मापाचा चुणीदार आणि कुर्ता
    क) लूज फिट बॉट्मस वर स्लिम फिट शॉर्ट टय़ुनिक;  ड) जीन्स आणि साधासा टॉप;  इ) फुल लेंथ नॅरो ड्रेस आणि जॅकेट;
फ) हलका फुलका ड्रेस आणि वर स्टोल

उत्तरांमध्ये अधिक..
अ.     असतील तर तुमचा रंग     – लाल
ब.     अधिक असतील तर     – निळा
क.     अधिक असतील तर     – हिरवा
ड.     अधिल असतील तर     – पिवळा
इ.     अधिक असतील तर     – काळा
फ.     अधिक असतील तर     – पांढरा