मी ३२ वर्षांची नोकरी करणारी विवाहित स्त्री आहे. माझा रंग सावळा असून मध्यम बांधा आहे. उंची पावणेपाच फूट आहे. मला कोणत्या प्रकारचे कपडे सूट होतील. माझी उंची कमी असल्याने मी या बाबतीत कनफ्यूज आहे. बऱ्याचदा मी साडीच नेसते. प्लीज मला नवीन काही सुचवा.
-निर्मला
प्रिय निर्मला,
तू केलेल्या वर्णनावरून तुझी उंची हा कन्फ्यूजनचा मूळ मुद्दा दिसतो. तुला असे कपडे निवडले पाहिजेत, ज्यात तुझी उंची जास्त असल्याचा आभास निर्माण होईल. माझ्या अगोदरच्या लेखांमधून मी याविषयी लिहिले आहे. काही कपडय़ांचे प्रकार, प्रिंट्स, डिझाइनचे प्रकार वेगवेगळे आभास निर्माण करतात. तू म्हणालीस की, तू बऱ्याचदा साडीच नेसतेस. साडी हा प्रकार खरंच सुरक्षित फॅशनचा प्रकार आहे. कारण साडीने फॉर्मल लूक तर मिळतोच, पण त्याचबरोबर एक क्लासी टच मिळतो. साडीचा प्रकार आणि ब्लाऊजचा कट यावरून वर उल्लेखलेला आभास निर्माण करता येऊ शकतो. कुठलीही सॉफ्ट साडी तू वापरू शकतेस. म्हणजे शिफॉन, जॉर्जेट किंसा तत्सम मटेरिअलची साडी तुला चांगली दिसेल. पण कुठल्याही साडीवर मोठे प्रिंट किंवा स्कर्ट बॉर्डर, रुंद काठ या गोष्टी तू टाळायला हव्यास. कारण या डिझाइनमुळे तू बुटकी दिसशील. ब्लाऊज स्लीव्हलेस, मेगा स्लीव्हज वापरू शकतेस आणि डीप नेक किंवा मीडियम नेकमध्ये ब्लाऊज शिवू शकतेस. यामागचा उद्देश असा आहे की, तुझे हात जितके मोकळे किंवा उघडे दिसतील तेवढे ते लांब असल्याचा आभास निर्माण होईल. नेकलाईन ओपन ठेवायला हवी.
साडीव्यतिरिक्त तू कुर्ती आणि लेगिंग्ज घालू शकतेस. ऑफिससाठी आजकाल स्त्रिया हाच पोशाख करतात. कुडत्याची लांबी तुझ्या गुडघ्याच्या खाली दोन इंच इतकी आली पाहिजे, म्हणजे तू उंच दिसशील. शॉर्ट कुर्ती घालायला हरकत नाही. पण तू बारीक असलीस तर त्या चांगल्या दिसतील. इथेदेखील तुझ्या बाह्य़ांची फॅशन आणि नेकपॅटर्न याकडे लक्ष दे. ब्लाऊजविषयी सांगितलं तेच इथेही लक्षात ठेवलं पाहिजे. ओपन नेक आणि कमी बाह्या कुर्त्यांलादेखील तशी फॅशन हवी.
कुर्तीसाठी सॉफ्ट कॉटन, लिनन, जॉर्जेट, शिफॉन किंवा हलकंफुलकं कुठलंही कापड वापरायला हरकत नाही. निटेडवेअर शक्यतो टाळलेलं बरं. कारण त्यात मुली थोडय़ा जाड दिसतात. जाड दिसलं की उंची कमी असल्याचा आभास होतो.
आता रंगाविषयी बोलू. काळा, पांढरा, क्रीम, बेज, टॅन, ग्रे, रॉयल ब्लू, इंडिगो, इंग्लिश ग्रीन, लाईन ग्रीन, रस्ट, लाईट ऑरेंज, टोमॅटो रेड, क्रिमसन, मरून, वाईन, ब्राऊन.. कुठलाही रंग निवडलास तरी त्याची तीव्रता किंवा गडदपणा फार नसेल याची काळजी घे. टॉपसाठी बॉटम्सपेक्षा हलके रंग वापरायला हवेत.
डिझाइनच्या बाबतीत, कुठलाही ड्रेस किंवा कुडता दोन समान भागात शिवला जात असेल तर ते टाळायला हवं. कारण त्यामुळे तू बुटकी दिसू शकतेस. एम्पायर लूकसारखे योक पॅटर्न वापरले तर आणखी उंच आणि बारीक दिसशील. कापडावरच्या तिरक्या रेषा किंवा उभ्या रेषा उंच दिसायला मदत करतात. लेहरिया प्रिंटसारखी फॅशन त्यामुळे तुला चांगली दिसेल.
उंच असल्याचा आभास निर्माण करण्यासाठी तुझी हेअरस्टाईलही महत्त्वाची आहे. उंच बांधलेली पोनीटेल किंवा अंबाडा उंच असल्याचा आभास निर्माण करेल. मानेवर बांधलेले केस, पोनी किंवा वेणी यामुळे तू बुटकी दिसशील. इतर अॅक्सेसरीजसुद्धा उंच दिसायला मदत करतील अशाच वापरायला हव्यात. हाय हिल्स त्यासाठी उपयुक्त आहे.
वेस्टर्न वेअर घालणार असशील तर गुडघ्यापर्यंत उंचीचे स्कर्ट, लो वेस्ट जीन्स आणि ट्राउझर्स वापरायला हवेत. शॉर्ट टॉप चांगले दिसतील. कुठल्याही परिस्थितीत हाय कॉलर ड्रेस किंवा कॉलरचे टॉप घालणं टाळ. ऑल द बेस्ट!
तुमचे प्रश्न पाठवा
तुमच्या फॅशनविषयीच्या शंका आमच्याकडे पाठवा. फॅशन स्टायलिस्ट मृण्मयी मंगेशकर त्यांना या सदरातून उत्तर देतील. सब्जेक्टलाईनमध्ये फॅशन पॅशन लिहायला विसरू नका. आमचा आयडी- viva.loksatta@gmail.com