प्रसिद्ध मॉडेल आणि बॉलिवूडची स्टाइल दिवा म्हणून ओळखली जाणारी मलाइका देतेय स्टाइल टिप्स खास व्हिवाच्या वाचकांसाठी.
हाय, मी शिवानी. मी अठरा वर्षांची असून, माझे वजन ४५ किलो आणि उंची ५ फूट २ इंच आहे. माझा वर्ण मध्यम गोरा आहे. माझी वनपीस ड्रेस घालून पाहायची इच्छा आहे. कोणत्या प्रकारचा वनपीस ड्रेस मला शोभून दिसेल? तसेच योग्य मेकअपबद्दलही काही टिप्स आपल्याकडून मिळू शकतील का? – शिवानी
हाय शिवानी,
इट्स गुड, शिवानी! योग्य वयात तू स्टायिलग आणि मेकअपबद्दल सल्ला विचारते आहेस. नुकतंच तू तारुण्यात पाउल टाकलं आहेस, तेव्हा वेळीच हे फॅशन फंडाज स्पष्ट झाले तर आपोआप आत्मविश्वास वाढेल. पुढील आयुष्याचा जास्तीत जास्त काळ, आत्मविश्वासाने फॅशनेबल राहणं तुला सहज शक्य होईल. सध्या मोस्ट इन असलेली फॅशन म्हणजे. वनपीस ड्रेस. हा प्रकार घालून पाहायची तुझी इच्छा आहे, फारच छान. तुझं वजन तुझ्या उंचीला अगदी साजेसं आहे, तेव्हा इतर ड्रेसचे प्रकारही ट्राय करायला काहीच हरकत नाही. तुझ्या वयाला, स्केटर ड्रेस ही शोभून दिसेल. हा ड्रेसचा प्रकार अंगासरशी बसत असल्याने, तुझी बांधेसूद कंबर ही यात दिसून येईल. (स्केटर ड्रेस – गुडघ्यांपर्यंत किंवा त्यापेक्षा थोडय़ा कमी लांबीचा वनपीस फ्रॉकसारखा ड्रेस, यात फक्त स्कर्ट ही असू शकतात त्यांना स्केटर स्कर्ट असे म्हणतात.) या ड्रेसवर तू कार्डिगन (पातळ स्वेटर वजा जाकीट) घातलेस तर , मित्रमत्रिणी, कॉलेजसाठी एकदम युथफुल स्टाइल होईल. थोडक्यात, नेहमी कोणत्याही ड्रेसवर आणि कधीही घालता येईल असे एखादे काळे किंवा ग्रे रंगाचे कार्डिगन पर्समध्ये ठेवलेले चांगले. तुझ्यासाठी चालेल असा आणखी एक ड्रेसप्रकार म्हणजे क्लासी रॅप ड्रेस (याप्रकारात नी लेन्थ म्हणजे गुडघ्यापर्यंत लांबीचा वनपीस ड्रेसची एक बाजू दुसरीवर गुंडाळून गाठीने/ बटणाने बांधली जाते, परिणामी ड्रेसच्या गळ्याशी साधारणपणे इंग्रजी व्ही आकार तयार होतो.) यावर शानदार हील्स असलेले शूज किंवा चमकदार चपला जोड घातले की कम्प्लीट स्टायलिश लुक यायलाच हवा. रॅप ड्रेस प्रकाराचा आणखी एक फायदा म्हणजे आपल्या बांध्यातील अयोग्य, आक्षेपार्ह गोष्टी झाकल्या जाऊन, शरीर सुडौल दिसायला मदत होते.
आता आपण मेकअप टिप्सबद्दल बोलूया. तुझा रंग बऱ्यापकी उजळ असल्याने, तुझ्या ओठांवर चमकदार लिप कलर उठून दिसतील. उठावदार रंगसंगतीतील पोवळ्याचा रंग (कोरल) किंवा गडद गुलाबी रंगाने तुझ्या चेहऱ्याला झळाळी येईल. पण त्याच वेळी डोळ्याचा मेकअप मात्र हलकाच ठेवायला हवा. यामुळे तुझ्या चेहऱ्यातील ओठ इतरांचे लक्ष वेधून घेतील आणि तुझ्या स्टायलिश मेकअपला पूर्णता येईल. रात्रीच्या पार्टीजमध्ये तू लाल लिपकलरचा खुशाल वापर कर, त्यावेळी तो रंग ग्रेसफुल आणि आकर्षक दिसतो. आता आपण केशरचनेबद्दल काय करता येईल का, ते पाहूया. तू पाठवलेल्या इ मेलमध्ये तू स्वतच्या केसांबाबत लिहिलेले नाहीस. म्हणजे तुझे केस किती लांब आहेत याचा अंदाज आलेला नाही. पण पार्टीज किंवा मित्रमत्रिणींमध्ये किंवा कॉलेजमध्ये जाताना तुला आवडत असेल तर केसाच्या वेगवेगळ्या स्टाइल्स तुला करता येतील. कधी केस मोकळे सोडता येतील. वेणीचेही हल्ली अनेक प्रकार करता येतात. या प्रकारांमध्ये तुझा लुक मस्त मॉड तरीही गर्ली, गोजिरवाणा दिसेल हे नक्की.
मलाइका अरोरा खान
(अनुवाद – गीता सोनी)
सौजन्य – द लेबल कॉर्प
http://www.thelabelcorp.com, http://www.theclosetlabel.com
आपल्या गर्ल्स गँगबरोबर सकाळी ब्रंचला जाणार आहात की रात्री पार्टीचा प्लॅन आहे? काय घालू, कसं दिसेल या प्रश्नांची उत्तरं शोधण्यासाठी स्टाइल दिवा मलाइका अरोरा-खान तुम्हाला मदत करेल. फॅशन, कपडे, हेअर, स्टाइलिंग याबाबतच्या तुमच्या शंकांना मलाइका या सदरामधून उत्तरं देईल. फॅशन आणि स्टाइलिंगविषयीचे आपले कोणतेही प्रश्न viva@expressindia.com या इमेल आयडीवर बिनधास्त पाठवा. आपलं नाव, राहण्याचं ठिकाण यांसह प्रश्न पाठवा आणि सब्जेक्ट लाइनमध्ये स्टाइलिंग बाय मलाइका असं आवर्जून लिहा.