सिलोएट्स किंवा कपडय़ांचे आकार तुमच्या फिगरमधली वैगुण्य झाकण्यासाठी कशी जादू करतात ते सांगणारा हा लेखाचा दुसरा भाग. सिलोएट म्हणजे बाह्य़ाकार. म्हणजेच एखाद्या व्यक्तीने कपडे परिधान केल्यानंतर त्याचा आकार कसा दिसेल याचे वर्णन. तुमच्या-आमच्यासाठी हे फक्त पॅटर्नस् असले तरी फॅशन डिझायनर्ससाठी तुमच्या शरीराच्या प्रत्यक्ष आकारातून आभासी आकार निर्माण करण्यासाठीचे हे एक प्रभावी आयुध असते.  कोणत्या सिलोएटमुळे काय परिणाम साधला जाईल, याचा थोडा विचार केला, तरी स्वत:चं स्वत:लाच सगळी जादू उमगत जाईल. कपडय़ांच्या आकाराचे म्हणजेच सिलोएट्सचे हे प्रमुख प्रकार त्यासाठी पाहिले पाहिजेत.  

आयत किंवा रेक्टँगल
हा बाह्य़ाकार बहुधा पुरुषवर्गाकडून जास्त वापरला जातो. मुलांचे टी-शर्ट्स आयतकार असतात, लांबी जास्त पण रुंदी कमी. यातही कमरेचा आकार वेगळा लक्षात येतच नाही, बहुधा म्हणूनच हा प्रकार स्त्रिया, मुली वापरताना दिसत नाहीत. मात्र पोटावरची अनावश्यक चरबी किंवा कमरेच्या वळ्या या कपडे प्रकारात सहज झाकले जातात.

बेल
विसाव्या शतकाच्या पूर्वीपासून हा कपडय़ांचा बाह्य़ाकार वापरात आहे. यात कपडा कमरेशी आवळलेला असतो व पुढे घंटेप्रमाणे दोन्ही बाजूंना वाढत जातो. पोट, नितंब आणि मांडय़ा झाकून टाकतो. याचीच बदललेली प्रगत रूपे म्हणजे ‘मर्मेड’ किंवा ‘फिश टेल’ हे बाह्य़ाकार. यात पाश्र्वभागापासून मांडय़ांपर्यंत कपडा अंगासरशी असतो तर नंतर दोन्ही बाजूंनी शेवटपर्यंत रुंदावत व लांबत जातो. या प्रकारात नितंबांचा आकार प्रदर्शित होतो, पण मांडय़ा मात्र झाकल्या जातात. त्यामुळे ज्यांच्या मांडय़ा जाड आहेत त्यांनी हे वापरायला हरकत नाही. पण पाश्र्वभाग प्रमाणात नसणाऱ्यांनी मात्र याचा वापर टाळावा.

व्ही-कट
हा बाह्य़ाकार ए-लाइनच्या बरोबर विरुद्ध असतो. आणि प्रामुख्याने पुरुषवर्गाच्या विशिष्ट कपडय़ांसाठी वापरला जातो. पुरुषांच्या फॉर्मल ड्रेसिंगसाठी- उदा. ब्लेझर. पुरुषांच्या खांद्यांकडे रुंद व कमरेकडे निमुळता होत जाणारा कपडय़ाचा प्रकार हे यांचे उत्तम उदाहरण. यामुळेच सर्वच पुरुष ‘सूट’ मध्ये रुबाबदार  दिसतात. हाच कपडय़ाचा प्रकार ‘पेन्सिल ट्राउझर, आणि स्कर्ट्स’मध्ये वापरात येतो, यामुळे हे कपडे परिधान करणाऱ्या व्यक्तीच्या मांडय़ा शिडशिडीत दिसतात.

ए-लाइन
हा कपडय़ाचा आकार बहुतकरून स्कर्ट किंवा पाश्चिमात्य वस्त्रप्रावरणासाठी वापरला जातो. यात कपडय़ाचा आकार इंग्रजी मुळाक्षर कॅपिटल ‘ए’सारखा दिसतो. वरून कमी आणि कण्र्याच्या ठिकाणाहून तो पसरत जातो. याचा फायदा म्हणजे घालणाऱ्या व्यक्तीचा पाश्र्वभाग प्रमाणापेक्षा मोठा असेल तरी सहज झाकला जातो. एवढेच नव्हे तर कपडय़ाचा हा बाह्य़ाकार तुम्हाला लहानशा शाळकरी मुलीचा लूक मिळवून देतो. थोडक्यात यात स्त्री तरुण भासू शकते.

स्लिम
हा बाह्य़ाकार आयताकृतीशी साधम्र्य दाखवतो, फक्त यात कपडय़ाची रुंदी कमी असते. या प्रकारात शिवलेला कपडा अंगासरशी बसतो आणि आपला नसíगक आकार सहज दर्शवतो. म्हणूनच जर शरीरावर अतिरिक्त चरबी असेल तर तीही यात दिसून येते. सध्या मुली, स्त्रिया घालत असलेले कुत्रे, खमीज याच प्रकारची उदाहरणे आहेत.

चौरस किंवा स्क्वेअर
कपडय़ाच्या या बाह्य़ाकारात कपडय़ाची लांबी व रुंदी सारखीच असते. कमरेची गोलाई दाखवण्यासाठी यात कोणतीच सोय नसते. साधारण ऐंशीच्या दशकात असे कुत्रे मोठय़ा प्रमाणात वापरात होते. पण गंमत म्हणजे सगळ्यांनाच हा प्रकार चांगला दिसतोच असे नाही. कारण फक्त सपाट पोट असलेल्या व्यक्तींना हे छान शोभून दिसतात.

अवरग्लास
व्ही-कट आणि ए-लाइन या दोन्ही बाह्य़ाकारांचा सुंदर मिलाफ म्हणजे ‘अवरग्लास’. हा बाह्य़ाकार, स्त्रियांच्या बांध्याच्या आदर्श मोजमापाचे निदर्शक असतो. प्रमाणबद्ध शरीर असलेल्या स्त्रियांनी अशा आकारातील कपडय़ांचा आवर्जून वापर करावा. स्त्रियांच्या इव्हिनिंग गाऊन्स, आणि काही पाश्चिमात्य प्रावरणामध्ये हा प्रकार वापरला जातो. या प्रकारात, स्त्रियांच्या शरीराचा आकार फार सुंदर पद्धतीने प्रदíशत होतो. म्हणूनच असा सुडौल बांधा असणाऱ्या स्त्रियांनीच कपडय़ांमध्ये हा बाह्य़ाकार वापरणे योग्य.

एक्स्पर्ट अॅडव्हाइस
या फंक्शनला कुठला ड्रेस घालावा, आपल्या कांतीला कुठला रंग उठून दिसेल, या ड्रेसमध्ये जाड तर दिसणार नाही ना, ही फॅशन शोभून दिसेल ना.. असे नाना प्रश्न आपल्याला पडत असतात. प्रत्येक वेळी खास ड्रेस डिझायनर गाठणं काही जमत नाही आणि परवडत नाही. पण तुमच्या आऊटफिट्सविषयी, फॅशनविषयीच्या शंकांना या कॉलममधून डिझायनर मृण्मयी मंगेशकर उत्तरं देतील. आपला प्रश्न व्यवस्थित वर्णनासह आमच्याकडे viva.loksatta@gmail.com या आयडीवर पाठवा. सोबत तुमचं नाव, वय आणि आपले राहण्याचे ठिकाणही आम्हाला सांगा. सब्जेक्ट लाइनमध्ये फॅशन पॅशन असा उल्लेख करायला विसरू नका.